निकिता आणि गौरव शहराच्या एका नामांकित अश्या IT कंपनीमध्ये सेल्स आणि मार्केटिंग विभागात कार्यरत आहेत. निकिता २८ वर्षे वयाची एक सुंदर तरुणी आहे. आपल्या हुशारीने कमी वयातच टीम लीडर बनून, सध्या ती एक पूर्ण टीम सांभाळण्याचे काम करत आहे. एका छोट्याश्या खेड्यातून पुणे शहरात येऊन, जॉब करून, तिने स्वतःच घर घेतलं होत. सध्या तरी ती एकटीच राहात होती, तीच लग्न झालेलं नव्हतं पण वरसंशोधन चालू होत. गौरव तिच्याच टीम मधला एक अत्यंत हुशार सदस्य आहे. निकिता आणि तिची टीम गौरव च्या कामावर खूपच खूश आहेत. गौरव २६ वर्षे वयाचा एक सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेला तरुण आहे. गौरव मूळचा पुण्याचाच आहे, आणि आपल्या आई-वडिलांबरोबर राहतो. गौरवपेक्षा निकिता २ वर्षांनी मोठी असूनही गौरवला ती आवडायची. प्रेम असं नाही पण आवडायची. निकिता गौरवकडे ऑफिस मधला एक सहकारी याच दृष्टीने पाहात होती. पण कधी कधी तिला गौरवच तिच्या प्रति असणारे आकर्षण समजून यायचं, ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. अनिकेत हा त्यांच्या टीम मधला आणखी एक सहकारी होता. गौरव आणि अनिकेत एकाच वयाचे असल्यामुळे खूप घट्ट मैत्री होती दोघांची.
त्यांचं ऑफिस शहरापासून थोडस बाहेरच्या बाजूला होत. आडबाजूला म्हणूयात हवं तर आपण. शहर सोडून ५-६ किलोमीटर सुमसान रस्ता होता आणि मग त्यांचं ऑफिस होत. दिवस त्या रस्त्याला माणसांची लगबग असायची पण रात्रीच्या वेळी रस्ता पूर्णपणे सुमसान व्हायचा. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या ऑफिस मध्ये संध्याकाळी ७ वाजल्या नंतर कुणाही महिला कर्मचाऱ्यांना थांबायची परवानगी नसे.
अनिकेत, निकिता आणि गौरव शहरामध्ये एकाच भागात राहात होते. एकमेकांच्या जवळ नाही पण एकाच भागात राहात होते. म्हणजे ऑफिस मधून घरी जायचं असेल तर पहिले अनिकेत च घर यायचं, नंतर निकिता च घर होत आणि तिथून पुढे गेलं कि गेलं कि गौरवच घर होत. कधी कधी निकिताची कार खराब असेल किंवा सर्विसिंगला दिली असेल तर गौरव आणि ती गौरवच्या कार मधून एकत्र ऑफिसला यायचे आणि जायचे. अनिकेत त्याच्या बाईक वरून ऑफिस ला येत-जात होता.
असाच जुलै महिना संपत आला होता. सगळीकडे पावसाचे वातावरण होते. महिना अखेर असल्याने दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी सगळ्यांची गडबड चालू होती. त्या दिवशी पण दिवसभर खूप काम होते. संध्याकाळी ६.३० झाले होते. अजूनही खूप काम बाकी होते. बाहेर पाऊसही खूप जोराचा पडत होता. पावसाचं वातावरण पाहून बाकीचे लोक आप-आपले काम आवरून निघून गेलेले. आता त्यांच्या टीम मध्ये फक्त निकिता आणि गैरव राहिले होते. पण निकिताला ७ च्या आधी जायला लागणार होत. त्यामुळे बाकीच राहिलेलं काम गौरवला समजावून सांगून निकिता ऑफिस मधून निघाली.
असलेल्या कामाचा व्याप पाहता गौरवला अजून २-३ तास तरी लागणार होते. निकिता गेल्या नंतर गौरव ऑफिस मधल्या कॉफी मशीन मधून कॉफी घेऊन आला आणि कॉफी पीत पीत आपलं राहिलेलं काम करू लागला. थोड्या वेळाने गौरवने ऑफिस मध्ये एक नजर फिरवली, तर पूर्ण ऑफिस मोकळं मोकळं झालेलं दिसलं त्याला. सेक्युरिटी गार्ड सोडून बहुधा तो एकटाच होता ऑफिस मध्ये. राहिलेल सगळं काम पूर्ण होईपर्यंत गौरवला आणखी २-२.५ तास लागला. त्याने निघताना घड्याळात पाहिले तर ९.३० वाजले होते. गौरवने आपली कार स्टार्ट केली आणि तो ऑफिस मधून घरी जायला निघाला. खूप जोराचा पाऊस अखंड चालू होता.
ऑफिस मधून बाहेर पडल्या नंतर गौरव त्या सुमसान रस्त्याला आला. ३-४ किलोमीटर गेल्या नंतर त्याला कुणी तरी एक तरुणी लिफ्ट मागत आहे असं दिसलं. त्याने त्याची गाडीचा वेग कमी केला. एवढ्या पावसात सुमसान रस्त्याला कुणी तरुणी एकटी मदत मागत आहे म्हणून त्याने गाडी त्या तरुणी जवळ थांबवली. गाडीच्या उजेडावरून तरी ती तरुणी निकिता वाटत होती. त्याने गाडीची काच खाली करून पाहिले तर खरचं ती तरुणी निकिता होती. निकिता पूर्ण भिजली होती पावसात. त्याने तिला गाडीत घेतले.
गौरव : अश्या इथे का उभ्या आहात आणि तुमची कार कुठे आहे?
निकिता : अरे माझी कार खराब झाली आहे, बंद पडली आहे. किती तरी वेळ झाली मी इथे कुणाची तरी मदतीची वाट पाहात उभी आहे.
गौरव : तुम्ही निघून २.५ तास झाला, एवढा वेळ कशाला वाट पाहात उभा राहायच, मला कॉल करायचा ना मग.
निकिता : अरे दिवसभर कामाच्या व्यापात मला फोनची बॅटरी चार्ज करायचं विसरूनच गेले मी, माझ्या फोन ची बॅटरी पण संपली आहे. फोन स्विच ऑफ झाला आहे माझा.
गौरव : ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना?
गौरवने कार स्टार्ट केली आणि पुढचा प्रवास चालू झाला. पुढे निकिताच्या घरापर्यंतचा ६-७ किलोमीटर चा प्रवास होता. निकिता ला तिकडे सोडून गौरवला पुढे त्याच्या घरी जायचं होतं. निकिता पूर्ण भिजलेली होती, तिच्या केसांमधून निघणारे पाणी तिच्या चेहऱ्यावर येत होते. अश्या अवतारात गौरवला निकिता जास्तच आकर्षक भासू लागली. एव्हाना निकिताला पण ते जाणावू लागलं होत. निकिताला गौरवची मस्करी करण्याचा मुड झाला.
निकिता : माझ्याकडे पाहून काय गाडी चालवत आहेत, पुढे पाहून चालावं नाही तर एक्सीडेंट करशील कुठे तरी. कधी सुंदर तरुणी पहिली नाहीस काय?
गौरव : सुंदर तरुणी तर खूप पाहिल्या आहेत, पण तुमच्या सारखी पावसात भिजलेली सुंदर तरुणी नाही पाहिली कधी.
असच काही वेळ एकमेकांशी फ्लर्ट करत दोघांना निकिताच घर कधी आलं ते समजलंच नाही. पाऊस अखंड चालूच होता. निकिताने उतरत असताना गौरवला कॉफी पिण्यासाठी घरी येण्याची विनंती केली. गौरवने सुरुवातीला टाळाटाळ केली पण मग निकिताने जास्तच आग्रह केल्या नंतर तो तयार झाला. दोघे घरी आले. गौरवला पाणी देऊन निकिता कपडे चेंज करायला गेली. पाणी पिऊन निखिल आपला मोबाइल चेक करण्यात व्यस्त झाला. थोड्या वेळात निकिता ट्रे मध्ये २ कप कॉफी घेऊन आली. ती येताच गौरव तिच्या कडे पाहतच राहिला. तिने कपडे बदलून नाईटी घातली होती. चंदेरी रंगाच्या नाईटी मध्ये गौरवला निकिता जणू अप्सराच भासत होती. गौरव तिच्याकडे पाहातच राहिला. निकिताने गौरवला एक कप देऊन दुसरा कप स्वतः घेऊन कॉफी पिऊ लागली. गौरवचे तिच्याकडे असे पाहणे, निकिताला पण आकर्षित करू लागेल. तिच्या मनातहि आता तारुण्य सुलभ भावना जन्म घेऊ लागल्या. दोघे काही वेळ एकही शब्द न बोलता कॉफी पितं होते. दोघांनाही एकमेकाच्या भावना समजत होत्या. कॉफी पिऊन झाल्यानंतर कॉफीचे कप आत नेऊन ठेवण्यासाठी म्हणून निकिता उठली. पण उठताना समोरच्या छोट्या टेबलला पाय लागून तिचा तोल गेला. ती खाली पडणारच होती इतक्यात गौरवने तत्परता दाखवत तिला सांभाळलं. पण या सगळ्या गडबडीत परिस्थिती अशी झाली होती कि गौरवचा उजवा हात निकिताच्या कमरेत होता आणि गौरवाचा उजवा हात आपण पडू नये म्हणून निकिताने घट्ट पकडला होता. सुरुवातीला तिला काही समजलं नाही. पण थोड्या वेळाने आपली अवस्था समजल्यानंतर तिला लाजून लाजल्यासारखे झाले. तारुण्य सुलभ भावनां पासून सुरु झालेला हा त्या रात्रीचा खेळ मग पुढे प्रणयसाधाने पर्यंत रंगला.
गौरव जेव्हा घरी जायला निघाला तेव्हा रात्रीचे १ वाजले होते. थोड्याच वेळात गौरव आपल्या घरी पोहोचला. झाल्या प्रकारामुळे त्याला थोडा थकवा जाणवत होता. अंथरुणावर पडल्या नंतर त्याला गाढ झोप कधी लागली ते त्याचे त्यालाच कळले नाही. सकाळी ८ वाजता त्याला जाग आली तेव्हा त्याचा फोन वाजत होता. त्याने फोन घेऊन पाहिले तर त्याला अनिकेतने कॉल केला होता. कॉल रिसिव्ह करून गौरव बोलू लागला.
गौरव : हॅलो
अनिकेत : हॅलो गौरव, अरे कुठे आहेस?
सकाळी सकाळी गुड मॉर्निंग वैगेरे विश न करता डायरेक्ट कुठे आहेस असं कस विचारात आहे असा विचार गौरवच्या मनात आला. अनिकेतच्या आवाजात पण थोडासा घाबरलेपणा वाटत होता त्याला.
गौरव : अरे एवढ्या सकाळी कुठे असणार. घरी आहे. का रे? काय झालं?
अनिकेत : लवकरात लवकर आवरून माझ्या घरी ये. आपल्याला ऑफिस ला जायचं आहे अर्जेंट.
गौरव : अरे पण असं इतकं काय अर्जेंट आहे? काय झालं ते तरी सांगशील का मला?
अनिकेत : तू माझ्या घरी ये तुला सांगतो मी काय ते. आणि हो लवकरात लवकर ये.
असं बोलून अनिकेतने फोन कट केला. झोपेतून उठवला म्हणून गौरवला अनिकेतचा थोडासा राग च आला होता. त्यात काय झालं आहे हे सांगितलं नसल्यामुळे त्या रागात आणखी भर च पडली. तासाभरात सगळं आवरून गौरव अनिकेतच्या घरी पोहोचला. घरी पोहोचल्या नंतर गौरवने रागातच अनिकेत ला विचारले कि काय झालं आहे? आणखी एवढ्या अर्जेंट मध्ये का बोलावलंस मला? त्याच्या नंतर अनिकेत ने जे सांगितलं ते ऐकून गौरव ला धक्काच बसला, त्याचे डोकं भणभणू लागलं.
अनिकेत बोलत होता - "काल रात्री जोरदार पाऊस चालू होता. निकिता ऑफिस मधून निघाली. पण सुमसान रस्त्याने जात असताना गाडीचा ताबा सुटून तिच्या गाडीला खूप मोठा एक्सीडेंट झाला आहे. अपघात एवढा मोठा होता कि गाडी रास्ता सोडून बाजूच्या उतारावरून झाडावर जाऊन आदळली. निकिता जाग्यावरच मृत झाली. मला ऑफिस मधून कॉल आलेला कि असं असं झालं आहे म्हणून. आपल्याला तिकडे जायला लागेल."
अनिकेत बोलत होता. पण गौरवच्या पायाखालची जमीनच सरकली होती. अनिकेत काय बोलत आहे त्याच्याकडे गौरवच लक्ष च नव्हतं. गौरवला घेऊन अनिकेत घटनास्थळावर पोहोचला. तिथली अवस्था खुच वाईट होती. गाडीचा चक्काचूर झाला होता. पोलीसांनी निकिताचा मृतदेह बाहेर काढून बाजूला ठेवला होता. घटनास्थळाचा पंचनामा चालू होता. ती जागा पाहून गौरवला कालचा प्रसंग आठवला. त्याच्या मनात आलं "अरे हि तर तीच जागा आहे जिथून आपण काल निकिताला लिफ्ट दिली होती". गौरवला ते आठवल्या नंतर पुढचं सगळं काही अंधुक अंधुक दिसायला लागला, आणि थोड्याच वेळात भोवळ येऊन तो धाड्कन जमिनीवर कोसळला.
२ दिवसानंतर गौरव शुद्धीवर आला तेव्हा तो दवाखान्यात होता. भोवळ आल्यानंतर त्याला अनिकेतने दवाखान्यात दाखल केलं होतं. त्याचे आई - बाबा आणि अनिकेत त्याच्या जवळ होते. गौरव शुद्धीवर आल्या नंतर अनिकेतने त्याला थोडासा धीर दिला. अनिकेतला वाटत होत कि आपली एक खूप जवळची सहकारी गेली म्हणून गौरवला धक्का बसला आहे. त्याच्याशी थोड्या वेळ बोलून अनिकेत ऑफिसला निघून गेला. थोड्या वेळाने डॉक्टर येऊन गौरवला तपासून गेले. त्यांनी पेशंटला आराम मिळावा म्हणून गौरवच्या आई-बाबांना बाहेर जायला सांगितले. सगळं चेक करून डॉक्टर निघून गेले.
गौरवच्या डोक्यात मात्र एकच विचार चालू होता ज्याचे उत्तर त्याला तेव्हाही मिळाले नाही आणि नंतर आयुष्यात पुढेही कधी मिळाले नाही - ती रात्र आपण जिच्या सोबत घालवली, ती नक्की कोण होती? एक स्वप्न, एक भास कि आणखी काही ???