WAR MOVIE in Marathi Short Stories by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE books and stories PDF | युद्ध चित्रपट (युध्दस्य कथा रम्य:)

Featured Books
Categories
Share

युद्ध चित्रपट (युध्दस्य कथा रम्य:)

फार पूर्वी एक चित्रपट अनावधानाने बघण्यात आला होता...जर्मन होता का फ्रेंच नक्की माहित नाही आणि खाली सब-टाइटल्स पण नव्हते.. चित्रपटाला दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी होती..कथा अशी होती

एक त्रिकोणी कुटुंब जर्मनीतल्या सुदंर खेड्यात रहातं असते आई वडील आणि त्यांचा एक गोड मुलगा ५ ते ७ वर्षाचा ...दुसऱ्या महायुद्धाची झळ अजुन तरी त्या गावाला लागलेली नव्हती...घरात अठरा-विश्व दारिद्र्य..हाता तोंडाची गाठ पडायची मुश्किल..मग लहान मुलासाठी खेळणी कुठून आणणार..पण आई वडील दोघेही दुःख कधीच कवटाळून बसणारे नव्हते...आपल्या मुलाला नेहमी खुश ठेवायला धडपडत होते...खेळणी नाही मग वडील मुलासाठी काल्पनिक खेळ रचायचे त्या मुलासाठी ते समजण्याचे वयच नव्हते मग तो पण वडील सांगतील तसे धावायचा, लपायचा...आणि असे दिवसभर दमायचे आणि आई-वडिलांनी आपले पोट मारून ठेवलेले जेवण खायचे आणि शांत झोपायचे...काहीच नसले तरी ते सुखी होते....

पण एका रात्री त्या वडिलांना दरवाजावर जोराची थाप पडल्याचा आवाज येतो ....कोणी तरी अडीनडिला आलेला शेजारी असेल...ते दरवाजा उघडतात..पण समोर एक नाझी सैनिक उभा असतो...त्याना कळून चुकते कि... आपल्याला ज्यु म्हणून अटक होणार आहे...आणि छळछावणीत मृत्यू अटळ आहे...अर्ध्या तासात संपूर्ण गावाला काही मोठमोठ्या गाड्यात कोंबले जाते नशिबाने वडील आणि मुलगा एकाच गाडीत कोंबले जातात पण आई मात्र कुठच्या गाडीत आहे ते समजत नाही तेव्हा वडील समजून जातात तिला आपण शेवटचे पहिले... आणि गाड्या निघतात....मुलांपुढे कसे रडायचं मग वडील अजून एक काल्पनिक खेळ खेळायचं ठरवतात...आसपास गोंधळाचे वातावरण असते सगळे रडत आहेत काही शून्यात नजर लावून बसले आहेत...५ ते ७ वर्षाच मुलं ते.. ते पण रडायला लागते ...तेव्हा वडील त्याला समजावतात ....हा पण एक खेळ आहे...आणि ह्यात काही पायऱ्या आहेत...एक एक पायरी पार केली कि काही पॉईंट मिळणार आणि सरत शेवटी जो प्रथम येईल त्याला रणगाड्यावरून एक फेरी मिळणार...आणि सर्वात शेवटी आईच्या हातचा खाऊ मिळणार

तो मुलगा पण हा खेळ खेळायला तयार होतो...तीन ते चार तासांनी एका प्रचंड कोलाहल असणाऱ्या जागी गाड्या थांबतात छळछावणी गाडीतुन समोरच दिसत असते ...वडील त्याला सांगतात आता खेळ सुरु झाला...आता त्या समोरच्या सैनिकांना चकवून आपण दोघांनी एकत्र लपायचे...आणि त्यात ते यशस्वी होतातही...एकाच खोलीवजा तुरुंगात काही ज्यूंना ढकलले जाते...दरवाजे बंद होतात...मुलाला मात्र मजा वाटत असते... आपण पहिला टप्पा पार केला ह्यातच त्याला आनंद असतो...तेवढ्यात काही वेळाने दरवाजा उघडला जातो आणि त्यातल्या काही ज्यूंना गॅस-चेम्बर कडे नेले जाते...मग वडील सांगतात हा दुसरा टप्पा असे सैनिक आले कि कुठंतरी लपून जायचे...आणि त्या बाप लेकाला बाकीचे कैदी पण जमेल तशी मदत करत असतात ... सकाळी जेव्हा पुरुषांना कामाला नेण्यात येई...तेव्हा वडील त्या मुलाला कोणाच्यातरी खाटेखाली लपवून जात...आणि तेच सांगत हा तिसरा टप्पा हा चौथा टप्पा...वडील जाणून होते कि....नशिबाची साथ आहे तोवर ठीक आहे मृत्यू पुढे पुढे जातो आहे.. कधी गॅस-चेम्बर कडे नेले जाईल...आणि किती दिवस मुलाला तरी खोटे खोटे सांगायचे...आणि किती दिवस आपण दोघे तरी जगू ...

आज मुलगा खूष असतो कारण वडील आपण आज त्यांच्या बरोबर खेळणार असतात...आणि त्यांचे नशीब पण जोरावर असते दोस्त राष्ट्रांनाकडून जर्मनी चा पाडाव झाल्याचे त्यांच्या कानावर येत असते...मोठ-मोठे अधिकारी छळछावणी सोडून पळण्याच्या मागे असतात...कसे पळायचे हा प्रश्न तात्पुरता का होईना सुटलेला असतो...इतक्यात दार खोलली जातात...सर्व दचकतात पण काही क्षण...समोर दरवाजा उघडणारे त्यांच्या सारखेच कैदी असतात आणि सर्व कैदी आनंदाच्या भरात सैरावरा पळत सुटतात...आणि इतक्यात पाठी राहिलेले जर्मन सैनिक अंधाधुंद गोळीबार करतात..कितीतरी जण मारले जातात.. पण त्यातूनही हे बाप लेक सही सलामत सुटतात आणि छळछावणी च्या बाहेर पडणार इतक्यात काही जर्मन सैनिक त्या दोघांच्या मागे लागतात...धावण्याच्या नादात वडिलांना पायाला लागलेली गोळी कळत नाही पण आता मात्र....धावता धावता जखम जाणवत होती...शेवटी मग वडील मुलाला एका कचऱ्याच्या पेटीत लपवतात आणि सांगतात हा शेवटचा टप्पा आणि नंतर मोठे बक्षीस...असे बोलून वडील पुढे पळत जातात ..पण काही अंतरावर जर्मन सैनिक वडिलांना पकडतात आणि त्या पेटी समोरून घेऊन जातात...आपल्या वडिलांना असे घेऊन जाताना पाहून तो मुलगा त्या पेटीच्या फटीतुन पाहतो...आणि बाप लेकाची नजरानजर होते...वडील त्याला गाल फुगवून दाखवतात आणि डोळा मारून लंगडत चालत जातात..मुलगा खदखदून हसतो...आणि बराच वेळ तिथेच लपून राहतो.. सैरावरा पळणारे कैदी ,जर्मन सैनिक त्याला दिसत असतात...शेवटी कंटाळून तो मुलगा बाहेर येतो.. आणि त्याच्या पाठी एक जर्मन सैनिक त्याच्यावर बंदूक रोखून उभा असतो ...तो चाप ओढणार इतक्यात धडाम धुडूम आवाज करत...समोरच्या इमारती कोसळतात...आणि दोस्त राष्ट्रांनाचे येणारे रणगाडे पाहून जर्मन सैनिक पळत सुटतो...पण मुलगा मात्र रणगाडे पाहून आनंदी होतो..आणि रणगाड्या वरच्या सैनिकांनी पुढे केलेला हात पकडून...बक्षीस म्हणून फिरायला जातो...

आणि इथेच चित्रपट संपतो ... त्याचा वडिलांचे काय होते ?? मुलाला ते सैनिक कुठे सोडतात ?? ते कळत नाही??.... मात्र चित्रपट संपताना हुरहूर मात्र लावून जातो...