Ganpati bappa morya - 4 in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | गणपती बाप्पा मोरया - भाग ४

Featured Books
Categories
Share

गणपती बाप्पा मोरया - भाग ४

गणपतीची मूर्ती घरी नेताना वस्त्र पांघरून, अनवाणी पायांनी डोक्यावर टोपी घालून नेली जाते. औक्षण करून मूर्ती घरात घेतली जाते. तांदळावर गणपती बसविला जातो.
व फुले पत्री घालून पूजा केली जाते .
त्यानंतर पाच दिवस दररोज सकाळी, संध्याकाळी सहकुटुंब, शेजारी यांच्यासह सामुदायिक आरती, काही ठिकाणी अथर्वशीर्ष पठण होते. प्रसादवाटप होते.
सकाळ संध्याकाळ वेगवेगळा प्रसाद वाटला जातो .
दैनंदिन ताणतणावातून थोडी सुटका मिळत असल्याने कौटुंबिक, सामाजिक वातावरण चैतन्यमय वाटते. जीवनात काही काळ शुद्ध भावना, शांत, प्रसन्न प्रेरणादायी वातावरण यांची निर्मिती होते.

गणपतीच्या रूपातून काय शिकायला मिळते ?
त्याचे छोटे डोळे नाव, "पिंगाक्ष", मोठे डोके अर्थात मेंदू नाव "गजानन" हे सांगतात की छोट्या डोळ्यांनी आजूबाजूला चालले टिपत रहा आणि मोठ्या मेंदूत साठवून ठेवा.
हा शूर्पकर्ण म्हणजे सुपासारखे याचे कान हे सांगतात की जे ऐकाल त्या पैकी चांगल्या गोष्टी सुपा सारख्या पाखडून घेऊन लक्षात ठेवा, वाईट गोष्टी सोडून द्या.
गणपतीची सोंड ही मोठे वृक्षही हलवून पाडू शकते आणि सुईही उचलू शकते आणि श्वास ही घेतो. त्यातून हे दिसते की योग आणि प्राणायामाने मन शरीर यावर पूर्ण प्रभुत्व मिळवून आपण जीवनाच्या अंतिम सत्याकडे जाऊ शकतो .
वृक्ष उपटून टाकणारा "शुंडानन ".हा बळ दर्शक आहे .
लंबोदर नाव असलेला ज्याचे मोठे पोट हे सांगते की लोकांचे अपराध पोटात घाला.
चार हातांनी काम करणारा तो चतुर्हस्त.
पाश आणि अंकुश ही त्याची शस्त्रे हे सांगतात की पाश- जे या समाजाचे, सृष्टीचे नियम पाळत नाहीत त्यांना तो बंधनात टाकतो. अंकुश सांगतो तुम्ही तुमच्या इच्छा, वासना, भोग, लालसा, हावरटपणा आणि षडविकारावर अंकुश ठेवा म्हणजे मी प्रसन्न होईन.
त्याच्या तुंदिलतनू पोटावर असलेला नाग हे जागृत कुंडलिनी शक्तीचे प्रतिक आहे...कपाळावरील चंद्र हे मेंदूतील "hypothalamus " या भागाचे प्रतिक आहे जे शरीराचे तापमान नियंत्रित करते .

त्याची बैठक हे सांगते की जे काम हात घ्याल ते स्थिरपणे पार पाडा. बुद्धीच्या कामाला चिकाटी, स्थिरता आवश्यक आहेत.
त्याच्या हातातील मोदक म्हणजे "मोद" अर्थात " आनंद आणि "क" म्हणजे करणारा किंवा निर्माण करणारा...म्हणजे जो आनंद निर्माण करतो तो गणपती .
तुम्हीही असा आनंद निर्माण करायचा आहे.
उकडीचे मोदक गणपतीच्या आवडीचे .यात सुद्धा आहारशास्त्र आहे . ज्यात सारण गूळ-खोबरे असते . गुळातून २१ प्रकारचे क्षार आणि उर्जा आणि खोबार्यातून अनेक पौष्टिक पदार्थ मिळतात.

सहसा गणपती डाव्या सोंडेचा असतो .उजव्या सोंडेचा गणपती हा "कडक", त्याचे फार सोवळ्यात करावे लागते असे मानतात

पूजा करताना २१ प्रकारची पत्री म्हणजे पाने वाहिली जातात.

चमेली, माका , बिल्व म्हणजे बेल , दुर्वा- , बोर ,धोत्रा, तुळस , शमी आघाडा- , डोरली ,कण्हेर , गणेशपत्री , रुई- रुईची पाने- , अर्जुन सादडा ,शंखपुष्पी –,डाळिंब, देवदार, मरवा, पिंपळ-, जाई , केवडा, अगस्ता- हादगा, आपटा , निर्गुंडी ,इत्यादी ..

पूर्वी गणेशाच्या आगमनापूर्वी काही दिवस आधी घर सजावटीचे काम घरीच केले जात असे.
गणपतीची खोली, देवळी पिवडीने (पिवळा रंग) स्वतः, मित्रांच्या मदतीने रंगविले जायची.
डिस्टेंपर हा प्रकार त्यावेळी नव्हता. माळावरील घाण किंवा पोटमाळ्याच्या किलचीतून खाली काही पडू नये म्हणून खडीच्या रंगात किलतान रंगवून मारले जायचे. किलतान व्यवस्थित बसण्यासाठी लहान चौकोनी तगडी कागदाच्या साहाय्याने लहान टेकस् मारले जायचे.
हा अंतर्गत सजावटीचा भाग सुंदर दिसतो. फुगे, झिरमिळ्या, मातीची खेळणी यांची आकर्षक आरास चांगली दिसते.बाजारातील रंगाची दुकाने गणेशोत्सवाची चाहूल देत असत.
एकूणच या घरगुती गौरी-गणपती सणात उत्सवापेक्षा सणाचे धार्मिक पावित्र्य जपले जाते. घर सफाई, रंगरंगोटी, स्वागताची तयारी या गोष्टी वेगळे वातावरण निर्माण करतात. पूर्वी गौरी विसर्जन दुपारपर्यंत महिला करीत असत. दुपारनंतर गणपतीचे विर्सजन व्हायचे. आता संपुर्ण कुटुंब, मित्रांसमवेत गौरी-गणपती विसर्जन एकत्रित केले जाते.
भगवान श्री सूर्यनारायण अंधकाराचा नाश करतो. त्याप्रमाणे विघ्नांच्या राशीच्या राशी ज्याच्या पद कमलाच्या स्मरणाने नाहीशा होतात, त्या सिंदुरवदन श्री गजाननाचा जयजयकार, स्मरण आणि पूजन करण्याची प्रथा, वेदोपनिषद काळापासून अखंड चालू आहे.
श्री गणेश चौदा विद्या आणि चौसष्ट कलांनी मंडीत आहे. त्याच्या कृपाप्रसादाने सुबुद्धी आणि सुविधा यांचा लाभ होतो ही भावना गणेशभक्तांनी श्रद्धापूर्वक अंतःकरणाने जपली आहे.
चतुर्थी ही गणेशाची प्रिय तिथी. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि वद्य चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. भाद्रपदातील शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात.
चतुर्थी म्हणजे जागृती आणि सुबुद्धीची अवस्था मानली जाते. कोणत्याही शुभ कार्यात आणि सर्वप्रथम पूजनाचा सर्वमान्य अधिकार श्री गणेशाकडे जातो. घराघरांत आणि घरातील प्रत्येक देव्हाऱ्यात गणपतीचे स्थान श्रद्धापूर्वक जपले जाते.
वाडा संस्कृती असो वा फ्लॅट संस्कृती असो किंवा स्वतंत्र घर असो दर्शनी दरवाजावर छोटी गणेश मूर्ती किंवा सिरॅमिक टाईल्सवर मुद्रित केलेली गणेशमूर्ती कलात्मकरीतीने बसविलेली असते. औद्योगिकीकरणाच्या काळात किंवा संगणक युगातसुद्धा गणेशोत्सवाचे महत्त्व कायम आहे. संगणकाच्या शेजारीच आता माउसही पाहावयास मिळतो.
जावा, सुमात्रा, कंबोडिया, बाली, आदी पूर्वेकडील देशांतही कोरीव लेण्यांतून वास्तुशिल्पातून सिद्धिविनायकाचे दर्शन घडते.
गौरी गणपतीचा सण म्हणजे मराठी लोकजीवनातील मराठी माणसाचे सांस्कृतिक वैभवच आहे .
या उत्सवात संपूर्ण समाजाला एकत्रित करण्याचे सामर्थ्य आहे. कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक ताकद एकत्र करण्याचे मोठे काम या सण आणि उत्सवामधून होते.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी ‘देवा तुचि गणेशु, सकलाचा प्रकाशु’ असे म्हणून गणरायाला वंदन केले आहे. संत एकनाथ, संत नामदेवांनीसुद्धा तुळसीदासकृत रामायणातही गणेशस्तवनाचा उल्लेख आहे.
संत महात्म्याचे अनुनय करणारे मराठी मन सुद्धा गणेशाकडे आकर्षित झाले होतेच .
शिवकालात पुण्यातील कसबा गणपतीच्या स्थापनेत राजमाता जिजाऊंचा सहभाग होता. यावरून गणेश भक्तांची अखंड श्रद्धेची कल्पना यावी.
महाराष्ट्रातील गौरी गणपती उत्सव घरगुती स्वरूपात तर सार्वजनिक गणपती उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो.
गणेशमूर्तीचे आकार व मूर्तिकार बऱ्याच वेळा परंपरेचाच भाग होऊन गेलेत. त्यामुळे मूर्तीच्या पाठीमागील बाजूस नाव घालून बुकिंग झालेले असते . सुती हार, वस्त्र, खेळणी त्याच्या जोडीला मिळत असल्याने व बँड, ढकलगाड्या यावर गणेशाला घालून आणतात यामुळे आपसूकच यात्रेचा माहोल तयार होतो.
गणपतीची मूर्ती दुखावली जाणे हा अपशकून मानल्यामुळे फारच जपून मूर्ती आणली जाते. शेवटपर्यंत जपली जाते.
आता जवळपास कुठेही काही गणेशमूर्ती मिळते. पूर्वी मूर्तीचे आकार ठरलेले असायचे. उभी , मोरावर, सिंहासनावर बसलेली आदी, पण आता दगडूशेठ गणपती आणि अनेक देवांच्या रूपात गणपती मिळतात.
गणपती विसर्जनाचा दिवस भक्तांच्या दृष्टीने खुप दुख्खद असतो .
पण पुढल्या वर्षी लौकर या म्हणायचे असेल तर आत्ता निरोप द्यावाच लागतो .

क्र्मशः