आज पासून रुद्राचे साक्षीदार साक्ष देणार होते. खून करतानाची व्हिडीओ असूनही रुद्राने खुनाचा आरोप धुडकावून लावला होता! कशाच्या जोरावर? हाच प्रश्न दीक्षितांना आणि प्रेक्षकांना पडला होता. म्हणून आजही न्यायालयाचा तो कक्ष भरगच्च भरला होता. रुद्रा काय दिवे लावणार? हीच भावना दीक्षितांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
कोर्टाचे कामकाज सुरु झाले.
"रामगोपाल हाजीर हो SSS !!" साक्षीदारांचे नाव पुकारण्यात आले.
रामगोपालने दबकतच कोर्टात पाऊल टाकले. कोर्टाची पायरी चढण्याची हि त्याची पहिलीच वेळ असावी. तो खूप भेदरलेला दिसत होता.
त्याने साक्षीदाराच्या पिंजऱ्यात,पिंजऱ्याचा लाकडी काठ गच्च धरून ठेवला होता. त्याचे हात आणि पाय लटपटत होते. घश्याला कोरड पडली होती. हि श्रीमंतांची लफडी अन गरिबाला हकनाक ताप असे काहीसे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट वाचता येत होते.
"रामगोपालजी, घाबरू नका. तुम्हास काहीही त्रास होणार नाही. सगळ्यात आधी न्यायमूर्तींना नमस्कार करा. तुम्हास माहित नसेल म्हणून सांगतोय." रुद्राने रामगोपालला शांत करण्याचा प्रयत्न केला. रामगोपाल थोडासा स्थिरावला. त्याने न्यायासनास हात जोडून नमस्कार केला.
"आता तुमचे नाव,वय, पत्ता, कोर्टास सांगा!" रुद्रा म्हणाला.
"नाव -रामगोपाल. वय- पंचेचाळीस. राहणार वजिराबाद नांदेड. "
"आपण काय करता?"
"मी सेक्युरिटी इन्चार्ज आहे!"
"कोठे?"
"ओम मॉल मध्ये. "
" हा मॉल कोठे आहे?"
"डेक्कन जवळ, पुण्यात."
"या मॉल मध्ये किती दिवसान पासून कार्यरत आहेत?"
"झाले असतील वीस वर्ष." रामगोपाल आता सरावला होता. त्याच्या आवाजातला कम्प कमी झालेला रुद्राला जाणवला. तो मुख्य विषयाकडे वळला.
" बर, तुम्ही मला ओळखता?"
" हो!"
"कसे ?"
"तुम्ही बरेचदा मॉल मध्ये येत होता."
"मॉल मध्ये वरच जण येत असतात. त्यातले काही नियमितहि येत असतील. मग मीच कसा तुमच्या लक्षात राहिलो?"
"सांगू का नको?" रुद्राकडे पहात रामगोपाल म्हणाला.
"सांगा. तुम्हाला माहित असलेले सगळे सांगा. त्या साठीच तर तुम्हाला बोलावलंय!"
"बरेचदा मी तुम्हाला 'चोरी' करताना पकडलाय!"
"एखादा प्रसंग कोर्टास सांगा!"
"एक दिवस हे महाराज मला पेन चोरी करताना सीसीटीव्हीत दिसले!"
"मग?"
"मी एक्सिट गेटवर थांबवून झडती घेतली आणि 'अनपेड' पेन जप्त केले!"
"मग?"
" मग. काही नाही! 'तुम्हाला हे शोभत नाही' अशी समज देऊन सोडून दिले. "
"दुसरा एखादा प्रसंग सांगू शकाल?"
"हो! त्या दिवशी एक छोटोशी शेविंग क्रीमची ट्यूब खिशात घालताना पकडले होते!"
"वारंवार तुम्ही मला पकडत होता. मला पोलिसात का नाही दिलेत?"
"कारण त्यात तुमची काहीच चूक नव्हती!"
"कशी?"
" कारण तुम्हाला 'उचलेगिरीची' लत होती. "
"लत?"
"लत म्हणजे सवय!"
"शेवटचा प्रश्न 'उचलेगिरी'ची तुम्हाला काय माहिती आहे? "
"'उचलेगिरी' म्हणजे नकळत वस्तू उचलणे किंवा चोरी करणे. असते एखाद्याला सवय त्यात काय मोठं?"
"माझी साक्ष संपली! दीक्षित सर, आपल्याला उलट तपासणी करावयाची आहे?" दीक्षितांकडे पहात रुद्राने विचारले.
"हो!" सरकारी वकील दीक्षित सावकाश उठत म्हणाले. अनुभवी मंडळींच्या पोटात गोळा उठला. आता ते अशे सावकाश उठले म्हणजे साक्षीदारांचे त्याच्याच शब्दात पकडून तीन तेरा करणार! थोडक्यात या रामगोपालाचे काही खरे नाही.
"रामगोपाल, तुम्ही मॉल मध्ये नौकरीस वीस वर्षा पासून कामाला आहेत. बरोबर?"
"हो!"
"या वीस वर्षात अशी 'उचलेगिरी' करणारी किती प्रकरणे तुमच्या पहाण्यात आलीत?"
"खूप! रोज दोन-चार तरी!"
"इतकी?" अविश्वासाने दीक्षितांनी विचारले.
" तीन -चार वर्षांची लेकरं घालतात खिशात काहीही!"
"अरे, तस नाही, या साहेबांच्या वयाची थोरली माणसे!"
" नाय एक पण नाय! हे एकटेच होते तशे!"
"मला, म्हणजे कोर्टाला सांगा, त्या पेनची किंमत किती होती?, जी साहेबानी खिशात घातली होती?"
" फक्त दहा रुपये!"
"आणि त्या शेव्हिंग क्रीमच्या ट्यूबची ?"
"पाच रुपये!"
"हा , म्हणजे किरकोळ! पण त्या वेळेस या साहेबांचे पेड बिल किती होते? काही आठवते ?"
" नक्की आकडा नाही आठवत. पण नेहमी त्यांचे बिल हजार-दिड हजाराच्या आसपास असायचं.!"
"काहो? याला तुम्ही म्हणता तशी 'उचलेगिरीची' सवय होती का हा खरेच चोट्टा होता?"
"मी त्यांना ओळखतो! एका कॉलेजच्या प्रोफेसरला शुल्लक पाच-दहा रुप्याच्या वस्तूची चोरी करण्याची काय गरज?"
"काय? प्रोफेसर?"
"हो तर! माझा पोरगा यांचा विद्यार्थी होता! पोर जॅम खुश होती म्हणून सांगायचा!" हा रामगोपाल आपल्या हातून निसटलाय याची दीक्षितांना जाणीव झाली. ते न्यायासनाकडे वळले.
"न्यायमूर्ती महाराज, हे काय चालू आहे? 'उचलेगिरी' काय? आणि आरोपी पुर्वाश्रमी काय करत होता? याचा या खून खटल्याशी काय समंध आहे? हा स्पष्ट कालव्यय आहे! हि 'उचलेगिरी'ची कपोलकल्पित कथा उगाच घुसडली जातेय! आरोपी आणि रामगोपालची जुनी ओळख आहे! हा पढवलेला साक्षीदार आहे! असंबंधित बाब म्हणून हि साक्ष कामकाजातून काढून टाकावी अशी मी कोर्टास विनंती करतो!" दीक्षितांचा तोल ढळला.
" माझ्या निरपराधत्वासाठी हि एक अत्यंत महत्वाची साक्ष आहे महोदय! तेव्हा हि साक्ष कामकाजात ठेवण्यात यावी हीच माझी विनंती आहे!"रुद्रा नम्रपणे न्यायासनास म्हणाला. आणि दीक्षितांकडे वळला.
"सरकारी वकिलांनी स्वतःस सावरावे. हा रामगोपाल ओम मॉलमध्ये, ओम मॉल पुण्यात, मी मुंबई! तेही इन्स्पे. राघवच्या नजरेसमोर! आता सांगा मी साक्षीदारास काय आणि कसा पढवून ठेवणार?" कोर्टात माफक हश्या पिकला.
दीक्षित थोडेसे खजील झाले.
"न्यायमूर्ती महोदय, माझे दुसरे साक्षीदार आहेत प्राध्यापक-डॉ. -जोगदंड! त्यांच्या साक्षीची परवानगी असावी!" रुद्रा म्हणाला.
"डॉ. जोगदंडांची साक्ष उद्या होईल! आजचे कामकाज स्थगित होत आहे!" अशी घोषणा करून कोर्ट उठून गेले. तो कोर्टाचा हॉल हळूहळू रिकामा झाला.
दीक्षितमात्र तसेच विचारमग्न बसून होते. मॉलचा सेक्युरिटी ऑफिसर, पीएचडी प्रोफेसर, आणि प्रख्यात डॉक्टर! परस्पर काय समंध? मॉल पुण्यात, प्रोफेसर नागपूरचा आणि डॉक्टर मुंबईतला! तीन ठिकाणचे तिघे! काय कनेक्शन? 'उचलेगिरी ' सारखी फडतूस गोष्ट हा रुद्रा 'पुराव्यात' का इतक्या आग्रहाने घेतोय?
" वकील साहेब!" राघवच्या आवाजाने दीक्षित भानावर आले.
"इन्स्पे. राघव बरे झाले तुम्ही आलात! तुम्ही आजचे कोर्टाचे कामकाज एकलेतच. या रुद्राचा काय गेम असेल?"
"मला वाटते 'गेम' आहे तो संतुकरावांची अमाप संपत्ती! त्या साठी हि धडपड! लक्षात घ्या ते 'इच्छापत्र ' प्रसारित झाल्यावर हा उगवला! स्वतः होऊन सरेंडर झाला! नुस्ता सरेंडर नाही तर फुलप्रूफ पुराव्या सह! कारण त्याला खून केल्याचे प्रमाणपत्र कोर्टाकडून हवे आहे! म्हणजे संतुकरावांच्या तिजोरीच्या चाव्यावर त्याला हक्क सांगता येईल! "
"ते ठीक! पण हे कसे शक्य आहे. आरोप सिद्ध झालाकी तो 'खुनी'! आणि 'खुन्या'ला शिक्षा होणारच! मग संपत्तीचा काय उपयोग?"
या प्रश्नाचे उत्तर काळच देणार होता !
०००
उंचेपुरे, कृश प्रकृतीचे प्राध्यापक डॉ. जोगदंडाच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज विलसत होते. त्यांनी विरळ होत जाणारे डोक्यावरचे पांढरे केस मागे वाळवून व्यवस्थित विंचरले होते, ते त्यांच्या रुबाबदारपणात भरच घालत होते. सैलसर कोट-पॅन्ट आणि पांढराशुभ्र शर्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसत होती. रिमलेस ग्लासेस मधून निळसर जांभळे डोळे चमकत होते. एकंदर 'हा गृहस्थ प्रोफेसर आहे.'अशा ओळखीची गरज नसणारी इमेज पाहणाऱ्याच्या मनात उभी राहत असे. कोर्ट सुरु होईपर्यंत ते शांतपणे व्हरांड्यातल्या एका बाकड्यावर बसून होते.
त्यांच्या नावाचा पुकार झाला तसे ते कोर्टात गेले. रुद्राचे लक्ष जाताच तो लगबगीने त्यांना सामोरा गेला आणि भरगच्च भरलेल्या लोकांची लाज न बाळगता त्याने चटकन त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्या क्षणी रुद्राच्या डोळ्यात पाणी होते! पण ते कोणालाच दिसले नाही.
क्षणभर रुद्राची आणि त्यांची नजरा नजर झाली.
"रुद्र, अरे अश्या अवस्थेत तुझी भेट व्हावी हे माझे दुर्दैवच!" प्रो. पुटपुटले.ते त्याला मायेने 'रुद्र' म्हणून कॉलेजमध्ये असल्या पासून संबोधत असत.
"सॉरी सर, इलाज नव्हता म्हणून तुम्हास त्रास द्यावा लागला!"
"असो!"
ताठ मानेने ते साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाऊन उभे राहिले. प्राथमिक उपचार आटोपल्यावर रुद्रा उभा राहिला.
"सर, आपला परिचय कोर्टास सांगावा!" रुद्राने विनंती केली.
"मी, अनंत माधव जोगदंड. वय पासष्ट. निवृत्त जीवशास्त्राचा प्राध्यापक, राहणार नागपूर विदर्भ. "
"सर, मी तुमचा अकरावीचा विद्यार्थी होतो तेव्हाचे दिवस तुम्हास आठवतात का?"
" हो तर! तुझा रोल नम्बर तेरा, आणि तू सी डिव्हिजन मध्ये होतास!"
" तुमच्या स्मरण शक्तीस दाद द्यावी लागेल. "
या वर प्रो. जोगदंडानी फक्त एक स्मित केले.
"सर, तुम्हास आठवत असेल कि मला कॉलेज मधून काढून टाकण्याच्या निर्णयाला फक्त तुम्हीच विरोध केला होता!"
"हो तर! स्पष्ट आठवतंय!"
"असे काय झाले होते म्हणून कॉलेज मला काढून टाकणार होते?आणि तुम्ही या निर्णयाच्या विरोधात का उभे राहिलात? कृपया याची सविस्तर माहित कोर्टास सांगा, सर!"
"रुद्रने एका मुलाचा डिसेक्शन बॉक्स चोरला होता. सुरवातीस त्याने ती 'चोरी' मान्य केली नाही. पण जेव्हा झडती घेतली तेव्हा तो बॉक्स त्याच्या बॅकसॅक मध्ये सापडला! तो तेथे कसा आला हे त्याला सांगता येईना. 'मला माहित नाही!'हेच त्याचे पालुपद होते. तो चोरी कबूल करेना! अर्थात त्यामुळे हा खोटे बोलतोय असाच सर्वांचा समज झाला होता. त्याने 'चोरी' कबूल करून क्षमा मागितली असती तर हे प्रकरण तेव्हाच मिटले असते. पण 'मी बॉक्स चोरला नाही!' यावर हा आडून बसला. कॉलेजच्या कार्यकारणीचा 'याला काढूनच टाकावे.' असा सूर होता. रुद्र एक हुशार मुलगा होता. मी त्याला ओळखत होतो. त्याला काढून टाकले असते तर त्याच्या भवितव्यावर विपरीत परिणाम झाला असता. मी मध्यस्ती केली, कॉलेजने माझ्या शब्दाला मान दिला, आणि रुद्रला कॉलेजातच राहू दिले. "
"मग काय झाले?"
"रुद्रला नकळत वस्तू उचलण्याचे व्यसन लागले असावे असे मला वाटले. मी याच्या आई-वडिलांशी सविस्तर चर्चा केली. त्यांनीही 'लहान असताना होती अशी सवय!' याची कबुली दिली. त्याच्यावर उपाययोजना करण्याची आणि खबरदारी घेण्याची मी त्यांना विनंती पण केली. मग तो ग्रॅज्युएशन नन्तर कॉलेज सोडून गेला आणि त्याचा सम्पर्क तुटला! तो आज मला या येथे भेटतोय!"
" धन्यवाद सर. आपल्याला त्रास द्यावा लागला त्याबद्दल दिलगीर आहे. "
"माझी साक्ष संपली, महोदय. सरकारी वकिलांना काही शंका असतील तर त्यांनी निरसन करून घ्यावे."
पण दीक्षितांनी क्रॉस केले नाही!
कारण जोगदंडाची साक्ष अतिशय पारदर्शक होती. कोर्टात काय विचारले जाईल याची त्यांना प्रश्न विचारी पर्यंत कल्पना असण्याची शक्यता नव्हती. उगाच करायची म्हणून क्रॉस करणाऱ्यातले दीक्षित नव्हते. रुद्राच्या दोन्ही साक्षीतून, रुद्रा हि केस एका विशिष्ट दिशेने नेतोय हे मात्र त्यांना जाणवत होते. पण थांगपत्ता लागत नव्हता. आणि सगळ्यात गहन प्रश्न होता तो हा कि या त्याच्या 'उचलेगिरी' च्या सवयीचा आणि खुनाचा काय संबंध?
कोर्टचे कामकाज त्या दिवसा करिता स्थगित झाले.
०००
आज 'संतुकराव खून' खटल्याचा महत्वाचा दिवस होता. आज रुद्राचा शेवटच्या साक्षीदाराची साक्ष होती. अपेक्षेप्रमाणे कोर्टात पाय ठेवायला जागा नव्हती. एखाद्या सिरीयल मधल्या व्हिलन सारखा दिसणारा, तुळतुळीत कॉफी कलरच्या टकलाचा धनी असलेला, जाडगेला सुमार उंचीचा माणूस, आजच्या खटल्याचा 'होरो' होता. त्याने अत्यंत उंची कापडाचा सूट घातला होता. पण सुटीचे माप देऊन तो शिवून येईपर्यंत, त्याचे माप बदलले असावे. कारण तो सूट त्याला तोकडा होत होता. ते प्रसिद्ध मनोसोपचार तज्ञ डॉ. आर. के. रेड्डी होते.! त्यांचे अनेक पेपर्स आंतरराष्टीय व्यासपीठावरून प्रसिद्ध झाले होते! आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रात मानाचे स्थान होते.
सर्व प्राथमिक सोपस्कार आटल्यावर, रुद्राने डॉ. रेड्डिना त्यांचा परिचय आणि व्यवसाय कोर्टास सांगण्यास सांगितले. त्याने तो सांगितला.
"डॉ. साहेब तुमचे आणि माझे काय नाते आहे?" रुद्राने विचारले.
"एक डॉक्टर आणि पेशंटचे जे असते तेच नाते आहे."
"एक पेशंट म्हणून तुम्ही मला किती वर्षा पासून ओळखता?"
"गेल्या तीन वर्षा पासून!"
"मला काय झालाय? म्हणजे मी आपल्याकडे कसली ट्रीटमेंट घेतोय?हे जरा कोर्टास सांगाल का?."
" गेल्या तीन वर्षा पासून मी रुद्रप्रताप याना Alien Hand Syndrome साठी ट्रीटमेंट देत आहे." डॉ. रेड्डी म्हणाले आणि रुद्राने काहीतरी नवीन पिल्लू काढल्याचे अडव्होकेट दीक्षितांना जाणवले. ते सावरून बसले.
"एलिन हॅन्ड सिन्ड्रोम म्हणजे नक्की काय?"
"ती एक मानसिक विकृती आहे."
"त्याची लक्षणे?"
"या व्याधीत रोग्याचे आपल्या हातावर नियंत्रण रहात नाही!"
"नियंत्रण रहात नाही म्हणजे? लखवा ---"
"नो! नो! लखवा हि शारीरिक व्याधी आहे! एलिनहॅन्ड हि मानसी व्याधी आहे. या व्याधीत रोग्यास आपला हात काय करतोय हे कळत नाही! हाताचे कृत्य मेंदू पर्यंत पोहंचतच नाही. आणि म्हणून त्याची नोंद मेमरीत होत नाही!"
दीक्षितांची ट्यूब पेटली. त्यांना रुद्रा हि केस ज्या दिशेस नेतोय ते आता त्यांना स्पष्ट झाले होते!
"डॉ. हे फार क्लिष्ट होतंय. मी त्या रोगाचा बळी आहे,आणि तुम्ही मला नीट समजावून सांगितले आहे. पण कोर्टास आकलन होईल असे सांगा!"
"आपल्या ऐच्छिक आणि अनैच्छिक क्रिया आपल्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागाद्वारे नियंत्रित होत असतात हे सर्वाना माहित आहे.पण या रोगात मेंदूची गल्लत होत असते. मेंदूस मार लागल्यास किंवा अपघाताने हा रोग जडू शकतो. आपला हात हा 'स्वतंत्र' आहे. तो आपल्या आदेशांचे नेहमीच पालन करील याची खात्री रुग्णास नसते. आपल्या हाताला स्वतंत्र नियंत्रण केंद्र आहे आणि तो त्याचा कार्य करतो आणि आपल्या ऐकण्यात नाही हा भ्रम रोग्यास असतो! या मुळे या हाताच्या कृत्यात, मेंदूचा सहभाग किंवा सम्मती असेलच असे नाही!"
"धन्यवाद. डॉक्टर साहेब. न्यायधीश महोदय, माझी साक्ष संपली! सरकारी वकिलांना काही शंका असतील तर विचाराव्यात."
आडोव्हकेट दीक्षित क्रॉस साठी उभे राहिले.
"डॉ.रेड्डी, आरोपीस आपण तीन वर्षांपासून ट्रीट करत आहेत. बरोबर?"
"हो."
"तो काय करतो? त्याचा व्यवसाय काय? याची काही कल्पना आहे का तुम्हाला?"
"नाही! पेशंटच्या व्यक्तिगत जीवनाशी आमचा काही समंध नसतो!"
"ठीक! मला सांगा खरच तो एलिन हॅन्डवाला रोग आरोपीस झाला आहे का ?"
"वकील साहेब, मी त्या विषयातला तज्ञ आहे,आणि गेल्या तीन वर्षांपासून त्यांना उपचार देत आहे. हे पुरेसे नाही का?"
"उपचार करत आहेत तर मग नेमकी काय 'प्रगती' आहे,हे आम्हास कळेल का?"
" हो सांगतो ना! 'त्याला त्याचा हात काय करतोय ते कळत नाही. आणि हाताने केलेले कृत्य त्याच्या स्मरणात रहात नाही.' --या लक्षणावर सध्या माझे उपचार केंद्रित केले आहेत!'
"पुढे? प्रगतीचे काय?"
"आता त्याला हाताने केलेले कृत्य लक्षात राहतय! स्मरण ठेवण्याच्या बाबतीत त्याची झपाट्याने प्रगती होतीयय! अजून वर्षभरात 'आपल्या लक्षात राहतंय.' हा कॉन्फिडन्स मी त्याला मिळवून देऊ शकतो!"
"अजून?"
"पूर्वी त्याला आपला हात काय करतोय हेच कळत नव्हते आता हात कृत्य करताना कळतंय!"
"म्हणजे कुठल्या क्षणी आपला हात काय 'कारभार' करतोय हे रुद्राला बरोबर कळतंय! तेव्हा त्याचा मेंदू जागृत असतो! असच तुम्हाला म्हणायचं आहे. नाही का?"
"हो."
"न्यायधीश महोदय,या मुद्याची विशेष नोंद घेण्यात यावी!" न्यायासनास विनंती करून दीक्षित पुन्हा डॉ. रेड्डी कडे वळले.
"आता सांगा डॉ. कि या एलिन हॅन्ड रोगात एखाद्याचा गळा किंवा तोंड दाबण्यासारखे भयानक कृत्य होऊ शकते का?"
" बहुतावूश रोगी असली घातक कृत्य करताना आढळत नाहीत! पण ते अशक्य हि नाही!"
"आरोपी रुद्रा कुठल्या स्टेजचा रुग्ण आहे? त्याची परिस्थिती कशी आहे?"
" रुद्रा खूप ऍडव्हॉन्स पेशन्ट आहे. नको तितकं दुर्लक्ष झालाय. सेन्सेटिव्ह केस आहे त्याची! त्याने धोकादायक पातळी गाठलीय!"
"एखादा प्रसंग सांगाल?"
" एकदा तो फालोउप साठी आला होता. अचानक त्याने माझी खुर्ची उलथून टाकली. त्याच क्षणी मी त्याचा बी.पी. घेतला होता. तो नॉर्मल रेंज मध्ये होता. एक्ससाईटमेंटची इतर कुठलीही लक्षणे नव्हती. खुर्ची उलथून टाकणे हे त्याच्या हाताचे कृत्य होते, पण तो त्या पासून अलिप्तच होता!"
"म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचे आहे? तो एखाद्याचा तोंड दाबून खून करू शकतो?,आणि तरी तो 'अलिप्तच' राहू शकतो?"
"होय वकीलसाहेब!"
"एक मिनिट डॉ. रेड्डी, तुम्ही काही तरी गल्लत करत आहेत! "
"अजिबात नाही!"
"तुम्ही आताच म्हणालात कि आरोपी रुद्राचा हात काय करतोय हे त्याला, म्हणजे त्याचा मेंदूला कळत!"
"बरोबर!"
"मग त्याचा त्या 'कृत्यात' त्याचा सहभाग नाही! हे कसे? तो कसा 'अलिप्त' राहू शकतो?"
स्वतःला शहाणा समजणाऱ्या टकल्याला बरोबर त्याचाच शब्दात अडकावल्याचे विजयी स्मित दीक्षितांच्या चेहऱ्यावर क्षणभर विलसत होते.
"त्याचा हात काय करतोय हे मेंदूला जाणवत, पण ----"
"पण काय डॉक्टर ?"
"पण हे कृत्य करण्याची 'आज्ञा' मेंदूने दिलेली नसते! किंबहुना वाईट कृत्य होत असेल तर 'करू नये' हेच आदेश मेंदू देत असतो!"
"म्हणजे?"
"म्हणजे, जे कृत्य होतंय ते कळत असले तरी ते करण्याचा रोग्याचा मानस, उद्देश असेलच असे नाही! आणि ते कृत्य थांबवण्यास असमर्थ असतो!"
दीक्षितांनी उलट तपासणी आटोपती घेतली. कारण त्यांना कळून चुकले होते कि हा डॉक्टर त्यांच्या वकिली डावपेचात अडकणारा नाही. रुद्रा वाटला त्यापेक्षा बिलिंदर होता!
त्या दिवशीचे कामकाज सम्पल्याचे घोषित करून कोर्ट उठले.
०००
(क्रमशः )