Priya mates patra in Marathi Letter by Nagesh S Shewalkar books and stories PDF | प्रिय मातेस पत्र

Featured Books
Categories
Share

प्रिय मातेस पत्र



●●●●●● प्रिय मातेस पत्र !●●●●●●
माझी प्रिय आई,
तुला शतशः नमन।
तुझे अनंत उपकार. केवळ तुझ्यामुळेच मी या सुंदर, रमणीय, मनमोहक जगात पाऊल ठेवू शकले. पण, खरे सांगू का आई, तुझ्या उदरात घालवलेला काळ जणू माझ्यासाठी स्वर्गात विहार करत असल्याप्रमाणे होता. तुझ्या पोटात असतानाही मी तुला भरपूर त्रास दिलाय ग! पण आई, तू तो सारा त्रास मोठ्या आनंदाने सहन तर केलासच पण कधी तुझ्या चेहऱ्यावरील समाधान कमी होऊ दिले नाही. तुझ्या पोटात असताना मी मस्त बागडायचे, खेळायचे, तुला मधूनमधून लाथाही मारायचे पण तू कधीच राग केला नाहीस की कधी त्रागा केला नाहीस. उलट माझी दिवसेंदिवस होणारी नैसर्गिक वाढ अनुभवताना तुला खूप खूप आनंद होत असे. माझ्या लीलांचे तुला खूपच कौतुक वाटत असे. मी पोटात असताना तू माझ्याशी आनंदाने बोलायची, हसायची, मला छान छान गोष्टी सांगायचीस. अर्थात हा तू माझ्याशी साधलेला मूक आणि एक तरफी संवाद असे. मला आवडणारे पदार्थ तू खायचीस. एकंदरीत काय तर माझी चंगळ होती, मज्जाच मज्जा! इतकेच कशाला मी तुझ्या पोटातून बाहेर येत असताना तुला प्राणांतिक त्रास, प्रचंड वेदना झाल्या त्याही तू त्या मोठ्या धीराने सहन केलेल्या मला माहिती आहे. तू ओरडलीस, तुझ्या डोळ्यातून अश्रूंंच्या धारा वाहत होत्या. मध्येच तुझा श्वास थांबतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना तू त्या साऱ्या वेदना स्वीकारल्यास नव्हे तर ते सारे भोगलेस. तुला अनंत वेदना देत - देत मी बाहेर आले. तुला सांगू काय, मी तुझ्या उदरात वाढत असताना आणि उदरातून बाहेर पडत असताना मी एक असा निश्चय केला होता की, बाहेर आल्याबरोबर आधी तुझे दर्शन घ्यायचे. अग, दर्शन घेणे ही गोष्ट तरी मी कधी अनुभवली होती परंतु तुझ्या सांगण्यावरून आणि रोज सकाळी उठून देवापुढे तू डोके टेकवायचीस त्यावरून दर्शन या गोष्टीची थोडी माहिती होती परंतु मला तसे कुठे करता येणार होते. मग मी एक केले बाहेर आल्याबरोबर आधी तुझ्या चेहऱ्याकडे पाहिले. मला वाटले होते, माझ्यामुळे तुला झालेल्या प्रचंड त्रासामुळे तू माझ्यावर रागावलेली असशील, तुझा चेहरा संतापाने फुललेला असेल पण कसचे काय तू तर एखाद्या योद्ध्याप्रमाणे, जग जिंकल्याप्रमाणे आनंदी होतीस, चेहऱ्यावर पराकोटीचे समाधान घेऊन माझ्याकडे आत्यंतिक समाधानाने बघत होतीस. ते पाहून मला खूप आश्चर्य वाटले. ते पाहून माझी एकच भावना झाली की, आई असावी तर अशी...
पांढरे कपडे घातलेल्या त्या बाईने मला तुझ्या शेजारी ठेवले आणि आई, तू किती प्रेमाने माझा पापा घेतलास. त्या तुझ्या कृतीने मला काय आनंद झाला म्हणून सांगू, मला एक वेगळीच स्फूर्ती मिळाली. माझ्या शरीरात कशाचा तरी संचार झाला. येणारा प्रत्येक जण माझ्याकडे कौतुकाने बघत होता. पण आई, काही व्यक्तींंच्या चेहऱ्यावर आनंद, कौतुक, समाधानाचे भाव दिसलेच नाहीत. अगदी जवळच्या नातेवाईकांच्या डोळ्यातही 'मुलगी' म्हणताच राग, चीड अशा भावना उत्पन्न झाल्या असल्याचे मला वारंवार जाणवत होते. तुझ्याकडे पाहतानाही त्यांच्या डोळ्यांंमध्ये मी संताप बघत होते. का ग असे? जन्मलेल्या छोट्या मुलीबद्दल, तिला जन्म देताना अपार कष्ट सहन करणाऱ्या आईबद्दल अशी घ्रुणा त्यांना का ग असे? इतकेच कशाला तुझ्या उदरात बाळाने प्रवेश केल्याची चाहूल लागता क्षणी आजीआजोबा आणि प्रत्यक्ष बाबांच्याही तोंडी 'मुलगी नको' असे शब्द का ग होते? मुलगाच पाहिजे असा दुराग्रह का आणि कशासाठी होता? 'पहिली बेटी, धनाची पेटी' आणि 'पहिली बेटी, तूप रोटी !' हे तू त्यांना घसा खरडून सांगायचीस पण ते ऐकत नव्हते. तुझा आणि बाबांचा वाद, आजी-आजोबांनी तुला सुनावलेले खडे बोल हे सारे का? काय गुन्हा होता माझा? का नको होती त्यांना मुलगी? मुलीने असे कोणते घोडे मारले होते त्यांचे? आजी-आजोबांनाही एक मुलगी आहेच ना? पण आई, तू तुझ्या मतावर ठाम होतीस. घरातील सर्वांचा अगदी आत्याचा, मावशीचा...हो. तुझ्या बहिणीचा विरोध डावलताना, त्यांचे मत परिवर्तन करताना तुझी झालेली ससेहोलपट मी कशी विसरू शकेल? तुला झालेल्या वेदनांची मी भागीदार नसेल पण साक्षीदार नक्कीच आहे. आई त्यादिवशी सकाळी सकाळी आपल्या घरात झालेला वाद मला आजही आठवतो ......
त्यादिवशी मी सकाळी तुझ्या पोटात जागी होत असताना तू सर्वांसाठी चहा करीत होतीस. बाहेर सारे चहाची वाट बघत असताना आजीने बाबांना विचारले,
"काय म्हणतेय रे तुझी बायको? ती तपासणीसाठी तयार झाली का?"
"आई, मी तुला किती वेळा सांगू की ,तिचा ठाम विरोध आहे. ती तयार नाही."
"मग काय असा हातावर हात देऊन शेळपटासारखा बसणार आहेस? अरे, उद्या तीन-चार महिने झाले ना तर आपल्याला काहीही करता येणार नाही. ती तयार होत नसेल तर तू तिला तयार कर. मार, झोडपून काढ, शिव्या घाल काहीही कर पण ती तपासणीसाठी तयार झालीच पाहिजे."
"तुझी आई म्हणते ते बरोबर आहे." आजोबांनी ही आईच्या सुरात सूर मिसळला.
"बाबा, माझे प्रयत्न चालू आहेत. परंतु ती ऐकायला तयार नाही. मी बघतो काय करायचे ते."
"केव्हा? तिच्या पोटात वाढणाऱ्या काट्टीने जन्म घेतल्यावर? तिच्यापुढे तुला मायबाप, गणगोत, समाज कुणाचीही गरज राहिली नाही. बायकोच्या ताटाखालचं मांजर झालास तू. तीन दिवसांची मुदत देतेय तुला, तिची ती तपासणी करून पोरग आहे की पोट्टी आहे ते खात्री करून घे. पोरगी असली तर लगेच डाक्टरणीचे हात भरून त्या काट्टीचा बंदोबस्त करून या. तुला जमत नसेल तर मला सांग मी समर्थ आहे."
"आई, तिच्या पोटात मुलगीच आहे असं कसं म्हणू शकतेस? मुलगाही असू शकतो..."
"मी तेच तर तपासून बघ म्हणतेय."
"आणि मुलगी असेल तर?" चहा घेऊन गेलेल्या माझ्या आईने... तू विचारलेस.
"तर मग पाडून टाक. मोकळी हो तू आणि आम्हालाही मोकळी कर."
"आs sई..." तू ही ओरडलीस. कदाचित पहिल्यांदा तुझा आवाज चढला होता. ते ऐकून सारे चपापले होत.
"ओरडू नकोस. आम्हाला मुलगी नकोय. पुन्हा का म्हणून निर्लज्जपणे विचारू नको. हज्जारदा सांगितलय तुला ते. पुन्हा पुन्हा तेच उगळायला लावू नकोस."
"मलाही त्याच त्याच गोष्टींंचा कंटाळा आलाय. एकदाचा सोक्षमोक्ष होऊन जाऊदे. पण मी आत्ताच सांगते, मी तशी कोणतीही तपासणी करणार नाही. माझ्या गर्भातलं बाळ माझे आहे. मुलगा असो की मुलगी मी त्याला जन्म देणार, वाढवणार. तुम्हाला मुलगी नको असेल तर या अवस्थेत मलाही मारून टाका. आई, मला एक सांगा, प्रत्येक कुटुंबाने त्या परिवारात येऊ पाहणाऱ्या मुलीचा असाच गळा घोटला तर या जगात मुलगी शिल्लक राहिल का? सारी मुलेच जन्मली तर त्यांनी लग्न कुणाशी करावे? "
"ये बाई, मला जगाशी काही घेणेदेणे नाही..."
"हे का विसरताय की, आपले कुटुंब त्याच जगाचा एक भाग आहे. उद्या आपल्या परिवारात जन्माला येणारा मुलगा याच जगात वावरणार आहे. सर्वांंनीच मुलींचे गर्भ पाडून टाकले, मुलांनाच जन्म दिला तर माझ्या पोटी येणारा मुलगा कोणाशी लग्न करेल? केलाय हा विचार कुणी? आई,अशी परिस्थिती येणार नाही हे तुम्ही ठामपणे सांगाल का?"
"अग पण..... " आजीचा स्वर प्रथमच नरमला होता.
"मला सांगा आई, तुम्हीही स्त्री आहात. समजा तुमच्या जन्माच्या वेळी तुमच्या आईवडिलांनी असा विचार केला असता तर तुमचा जन्म झाला असता का? आज तुम्ही या भरलेल्या कुटुंबात असतात का? बाबांना तुमच्यासारखी सुशील, हुशार बायको मिळाली असती का? तुमच्या या सद्गुणी मुलाला कुणी जन्माला घातले असते? दुसरीकडे माझ्या कुटुंबाने तुम्ही म्हणता ती तपासणी करून मुलीचा गर्भ म्हणजे मला मारून टाकले असते तर मला तुमच्यासारखी प्रेमळ सासू, बाबांच्या रुपात दुसरे वडील आणि माझा प्रत्येक शब्द झेलणारा हा नवरा मला मिळाला असता? मला मान्य आहे, अनेक कुटुंबात सुनेचा छळ होतो पण आपल्याकडे तसे नाही ना. 'मुलगी नको' हा एक मुद्दा सोडला तर मी या घरची मुलगीच आहे ना. तुमच्यासारख्या प्रेमळ, लाघवी, जीवास जीव लावणाऱ्या आईच्या मनात हा विचार येऊच कसा शकतो? हेच मला आश्चर्य वाटते, सोबत दुःखही वाटते.आई, आपण ठरवले तर माझ्याच काय परंतु आपला ..... तुमचा आदर्श घेऊन शेजारीपाजारी, पाहुण्यांकडेही मुली जन्माला येऊ शकतात. आई, क्रुपा करा.शांतपणे विचार करा. आकारास येण्यापूर्वीच एका कळीला खुडण्याचे पाप करू नका. आई, तुम्ही रोज देवळात जाता, भजन करता , कीर्तन ऐकता तरीही तुम्ही असा विचार करू शकता? ....."
आई, तू अजून काय काय समजावून सांगितलेस. अरे बापरे! मला तर तुझ्या धैर्याची, सहनशीलतेची आणि लढाऊव्रुत्तीची कमालच वाटली. पण, शेवटी तू जिंकलीस ग, जिंकलीस. मुळातच प्रेमळ असणाऱ्या आपल्या कुटुंबाने तुझ्या निर्णयाला आनंदाने संमती दिली आणि कोणतीही तपासणी करायची नाही अस पक्के ठरवले. मात्र हा निर्णय झालेला असताना आत्याच्या रुपात एक विरोधी वादळ घोंघावत आले. आल्याबरोबर आत्या मुद्द्यावर आणि गुद्द्यावर येत कडाडून म्हणाली,
"या घरात मुलगी नको हे ठरलेले असताना तो निर्णय कुणी आणि का बदलला?"
त्यावर कुणी काही बोलण्यापूर्वीच तू अत्यंत नम्रपणे आणि तितक्याच कठोरपणे म्हणाली,
"हा निर्णय माझा असून त्यास माझ्या घरातील माझ्या माणसांचा पाठिंबा आहे."
"एवढा का तुला पोरीचा पुळका येतोय ग? एखादे वेळी पोट्टीच जुळे-तीळे जन्मले तर? " आत्याच्या तशा विचित्र प्रश्नावर तुझ्या मदतीला धावून आलेली आजी म्हणाली,
"ये बाई, आमचा निर्णय झालाय. तू ढवळाढवळ करायची गरज नाही. आणि काय ग तू एक आई असून मुलीच्या विरोधात का जातेस ग? तू माझ्या पोटात असताना मी तुला पाडून टाकली असती तर आज तू हे बोलू शकली असतीस का? सांग ना मला. अग, माणसांचे एक सोड पण आपण बायकांनी असा विचार का करावा? दुसरे असे गर्भपात म्हणजे एक प्रकारचा खून करणे होय. असा खून करणे बरोबर आहे का? कोणतीही बाई या अशा काळ्या क्रुत्याला तयार होणार नाही. गर्भ पाडताना बाईच्या जीवाला काही धोका झाला तर डबल मर्डर होणार नाही का? आली तशी दोन दिवस रहा. भावजयीला काय आवडते ते विचारून करून खाऊ घाल...आणि हो आता जरा तुम्हीही विचार करा. पोरग....पोरगी काही का होईना जन्माला घाला...."
आजी म्हणाली तशी आत्या तुझा हात हातात घेऊन म्हणाली, " वहिनी, तू माझे डोळे उघडलेस. नाही तर दोन चार दिवसात मी माझ्या गर्भाची तपासणी करून मुलगी असेल तर पाडून टाकायचा विचार करत होते पण आता सारे कँसल...."
आत्या म्हणाली आणि सर्वांना खूप आनंद झाला. पुन्हा तो विषय आपल्या घरात चुकूनही निघाला नाही. उलट माझा जन्म होताच बाबांनी उसने पैसे घेऊन गावभर मिठाई वाटली. आई, तू होतीस म्हणून मी या स्वर्गासारख्या हसऱ्या, आनंदी घरात जन्म घेऊ शकले. आई, तुझे अनंत उपकार ....
तुझीच, तू हट्टाने जन्म दिलेली लाडकी लेक.....

नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका फेज ०१,
क्रांतिवीरनगर लेन ०२,संचेती शाळेजवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३ (९४२३१३९०७१)