विवेक पूजाच्या बँक बाहेर येऊन उभा राहिला. १० मिनिटांनी पूजा आली आणि त्याला बघून जागच्या जागी थांबली. विवेकने पुढे येऊन पूजाचा हात धरला आणि ओढत ओढत तिला पुढे घेऊन आला.
" हात सोड विवेक… " पूजा ओरडली त्याला. हात झटकला तिने.
" काय झालंय पूजा. का अशी वागतेस ?",
"काही नाही." म्हणत ती जाऊ लागली. तसा विवेकने तिचा रस्ता अडवला.
"नाही. काहीतरी आहे नक्की." पूजाने काही उत्तर नाही दिलं.
" बोल ना काहीतरी.",
"काय बोलू ?",
"फोन का उचलत नाहीस?",
"तुला माहित आहे, काम खूप असते.",
"ठीक आहे. ऑफिस सुटल्यावर भेटत का नाहीस?", पूजा शांत.
"बोल !!",
"तुला काय सगळं सांगायला पाहिजे का आणि माझ्या वडिलांना आवडत नाही, कोणाला भेटलेलं." विवेकला आश्चर्य वाटलं.
" हो का… ठीक आहे, मला काहीतरी सांगायचे आहे तुला. ",
" बोल लवकर, उशीर होतो आहे मला." मोठा pause घेऊन विवेक बोलला.
" माझं प्रेम आहे तुझ्यावर. लग्न करशील माझ्याबरोबर. " आणि पावसाला सुरुवात झाली. पूजाच्या मनात घालमेल सुरु झाली. वडील डोळ्यासमोर उभे राहिले, आईला केलेलं प्रॉमिस आठवलं. निदान आईसाठी तरी हे करावंच लागेल. एव्हाना पावसाचा जोर वाढला होता.
" नाही." पूजा धाडस करून बोलली. अनपेक्षित होतं विवेकला.
" का … नाही.",
" माझा प्रश्न आहे तो.",
"हे उत्तर नाही आहे." दोघेही भिजत होते.
" हे बघ विवेक. कोणाला हो म्हणावं आणि कोणाला नाही, याचा मी स्वतंत्र निर्णय घेऊ शकते. आणि पहिलंच सांगितलेले, कि माझ्या घरचे ठरवणार आहेत लग्न माझं.",
"मग मी येऊन भेटतो त्यांना.",
"नको …. अजिबात नको. आपण फक्त मित्र आहोत विवेक, प्रेम वगैरे काय… ",
"झालं प्रेम… काय करू… ",
"हे बघ… तुला शेवटचं सांगते. आपण फक्त मित्र आहोत. प्रेमात पडलास हि तुझी चूक आहे. काय म्हणायचास, प्रेमात नाही पडणार कूणाच्या, मनावर कंट्रोल आहे. आता काय झालं मग. ३ महिन्यांची तर मैत्री आहे आपली. एकमेकांना ओळखत सुद्धा नाही इतकेशे. आणि लग्न… ? खूप लांब राहिलं ते. ",
"मग माझ्यासोबत फिरायचीस ती.",
" अरे, एक-दोनदा फिरायला काय आले, लगेच तू लग्नापर्यंत पोहोचलास. तशी मी सगळ्यासोबत हसत असते, बोलत असते. याचा अर्थ असा नाही कि सगळ्याशी लग्न करू. " विवेकच्या मनावर ते शब्द टोचत होते.
" शिवाय माझ्या घरी, माझ्या लग्नाची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आपण आता नकोच भेटूया. call पण नको करुस. मी वेळ मिळेल तेव्हा करीन call. असं प्रेम होतं नाही रे आणि प्रेमावर माझा विश्वास नाही. आपण 'Friend' च ठीक आहोत." पूजा निघून गेली.
विवेक तसाच स्तब्ध उभा, पावसात. खूप वेदना होतं होत्या त्याला. पावसाचे थेंब नसून असंख्य टाचण्या त्याच्या शरीरावर कोसळत होत्या. एका गाडीच्या हॉर्नच्या, मोठ्या आवाजाने तो भानावर आला आणि ऑफिसकडे निघाला.
पूजा बँकमधे पोहोचली. तशीच ती washroom मधे गेली. मनसोक्त रडली. स्वतः वरच ओरडत होती, आरशासमोर उभी राहून. खूप रडली. वाटतं होतं,तसंच जाऊन विवेकला मिठी मारावी. मनातलं सगळं सांगावं, कि माझंही प्रेम आहे तुझ्यावर. फक्त आईला प्रॉमिस केलं म्हणून. तशीच रडत राहिली ती. विवेक ऑफिसच्या बाहेर येऊन पावसात उभा होता. Reception वर असलेल्या watchman ने सुवर्णाला call करून बाहेर बोलावले. सुवर्णा धावतच बाहेर गेली आणि त्याला आत घेऊन आली. सगळं ऑफिस त्या दोघांकडे पाहत होतं. " काही नाही, बसा सगळे खाली. नेहमीचच आहे ना त्याचं… काय बघता सगळे. "सुवर्णा सगळ्यांना ओरडली." विवेक !! आधी कपडे बदलून ये. पटकन जा." १० मिनिटांनी विवेक जागेवर आला. त्याचा चेहरा बघूनच काहीतरी गडबड आहे, याची जाणीव सुवर्णाला झाली. सुवर्णाने एकाला टॉवेल आणि चहा घेऊन यायला सांगितलं. डोक्यावरचे केस अजून ओलेच." चहा घे गरमा-गरम " आणि तिनेच त्याचे केस पुसायला सुरुवात केली." काय झालं विवेक?:"सुवर्णाने टॉवेल बाजूला ठेवत म्हटलं. विवेक तर चहा सुद्धा पीत नव्हता.
थोडयावेळाने बोलला,"नाही म्हणाली मला ती.",
"कोण?",
"पूजा",
"काय विचारलंसं?",
"लग्नाचं…. ", सुवर्णा ऐकत राहिली. वाईटही वाटलं तिला. अश्रू आवरत ती म्हणाली,
"का नाही बोलली.",
"तिच्या घरी चालत नाही." एवढंचं बोलून तो शांत बसला.
"मी इतका वाईट आहे का ",
" नाही रे… तिचा काहीतरी प्रोब्लेम असेल.",
"मीच बरोबर नसेन कदाचित.",
"असं काही नाही … तीच वाईट असेल.",
"नाही. ती खूप चांगली आहे. मीच मैत्रीला प्रेम समजून बसलो. माझाच कंट्रोल गेला मनावरचा. कदाचित मला ना सवय झाली आहे आता, लोकांना गमावून बसण्याची. पहिली मानसी आणि आता पूजा." विवेकच्या डोळ्यातून पाणी आलं. मग सुवर्णाही स्वतःला थांबवू शकली नाही. तिलाही रडू आलं.
"हे बघ विवेक … वाईट वाटून घेऊ नकोस. तुझं प्रेम आहे ना पूजावर… आपण तिला जाब विचारू मग हा … एवढया छान मुलाला नाही कशी बोलली ती.",
" जाऊ दे गं… नको, वेगळं बोलू काहीतरी." विवेक डोळे पुसत म्हणाला. सुवर्णा ऐकत होती फक्त.
" अनोळखी बोलली मला. बोलते,ओळखत नाही आपण एकमेकांना… जाऊ दे गं… , वेगळं बोलू काहीतरी.….घरच्यांना पसंत नाही अनोळखी व्यक्ती सोबत बोललेलं,भेटलेलं… जाऊ दे गं… , वेगळं बोलू काहीतरी.….बोलते, एक-दोनदा फिरायला आले, हसले म्हणजे प्रेम नसते,फक्त friendship असते… जाऊ दे गं… , वेगळं बोलू काहीतरी.…..प्रेमात पडणार नव्हतो पुन्हा कधी,पूजाने वेडं लावलं, प्रेम वाईट असते… जाऊ दे गं… , वेगळं बोलू काहीतरी.…." आणि विवेक पुन्हा रडायला लागला. त्याची ती अवस्था सुवर्णाला बघवत नव्हती.
" बरं… डोळे पूस आता." विवेक ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सुवर्णाने स्वतःच्या ओढणीने त्याचे डोळे पुसले, चेहरा पुसला.
" गप्प… आता बस झालं,रडायचे नाही आता. आपण तिला ओरडूया.… माझ्या best friend ला रडवलं तिने. बघतेच तिला आता. तू नको वाईट वाटून घेऊस. तुला आवडते ना ती … पुजू.… मी बोलते तिच्याशी. ठीक आहे ना, रडू नकोस आता." त्याला सांगता सांगता तिच रडत होती.
थोडयावेळाने विवेक शांत झाला. सुवर्णा त्याच्या शेजारीच बसून होती. " विवेक, आज तू घरी जा… शांतपणे. सरांना मी सांगते,तुझी तब्येत ठीक नाही ते. तू घरी जाऊन आराम कर." विवेक शून्यात पाहत होता कूठेतरी. सुवर्णाने सरांची परमिशन काढली आणि विवेकला बाहेर रिक्षापर्यंत सोडायला आली. पाऊस थांबलेला पूर्णपणे. बोचरा वारा वाहत होता." विवेक…. घरीच जा… दुसरीकडे कूठे नको जाऊस. आणि उद्या ऑफिसला ये, फ्रेश होऊन… कळलं ना. " विवेकने मान हलवली. हरवलेला कूठेतरी, रिक्षा निघाली. सुवर्णा जाणाऱ्या रिक्षाकडे दूर पर्यंत पाहत होती. खूप काम आहे,नाहीतर मीच गेली असती त्याला सोडायला घरी. काय अवस्था झाली आहे त्याची,त्या पुजामुळे. का आली ती याच्या जीवनात… किती छान चालू होतं, पूजाचा राग आला तिला. तिला call सुद्धा करू शकत नाही. नंबर घेतला पाहिजे होता तिचा,विवेक कडून. संध्याकाळी सुद्धा तिला लवकर निघता आलं नाही. पूजा गेली असेल एव्हाना. नाहीतरी ती थांबलीच नसती. उद्या भेटूया तिला,म्हणत ती घरी निघाली.
तिकडे पूजाने स्वतःला पूर्ण बदललं होतं. एक महिना झाला होता, विवेक बरोबर शेवटचं बोलून,भेटून. तिला त्याची आठवण यायची,प्रत्येक वेळेस त्याला call करायची इच्छा व्हायची. पण आईकडे बघून ती गप्प रहायची. महिन्याभरात अजून ३ "बघण्याचे" कार्यक्रम झाले होते. एकही स्थळ तिच्या वडिलांना पसंत नव्हते. पूजाला त्या सगळ्यांचा कंटाळा आला होता आता. १ महिन्यापूर्वी मी कशी होते आणि आता कशी आहे. मे महिन्यात विवेकसोबत मैत्री झाली आणि ऑगस्टमध्ये तुटली सुद्धा. काय काय बोललो त्याला आपण. नको होतं तसं बोलायला. कसा असेल तो, काय करत असेल. भेटूया का एकदा त्याला,निदान एक call तरी. नको…. नकोच… का असं प्रॉमिस केलं मी आईला. पूजा गच्चीवर येऊन विचार करत होती. आता ती सुट्टीच्या दिवशी फिरायला जात नव्हती,घरीच असायची. soft music,songs ऐकण तिने सोडून दिलं होतं. सकाळी बँक आणि संध्याकाळी बँकमधून थेट घरी, हाच तिचा दिनक्रम झाला होता. कोणाशी बोलणं नाही,हसणं नाही, कोणाला फोन नाही. सगळं सगळं बंद. स्वतःलाच शिक्षा देत होती ती. थंड वारा आला तसं तिने वर आभाळात पाहिलं.पोर्णिमा होती आज, चंद्र छान दिसत होता. थंड वारा कूठून येतो मग. पाऊस तर नाही. विवेक असता तर लगेच त्याने सांगितलं असते पावसाबद्दल. किती छान दिवस होते ते. फिरायला जायचो आम्ही. तो निसर्ग, समुद्र, पाऊस. तो फोटो काढायचा माझे आणि मी त्याचे. गप्पा-गोष्टी चालायच्या,मस्करी,हसणं, खिदळणं. मज्जा असायची. डोळ्यात पाणी जमा झालं तिच्या. शिवाय विवेकपासून दूर झाल्यापासून पावसाने सुद्धा दडी मारली होती. त्याच्यासोबतच गेला वाटते तो दूर, माझ्यापासून. त्यानेही पुन्हा call लावला नाही मला, वाटते विवेक आणि पाऊस, दोघांना माझा राग आला असेल. Sorry विवेक…. miss you गोलू… गच्चीवर एकटीच रडत होती पूजा, सोबतीला होता पौर्णिमेचा पूर्ण चंद्र.
=============== क्रमश: ==================