Extra Marital Affair - 2 in Marathi Short Stories by Aniket Samudra books and stories PDF | एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-२]

Featured Books
Categories
Share

एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-२]

“अरे खरंच जा रोहनं, मी आत आईबरोबर पापड करत बसणार तु तसाही कंटाळशील. त्यापेक्षा जा ना तिच्याबरोबर. आणि ती काय तुला नविन आहे का? कॉलेजपासुनची आहेच की ओळख”, शरयु.

राधीका आपल्या भुवया थोड्याश्या उंचावुन म्हणाली, “बघं गं, मला काही प्रॉब्लेम नाही, पण नंतर तुच म्हणशील माझा नवरा पळवला म्हणुन!!” आणि दोघीही हसायला लागल्या.
रोहनने लगेच आपले कपडे बदलले. राधीकाबरोबर सिनेमाला जायचे यात एकदम थ्रिल्ल होते, पण त्याच बरोबर शरयुला एकटीला सोडुन जायला ही नको वाटत होते. शेवटी काय हरकत आहे. तसेही शरयु म्हणत आहे म्हणुनच जात आहे ना, लपुन-छपुन तर जात नाहीये. उगाच त्यांचे पापड-लाटणे बघण्यापेक्षा सिनेमा बघीतलेला बरा.. असं मनाला समजावुन तो बाहेर पडला.

दार लावतानाच शरयु म्हणाली..”आणि हो.. बाहेरच काही तरी खावुन या.. घरी काही केलेले नाहीये..”

गाडीत बसल्यावर पहीले काही क्षण शांततेत गेले. रोहनचे ह्रुदय जोरात धडधडत होते. त्याचा आवाज राधीकाला ऐकु जाईल की काय या विचाराने त्याने गाडीतील एफ.एम ट्युन केले.

“सोss”, राधीका आणि रोहन एकदमच बोलले.
राधीका त्यामुळे छानसी हसली.. तिच्या हसण्याने गाडीतील ताण थोडा कमी झाला.. “बोल बोल..” राधीका रोहनला म्हणाली.

“:-) सो.. कसे वाटले ऑस्ट्रेलिया? तु परत भारतात येणार आहेस असं शरयु म्हणाली”, रोहन
“हो अरे.. कंटाळा आला मला तिकडे. भारतात जसं मस्त मोकळं, स्वतंत्र वाटतं ना तसं नाही वाटत तिकडे. आपलं असं कोणीच नाही. आणि परत सध्या भारतीयं लोकांवर चाललेले हल्ले, त्यामुळे आई-बाबा पण म्हणत होते ये इकडेच म्हणुन.. मला काय, काहीतरी कारणंच हवं होतं” राधीका बोलता बोलता वाऱ्याने उडणारे केस सावरतं म्हणाली.

पुढील काही वेळ ऑस्ट्रेलिया तेथील विद्यापिठ, नोकरीचा अनुभव यावर राधीका बोलतं होती आणि रोहन ऐकत होता.

“मग आता भारतात येउन लग्न करण्याचा विचार असेल नाही का? शरयु म्हणाली तु अजुन लग्न नाही केलेस, आश्चर्य आहे. बाकी तु अज्जीब्बात बदलली नाहीस, होती तश्शीच आहेस.”, रोहन

“नाही रे.. अजुन मनासारखा मिळालाच नाही बघ. शेवटी सगळे शरयु सारखे लक्की थोडे ना असतात.. बाकी तु मात्र खुssप बदलला आहेस हं”, राधीका

“तु पण ना..” असं म्हणत रोहनने गाडीला वेग दिला. थोड्याच वेळात थिएटर आले. गाडी पार्क करुन थिएटर मध्ये शिरताना तेथील चित्र बघुन राधीका घाबरली होती.

“तुला माहीतीए मला ना, जाम भिती वाटते भुतांची वगैरे. सगळे हसतात मला, लहान आहेस का म्हणुन. मग या वेळेला हा सिनेमा लागला तेंव्हा ठरवलेच होते, काही झालं तरी हा सिनेमा बघायचाच, एकदाची भिती घालवुनच टाकायची”, राधीका विस्फारलेल्या डोळ्यांनी बाजुची भयानक चित्रं बघता-बघता बोलत होती.

सिनेमा सुरु झाला आणि राधीकाला वाटणारी भिती, टेंन्शन अंधारातही रोहनला जाणवत होते. खुर्चीला घट्ट पकडुन राधीका ताठ बसली होती. रोहनला खरं तर मनातल्या मनात हसु येत होते, पण मोठ्या प्रयत्नांनी तो हसु दाबुन ठेवत होता.

चित्रपटामध्ये नायीका रात्रीची एकटीच जंगलातुन जात असते. कॅमेरा हळु हळु तिच्या मागुन येत असतो. सगळीकडे धुके सदृश्य धुर असतो. नायीका घाबरलेली असते तरीही पुढे पुढे जात असते. कुठल्याही क्षणी कुठुन तरी कोणी तरी येईल अशी वेळ आलेली असते. अचानक रोहन त्याच्या हाताला झालेल्या स्पर्शाने दचकला. राधीकाने त्याचा खुर्चीवर ठेवलेला तळहात घट्ट पकडला होता. रोहनने तिच्याकडे बघीतले. राधीका अजुनही डोळे मोठ्ठे करुन पडद्याकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर पसरलेली भिती रोहनला स्पष्ट दिसत होती. कॅमेरा नायीकेच्या जवळ जवळ जात होता तसं-तशी राधीकाच्या हाताची रोहनच्या हातावरील पकड घट्ट होतं होती. आणि अचानक पडद्यावर भुताची ऐंन्ट्री झाली, त्याबरोबर राधीकाने डोळे घट्ट मिटुन घेतले आणि मान रोहनच्या खांद्यावर झुकवली.

तिच्या त्या दाट-कोमल केसांचा स्पर्श, हातावरील तिची पकड आणि दंडावरील तिच्या गरम-उच्छवासाने रोहनच्या अंगावर रोमांच उभे राहीले. थिएटरमधील थंडगार ए/सी मध्येही तिच्या हाताचा गरम स्पर्श रोहनला जाणवत होता. पडद्यावरील ‘तो’ सिन संपल्यावर राधिका बाजुला झाली.

“स्वॉरी हं..” आपले केस सावरतं राधीका हलकेच रोहनला म्हणाली, “..कसला भयानक आहे सिनेमा. मी नाही बघु शकत अजुन. प्लिज आपण बाहेर जायचे? प्लिज?”

“ओ.के”, असं म्हणुन रोहन उठला, मागोमाग राधीकाही उठली आणि दोघं जण थिएटरच्या बाहेर पडले. राधीकाचा श्वासोच्छवास अजुनही जोरात चालु होता. ती अजुनही टेंन्स्ड दिसत होती.

मग रोहनच म्हणाला, “चल कॉफी पिऊ यात, तुला बरं वाटेल.”

दोघांकडेही भरपुर वेळ होता..काय घडलं असेल पुढे?

कॉफी शॉप मध्ये राधीकानेच ऑर्डर दिली, “टु लात्ते (caffè latte) प्लिज!!”
रोहन, “तुला काय माहीत मला लात्ते आवडते?”

राधीका, “अरे म्हणजे काय, कॉलेज मध्ये नाही का एकदा आपण नविन कॅफे सुरु झाले होते तेंव्हा गेलो होतो.. तेंव्हा तु हिच घेतली होतीस कॉफी आणि म्हणाला पण होतास तुझी फेव्हरेट आहे म्हणुन!”

“असेल.. पण झाली त्याला आता ६-७ वर्ष!”, रोहन मनोमन आपली आवड राधीकाच्या लक्षात आहे हे ऐकुन सुखावला होता.

“A Lot Can Happen Over Coffee”, बाहेर लिहिलेल्या वाक्याकडे बोट दाखवत राधीका म्हणाली, “खरंच कित्ती साधे पण तितकेच परीणामकारक वाक्य आहे हे नाही?”

“हम्म..” कॉफी पित-पित, रोहन म्हणाला..”बरं ते जाऊ देत, काय गं, कॉलेज मध्ये तुझ्या मागे तो सुजित होता.. काय झालं पुढे त्याचे? नंतर काहीच कॉन्टाक्ट नाही ना?”

“:-) नाही रे.. मला तर तो निटसा आठवत सुध्दा नाही. आणि तोच काय, कित्तीतरी जणं माझ्या मागे होते :-)), अगदी तु सुध्दा.. हो ना?”, राधीका रोहन च्या डोळ्यात खोलवर पाहात म्हणाली.

“ए चल.. काहीही.. तसं काही नव्हते. आणि आपण असं कित्तीसं भेटलो होतो कॉलेज मध्ये?”, रोहन तिची नजर टाळत म्हणाला.

“अरे सांग रे.. डोन्ट वरी, शरयुला नाही सांगणार मी, खरं सांग”, राधीका
“नाहीsss, तसं काही नव्हते..” रोहन प्रयत्नपुर्वक आपल्या म्हणण्यावर ठाम रहात म्हणाला.
“बरं बाबा.. ठिक आहे”, राधीका

रोहनने तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक पाहीली होती, जी काही क्षणासाठी आली आणि परत निघुन गेली. नंतर दोघांनी खुप्प गप्पा मारल्या. विषय एक असा कुठलाही नव्हता. खरं कारण होतं ते म्हणजे दोघंही जण एकमेकांची कंपनी एन्जॉय करत होते. मग त्यांनी एकत्र जेवण घेतले, (यावेळेसही राधीकानेच ऑर्डर दिली होती).

घरी परतत असताना राधीका वाकुन वाकुन गाडीचा स्पिडोमिटर बघत होती. शेवटी रोहनने न रहावुन विचारले, “काय झालं?”

“अरे स्पोर्ट्स कार ना तुझी? मग असा ४०-६० च्या वेगाने काय गाडी चालवत आहेस? जरा चालव ना वेगाने? का मी चालवु?” राधीका

मग रोहनने गाडीला तुफाने वेग दिला. बऱ्याच दिवसांनी त्याने त्याची लाडकी कार अशी पळवली होती. नाही तर शरयु असताना तिचे नेहमी तुणतुणं असायचं, “गाडी हळु चालव, गाडी हळु चालव.” ‘कित्ती फरक आहे दोघींच्यात!’ रोहनच्या मनात विचार चमकुन गेला.

रोहनने राधीकाला तिच्या घरी सोडले आणि तो त्याच्या घरी परतला. खुप मस्त संध्याकाळ गेली होती त्याची. घरी आला तेंव्हा शरयु नुकतीच आली होती. नेहमीप्रमाणेच तिची स्वयंपाक घरात काहीतरि खुडखुड चालु होती. रोहनला बघताच ती म्हणाली, “अरे, बरं झालं तु आलास. अरे ह्या गॅस-हब ला बघ ना काय झालेय? सुरुच होतं नाहीये. आत्ताच तर आणला ना आपण? उद्या सकाळीच आपण दुकानात जाउन दाखवुन आणु. वॉरंटी मध्ये आहे तर तो करुन तरी देईल ना!”

रोहन चांगली संध्याकाळ घालवुन परतला होता. घरी आल्या आल्या शरयुची कटकट त्याला नकोशी झाली. “काय वैताग आहे हिचा.. काय अवतार आहे?”, स्वतःशीच तो बोलत होता, नकळत त्याचे मन शरयु आणि राधीकाला कंपेअर करत होते आणि अर्थात त्याचे झुकते माप राधीकाच्याच बाजुला होते. कपडे बदलले आणि बेड-वर बसणार एवढ्यात त्याचा मोबाईल एस.एम.एस आला म्हणुन किणकिणला. “Thanks a lot for a wonderful evening, evening that i will cherish in my life”, राधीकाचाच मेसेज होता. मेसेज वाचुन त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले. मेसेज ठेवावा का काढुन टाकावा या विचाराने त्याची थोडी चलबिचल झाली आणि शेवटी त्याने तो मेसेज काढुन टाकला.

[क्रमशः]