Rudra - 2 in Marathi Fiction Stories by suresh kulkarni books and stories PDF | रुद्रा ! - २

Featured Books
  • सनातन - 3

    ...मैं दिखने में प्रौढ़ और वेशभूषा से पंडित किस्म का आदमी हूँ...

  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

  • आखेट महल - 7

    छ:शंभूसिंह के साथ गौरांबर उस दिन उसके गाँव में क्या आया, उसक...

Categories
Share

रुद्रा ! - २

रुद्राच्या बोटाला सिगारेटचा चटका बसला तसा तो भानावर आला. वेटरने खुजराहोच्या (बीअर ) तीन बाटल्या, चखणा म्हणून खारे काजू, कलेजी फ्राय,आणि फोरस्क्येयर पाकीट सोबत ठेवले होते. दोन बाटल्या पोटात गेल्यावर त्याने तिसरीला हात घालणार, तोच त्याचा फोन वाजला. नम्बर अननोन होता.
"रुद्रा ! बोलतोय. "
"भेट हवीय!"
"कशाला?"
"मुका घ्यायचाय! बेवकूफ काहीतरी काम असल्याशिवाय कोण कोणाला फोन करील ?" बोलणाऱ्याचा सोलापुरीहेल स्पष्ट जाणवत होता.
" काय काम? "
"भेटीत सांगेन!"
"आत्ता दोन झाल्यात! तिसरी पास झाली कि ये !"
"तिसरी?"
"बियर !" रुद्राने फोन कट केला.
तिसरी बियर संपवून त्याने रोस्टेड चिकन आणि फ्राईड राईस जेवणासाठी मागवले. फिंगर बाऊल मध्ये बोट बुडवताना, तो बुटकेला माणूस किंचित फेंगडे चालत त्याच्या पुढ्यात येऊन बसला. रुद्राने टिशू पेपरने हात कोरडे केले. नवीन सिगारेट तोंडात धरून पेटवताना त्या माणसाचे निरीक्षण केले. उंची पाच फुटाच्या वर एखादा दुसरा इंच असावी,त्याच्या चेहऱ्याच्या मानाने नाक फुगीर होते. गाल गोबरे म्हणता येतील इतके गुबगुबीत,आणि डोक्याला भरघोस पांढरे निर्जिन केस! डोळ्याला मोठाल्या भिंगांचा गॉगल! रुद्रा स्वतःशीच हसला. पार्टी नवखी असावी, ओळख लपवण्यासाठी त्याने केविलवाणी धडपड त्याचा नजरेतून सुटली नाही.
"रुद्रा ?" त्याने विचारले
"हू!" रुद्राने हस्तोलन्दनासाठी हात पुढे केला.
"सुपारी घेणार?" त्याने धडक विचारले
"मी पान -सुपारी खात नाही !" रुद्रा थोडासा तंद्रीतच होता.
"काम सोपे आहे! दोन लाख देतो !" त्याने आपला आवाज खालच्या पट्टीवर आणला.
रुद्राची धुंदी खाड्कन उतरली. सोप्या कामाचे दोन लाख !
"सोपं काम?"
"एक म्हातारा नौकर दूर करायचाय ! कायमचा!"
"काय?खून ?"
"बोंबलू नकोस! होय का नाही इतकेच सांग! "
" त्या पूर्वी काही गोष्टींचा खुलासा हवा! "
"कोणत्या गोष्टी?"
" या कामासाठी मीच का हवाय?"
" तुझे क्रिमिनल रेकॉर्ड मला माहित आहे! कामाची खात्री आहे म्हणून!"
"माझ्या सेक्युरिटीच काय? काळजी घेऊनही पकडला गेलो तर ,कोर्ट ,जामीन ,वकील यांचं काय ?"
" दोन हजाराच्या कामा साठी, दोन लाख कशाचे देतोय?"
"दोन हजारात ? मग जा त्या बोळीतल्या गुंडा कडून घे करून !"रुद्रा भडकला.
" खुनासाठी दोनच हजार देतोय! बाकीचे कोर्ट कचेऱ्यासाठी आहेत ! खुनापूर्वी आणि नंतरही माझा कोठेही माझा सम्बन्ध नसेल!"
" शेवटचं सांगतो पाच लाख! तीन आता आणि दोन कामा नन्तर! मान्य नसेल तर उठ!"
काही क्षण तो बुटका विचारात पडल्या सारखा दिसला.
" ठीक! पण माझा माग काढण्याचा प्रयत्न करू नकोस! दुसरे मला दगा दिलास तर --- पोलीस अजून रागिणीच्या केस मध्ये आरोपी शोधताहेत!" त्या बुटक्याचा आवाज खुनशी झाला होता. म्हणजे त्याने रुद्राची कुंडली चांगलीच अभ्यासली होती!
" त्याची गरज नाही! रुद्राची डील हीच कामाची ग्यारंटी असते! मला त्या सावजाची माहिती सांग. आणि एक फोटो दे !"
त्या बुटक्याने खिशातून हजारच्या नोटांची तीन पाकिटे काढली आणि टेबलवर ठेवली! गडी पूर्ण तयारीने आला होता तर !
" त्या सावजाच्या फोटो तुला sms करतो. त्याचा ठाव ठिकाणा , वेळ मी तुला कळवीन! प्लॅन माझाच असेल फक्त तू तो प्रत्यक्षात आणायचाय ! या पुढे सम्पर्क फोनवरच असेल ! आणि तो बुटका निघून गेला! तसाच फेंगडा चालत!
रुद्रा अविश्वासाने त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे पहात राहिला! काय झटपट डील फायनल करून गेला हा गृहस्थ !
०००
रात्री बाराच्या दरम्यान तो गोबऱ्या गालाचा,गृहस्थ घाईतच 'लैला ' बाहेर पडला. एका काळ्या पिवळ्या ऑटोला 'भोसेकर चाळ ' असा पत्ता सांगून, चपळाईने आत बसला. चाळीच्या कोपऱ्यावर त्याने रिक्षा थांबली. झपझप पावले टाकत दुसऱ्या मजल्यावरच्या आपल्या खोलीत घुसला आणि पटकन दार लावून घेतले. आधी ते गालातले पॅडिंग काढून फेकले. सवय नसल्याने गाल चांगलेच दुखत होते. मग नाकावरचे आवरण काढले. आणि शेवटी डोक्यावरचा तो पांढऱ्या केसांचा विग ओढून काढला. विगचे रबर जाम चिकटलं होत. त्याची टाळू बराच वेळ हुळहुळत होते. चिनी मातीच्या भांड्या सारख्या तुळतुळीत टकलाला सिलिंग फॅनचा गार वारा झोंबू लागला तसे त्याला थोडेसे बरे वाटले. तो तसाच काही क्षण खुर्चीत बसून राहिला.
"वा मनोहरपंत ,डील पक्की करून आलात!"तो स्वतःशीच पुटपुटला. चला एक काम तर मार्गी लागले. हा रुद्रा काय भयानक प्राणी होता! उंचा -पुरा पहिलवान गडी! उद्या हातापाई करायची वेळ आली तर तो नक्कीच आपल्याला भारी पडेल.शेकहॅण्ड करताना रुद्राच्या ताकतीची त्याला कल्पना आली होती. पण त्याची गरजच पडणार नव्हती. कारण रुद्राला आज भेटलेली व्यक्ती, त्यालाच काय पण कोणालाच दिसणार नव्हती! आपण पैसे तर देवून बसलोत. समजा त्याने काम नाही केले तर ? 'रागिणीची 'धमकी कितपत उपयोगी पडेल शंकाच होती.कारण रुद्रा पळून गेल्यावर रागिणीचा बनाव त्यांच्याच केबिन मधल्या सीसीटीव्हीने उघड केला होता! रिस्क तर होतीच. पण परस्पर म्हाताऱ्याचा काटा काढायचा तर, रिस्क घेणे भाग होते ! रुद्रा काम करे पर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवावेच लागणार होते. एकदा का तो म्हातारा मेला कि, बस! प्रोजेक्ट फिनिश! मग काय? त्या म्हाताऱ्याचं अन आपले नाते सिद्ध करणे, इतकेच बाकी राहील! त्या साठी आधुनिक विज्ञान मदतीला धावून येणार होते. डी. एन. ए. मॅचिंग सिद्ध करणारच कि !फक्त काही महिन्यांची, कळ सोसावी लागणार होती.
०००
दुसऱ्याच दिवशी एका पांढऱ्या केसांच्या म्हाताऱ्याचा फोटो रुद्राच्या मोबाईलवर मिळाला. हेच ते 'सावज ' होते. गेल्या दोन दिवसापासून रुद्रा झालेल्या डीलचा विचार करत होता. खिशातले तीन लाख खरे होते. डील काहीश्या गुंगीत झाले होते. 'यशाची ग्यारंटी!'हि त्याची अंडरवर्ड मधली प्रतिमा आजवर त्याने जपली होती. एकदा काम हाती घेतले कि ते पूर्ण करण्यासाठी तो जीव तोडून मेहनत घेत असे. या डील मध्ये काही गोष्टींचा त्याला उलगडा होत नव्हता. बसल्या बैठकीत आणि फारशी घासाघीस न करता त्या बुटक्याने रुद्राचे म्हणणे मान्य केले होते. एखादा गल्लीतला गुंड सुद्धा हे काम करू शकला असता, तेही खूप कमी पैशात. तरी हा आपल्याकडे केवळ 'खात्रीचा 'माणूस म्हणून नक्कीच आला नसेल. इतर काही तरी कारण असावे. पण ते कोणते? दुसरे एक शुल्लक म्हातारा नौकर याला का अडचणींचा वाटतोय? तो स्वतःच थोडेसे धाडस करून का नाही त्या नौकराचा काटा काढत? त्या साठी आपल्या सारखा व्यावसायिक खुनी का शोधतोय? काही तरी गौड-बंगाल नक्कीच आहे.
' मरू दे तो बुटका! असलेल्या पैशात ऐष करून घे. पुढचं पुढे बघू. वेळ आली कि म्हाताऱ्याला स्वर्गात पाठून देऊ! पैसे वसूल करून हे गाव सोडून जावं !'असं एक मन सुचवत होत. पण 'रागीणी'ची धमकी? नाही बेसावध राहून चालायचं नाही. का कोण जाणे रुद्राला आपण गहन जाळ्यात अडकतोय असा फील येऊ लागला. तो बुटका आपल्याला खुनाच्या प्रकरणात अडकवून 'लंबा हात' तर मारण्याच्या बेतात नसेल? किंवा तो कोणाचा तरी हस्तक असू शकेल का ? काय असेल ते असेल. रुद्राने आपल्या बचावासाठी प्लॅन करण्याचे मनावर घेतले. सर्वात आधी त्या बुटक्याचा शोध घ्यावा लागणार होता. सगळ्या प्रश्नांची उत्तरे तेथेच होती!
रुद्राने नवीन सिगारेट पेटवली.