" मला माहित आहे, मी नवीन आहे इथे.. तरी बोलतो... दिवसाचे २४ तास, त्यातले झोपेचे ८ तास सोडले तर उरलेल्या १६ तासातले.... जवळपास १० तास आपण इथे ऑफिस मधे असतो. घरी गेल्यावर सुद्धा घरातल्याशी इतके बोलणे होतं नाही , जेव्हडे आपण इथल्या लोकांशी बोलतो. एक प्रकारचे कुटुंबच आहे ना हे सगळे.. आणि कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस आपणच साजरा करणार ना.. माहीत आहे तुम्ही कामात सतत बिझी असतात.. म्हणून ... जास्त नाही... फक्त १०-१५ मिनिटांसाठी वेळ काढा... थँक्स.. " म्हणत विनय निघून गेला.
विनय निघून गेला तरी अनुजा तिच्या बोलण्याचा विचार करत होती. कारण पहिल्यांदा असं कोणी तरी थेट बोलत होते कोणी. बरेच जण बोलायचे तिच्याशी, काही कामानिमित्त ... आणि उरलेले तिची स्तुती करण्यासाठी फक्त....एक दिक्षा सोडली तर तिच्याशी पर्सनल बोलायला कोणीच नव्हते. आतातर दिक्षाशी बोलणे होतं नाही. आधी बोलायचो तरी. तिलाही आठवलं, घरी कोणाच्याही लक्षात नाही , या महिन्यात माझा वाढदिवस होता ते. संद्याकाळी घरी पोहोचली तेव्हा तिने पहिले आईला विचारलं. " मॉम .... या महिन्यात काही होते का... माझ्या लक्षात नाही. तुला आठवते का बघ. " आईला तर नाहीच , तिच्या वडिलांनाही विसर पडलेला. अनुजा रात्री न जेवताच झोपली. हे आपल्या जगात बिझी असतात, पप्पा त्यांच्या बिजनेस मध्ये आणि आई तिच्या मैत्रीणी मध्ये... माझ्यावर लक्ष तरी कुठे असते यांचे.... आज जेवली नाही ,ते सुद्धा माहित नाही यांना. ऑफिस मधल्या सगळ्या लोकांचे मेल आले वाढदिवसाच्या शुभेच्छाचे. पण खरच का ... इतके सगळे बिझी झालेत कि आपणच वेगळे राहत आहोत या पासून... रात्रभर विचार करत होती.
ठरल्याप्रमाणे, पुढल्या दिवशी सर्व ४ वाजता जमा झाले. विनयने नजर टाकली सर्वावर. त्या " ४ " पैकी कोणीच नव्हते. जरासा नाराज झाला स्वतःवर. पण पुढच्याच क्षणाला जरा कुजबुज सुरु झाली. कारण अनुजा आलेली ना. सगळयांना आश्चर्य वाटलं. त्याचीच कुजबुज होती ती. पण ती आली तशी एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. विनय त्यावर काही बोलणार तर अनुजाचं बोलली... " मी फक्त cake cutting .... बघायला आली आहे.. जास्त कोणी फोर्स करू नका.. " ती आलेली हेच खूप होते. उरलेल्या लोकांनी केक कापला, मिळून खाल्ला. सारेच आनंदात. पहिले असे असायचे सोहळे इथे. त्यामुळे सगळ्यांना आवडले हे. अनुजा केक खाण्यास थांबली नाही. तरी विनयने ४ डिश मध्ये केक घेतला. " त्या " चौघांसाठी ४ डिश... पहिला तो अनुजाकडेच गेला. तिच्या पुढ्यातच केक ठेवला.
" मला माहित आहे, तुम्ही असलं काही खात नसणार. तुमचा फिटनेस पाहिला कि कळते ते, तरी लहानसा तुकडा आणला आहे... तुम्ही आलात , खूप बरं वाटलं... प्लिज .. एवढंसं खा... प्रेमाने आणला आहे. " विनय केक ठेवून पट्कन निघून गेला. अनुजाला हसू आले. पण काही म्हणा... तिलाही बरं वाटलं.
पुढचा स्टॉप , अव्या.. विनय जरा घाबरतच त्याच्या डेस्क वर गेला. स्वारी कामात बिझी. विनयने गुपचुप त्याच्या समोर डिश ठेवली आणि सटकला. अव्याने एकदा पाहिलं केक कडे... आणि विनयला हाक मारली..
" अय बुलेट... " ,विनय थांबला
" बुलेट ?? " विनयने उलट विचारलं.
" बुलेटचं आहे ना तुझ्याकडे... तुझं नावं लक्षात नाही... ये इकडं... " अव्या केक खात म्हणाला. विनयला जरा भीती वाटली. " बस " घाबरतच बसला.
" मी येणार होतो.. मुद्दाम आलो नाय .. पुन्हा कोणी बघितलं तर भांडणं होतील म्हणून.. तुला का थांबवलं... बोलायचं होता तुझ्या बरोबर... " ,
" बोला ... " ,
" गेल्या महिन्याभरात तुला सगळं ऑफिस ओळखायला लागलं... हिरो झालास तू.. गाणी म्हणतोस ... गिटार वाजवतो... हे आवडते सगळ्यांना... पण त्यापेक्षा सगळे जमतात एकत्र ... ते आवडलं मला... महिन्याभरात वातावरण बदलून टाकलास मित्रा... मानलं पाहिजे तुला... सगळे एकत्र जमतात.. गप्पा मारतात.. हसतात , बोलतात , मस्करी करतात.. छान वाटते.. असंच होते पहिले ऑफिस... फक्त एक... हे जे सुरु केलं आहेस ना.. ते सांभाळून कर.. कारण तुला भूतकाळ माहित नाही.. असो, छान वाटलं... केक सुद्धा लय आवडला. तूच आणला असणार.. आणि हा अनुजाच्या आवडीचा आहे... हेही माहित आहे मला.. ",
" हो.. आधी तुमच्याकडे होते ना हे.. कोणता केक आणायचा ते... चंदन ने सांगितलं मला.. " ,
" बरं... आता आला आहेस तर जरा माझ्या PC च काम आहे बघ... " ,
" ५ मिनिटांनी येतो.. " चंदन हेमंतच्या दिशेने गेला.
" Hi हेमंत.. हे तुझ्यासाठी ... " विनयने हेमंत समोर डिश धरली.
" हे बघ.. तुझं नाव काय आहे माहित नाही मला.. आणि त्यात इंटरेस्ट पण नाही. " ,
" अरे पण केक आणला आहे फक्त तुझ्यासाठी.. तू नव्हता ना तिथे... " विनय बोलला.
" तो घेऊन जा... आणि सरळ सांगतो... मी नेहमी तोंडावर बोलतो... सरळ बोलतो... ते फिरवून फिरवून बोलणे जमत नाही. ऐक... हे जे तू सुरु केलं आहेस ना... सगळा बनाव आहे. कोणाला इंप्रेस करायचे आहे माहित नाही... मोठ्या सरचा चेला आहेस म्हणून सगळं खपवून घेतो आहे.. तरी... जोपर्यंत मी आहे इथे तोपर्यंत दुसरं कोणीच माझ्या समोर उभं राहू शकत नाही.. जास्त दिवस टिकणार नाही हे... हेमंत नाव आहे माझं.... लक्षात राहू दे... " असं म्हणत हेमंत निघून गेला. काय झालं याला... मी तर फक्त केक देयाला आलो होतो. आणि मी कुठे कोणाला इंप्रेस करतो आहे. येडाच आहे हा... स्वतःशीच हसला विनय आणि दिक्षा कडे गेला.
" Hi .... " विनयने दिक्षाला हाक मारली. तिने कानाला इअरफोन लावले होते. " Hi .. " विनयने पुन्हा हाक मारली. तरी तीच लक्ष नाही. मग विनयने केक तिच्या पुढ्यात ठेवला.
" हे काय ? " तिने वळून पाहिलं विनयकडे.
" याला इंग्लिश मध्ये cake असे म्हणतात ... तुझ्यासाठी आणला. ",
" थँक्स .. पण नको आहे मला... नाही खात मी... नाही आवडत मला... " ,
" पहिलं तर आवडायचे ना... " विनयच्या या वाक्यावर दिक्षा काही बोलली नाही. " काही नसते असे.. मज्जा करायची. छान जगायचे... का कोणावर रुसून राहायचे.. कोणाशी अबोला धरायचा ... कशाला ते.. आणि तुम्ही आधी तर मित्र होता ना सगळे छान.. मग... " दिक्षा केक कडे पाहत होती.
" खा ... तुझ्यासाठीच आणला आहे... तू आली नाहीस तिथे... आली असती तर बर वाटलं असते मला..नक्की खा... पुन्हा सांगतो.. असं नाही राहायचे गप्प गप्प... एकच life आहे ना... जगून घेयाचे प्रत्येक वेळेस .. " दिक्षाने केक घेतला हातात. " आणि हा आणखी एक.. " विनयने आणखी एक डिश ठेवली तिच्या समोर.
" हा कशाला आता... " ,
" हा तुझ्या ड्रेस साठी.. मला blue color खूप आवडतो... आणि तुझे ड्रेस खूप छान असतात, त्याबद्दल खूप ऐकलं होते... म्हणून एक माझ्याकडून केक.. दुसरं कारण, तुझ्या आता येणाऱ्या smile साठी... .. आली बघ... " खरच , ते बोलणं ऐकून दिक्षाच्या चेहऱ्यावर smile आली. " मला तुझी smile खूप आवडते... " विनय हसतच निघून गेला.
-------------------------- क्रमश: ------------------