यानंतर कौंडीण्य परतल्यावर सुशीला आणि कौंडीण्य परत रथात बसून पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान एक मोठे नगर लागले.
हे कोणते नगर? हे कोणाचे नगर आहे? त्यांना काहीच समजेना. इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. "स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात! या नगराचे ,राज्य तुमचेच आहे." असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभवसंपन्न राजप्रसादात नेले.
अनंतपूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते हे सुशिलेच्या लक्षात आले .
एके दिवशी कौंडीण्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले, "हे हातावर तू काय बांधले आहेस?"
सुशीला म्हणाली, "हा अनंत आहे. मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले. व याची पूजा केली त्यामुळे आपल्याला ही सुखसमृद्धी प्राप्त झाली आहे."
हे ऐकताच कौंडीण्याला राग आला. तो म्हणाला, "आपल्याला सुखसमृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने, माझ्या ज्ञानामुळे. मी केलेल्या खडतर तश्चर्येने. त्यात त्या अनंताचा काहीही संबंध नाही." असे म्हणून त्याने तो अनंतदोरक हिसकावून घेतला व अग्नीत टाकला.
अनंताचा कोप झाला. अनंतव्रताचा अपमान झाला.
यानंतर कौंडीण्याची सगळी संपत्त्ती नष्ट झाली. चोरांनी सगळी संपत्ती चोरून गेली. त्याच्या घराला आग लागून सगळे घर जळून भस्म झाले.
सुशीला आणि कौंडीण्य एकवस्त्रानिशी वनात भटकू लागली.
मग कौंडीण्याचे डोळे उघडले. त्याचा गर्व नाहीसा झाला. पश्चातापदग्ध झालेला तो शोक करीत, अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला. जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला,"तुम्हाला अनंत कोठे दिसला का?" प्रत्येकजण 'नाही' असे उत्तर देत असे.
त्या वनात कौंडीण्याला एक आम्रवृक्ष दिसला. त्या वृक्षावर खूप फळे होती, पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता.
एक बैल दिसला त्याच्यासमोर गवत होते पण तो ते खात नव्हता .
. त्याला दोन सरोवरे दिसली, पण त्यातले पाणी कुणीच पीत नव्हते.
त्याला एक गाढव व हत्ती दिसला. ते दोघे नुसतेच उभे होते. कोणी काही बोलत नव्हते. काही सांगत नव्हते.
तेव्हा कौंडीण्य दुःखी, कष्टी झाला. जमिनीवर पडून शोक करू लागला. 'अनंत, अनंत' अशा हाका मारू लागला.
त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली. तो वृद्ध ब्राम्हणरूपाने तेथे प्रकट झाला. कौंडीण्याने त्याच्या पायांवर डोके ठेवून विचारले, "तुम्ही तरी अनंत कोठे पाहिलात का?"
त्यावेळी 'मीच तो अनंत' असे तो ब्राम्हण म्हणाला आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले.
त्यांनी कौंडीण्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव त्याला परत दिले. भगवान अनंत विष्णूने कौंडीण्याला वर दिला. तू धर्मशील होशील. तुला कधीही दारिद्र्य येणार नाही .
भगवान विष्णू म्हणाले, "तुला जो आम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राम्हण होता; परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता. त्याने कुणालाही विद्यादान केले नाही म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली. त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येईनासे झाले.
तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता. त्याने बरेच दान केले होते; पण त्याला त्या दानाचा गर्व होता, त्यामुळे आता त्याच्यापुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते.
तुला ती दोन सरोवरे दिसली त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या. दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकीनांच दान देत असत. त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग नाही झाला, म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पीत नाही.
तुला जो गदर्भ दिसला तो तुझा क्रोध होय. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गदर्भाचा जन्म मिळाला. तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्येचा झालेला गर्व. तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला.
तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास. सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस, गर्व, अहंकार, देवाधर्माबद्दल तुच्छता दाखवलीस यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले.
पण आता तुला त्याचा पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जा व अनंतव्रत कर, म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल. मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसु नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील."
कौंडीण्याला सगळे पटले. त्याचा गर्व नाहीसा झाला. त्याने घरी जाऊन पुन्हा सुशीलेसह अनंतचतुर्दशीचे व्रत केले. त्याला अनंत वैभव प्राप्त झाले.
ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, "अनंत व्रताचा महिमा हा असा आहे. या व्रतामुळे कौंडीण्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले. त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे व्रत केलेत तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल."
मग हे व्रत पांडवानी केले आणि त्यांना त्यांचे सर्व गतवैभव परत मिळाले .
अशी ही अनंत चतुर्दशी ची कथा .
आजच्या दिवशी खर्या अर्थाने गौरी गणपती सणाचा शेवट होतों .
भक्तजन परत पुढल्या वर्षीसाठी आपल्या बाप्पाची वाट पाहतात .
क्रमशः