°° मी एक मुंगी, तू एक मुंगी °°
प्रशिक्षणासाठी उशीर होतो आहे म्हणून मी गडबडीने निघालो. घाईघाईत जात असताना अचानक ठेसाळलो. ठेस पायाच्या अंगठ्याला लागली असली तरीही वेदनेची एक कळ पार सर्वांगात शिरली. कुणीतरी शिव्या दिल्या हा अंधश्रध्देला खतपाणी घालणारा विचार माझ्या डोक्यात शिरलाच.शिव्या जरी दिल्या नसल्या तरी कुणी तरी आठवण नक्कीच केली हा विचार डोक्यात शिरत असताना एक मूर्ती चटकन डोळ्यासमोर आली....संभामामा! तसे पाहिले तर संभामामा ना माझ्या नात्यातला ना गोत्यातला. मात्र, गेली काही वर्षे तो माझ्या मित्र परिवारातील एक महत्त्वाचा भाग होता. समुद्रात मोठं तुफान यावं, दोन ओंडके शेजारी यावेत. पाण्याच्या प्रवाहासोबत त्यांचा काही काळ प्रवास सुरु असताना पुन्हा पाण्याच्या प्रवाहामुळेच ते ओंडके विलग व्हावे असा काहीसा हा प्रकार! नोकरीनिमित्ताने मी कोरवडला दोन वर्षे होतो. तिथे संभामामा, देशमुख, काळे आणि मी असे आमचे एक मैत्रीचे छान वर्तूळ होते. यात संभामामा हा तसा अडाणी... निरक्षर पण हिशोबात एकदम पक्का! तोही आमच्याप्रमाणे पोटार्थी म्हणून कोरवडला आलेला. निस्वार्थ मैत्री होण्यासाठी जशी जात, धर्म, आर्थिक स्तर, व्यवसाय आडवे येत नाही तसेच शिक्षणही आडवे येत नाही. दोन मनं, दोन मतं मिळाली की मैत्रीची वीण गुंफायला सुरू होते. हे ऋणानुबंध जसजसे घट्ट होत जातात तसतशी ती वीण अधिकाधिक घट्ट होत जाते. मुंग्या जशा एकत्र येतात. परंतु एखादे संकट येताच घरातल्या घरात पांगल्या जातात. त्याप्रमाणे माझी बदली झाली आणि कोरवडचे आमचे मैत्रीचे वर्तूळ छेदल्या गेले. जेव्हा केव्हा कोरवडचे कुणी समोर येत असे तेव्हा तेव्हा आठवणींना उजाळा मिळत असे. संभामामाचे नाव अग्रक्रमाने पुढे येत असे. तसा मी अंधश्रध्दाळू नाही पण जेव्हा केव्हा ठसका, उचकी, ठेस लागे तेव्हा इतर कुणाची आठवण यायच्या आधी संभामामाचे नाव ओठावर येत असे.
त्यादिवशीही गडबडीने प्रशिक्षणासाठी जात असताना ठेच लागताच संभामामा आठवला.गेल्या अनेक त्याची भेट झाली नव्हती. तरीही त्याची अनेक रुपं जशीच्या तशी पुढे येतात. आठवणींचा महापूर येतो. मी प्रशिक्षण स्थळी पोहोचलो. तिथे अनेक मित्रांच्या भेटी होत गेल्या पर्यायाने संभामामा पुन्हा विस्मृतीत गेला. एकाला अनेक भेटले की, मतांचा गलबला होतो. हास्यविनोदात आमचा एक गट दंग असतानाच आवाज आला,
"काय पांडे काय चालले आहे? " मी आवाजाच्या दिशेने पाहिले. कोरवड येथील माझे सहकारी काळे नावाचे शिक्षक मला विचारत होते.
"काही नाही. तुमचे काय चालले?"
"कोरवडी जाणे-येणे. तुमचे आपले बरे. कोरवडला आलात, काही वर्षे राहिलात. घेतली बदली करून. स्थलांतरीत होणाऱ्या पक्षाप्रमाणे!"
"चला. चहा घेऊ या."
"चहासोबत भजे लागतील बरे." काळे म्हणाले. ते दहा वर्षांनी मला ज्येष्ठ होते. कोरवडला पंधरा वर्षांपासून सेवा बजावत होते. मात्र बदली होत नव्हती. दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात बदलीचा अर्ज न चुकता पाठवून स्वतःचे कर्तव्य बजावत होते. त्यांच्यानंतर कोरवडला अनेक शिक्षक आले. काही वर्षे राहून बदली करून गेले. परंतु हे जिथल्या तिथे. जणू कोरवड गावी दत्तक बसल्याप्रमाणे! आम्ही इतर हॉटेलपासून थोडे दूर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेलो. तिथे गर्दी थोडी कमी आणि निवांतपणा अधिक मिळेल म्हणून. अर्थात त्या हॉटेलची कळाही तशीच. दोन चार मोडकी बाके, त्यांना साबणाने घास घासले तरीही मुळचा रंग दिसणार नाही. मनगटापर्यंत हात उघड्या हौदात बुडवून पाण्याचे प्याले ठेवून तो पोऱ्या आमच्या आदेशाची वाट पाहात उभा राहिला.
"भजे आण." मी म्हणालो.
"ए बाबा, गरमागरम आण हं." काळे म्हणाले. गरमागरम भजे म्हणजे काळ्यांचा जीव की प्राण! गरम भजा न फोडता अख्खाच्या अख्खा तोंडात टाकताच जीभ भाजली म्हणजे ते भजे चांगले असा आपला काळेंचा समज!
"तुमची गरमागरम भज्यांची आवड गेली नाही का?"
"पांडेजी, अहो, कढईतून काढलेली गरम भजी म्हणजे जीव की प्राण हो. असे म्हणतात की, मृतात्म्याची एखादी इच्छा अपूर्ण राहिली तर म्हणे कावळा पिंडाला शिवत नाही. हे जर खरे असेल तर माझ्या पिंडाला कावळा तेव्हाच शिवेल जेव्हा माझ्या पिंडाजवळ गरमागरम किलो- दोन किलो भजे ठेवण्यात येतील..."
"काळेसर, काहीही बरे..." मी हसत पुढे म्हणालो, " तरी बरे, संभामामा तुमची गरम भज्यांची हौस वर्षानुवर्षे भागवतात..."
"नाही हो. संभामामा गेला आणि भज्याची चवच गेली.. "
"काय? संभामामा गेला?"विजेचा जबरदस्त धक्का बसल्याप्रमाणे मी विचारले.
"तुम्हाला माहिती नाही? त्याला जाऊन एक वर्ष झाले."
तितक्यात पोऱ्याने आणून ठेवलेल्या बशीतला एक भजा हातात घेऊन मी त्याला फोडले आणि दचकलो. आत मला संभामामाचा चेहरा असल्याचे भासत होते.भजा माझ्या गळ्याखाली उतरत नव्हता. मी विचारले," आजारी होता का?"
"आजारी नाही. काही नाही. शनिवारी मध्यंतरात मला नेहमीप्रमाणे गरम भजे काढून दिले. नंतर सोमवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो. सायकल लावत असतानाच पोरं म्हणाली की, गुरुजी संभामामा मेला.... झाले त्यादिवशीपासून पोट भरण्यासाठी भजे खातो पण ती बेचव लागतात."
तितक्यात प्रशिक्षण सुरु होत असल्याची सूचना माइकवरुन जाहीर झाले आणि आम्ही जड पावलाने तिकडे निघालो. पण का कोण जाणे तासापूर्वी असलेला उत्साह एकाएकी मावळला. पावलं जड झाली. दो मनाने मी प्रशिक्षणासाठी उपस्थित झालो.तरीही माझे मन चार वर्षांपूर्वीच्या नोकरीच्या गावी म्हणजे कोरवडला पुन्हा पोहोचले........
कोरवड या गावी मी शिक्षक म्हणून हजर झालो. मनात असंख्य प्रश्न, अनंत विचार.... काही तरी करून दाखवण्याची इच्छा होती, जिद्द होती. कोरवडची शाळा सातवीपर्यंत होती. दोन खोल्या चार शिक्षक अशी अवस्था! मी उपस्थित होताच कुणी तरी म्हणाले,
"बरे झाले. पांडे आले. चाराचा भार पाचावर...एक मडकं धरायला...."
शाळेतला माझा पहिलाच दिवस. मध्यंतर झाले. तीनही शिक्षक हॉटेलकडे निघाले. मुख्याध्यापक मात्र गावात निघाले. काळे, देशमुख, पाटील हे तालुक्याच्या गावाहून जाणे-येणे करायचे. काळे, मला म्हणाले,
"चला. पांडे चहा घेऊ." मी त्यांच्या सोबत निघालो. शाळेजवळ असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही पोहोचलो. हॉटेल कसले दहा बाय सात अशी खोली. त्यात एका बाजूला एक काळेकुट्ट कपाट. कपाटाला भिडून एक चाळीस-पंचेचाळीस वर्षाचा इसम बसला होता. काळेभोर धोतर, तसलीच बनियन. त्या बनियला दोन तीन खिसे. समोर दोन चार डब्बे. त्यापुढे एक स्टोह. त्याच्या बाजूला एक माठ. स्टोच्या बाजूला विटा रचून केलेल्या छोट्या टेबलवर ठेवलेल्या वेगवेगळ्या ताटांमध्ये भजे, चिवडा ठेवलेला. माझ्याकडे बघत त्या माणसाने विचारले,
" हे नवं पाखरू कोण म्हणावं?"
"संभामामा, हे नवीन गुरुजी पांडे. आणि हे संभामामा खाद्यमंत्री...हॉटेल मालक."
मळकटलेल्या हातांनी कढईत भज्याचं कालवलेले पीठ टाकत संभामामा म्हणाला,
"हे मातर लई बेस झालं नवा मास्तर आला म्हंजी मी आता 'राम' म्हणायला मोकळा."
"संभामामा, हे काय बोलता?" देशमुखांनी विचारले
"मास्तर, आव्हो, जीवाचा काय ईश्वास? आता तुमी पाच झाले म्हणजे कोरम फुल्ल! म्या आसा...ना आगा ना पिछा. जे काय हाय ते मास्तरच...." इतक्यात मुख्याध्यापक परत आलेले पाहून मी म्हणालो,
"साहेब, तर आले की..."
"तर मंग आज सायबाच्या घरी सैपाकच झाला नसाल. आलं बिचारं बंद चूल बघून...." सारे खो खो हसलज. मला काही समजलेच नाही. मी सर्वांकडे बघतच राहिलो. मात्र संभामामाचे वारंवार मास्तर म्हणणे माझ्यासारख्या नवशिक्षकाला पटले नाही. मी भीत भीत म्हणालो,
"मामा, तुम्ही हे मास्तर... मास्तर म्हणता..."
"मंग काय झाले? आहो नवे मास्तर, मास्तर म्हंजी कशी आपुलकी वाटते, माणसाच्या जवळ आल्यावानी वाटते. तुमचे ते सर का फर कसं येगळच वाटते बगा...सावत्र मायीने आवाज दिल्यावानी....."
'गरम गरम भज्यावर या शिक्षकांचे विशेष प्रेम दिसते....' कढईतल्या भज्यांकडे बघत मी मनात म्हणालो.
त्यानंतर जसजसे दिवस जात होते, तसतसा मीही संभामामांच्या भज्यांच्या प्रेमात पडत गेलो. ते भजे आम्हा शिक्षकांच्या आहारातील एक ठराविक भाग झाला. कोरवड या पोहोचण्यासाठी बारा किलोमीटरचे अंतर पार करावे लागायचे. अगोदरच्या तीन शिक्षकांना मीही सामील झालो. तेवढे अंतर सायकलवर कापणे म्हणजे तोंडचा खेळ नाही. उर असा उडायचा. परंतु शेवटच्या टप्प्यात कोरवडची शाळा आणि खरे सांगायचे तर संभामामाचे हॉटेल दिसले की, भरून आलेली छाती एकदम मोकळी झाल्यासारखी वाटायची. फार मोठे ओझे कमी झाल्याची जाणीव होत असे. शाळेच्या भिंतीला सायकल टेकून सायकल उभी करून संभामामाच्या हॉटेलमध्ये गेलो की, संभामामा चौघांना पाण्याने भरलेले चार तांबे देऊन स्वागत करायचा. आजकाल अशी कृती दुर्मीळ झाली आहे. त्याची ते स्वागत पाहून सुरुवातीला नकळत काळीज भरुन येत असे. तोंडावर पाणी मारून आम्ही खोलीतल्या पोत्यांवर बसलो न बसलो की, संभामामा कढईतले तेल गरम व्हावे म्हणून स्टोव्हला पंप मारायचा पण नेमका तो स्टोव्ह भज्यासारखा फुगून बसायचा. मग मामा त्याला शिव्या देत पिन करत असे. ते करताना त्याची तीन बोटे जमिनीशी दोस्ती करत असायचे. स्टोव्हने रुसवा सोडल्याचा सिग्नल देताच आनंदाने भज्याचं पीठ कालवायला घेत असे. पीन करताना बोटांना लागलेली माती, घासलेटचा वास त्या पिठात कालवल्या जाई. कदाचित त्यामुळेच भज्यांना खमंगपणा येत असावा. सुरुवातीला ते सारे पाहून मला कसेसेच होत असे. पण हळूहळू मलाही सवय झाली. नजर मेली. इतकी की, पॉश हॉटेलमधले भजेही मला फिके वाटू लागले.....
आमच्यापैकी देशमुख गुरुजींचे भज्यावर अतिशय प्रेम. सायंकाळी शाळा सुटल्यावर पावकिलो भज्यावर ताव मारून ते घर गाठत असत. मामाचेही देशमुख गुरुजींवर विशेष प्रेम. गावातील काही गिऱ्हाईक ठरलेले. एकदा गावातील एक प्रतिष्ठित माणूस भज्यावर ताव मारून स्वतःच्या खात्यात पैसे मांडून निघाला. संभामामा निरक्षर असल्यामुळे ज्याचे खाते त्याने लिहावे हा मामांचा अलिखित नियम. तो माणूस निघून जाताच मामाने ती डायरी देशमुख गुरुजींकडे दिली आणि म्हणाला,
"मास्तर, आकडा किती लिवला बघा तर..."
देशमुख गुरूजींनी तो आकडा पाहिला आणि आश्चर्य म्हणजे त्या माणसाने पाव किलो भज्यावर ताव मारलेला असताना पैसे मात्र चक्क छटाक भज्याचे लिहिले होते. त्या माणसाला बोलावून त्यांची मामाने घेतलेली हजेरी पाहून आम्हालाच लाजीरवाणे झाले. निरक्षर असणारा, भोळसट दिसणारा संभामामा तितकाच चतुर होता.गावातील कुणाचे कुठे लफडे आहे, कुणाचे पाणी कुठे मुरतेय ह्याची बित्तंबातमी संभामामाला माहिती असायची त्या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे भजे खात असताना कुणी तरी येऊन विचारले,
"संभामामा, सिस्टरीन आलती की..."
"व्हय. आलती रे. "
"मंग कुठं गेली?"
"ती व्हय? गेली की सरपंचाकडं."
"त्याच्याकडं कहाला?"
"आता कसं सांगू बाप्पा, आरे, निरोद कसा वापरायचा ते ....." संभामामा मुरक्या मुरक्या हसत म्हणत असताना आम्हाला ठसका लागला. गरम गरम भजे आणि संभामामाचे चुटकले तोंडी लावायला नेहमीच मिळत. संभामामाचे भज्याप्रमाणे एक उदाहरण कायम लक्षात राहिले आहे. त्यादिवशी आम्ही सारे भज्याचा आस्वाद घेत असताना मुख्याध्यापकही पंगतीला होता. कारणही तसेच होते. विनाकारण भजे, चहापाणी अशी मेजवानी देणे त्यांना आवडत नसे. महत्त्वाचे टपाल आणि तेही किचकट असले की, त्याला काळेगुरुजींशिवाय कुणी हात लावत नसे. काळे गुरुजींचा हात त्या कामाला लागण्यासाठी आधी काळेगुरुजींच्या हाताला भज्याचे तेल लागणे आवश्यक असायचे. भजे तळत असताना संभामामाचे लक्ष गावातून येणाऱ्या रस्त्यावर गेले. दूरवरून सात आठ माणसे येत होते. त्यात गावचे सरपंचही होते. त्या लवाजम्याला पाहताना मुख्याध्यापकांना तोंडातला भजा आणखीनच तिखट लागल्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी विचारले,
"हे लोक कशाला यायलेत?"
"कहाला म्हंजे? तुमाला ठाव न्हाई? मास्तर गावात राहता का न्हाई? तुम्ही ते शाळतल्या पोऱ्हांकडून दोन रुपये म्हैना जमा करता ना, त्येच काय केलं?"
"दोन दोन रुपये घेतो की, पण तो तर गावातील लोकांचा ठराव आहे."
"किती पैका जमलाय? त्येच काय केलं?"
"साहेब, खरेच त्याचा हिशोब ठेवलाय का? रक्कम बँकेत ठेवला काय?"
"अहो, बँकेत तर जमा नाही केला आणि काही खर्चही झाला नाही."
"बाप रे! हेडमास्तर आता तुमच काय बी खर न्हाई."
"म्हणजे?"
"अव्हो, बगा तर समद्यांच्या फुडं गाढव दिसतय की. काही तरी काळंबेर दिसतय बुवा."
"निघतो आता..." असे म्हणत हेडमास्तरांनी तालुक्याची वाट धरली. आणि आमची सर्वांची हसून हसून वाट लागली. तिथे पोहोचलेल्या सरपंच आणि इतरांना आमच्या हसण्याचे कारण समजताच तेही हसण्यात सामील झाले. त्या नादात आम्ही सर्वांनी दररोजच्या कोठ्यापेक्षा भज्यांवर डबल ताव मारला.
असा हा आमचा संभामामा! ना कुणी सोयरा ना पाहुणा! भर तारुण्यात बायको वारली. संभामामाने पुन्हा दुसरे लग्न केले नाही. त्याला भाऊ-बहीण कुणी नव्हते. त्याचे मूळ गाव तसे जवळच कुठे तरी होते. बायको मरण पावली आणि संभाचे स्वतःच्या गावावरचे लक्षच उडाले. जवळ असलेली पाच-सात हजाराची पुंजी घेऊन त्याने कोरवड गाठले. शाळेजवळ असलेल्या नव्या
आबादीत प्लॉट मिळाला. तिथे कामापुरती एक खोली बांधून तिथेच हॉटेल आणि संसार दोन्ही थाटले. कोरवडला मी पाच वर्षे होतो. त्या काळात संभामामाचे हॉटेल म्हणजे जीवनातले एक अविभाज्य अंग झाले होते. इतके की, दैनिक टाचणात मध्यंतर लिहिताना त्याऐवजी संभामामाचे
हॉटेल लिहिण्याचा मोह होत असे.
कोरवडहून बदली झाली आणि संभामामाचा निरोप घेताना बरेच जड गेले. नंतरचे काही महिने संभामामाची दररोज आठवण येत असे. विशेषतः हॉटेलमध्ये भजे खाताना तर नक्कीच. कारण भजे खाण्याची एवढी सवय लागली होती की, घरी राहूनही अनेकदा भजे खाण्याची अधूनमधून लहर येत असे. परंतु संभामामाच्या भज्यांची चव मात्र येत नसे. संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलो आणि संभामामाची आठवण धुसर होत गेली. कोरवडचे कुणी भेटले की,मात्र आवर्जून संभामामाची आठवण मी काढत असे. त्यादिवशी काळे गुरुजी भेटले आणि पुन्हा आठवणींना उजाळा मिळाला. परंतु संभामामाने या जगाचा निरोप घेतला हे ऐकून मन हेलावले. संभामामाची मूर्ती डोळ्यासमोर येत होती आणि भज्यांची चव जीभेवर विराजमान होत होती....
प्रशिक्षण संपले. मी बाहेर आलो. शिक्षकांच्या त्या सागरात तहसिलच्या फाटकाजवळ उभ्या असलेल्या एका इसमाने माझे लक्ष वेधले. व्यक्तीमत्त्व हळूहळू स्पष्ट होत होते....तो...तो..संभामामा होता. तेच मळकट धोतर, त्यावर चुरगळलेला सदरा आणि गावाला जाताना वापरण्यासाठी घेतलेला तांबडा, चुरगळलेला पटका...होय! तो संभामामाच होता. जणू काय माझ्या भेटीला आला होता..... गरमागरम भजे घेऊन...
नागेश सू. शेवाळकर