आयुष्य जगात असताना खूप सारी नाती बनत असतात, तुटत असतात. प्रत्येक नात्याचं आपलं एक गणित असत आणि प्रत्येक माणसाची ते गणित सोडवण्याची आपली-आपली एक वेगळी पद्धत असते. माणसाला प्रत्येक नात्याचं गणित बरोबर सोडवतात येतंच असं नाही. काही नात्यांचं गणित बरोबर सुटत, काही नात्यांचं गणित सुटता सुटत नाही, काही नात्यांचं गणित चुकलेल असत. "नात्याचं गणित" हि अशाच एका नात्याची गोष्ट घेऊन येत आहे. आता हे गणित बरोबर आहे कि चुकलेलं आहे कि अजून सुटलेलच नाही हे गोष्ट वाचल्या नंतर तुम्हाला समजेल.
--------------------------------------------------------------------------------------------------
हि गोष्ट आहे मुग्धा आणि अनय यांच्या नात्याची. गेले ३ वर्षे प्रेमात असणारे मुग्धा आणि अनय यांच नातं आज जीवनाच्या अश्या वळणावर येऊ घातलेलं आहे कि पुढे काय होणार आहे हे दोघांनाही माहिती नाही. चला तर मग, मुग्धा आणि अनय यांचा आतापर्यंतचा प्रवास, नियतीने दोघांच्या आयुष्यात पुढे काय लिहून ठेवलं आहे ते आणि दोघांच्या या नात्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
मुग्धा -
मुग्धा, वय वर्षे २८, कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करणारी एक स्वयंसिद्ध तरुणी. दिसायला खूपच सुंदर अशी म्हणता येणार नाही, पण नाकी-डोळी छान आणि आपल्या वागण्या-बोलण्याने जिथे जाईल तिथे सगळ्यांना लळा लावून आपलंस करून घेणारी. घरच्यांची आणि मित्र मैत्रिणींची जान. घरामध्ये सगळ्यात लहान असल्यामुळे शेंडेफळ, लाडात वाढलेली. असं असलं तरी इथपर्यंचा तिचा प्रवास सोपा नव्हता.
कोकणातल्या XXX नावाच्या निमशहरी भागात लक्ष्मीकांत आणि त्यांचं कुटुंब राहात होत. वडील लहानपाणीच गेलेले. घरी त्यांची आई गोदावरी, मोठा भाऊ रमाकांत, २ नंबरचा भाऊ रंगराव, ३ नंबरला लक्ष्मीकांतना स्वतः आणि सगळ्यात छोटी बहीण कांचन असे लोक राहात. घराची परिस्थिती बेताचीच होती पण गोदावरीबाईंनी आपल्या मुलांना चांगले संस्कार आणि शिक्षण देऊन मोठं केलं. मुलीचं चांगल्या घरी लग्न लावून दिलं. मुलांनी पण आईचे कष्ट वाया जाऊ दिले नाहीत, शिकून सावरून मुलं आप-आपल्या पायावर उभी राहिली. लक्ष्मीकांत स्वतः महाराष्ट्र पोलीस मध्ये सेवा बजावत होते. त्यांच्या प्रमाणेच इतर भाऊही शासकीय सेवेमध्ये चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत होते. जशी जशी गोदावरीबाईंची मुलं मोठी झाली, मुलांची लग्न झाली, मुलांना मुलं झाली, तसं तसं राहत घर छोटा पडू लागलं. घराची विभागणी झाली. आता पर्यंत एकत्र राहणारे सगळे आता वेगळे वेगळे राहायला लागले. राहायला वेगळे वेगळे होते पण वेळ मिळे तसा किंवा काही कार्यक्रम वैगेरे असेल तर सगळे लोक एकत्र मिळून पार पडायचे. सारे गुण्या गोविंदाने राहात होते.
मोठ्या भावांची लग्न झाल्या नंतर लक्ष्मीकांत यांचं पण लग्न झालं. सुलभा लक्ष्मीकांत यांची पत्नी. लक्ष्मीकांत शासकीय सेवेमध्ये तर सुलभा गृहिणी असा यांचा सुखाचा संसार चालू झाला. लग्नानंतर २ वर्षातच दोघांच्या सुखी संसाराच्या वेलीला एक सुंदर फुल उमललं. मुलगी झाली. घरामध्ये आनंदच वातावरण होत. मुलीच नाव ज्योती असं ठेवण्यात आलं. दोघांच्या सुखी संसाराला प्रकाशमान करून टाकणारी ज्योती. ज्योती नंतर त्यांना आणखी एक मुलगी झाली तीच नावं प्रिया. लक्ष्मीकांत आणि सुलभ यांना याच्या नंतर कोणताही आपत्य नको होत, म्हणून त्यांना कुटुंब नियोजन शस्रक्रिया करायची होती. पण गोदावरीबाई थोड्याश्या जुन्या विचाराच्या होत्या. त्यांना मुलगा हवा होता. गोदावरीबाईनी कुटुंब नियोजन शस्रक्रियेला विरोध केला. गोदावरीबाईंच्या इच्छेखातर दोघांनी मग आणखी एका अपत्याला जन्म देण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या वेळी पुन्हा मुलगी जन्माला आली. सुलभा आणि लक्ष्ममिकांत यांनी गोदावरीबाईंच्या विरोधात जाऊन कुटुंब नियोजन शस्रक्रिया करवून घेतली. सुलभा आणि लक्ष्मीकांत खूप खुश होते. गोदावरीबाई थोड्याश्या नाराज होत्या. पण वेळ जाईल तसं वातावरण पुन्हा सगळं सुरळीत झालं. तिसऱ्या मुलीच नाव ठेवलं गेलं "मुग्धा"
प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये तिचा पहिला हिरो असतो तो तिचा बाप. पण नियतीने मुग्धाच्या आयुष्यात काही तरी वेगळंच लिहिलं होत. मुग्धा जेव्हा फक्त ११ महिन्याची होती तेव्हा लक्ष्मीकांत यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. घरावर शोककळा पसरली. ज्या वयात बाप म्हणजे कोण असतो ते समजत सुद्धा नव्हतं, ज्या वयात बापाच्या अंगा-खांद्यावर खेळायचं त्या वयात मुग्धा बापाच्या नात्याला पोरकी झाली होती. सुलभा आणि ज्योती यांच्यावर दुःखाचा डोंगरचं कोसळला होता. मुग्धा आणि प्रिया लहान असल्यामुळे यांना अजून नीटसं काही समजत नव्हतं. लक्ष्मीकांत आणि सुलभा यांच्या संसाराच्या गाड्याचं एक चाक निखळलं होतं. मृत्यूनंतर दिवसाचे सगळे विधी आणि सोपस्कार होईपर्यंत घरी सांत्वन करायला येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ असायची, त्यामुळे दिवस निघून जायचे. पण सगळे सोपस्कार पूर्ण झाल्या नंतर वर्दळ कामी झाली आणि घर भकास वाटू लागले. नाही म्हणायला रामाकांत आणि रंगराव अधून मधून लक्ष देत होते. त्यांची नोकरी-संसार सांभाळून जेवढं जमेल तेवढं ते करत होते.
थोड्या दिवसानंतर सुलभा या धक्क्यामधून बाहेर पडून आपलं आयुष्य सुरळीत करण्याचा प्रयत्न करू लागली. तिचा पूर्ण दिवस आपल्या घरच्या कामामध्ये आणि मुलींचा सांभाळ करण्यामध्ये जात असे. मोठी ज्योती शाळेला जात होती. प्रिया आणि मुग्धा लहान होत्या त्या घरीच असायच्या. हळू हळू त्यांचं जीवन पूर्वपदावर येऊ लागलं होत. सुलभाला घरच्या कामामध्ये ज्योतीचा खूप हातभार लागत होता. छोट्या वयातच ज्योतीला आलेली समाज पाहून सुलभाला मोठं आश्चर्य वाटायचं. सुलभाही धक्क्यातून सावरून मोठ्या हिंमतीने पुढच्या आयुष्याची वाटचाल करू लागली. घरच्या आणि पोलीस डिपार्टमेंट मधील काही ओळखीच्या लोकांच्या सहकार्याने लक्ष्मीकांत यांच्या जागी पोलीस डिपार्टमेंट मध्ये नोकरी लागते का यासाठी तिची धावपळ चालू होती. अखेर काही सोपस्कार आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर सुलभाला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार हे नक्की झालं. शिक्षण जास्त झालं नसल्यामुळे तीच पद तितकस मोठं नसणार होत. पण पुढचं आयुष्य जगण्यासाठी आणि मुलींचा सांभाळ करण्यासाठी जो मानसिक आणि आर्थिक पाठिंबा लागतो, तो देण्याचं काम या नोकरीमुळे तिच्या आयुष्यात होणार होत.
क्रमशः ...