एका मोठ्या शहरापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर एक मुलींची आश्रमशाळा होती. शाळेला लागून असलेल्या दुसऱ्या भव्य इमारतीत मुलींचे वसतिगृह होते. ती शाळा आणि ते वसतिगृह राज्यात नामांकित होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पालक आपापल्या मुलींना तिथे प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करीत असत. शाळा आणि वसतिगृह यांच्या अवतीभोवती फार मोठे जंगल असले तरीही त्याची व्यवस्थित निगा राखली असल्यामुळे एक सुंदर वन तयार झाले होते. शाळा आणि वसतिगृह यांच्या दोन्ही बाजूला छान छोटी छोटी तळी होती. या तळ्यांपासून काही अंतरावर आंब्याची मोठमोठी झाडे होती. दोन्ही इमारतीच्या भोवताली कुंपणाच्या मोठमोठ्या भिंती असल्यामुळे बाहेर जाण्यासाठी किंवा आत येण्यासाठी एक मोठे फाटक होते. तिथे एक चौकीदार कायम बसलेला असे. विद्यार्थीनींना बाहेर जायचे असल्यास संबंधित शिक्षकाची परवानगी असल्याशिवाय बाहेर जाता येत नसे. शाळा सुटली की, मुली गटागटाने त्या इमारतींच्या परिसरात परंतु फाटकाच्या आतच फिरायला जात असत.
त्यादिवशी शनिवार असल्यामुळे दुपारी शाळेला सुट्टी होती. महत्त्वाचा अभ्यास आणि काही कामे आटोपून पाच-सहा मुलींचे असे अनेक चमू परिसरात गटागटाने फिरत होते. कुंपणाजवळ अशा काही जागा... टेकड्याप्रमाणे उंचवटे होते की, तिथे उभे राहिले म्हणजे शेजारच्या शेतातील तळ्याजवळचे सारे काही दिसत होते. दुपारचे तीन वाजून गेले होते. जानेवारी महिना असूनही आभाळात काळ्या कुट्ट ढगांनी गर्दी केली होती. कोणत्याही क्षणी पाऊस येण्याची लक्षणे होती. थंडगार वारा सुटला होता. सर्वांना हवेहवेसे असे वातावरण पसरले होते. मुली त्या वातावरणाचा मनसोक्त आनंद लुटत होत्या. हसत, खेळत, बागडत होत्या. एका उंचवट्यावर उभ्या असलेल्या मुलींपैकी एका मुलीचे लक्ष आंब्याच्या झाडांकडे गेले. तिथे बागडणारा मोरांचा एक थवा पाहून एक मुलगी अत्यानंदाने ओरडली,
"अग, अग, बघा तर किती मोर जमलेत ते..." तिचा आनंदी स्वर ऐकून सर्व मुलींनी एकदम तिकडे पाहिले.
"अय्या, किती सुंदर ग. एक-दोन---- चार-पाच मोर..आणि बघातर पिसारा फुलवून नाचतात. मोबाईलची परवानगी असती तर हे मनमोहक दृश्य आपण मस्तपैकी टिपले असते आणि आपल्या घरी पाठवले असते..."
"हो ना. साधा मोबाईल सोबत ठेवता येत नाही...."
"ते जाऊ द्या ग. 'आलिया भोगाशी असावे सादर!' याप्रमाणे जे आहे त्याचा तर आनंद लुटूया. बहुतेक पाऊस येईल असे वाटतंय कारण मोरांना म्हणे पावसाची चाहूल आधीच लागते आणि म्हणून ते आनंदाने पिसारा फुलवून नाचतात."
"बरोबर आहे. आपण नेहमी ऐकतो ते एक गीत म्हणूया."
"गीत? कोणते ग?"
"अग, आपण लहानपणापासून ऐकतोय ना ते... 'नाच रे मोरा, आंब्याच्या वनात...' हे गीत."
"अय्या, खरेच आपण हे गीत ऐकत ऐकत लहानाचे मोठे होत गेलो परंतु अजूनही हे गीत कुठेही लागले तरी पावले रेंगाळतात, ओठ गुणगुणायला लागतात. कुणाला पाठ आहे का ग ?"
"म्हणायला सुरुवात तर करूया. आपोआप सुचते.....
'नाच रे मोरा आंब्याच्या वनात....... "
"मला सांगा, आंब्याचे वन .... किती सुंदर शब्द आहे ना. मुळात वनराई हिच कल्पना जबरदस्त आहे. आमच्याकडे की नाही, शेतात एकापेक्षा जास्त आंब्याची झाडे असली ना की त्या झाडांच्या समुच्चयाला आमराई असे म्हणतात...."
"बरोबर आहे. कुठे काही कुठे काही शब्द वापरतात परंतु प्रत्यक्ष कल्पना महत्त्वाची आहे. आता हेच बघा ना, सध्याचे जे वातावरण आहे म्हणजे आकाशात ढग जमले आहेत. वारा सुटला आहे. जणू वारा आणि ढग यांच्यामध्ये झुंज सुरू झाली आहे. मधूनच लखलखणारी, कडकडणारी वीज जणू टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करीत आहे. या वातावरणात ढगांनीसुद्धा आपला रंग बदललेला आहे. नेहमी पांढरे शुभ्र असणारे ढग आता बघा ना कसे काळे कुळकुळीत दिसत आहेत. जणू असे वाटते पिंजलेल्या कापसातील काळा कापूस बाजूला केला आहे. आता या अशा मनमोहक वातावरणात आता मोराने स्वतःचा पिसारा फुलवून नाचले पाहिजे..."
"अग, बघ तर तू म्हणायला अवकाश. वनराईतल्या दोन-तीन मोरांनी पिसारा फुलवून थुईथुई नाचायला ही सुरुवात केली आहे. व्वा! काय पण तू सुंदर वर्णन केले आहेस ग..."
"मी नाही ग बाई. त्या गीतातल्या ओळींचा मला भावलेला अर्थ तेवढा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बरोबर आहे का चूक मला नाही माहित. ऐका कविवर्य ग. दि.माडगूळकर यांची ही सर्वांना आवडणारी, भुरळ घालणारी रचना....
एका मुलीने ते गीत सुरू करायला अवकाश इतर मुलींनीही तिला साथ दिली. ते पाहून ती मुलगी पुढे म्हणाली,
"बघा ना. मी म्हणाले होते ना, हे गीत आपल्या जसे मनात आहे, ह्रदयात आहेत तसेच ते ओठावर आहे. या गीताचा मुख्य उद्देश पावसाळी वातावरणात मोर कसा आनंदी होतो ते व्यक्त करण्याचा आहे. अशा वातावरणात जेव्हा पाऊस सुरू होईल. दुसऱ्याच क्षणी पावसाच्या धारा सुरू होतील. लहानथोर सारेच पावसात भिजून मनसोक्त आनंद लुटतील. त्यावेळी मोराला कुणीतरी आवाहन करते की, पावसाच्या धारा झरझर येत आहेत. त्या धारांनी झाडे, वेली, पशुपक्षी या सर्वांना चिंब भिजवून टाकले आहे. झाडांची पानेही पावसाने भिजली आहेत. आपण सारे मिळून पावसाचा आनंद लुटू, मस्तपैकी बागडू या. एखादे छानसे गाणे गाऊया. आरडाओरडा करूया. नाच रे मोरा..."
" एक सांगू का, आमच्या गावाकडे ना जेंव्हा अचानक पाऊस येतो ना, त्यावेळी शेतात काम करणारे शेतकरी, मजूर यांच्याजवळ ना छत्री असते, ना रेनकोट असतो. अशावेळी हे लोक शेतात असणाऱ्या पळसाची किंवा इतर झाडांची मोठमोठी पाने तोडून त्याची छानशी टोपी तयार करून ती डोक्यावर घेऊन पावसापासून स्वतःचे संरक्षण करतात. डोक्यावर घेतलेल्या पानांमुळे पाने तर भिजतात पण डोके भिजत नाही."
"अगदी बरोबर आहे. आता आपण पुढील ओळी सगळ्या मिळून गाऊया....."
तितक्यात एक मुलगी म्हणाली,
"तिकडे तळ्यात बघा, पावसाचे थेंब तळ्यात पडत आहेत. कवी गदिमांना ते पाहून छान कल्पना सुचली ते म्हणतात, पावसाचे पडणारे थेंब तळ्यात, त्या पाण्यावर नाचत आहेत. पानावर पडणारे थेंब बघा कसा टपटप आवाज करत आहेत. पावसाच्या ज्या धारा कोसळत आहेत ते पाहून गदिमा मोराला म्हणतात, पाऊस एका रेषेत कसा मस्त पडतो आहे. हे निळ्या रंगाच्या दोस्ता, चल. आपणही पावसात दोघे मिळून एखादा खेळ खेळूया. तुझा नाच पाहून आम्ही सारे आनंदी होतो...."
"किती सोप्या शब्दात आणि सहज अशा भावना आहेत ना. खरेच बघा ना, ते मोर कसे मस्त पिसारा फुलवून नाचत आहेत. ते पाहून मलाही वाटते असेच जावे आणि गदिमा म्हणतात त्याप्रमाणे त्या मोरांसोबत आपणही नाचावे या नयनरम्य वातावरणाचा आगळावेगळा आनंद लुटावा..."
"वाटते तर मलाही तसेच ग. पण इथून बाहेर पडता येत नाही त्याचे काय?"
"आपण इथूनच मोरांच्या नाचण्याचा आणि गीताचा आनंद लुटूया. खरेच मोर किती सुंदर, आकर्षक आहे ना, म्हणूनच त्याला 'राष्ट्रीय पक्षी ' म्हणून मान्यता मिळाली आहे. मोराची मान किती लांब आहे ग. त्याच्या हिरव्या आणि निळसर रंगाला ती मान शोभून तर दिसतेच पण त्याची पिसे बघा कशी लक्ष वेधून घेतात. पिसांवर असलेली विविध रंगाचे ठिपके किती शोभून दिसतात ना. त्याचा तुरा तर बघा, कसा बघतच राहावा असा आहे. त्याचा फुललेला पिसारा म्हणजे जणू एखादा पंखाच वाटतो. .."
"अग, मोराच्या एकूण डौलदार शरीरामुळे तो कुठेही उठून आणि शोभून दिसतो आणि म्हणूनच बायका जी पैठणी वापरतात ना त्या पैठणीवर हा मोर कसा मस्तपैकी डोलताना दिसतो. अग, कवी ते वातावरण आणि मोराचा पिसारा पाहून एवढे आनंदी झाले आहेत ना की, पाऊस थांबल्यानंतरही ते मोराला म्हणतात,जोरात पडणारा पाऊस तर थांबलाय, रिमझिम चालू आहे. अशा वातावरणात तुझी माझी जोडी जमली आहे. बघ आकाशात इंद्रधनुष्य पसरले आहे. सात रंगाच्या त्या सुंदर कमानीखाली हे मोरा, तू एकदा नाच. मला अशा मोहक वातावरणात तुला नाचताना पाहायला आवडेल..."
"अग, खरेच वर बघा,आताही कवी म्हणतात त्याप्रमाणे इंद्रधनुष्य फुलले आहे. त्याच्या दर्शनाने आमराईतील मोर किती आनंदी, उत्साही झाले आहेत. त्यांच्या आनंदाला एक प्रकारचे उधाण आले आहे. आनंदविभोर होऊन ते नाचत आहेत..." ती मुलगी त्या मोरांप्रमाणे वातावरणाचा आनंद लुटत असताना वसतिगृहाची घंटा घणघणली आणि एकमेकींकडे बघत साऱ्या मुली काहीशा नाराज होऊन वसतिगृहाच्या दिशेने निघाल्या......
नागेश सू. शेवाळकर,
११०, वर्धमान वाटिका फेज ०१,
क्रांतिवीरनगर लेन ०२,
संचेती शाळेजवळ, थेरगाव
पुणे ४११०३३ (९४२३१३९०७१)