(इतिहासातील काही सत्य घटनांचा इथे प्रसंगानुरूप उल्लेख केलेला असून या कथेतील बहुतेक प्रसंग काल्पनिक आहेत. काही चुका किंवा काही आक्षेपार्ह आढळल्यास मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती. आपल्या प्रतिक्रिया अनमोल आहेत.)
कारभाऱ्यांच्या राजकारणाला बळी पडून राजारामराजे यांनी संताजी घोरपडे यांना सेनापती पदावरून दूर केलं. धनाजी जाधव यांची सेनापती पदी नेमणूक करण्यात आली. खूप वर्षांपासून सेनापतीपदाची आस मंत्र्यांच्या धूर्त चालीने धनाजी जाधवांनी पूर्ण करून घेतली. धनाजी जाधव आणि मंत्र्यांच्या आग्रहाखातर राजाराम महाराज यांना देशावर निघालेल्या संताजी घोरपडे यांच्यावर स-सैन्य चाल करून यावं लागलं. नाईलाजास्तव संताजींना प्रतिकार करावा लागला. लढाईचे पारडे संताजींच्या बाजूने फिरताच धनाजी जाधव रणांगण सोडून पळून गेले. रामराजांना दगाफटका होऊ नये म्हणून संताजींनी त्यांना आपल्या संरक्षणात घेतले. लढाईत दगाबाज अमृतराव निंबाळकर मारला गेला. जिंजी दरबारात आपल्याकडून झालेल्या बेअदबीसाठी संताजींनी रामराजेंची माफी मागितली.
"महाराज... दरबारात झालेल्या आमच्या आगळिकीसाठी आम्ही दिलगीर आहोत."
संताजींनी आपली तलवार राजांच्या पायी ठेवली. घुडघ्यांवर बसले.
मान खाली घालून ते म्हणाले, "राजे, हि आमची तलवार आणि हे आमचे मस्तक. हे झुकेल किंवा कटेल फक्त अन फक्त छत्रपतींसाठी, स्वराज्यासाठी आणि स्वामिनिष्ठेसाठी. एक वेळ स्वराज्यातून बेदखल करा. पण, आमच्या घोरपडे घराण्याच्या स्वामीनिष्ठेबद्दल कदापि संदेह नका धरू राजे. आम्हाला सेनापतिपदाची आस नाही आणि वतनाची तर नाहीच नाही. पण हरामखोरीचा आरोप नको राजे. फौजही नको आम्हाला. आम्ही पुन्हा सैन्य बांधू आणि गनिमांना अविरत लढा देत राहू. आज्ञा द्या राजे."
संताजींचे डोळे पाण्यानं डबडबले होते. खाली अंथरलेला मऊशार गालिचा आसवांचे थेम्ब शोषून घेत होता. आपल्या मंत्र्यांच्या कुटील राजकारणाला राजेही कंटाळले होते. पण त्याला पर्यायही नव्हता. शिवाय स्वराज्यही टिकलं सावरलं पाहिजे. पण तो काळच असा होता कि, टिचभर वतनासाठी लोक बादशहाला जाऊन मिळत होते. बंडखोरीला आवर घालणे शक्य नव्हते. सैन्यही घटले होते. खजिनाही संपला होता. या पंधरा वर्षांतील मुघलांच्या स्वराज्यावरील सततच्या लढायांमुळे सैन्य आणि पर्यायानं जनताही हवालदिल झाली होती. अशावेळी मंत्री जे राजकारण चालवतील त्यावर विसंबून राहण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. शिवरायांची तत्वे सांभाळून स्वराज्य टिकवणे अशक्य होते. अन पर्यायाने रामराजेंना आपल्या मंत्र्यांना, सरदारांना मग ते आपले असो वा बंडखोर सगळ्यांना सामावून घ्यावं लागत होतं. बऱ्याच वेळा त्यांच्याच कलानं घ्यावं लागत असे. रामराजांच वय अवघं वीसेक तर संताजी पन्नाशीच्या आसपास होते. संताजी हे शिवरायांच्या हाताखाली आणि शंभूराजांच्या खांद्याला खांदा लावून लढलेले. त्यांना असल्या राजकारणाचा भयंकर राग आणि चीड. संताजींचा स्वभाव राजांना पुरेपूर माहित होता. जे काही असेल ते रोख ठोक. लहानपणापासून त्यांनी संताजींना जवळून पाहिलं होतं. राजे गहिवरून आले. संताजीरावांना खांद्याला धरून उठवले. अन घट्ट मिठी मारली.
"माफ करा संताजीबाबा. आम्हीही चुकत असू कदाचित. तुम्ही आमच्या आबासाहेबांच्या मुशीत घडलेले शिलेदार. शिवाय, आमच्या दादासाहेबांच्या साथीनं स्वराज्यासाठी लढलात. तीच तडफ, तीच शिस्त, तो बाणा तुमच्या अंगी पुरेपूर उतरलाय. जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला पाहतो, ऐकतो. आम्हाला आमच्या आबासाहेबांची, दादासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही."
बोलता बोलता रामराजांच्या नेत्रांच्या कडा पाणावल्या होत्या. कंठ दाटून आला होता. गहीवरल्या स्वरात रामराजे बोलत होते.
"पण सध्याचा काळ धामधुमीचा. आबासाहेबांच्या तत्वाने राज्य चालवणे अशक्य आहे. तरीही आम्ही प्रयत्न केला. पण टीचभर वतनासाठी बादशाही हुजरेगिरी करण्यातच आपल्या लोकांना धन्यता वाटते. त्यांना पुन्हा स्वराज्यात आणायचं असेल तर आपल्यालाही तोच मार्ग धरावा लागेल. गनिमांना मात द्यायची असेल तर त्यांच्याच राजकारणानं चालावं लागेल. अन्यथा, स्वराज्य टिकवणे अशक्य होऊन जाईल संताजीबाबा. कारभाऱ्यांचे राजकारण तुम्हाला कधीच रुचणार नाही. कारभाऱ्यांचे भ्रष्ट कारभार आम्ही जाणून आहोत. पण आपलं ध्येय मोठं. लढाई मोठी. त्याचबरोबर आपले राज्य सुस्थितीत आणायचे आहे. आता तुम्ही या मुलखात थांबणे धोक्याचे आहे. शिवाय, कारभारी इतर सरदार आणि तुम्ही, यांना एकाच वेळी सांभाळू घेणं अशक्य आहे. छत्रपती असलो तरी आम्ही आपल्याला मुलासारखे. हवं तर हट्ट समजा आमचा. पण आमचं ऐका संताजीबाबा. आता परत फिरा. तुमचे विश्वासू सरदार, सैन्य घेऊन देशावर जा. मुलुख सोडवा. संघर्ष चालू ठेवा. आणि आमच्याकडून काही चुकले असेल तर माफ करा."
राजांनी संताजींसमोर हात जोडले. राजांचे डोळेही अश्रूंनी भरलेले होते. तोच संताजींनी त्यांचे जोडलेलं हात आपल्या हातांनी धरले.
"नाही राजे. नाही... तुम्ही स्वराज्याचे स्वामी. आम्ही सेवक. तुम्ही आज्ञा करायची आणि आम्ही ती पाळायची. माफी तुम्ही नाही. आम्ही मागायची."
उराउरी भेट झाली. साश्रू नयनांनी उभयतांनी निरोप घेतला. संताजींनी राजांना आपल्याकडील काही फौज देऊन सुखरूप जिंजीला रवाना केले. संताजी महाराष्ट्र जवळ करत होते. हळू हळू सैन्यबळ कमी होत होतं. कारभाऱ्यांनी डाव साधला होता. रामराजांच्या शिक्यांचे कागद सरदारांना पाठवून संताजींच्या सैन्यात फूट पाडण्यात त्यांना यश आलं होतं. कारण संताजींचा सर्वात विश्वासू साथीदार विठोजी चव्हाण त्याच्या हाताखालील सैन्य घेऊन जिंजीला रवाना झाला होता. हा धक्का अनपेक्षित होता. पण आता अनपेक्षित धक्के खायची सवयच संताजींना झाली होती.
संताजींचा मुक्काम दहिगाव जवळ पडला होता. चार पाच हजार सैन्यबळ शिल्लक राहिलं होतं. तोच पहाटेच्या वेळी धनाजी जाधव अन निंबाळकरांची फौज संताजींचा बेसावध सैन्यावर तुटून पडली. झोपेतच बऱ्याच जणांचे मुडदे पडले. बऱ्याच जणांना तर हत्यार घ्यायलाही अवसर मिळाला नाही. अचानक झालेल्या हल्ल्याने संताजींच्या सैन्याची पळापळ झाली. दोन अडीज हजार सैन्य कामी आलं. संताजींना आपले बरेचसे सामान - सुमान मागेच ठेऊन पळ काढावा लागला. काही दिवस शंभू महादेवाच्या डोंगरात वसलेल्या पाड्यांवर, दऱ्यांमध्ये लपलेल्या गुहांमध्ये काढले.
वीस बावीस वर्षांची द्वारका लहानपणापासून वडिलांडून संताजींचे पराक्रम ऐकतच मोठी झाली. तलवारबाजी, घोडेस्वारी, भालाफेक, दांडपट्टा अशा सैनिकी कामात तरबेज झाली होती. संताजींच्या पराक्रमाने, शौर्याने ती भारावून गेली होती. द्वारकेचे वडील संताजीचे चांगले मित्र. चारेक महिन्यापूर्वी संताजी द्वारकेच्या घरी भोजनासाठी आले होते. ज्यांच्या बद्दल आपण लहानपासून ऐकत, बोलत आलो. ते भरदार व्यक्तिमत्व, स्वराज्याचे सरसेनापती, गनिमांचा थरकाप उडवणारे संताजी पाहताच क्षणी द्वारका त्यांच्या प्रेमात पडती. कारखेलच्या जंगलात संताजी आल्याची माहिती द्वारकेला मिळताच तिने तिकडे धाव घेतली. संताजींनी तिला आणि तिच्या वडिलांना खूप समजावून सांगितलं पण द्वारका तिचा हट्ट सोडेना. समोरच्या डोंगरावर असलेल्या महादेवाच्या मंदिरात एका संध्याकाळी काही मोजक्याच लोकांसमवेत संताजींचा विवाह द्वारकेशी झाला. काही दिवस द्वारकेच्या घरी राहिले. एका ठिकाणी थांबणे धोक्याचे होते. निंबाळकरांची माणसं कुत्र्यावाणी मागे लागले होते. संताजींनी जंगलातील खूप झाडीचा, जिथे कुणी सहजासहजी फिरणार नाही किंवा पोहोचणार नाही अशा ठिकाणी मुक्काम केला होता. सभोवतालचा परिसर घनदाट झाडीने वेढलेला. ज्या दऱ्यात संताजींनी आश्रय घेतला होता, त्याला लोक अस्वल दरा म्हणायचे. कधीकाळी त्या ठिकाणी अस्वलांचं वास्तव्य असायचं. आपल्या दहा पंधरा विश्वासू माणसांसह संताजी दिवस काढत होते. आजम खान, नारो महादेव , शाबाजी घोरपडे यांनी संताजींची अजून पावेतो साथ सोडली नव्हती. नारो महादेव दिवस रात्र डोळ्यांत तेल घालून पहारा देत होता. हाकेच्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या गुहेमध्ये बाकीची मंडळी राहायची. स्वराज्याचा मानी सेनापतीची चाललेली हि फरफट द्वारकेमुळे काहीकाळ सुखावली होती.
मराठ्यांच्या इतिहासातला तो काळा दिवस उगवला. आपल्या मेहुण्याच्या मृत्यूचा बदला, शिवाय पातशहाची मर्जी संपादन करून भरघोस इनामं, वतनं आपल्या पदरी पाडून घेण्याची हीच नामी संधी नागोजी माने बघत होता. निंबाळकर आणि माने यांचे लोक दिवस रात्र संताजींचा शोध घेत होते. मात्र, संताजींचा वास्तव्याचा नक्की मागमूस लागत नव्हता. म्हसवड हि मानेची जहागिरी. याच परिसरात असलेल्या शंभू महादेवाच्या डोंगररांगांत संताजींचा नेहमी मुक्काम असायचा. नागोजीला या परिसराची खडानखडा माहिती होती. जुलै महिना चालू झाला होता. पावसाची ये जा चालू होती. काल रात्रीच एका हेराने बातमी आणली होती, नारो महादेवाला त्याने कारखेल गावातून भाकऱ्या घेऊन अस्वल दऱ्याच्या दिशेने जाताना पाहिलं होतं. नागोजी निवडक पाच सहाशे माणसं घेऊन रात्रीपासूनच झाडाझुडपांमध्ये दबा धरून बसला होता. सकाळ व्हायला आली होती.
"लक्षात ठेवा. संताजीच्या हाताला एक बी हत्यार लागता कामा नये. न्हायतर तुमची खांडोळी झालीच म्हणून समजा.",
नागोजीने त्याच्या माणसांना दरडावलं. सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या.
गुहेच्या समोरूनच ओढा वाहत होता. पूर्वेकडे समोर डोंगर असल्यामुळे संताजी गुहेपासून जरा दूर जाऊन ओढ्यात अंघोळ अन सूर्यनमस्कार करत असत. समोरच्या डोंगरामुळे सूर्यदर्शन व्हायला घटकाभर वेळ व्हायचा. आजही संताजी नेहमीच्या वेळी उठून अंघोळीसाठी चालू लागले. रात्री बराच वेळ द्वारकेबरोबर गप्पा मारत बसल्यामुळे जरा आळसावलेले वाटत होते. संताजींनी सभोवती नजर फिरवली. नेहमी असणारा पक्षांचा किलबिलाट आज येत नव्हता. एक गूढ शांतता वातावरणात पसरली होती. सकाळचा थंडगार मंद वाराही आज नव्हता. शंकेची पाल मनात चुकचुकत होती. संताजींनी आपली कपडे अन तलवार खडकावर ठेवली. ओढ्यात कमरेइतक्या पाण्यात शिरून डोळे मिटून ते सूर्याला अर्घ्य देऊ लागले.
ॐ भूर्भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यंभर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॥
संताजींचे सूर्याला अर्घ्यदान चालू होते. तोपर्यंत नागोजीची माणसं ओढ्याच्या पलीकडे अन अलीकडे हातात नंग्या तलवारी घेऊन जमा होऊ लागली. हीच संताजींचा मारण्यासाठी योग्य वेळ होती. कारण एकदा का तो सावध झाला तर त्याला मारणं अवघड होऊन जाईल. दहा बारा जणांना तो सहज लोळविल, म्हणून नागोजी मागेच दूर थांबला होता. इशाऱ्यासरशी दोन माणसं संताजीच्या दिशेने दबक्या पावलांनी सरकू लागली. एकाने तलवार घेतली. मागच्याच्या हाती दिली. हळूहळू पाण्यात दोघेही पुढे सारसावू लागले. संताजी मृत्युंजय महामंत्र म्हणत होते.
ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
वार करण्यासाठी हात उंचावला गेला. संताजींच्या मानेचा वेध घेऊन त्यानं सपकन तलवार चालवली. तोच संताजी ओंजळीत पाणी घेण्यासाठी वाकले. वार पाठीवर झाला. तो दुसरा वार करणार तोच गर्रकन संताजी मागे वळले. उजव्या हाताने त्याचं नरडं पकडलं. एका हिसड्यात संताजीने त्याची तलवार खेचली अन दुसऱ्या क्षणी ती त्याच्या पोटात आरपार झाली. आजूबाजूच पाणी रक्तानं लाल झालं होतं. समोर पाहतो तर एका उंच खडकावर नागोजी माने उभा होता. सभोवती नंग्या तलवारी, बंदुका घेऊन माणसंच माणसं संताजींवर चालून येत होती.
नागोजी ओरडत होता, "हाणा... मारा... सोडू नका त्याला आज.."
"हरामखोर...नाग्या... दगाबाज...", म्हणत समोर येणाऱ्या एका एकाला संताजी तलवारीच्या दमदार वाराने सपासप कापत होते.
तोच एकाने संताजीच्या डोक्यावर वार केला. चपळाईने वार डाव्या हातावर झेलला. दुसऱ्या क्षणी त्यांची तलवार समोरच्याच्या पोटात घुसली होती. संताजींना झालेल्या जखमांतून रक्त ओघळू लागलं होतं. समोरून संताजींवर वार करायला आता एकाचही धाडस होत नव्हतं.
"हांडग्यांनो... मागून वार करता होय रे... हिम्मत असेल तर या समोर..."
संताजींचा आवेश पाहून नागोजी तर हबकलाच होता. तरीही मोठं मोठ्याने ओरडत आपल्या माणसांना तो संताजीवर हल्ला करायला सांगत होता.
"आरं... बघताय काय?? हाणा त्याला..."
एकाच वेळी चहूबाजूंनी शत्रूंनी हल्ला केला. संताजींची तलवार गरगर फिरू लागली, वार होऊ लागले, जखमा होऊ लागल्या. तलवारींचा खणखणाट होऊ लागला. संताजींचा दमदार वारांनी माणसं जखमी होऊन पडत होती. खडकावर उभ्या असलेल्या नागोजीच्या घाबरलेल्या डोळ्यांत संताजींचा रौद्रवतार गरगर फिरताना दिसत होता. संताजींचा पाठीवर, छातीवर, हातावर वार होत होते. वारागनिस संताजींच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. सगळे शरीर रक्तानं लालेलाल झालं होतं. शेंदूर फासलेला हनुमंतासारखे संताजी भासत होते. दहा बारा माणसांचे मुडदे पडले होते तर सात आठजण जखमी होऊन व्हीवळत होते. तिकडे नागोजी क्षणा क्षणाला अस्वस्थ होऊ लागला होता. एका बंदूकधारी हशमाला बोलवून त्याने संताजीवर नेम धरायला सांगितलं. त्याने समोरच्या घोळक्यात लढत असलेल्या संताजींवर नेम धरला. बंदुकीचा चाप ओढला.
"ठो ssss", आवाज करत गोळी सुटली.
समोरच्या आंब्याच्या झाडावरची पाखरं पंख फडफडत उंच उडाली. गोळीनं अचूक निशाणा साधला होता. संताजींची तलवार खाली पडली. छातीतून घळाघळा रक्त वाहू लागलं. छातीतुन मेंदूपर्यंत प्राणांतिक वेदनेची कळ उठली. डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. तोच समोरून नागोजी हातात तलवार घेऊन येताना अंधुकसा दिसू लागला.
"नाग्या... हरामखोरा..."
संताजी भेलकांडत, धडपडत त्याच्या दिशेने एक दोन पावलं गेले. तोच नागोजीने संताजीवर वार केला. त्यांनी उजव्या हाताने त्याची तलवार पकडली. पाठीमागून पुन्हा एकाने पाठीवर सपदिशी वार केला. तलवार सुटली. क्षणाचाही विलंब न करता नागोजीने तलवार आरपार केली. पोटातून रक्ताचा डोंब उसळला. भळाभळा रक्त वाहू लागलं. दृष्टी अंधुक होऊ लागली. सगळीकडे अंधार दिसू लागला. त्या अंधाराला बाजूला सारत एक दीप दिसू लागला. त्याचे तेज हळू हळू वाढू लागले. एवढा प्रखर झाला की डोळे दिपून गेले. पाहणे अशक्य झाले. संताजींनी गच्च डोळे मिटून घेतले.
डोळे उघडले. समोर पाहतो तर थोरले महाराज दिसू लागले. दक्षिण दिग्विजयात मिळालेल्या विजयाबद्दल भरदरबारात आपला सत्कार करताना महाराज म्हणत होते.
संताजीराव...
शर्थीने लढलात...
बहादुरी दाखवलीत...
हाच बाणा, हीच तडफ अन हीच जिद्द कायम असू द्या...
तुमच्या सारखे वीर जो पर्यंत स्वराज्यात आहेत, तोपर्यंत स्वराज्य सुरक्षित आहे...
जालना स्वारीत आपल्याकडून झालेल्या आततायीपणा बद्दल रागे भरणारे महाराज म्हणत होते.
आज पासून तुमच्यासाठी सदर दरबार बंद...
आणि मुजाऱ्यासाठी तर अजिबात येऊ नका...
ठरलेले मनसुबे धाब्यावर बसवून मनाचे घोडे रणांगणावर नाचवयाचे नसतात संताजीराव...
शत्रू बलाढ्य असेल तर कधी कधी जीव वाचवून रंणागणातून पळ काढला लागतो...
उगाच आम्ही या स्वराज्याचा डौलरा उभा करू शकलो नाही...
'माफी असावी म्हाराज...
पर एक संधी हवी होती आमची बाजू मांडायची...
तुमच्या तत्वांनाच आमच्या जीवनाचं ध्येय समजून लढलो राजं...'
समोर संगमेश्वरच्या लढाईतले शंभू राजे उभे राहिले. सांगू लागले.
निघा संताजीबाबा...
जीव वाचवा...
हा लढा शेवटचा श्वास असेपर्यंत चालू ठेवा...
स्वराज्य गनिमांच्या तावडीतून सोडवा...
वीतभर वतनासाठी इमान विकू नका...
आपल्या मातीशी, स्वराज्याशी बेईमानी करू नका...
ध्येय मोठं ठेवा तरच जगण्यामरण्याला अर्थ आहे...
बलाढ्य शत्रू असो वा कितीही कठीण परिस्थिती, शेवटच्या श्वासापर्यंत लढा...
'शंभूराजे ssss..
आम्ही लढलो...
शेवटच्या श्वासापर्यंत लढलो...
तलवार खाली नाही ठेवली...
तुमच्या वचनाला जगलो राजं...
वतनाच्या लोभ कधी केला न्हाई...
स्वराज्य सावरायचा प्रयत्न केला पर दगाबाजांनी डाव साधला...
माफ करा...
पर एवढीच सेवा करू शकलो राजं...'
धवल वस्त्रातील महाराणी येसूबाई उभ्या होत्या.
संताजीबाबा आता हे स्वराज्य तुमच्यासारख्या लोकांच्या हाती सोपवत आहोत...
जीव राखा स्वराज्य सांभाळा...
त्या औरंग्याला दाखवून द्या. या स्वराज्याची ताकत, सह्याद्रीची जिद्द आणि मावळ्यांची हिम्मत...
आईसाहेब - आबासाहेब दिसू लागले.
पोरा...
लय पराक्रम केलास...
घोरपड्यांच्या नावाला आणि स्वामिनिष्ठेला जागलास...
स्वराज्याची सेवा केलीस...
आम्ही भरून पावलो बग...
"आबासाहेब ssss... आईसाहेब ssss..."
"हर हर महादेव"
"जय शंभू महादेवा"
संताजी कोसळले...
शिवरायांचा मावळा धारातीर्थी पडला...
सह्याद्रीचा पुत्र हरपला...
स्वराज्याचा खंदा बुरुंज ढासळला...
एक धगधगता ज्वालामुखी शांत झाला...
संताजी नावाचं वादळ शांत झालं...
सेनापती संताजी म्हालोजी घोरपडे अनंतात विलीन झाले...
फाडीला सिंह कोल्ह्यांनी,
ढासळला बुरुंज स्वराज्याचा...
आक्रन्दु लागल्या कडे कपारी,
सह्याद्रीच्या चहुदिशांनी...
जय शिवराय
जय शंभूराजे
(कथेचे मुखपृष्ठ काका विधाते लिखित संताजी या कादंबरीतील आहे.)
--------------------------------
- ईश्वर त्रिंबकराव आगम
वडगांव निंबाळकर,बारामती.
९७६६९६४३९८
माहिती :
====================
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १६९७ साली सातारा जिल्ह्यातील म्हसवड जवळ असलेल्या कारखेलच्या जंगलात सेनापती संताजी घोरपडे यांची हत्या करण्यात आली. आपल्या व्यक्तिगत स्वार्थसाठी, अमृतराव निंबाळकराच्या मृत्यूचा सूड, बादशाहकडून मिळणाऱ्या भरगोस बक्षीसी आणि वतनासाठी नागोजी माने आणि हनुमंतराव निंबाळकर यांनी हे हत्याकांड घडवून आणले.
सेनापती संताजी घोरपडे यांच्या दोन समाध्या आहेत.
१. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड गावी कृष्णा नदीकिनारी त्यांच्या अस्थी विसर्जन करण्यात आल्या.
२. सातारा जिल्ह्यातील म्हसवड जवळ असलेल्या कारखेल या गावी.
संताजींनी हत्या झाल्यानंतर त्यांच्या शिर नसलेल्या धडाला गावातील एक मोकळ्या माळावर अग्नी देण्यात आला. आज असलेली समाधी अशाच जागेवर आहे. जिल्हा परिषदेच्या हॉल लगतच एक बंदिस्त चौथरा आहे. हीच ती समाधी. समोरच शंभू महादेवाची पिंड आहे. आपल्या पराक्रमाने मुघल सल्तनीच्या बादशहाला हैराण करून सोडणाऱ्या स्वराज्याच्या सेनापतीची समाधी, एवढी साधी असावी? एवढी दुर्लक्षित असावी? हीच आजच्या घडीची आमची शोकांतिका आहे.
प्रत्येक मराठी माणसाने जीवनात एकदा तरी सेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधी स्थळाला भेट द्यावी, हि विनंती...
संदर्भ :-
=========================
राजेश्री - ना. स. इनामदार
श्रीमानयोगी - रणजीत देसाई
भद्रकाली - अनंत तिबिले
मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध - डॉ. जयसिंहराव पवार
सेनापती संताजी घोरपडे - डॉ. जयसिंहराव पवार
संताजी - काका विधाते