Ramacha shela..- 5 in Marathi Moral Stories by Sane Guruji books and stories PDF | रामाचा शेला.. - 5

Featured Books
  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

  • मंजिले - भाग 14

     ---------मनहूस " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ कहानी है।...

Categories
Share

रामाचा शेला.. - 5

रामाचा शेला..

पांडुरंग सदाशिव साने

५. पंढरपूर

सरला सचिंत होती. उदयचे गेल्यापासून पत्र नाही. ती रोज वाट पाही. आज येईल, उद्या येईल. परंतु महिना झाला तरी पत्राचा पत्ता नाही. मे महिना संपत आला आणि जून उजाडला. मृग नक्षत्र सुरू झाले. पावसाळा आला. परंतु उदय आला नाही. कोठे आहे उदय? काय झाले त्याचे? त्याची आई का बरी नाही? त्याची व आईची भेट नसेल का झाली? परंतु तो कोठे आहे? त्याचा पत्ताही माझ्याजवळ नाही. इतके दिवस आम्ही एकत्र होतो. भेटत होतो. बोलत होतो. परंतु त्याचा पत्ता नाही घेऊन ठेवला. कोठे त्याला पत्र लिहू? कोठे त्याला पाहू? कोठे शोधायला जाऊ? उदय, तू का माझी उपेक्षा केलीस? तू माझा त्याग का केलास? शक्य तरी आहे का हे? गोड बोलणारा, प्रेमळ हसणारा तो उदय कोठे आहे? अशी माणसेही का फसवतील? ते सुंदर डोळे का फसवतील? कसे उदयचे डोळे? जणू प्रेमस्नेहाची सरोवरे ! किती पाणीदार ! सतेज परंतु गोड ! ते डोळे केवळ अमृताने भरलेले वाटत. मृतांनाही ते डोळे जिववतील असे वाटे. प्रभू रामचंद्रांनी मृत वानरांकडे नुसते पाहिले आणि ते सजीव होऊन उठले. जखमी वानरांकडे त्यांनी पाहिले आणि त्यांच्या जखमा भरून आल्या. माझ्या उदयचे डोळे असेच आहेत. तो माझ्याकडे पाही व माझ्या शतजन्मांच्या वेदना बर्‍या होत, जखमा भरून येत. उदय, माझ्या हृदयाच्या श्रीरामा, मला का तू फसवशील? परंतु प्रभू रामचंद्रांनीही सीतेचा त्याग केला. ज्या डोळयांत मृतांना सचेतन करण्याचे सामर्थ्य होते अशा त्या डोळयांनी सीतेला फसविले. लक्ष्मणाकडून रानात तिला नेऊन सोडले. उदय, तूही का सरलेला फसवून सोडून दिलेस? सीतादेवीला करुणासागर वाल्मीकि भेटला. मला रे कोण भेटेल?

अजून विश्वासराव परत आले नव्हते. परंतु लौकरच ते येणार होते. रमाबाईंचा बाळ चार महिन्यांचा झाला होता. रमाबाई बाळाला घेऊन येणार होत्या. काय करावे ते सरलेला समजेना. आज घरात ती रडत बसली होती. उदयचा व तिचा तो फोटो, तो तिच्या हाती होता. त्या फोटोजवळ ती बोलत होती :

“उदय, तू माझ्या कपाळावर कुंकू लावलेस. या फोटोत बघ ते कुंकू आहे. तू मला सनाथ केलेस. परंतु कायमचे कुंकू कधी रे लावणार? का तू लावलेले कुंकू मी मागून पुसले म्हणून रागावलास? ते तसेच मी का नाही ठेवले, रोज का नाही लावू लागले, असे तुला वाटले? मला नाही रे ते धैर्य. ज्या दिवसापासून तू मनाने माझा झालास, मी मनाने तुझी झाल्ये त्या दिवसापासूनच मी कुंकू लावले पाहिजे होते. परंतु लोकांची लाज वाटे, भीती वाटे. लाज घरच्यांची वाटे. उदय मी काय करू? तू म्हणशील, जेथे लाज आहे. भय आहे, तेथे कोठले प्रेम? माझ्या हृदयात डोकावून तरी बघ. तेथे तू आहेस. तुझे सारे राज्य. तुझे साम्राज्य. तेथे तुझे सिंहासन. तेथे फक्त तुझी पूजा, तुझी आरती, तुझी शेजारती. उदय, कधी येशील, कधी पत्र तरी लिहिशील, माझी वास्तपुस्त घेशील? तुझ्याशिवाय मला कोणी नाही. ना कोणाचा आधार, ना आसरा. तुला का हे माहीत नाही? सारे माहीत असूनही का येणार नाहीस? अरेरे ! उदय, इतका का तू कठोर असशील? तू का दगड आहेस, केवळ दुष्ट आहेस? तू का केवळ माझी विटंबना करण्यासाठी आलास? तू का केवळ फुलपाखरू?

परंतु मी तुला कशाला नावे ठेवू? मीच दोषी, मीच अपराधी. मीच तुला अधिकाधिक ओढले. तू आलास. परंतु ओढणारी मी, मीच तुला दिवाळीत घरी आणले. मीच तुझ्याकडे यायची, रमायची, तुला ओढायची. ते येत असस. निमूटपणे येत असस. माझी करूणा म्हणून का येत असस? म्हणून का माझ्याजवळ राहात असस? मग ती करूणा आता कोठे आहे? का “मला करूणा नको, प्रेम असेल तर दे” असे मी म्हटले म्हणून तू निघून गेलास?

किती तुझ्या आठवणी ! मी तुझ्या हातावर लिहायची, “मी तुझी, मी उदयची !” मी तुझ्या हातावर लिहून विचारीत असे, “मी कोणाची?” तू माझ्या हातावर लिहीत असस, “माझी”- हा बघ माझा हात. तुझी अक्षरे तेथे मला दिसत आहेत. “तू माझी” असे तू मला म्हटलेस, असे हातावर लिहिलेस आणि आज कोठे रे तू आहेस? मी तुझी ना? मग ये ना, मग ये ना धावत, ने ना मला, घे ना हृदयाशी. उदय, मी तुला नेहमी म्हणायची, “धर रे मला हृदयाशी. घे रे जवळ. कधी धरशील मला हृदयाशी?” तू हसून म्हणायचास, “धरीन, एक दिवस धरीन.” मी विचारायची, “या जन्मी का पुढच्या जन्मी?” तू थापट मारून म्हणस, “याच जन्मी, याच डोळा.” आणि एके दिवशी खरोखर तू मला हृदयाशी धरलेस. त्या तापात. आठवते का तुला? तू झोपेत असताना मी तुला हृदयाशी धरले. आणि झोपलेल्या सरलेला तू हृदयाशी धरलेस. आपण जणू प्रेमात न्हालो. डुंबलो. हे बघ माझ्या अंगावर रोमांच येत आहेत, त्या अनंत प्रेमाच्या स्मृतीचे. उदय, या का सार्‍या स्मृतीच राहणार? या स्मृतींवरच का केवळ आता जगू? केवळ स्मरणाचा चारा नाही रे मला पुरणार. संत म्हणतात, की रामनामाचे अमृत पुरे. मी का नुसते “उदय उदय” म्हणत बसू? तेवढयाने नाही रे भागणार.

बाबा आता येतील. आई येईल. बाळ येईल. त्याला मला हातही लावू देणार नाही, माझा उपहास सुरू होईल. पदोपदी माझी अवहेलना, तिरस्कार करतील. तू विषवल्ली आहेस, करंटी आहेस असे बाबा म्हणतील आणि त्यात त्यांना ही गोष्ट कळली तर? मग तर मला फाडून फाडून खातील. मारतील. हाकलून देतील. उदय, मग कोठे रे जाऊ? का जीव देऊ? होईल का ते धैर्य? पोटात आहे रे कोणीतरी; त्याच्यासह जीव देऊ? अभागिनीच्या बाळाने कशाला जन्माला यावे? आणखी एक अभागी जीवाची भर जगात कशाला? बाळ का अभागी असेल? बाळ केवळ माझे नाही. ते तुझेही आहे. तूही का अभागी आहेस? नाही, तू भाग्यवान आहेस. तू येशील, मला नेशील. ये, ये, लौकर ये. आता धीर नाही हो राजा !”

असे किती वेळ ती बोलत होती. कधी प्रकट बोले. कधी अप्रकट. मध्येच तो फोटो ती हृदयापाशी धरी. आणि सायंकाळ झाली. ती फिरायला गेली. त्या कालव्याच्या काठी ती जाऊन बसली. त्या कालव्यानेच तिच्या ओसाड जीवनाला ओलावा दिला होता. त्या कालव्यामुळेच तिचे जीवन हिरवेगार झाले होते. सुफळ संपूर्ण झाले होते. ते बाभळीचे झाड तेथे होते. त्या काटेरी रुक्ष झाडाखालीच तिच्या व त्याच्या प्रेमाचा पारिजातक फुलला होता. प्रेमाचे बकुळ-मांदार वृक्ष फुलले होते. किती आठवणी ! ‘हा बघ तुझ्या पदरावर मुंगळा’ असे म्हणून हळूच त्याने तो कसा उडवला. सारे तिला आठवत होते. आणि माझ्या छत्रीत त्याला मी बोलावले. तो आला नाही. येथेच त्याचा ताप मी पाहिला आणि त्या तापाच्या रात्री दोन देह एकत्र झाले. दोन जीव एकरूप झाले. तापलेले दोन तुकडे सांधले, एकजीव झाले. हा अमर सांधा का निखळेल?
सरला बसली होती. आणि पाऊस आला. ती ऊठली नाही. जवळ छत्रीही नव्हती. परंतु किती वेळ बसणार? “अशीच पावसात ओलेती होऊन उदयकडे मी गेले होते. त्याचे धोतर गुंडाळून त्याच्या पांघरूणात मी झोपले. किती वेळ झोपले? तो वाचून परत आला तरी मी झोपलेलीच. आज कोणाच्या पांघरूणात शिरू? कोठे आहे ते पांघरूण? कोठे आहे त्या पांघरूणाचा मालक?” अशा विचारात ती होती.

शेवटी सरला उठली. तिला भराभर चालवत नव्हते.

“उदय, तुझे प्रेमळ व गोड ओझे माझ्याजवळ आहे. बोजा माझ्याजवळ देऊन तू कोठे गेलास? हा बोजा कोठे उतरू, कोठे ठेवू? ही तुझी प्रेमळ मधुर ठेव कोठे सुरक्षित राहील? कोठे वाढेल? उदय, ये रे लौकर.”

ती घरी आली. ती गारठली होती. तिला हुडहुडी भरली. कोरडे नेसून ती पांघरूण घेऊन पडली. तिला का ताप आला?

“ये रे तापा, ये. होऊ दे न्यूमोनिया, टायफॉईड. ये. बाबा येण्याच्या आत हे प्राण जाऊ देत. त्यांना मुलीचे प्रेत दिसू दे. उदय येणार नसेल तर मरणा, तू तरी ये. उदय सदय नसेल होणार तर मृत्युदेवा, तू तरी सदय हो. या सरलेला घेऊन जा.”

ती उठली. तिने आपली ट्रंक उघडली. ट्रंकेत तो रक्तलांच्छित रूमाल होता. सरलेने तो रूमाल जवळ घेतला. त्याच्यावर तिने वेल भरला होता. दोन पाखरे होती.

“परंतु एक पाखरू कोठे आहे? कोठे गेले उडून? कोठे त्याला साद घालू? येथून केलेले कुऊ त्याला ऐकायला तरी जाईल का? उदय, कोठे रे गेलास उडून? अरे, चिमण्यासुध्दा घरटे बांधतात ना, त्या वेळेस त्या एकटया नाही बांधीत. नर व मादी दोघे मिळून घरटे बांधतात. दोघे उडतात. चोचीतून गवत आणतात, काडया आणतात, धागे आणतात. दिवसातून शंभर शंभर खेपा दोघे करतात. मी कितीदा पाहिले आहे. तो दिसला नाही, तर ती हाका मारते. ती दिसली नाही तर तो हाका मारतो. आणि दोघे भेटतात. चोचीत चोच घालतात. एकमेकांस गुदगुल्या करतात. आणि चिमणी नराला म्हणते, “खेळ पुरे. चला, घर बांधू. सामान आणू. ही मी निघाल्ये.” आणि ती उडून जाते. तोही जातो. चिव चिव करीत दोघे भुर्रकन जातात. आणि पुन्हा चोची भरून येतात. सुंदर घरटे बांधतात. कोणासाठी? पिलांसाठी. सुंदर घरटे. बाहेरून मजबूत, आत मऊ मऊ. बाहेरून जाडेभरडे सामान, आत सुंदर सामान. उदय, पाखरेसुध्दा जबाबदारी ओळखतात. आणि माणसे? आपण आपल्या बाळासाठी नको का घरटे करायला? परंतु मी एकटी कोठे करू घर? तू हवास रे बरोबर.

काल पारिजातकावर चिमण्या सारख्या चिवचिव करीत होत्या. त्यांना का माझी कीव येत होती? “आम्ही बघ सुखी. तू किती दु:खी” असे का त्या मला म्हणत होत्या?

उदय, तुझ्या रूमालावर मी पाखरे भरून दिली होती. तुझा रूमाल तुझ्याजवळ नसेल का बोलत? का तो फाटला? तू फेकून दिलास?”

तो रूमाल जवळ घेऊन सरला अशा विचारात होती. तिला किती ताप होता कोणास ठाऊक?

आणि उजाडताच रमाबाई आल्या. बाळाला घेऊन आल्या. विश्वासराव आले.

“सरले, अग सरले !” त्यांनी हाक मारली.

तिला झोप लागली होती. रात्रभर नव्हती झोप. तिला पटकन जाग आली नाही. विश्वासरावांनी जोराने हाक मारली. “सरले, ए सरले !” ते ओरडले.

“एकटी आहे की आणखी कुणी आहे?” रमाबाई म्हणाल्या.

“सरले, ए सरले !”

“आल्ये, आल्ये उदय !”

आपला उदय आला असे तिला वाटले. ती धावत आली. तिने कडी काढली.

“उदय, उदय !”

“काय म्हणतेस तू? तू का वातात आहेस? हो दूर. आमचाच उदय झाला, समजलीस?” पिता म्हणाला.

आणि त्याने तिला ढकलले. तिचा हात त्याला कढत लागला.

“ताप आला आहे की काय?”

“हो.”

“जा, जाऊन पड. येथे उभी कशाला?”

“बाळाला बघायला.”

“त्याच्याकडे नको बघूस. त्याला नको घेऊस.”

सरला वर गेली. आपल्या खोलीत जाऊन डोक्यावर पांघरूण घेऊन पडली. ती मुसमुसत होती. “देवा, दे रे मला मरण” असे ती प्रार्थीत होती. परंतु कोण ऐकणार तिची प्रार्थना?

सरलेचा ताप निघाला. दुसर्‍या दिवशीच निघाला. ती टांगा करून त्या खोलीवर गेली. तो त्या खोलीत दुसरेच कोणी होते.

“कोण पाहिजे तुम्हांला?”

“येथे का तुम्ही राहता?”

“हो. मी कालच ही खोली घेतली.”

“परंतु ही दुसर्‍याची होती.”

“उदय नि सरलेची का?”

“उदय नि सरला कोण?”

“येथे भिंतीवर ती नावे आहेत? भिंतीवर एक चित्र आहे. वेल आहे. तिच्यावर दोन पक्षी आहेत. आणि सरला नि उदय असे तेथे लिहिलेले आहे.”

“माझा एक मित्र ही खोली घेणार होता. तो लवकरच येणार होता. भैय्याला सांगून तो गेला होता.”

“भैय्यानेच तर मला ही खोली दिली. भाडयाने देणे आहे अशी पाटी होती. कालच त्याने ती काढली.” इतक्यात भैय्याच तेथे आला.

“का रे भैय्या ही खोली यांना दिलीस?”

“तुमच्या यजमानांचा पत्ता कोठे आहे? आणि तुम्हाला एवढीशी जागा कशी पुरेल? तुम्ही शिकलेली माणसे. का आमच्यासारखा एका खोलीत तुमचा संसार मावणार आहे? आणि आता कॉलेजे सुरू होणार; किती दिवस वाट बघायची?”

सरला निघून गेली. भैय्या मोठयाने हसला. तो नवतरूणही जरा हसला. “सरला नि उदय यांतील हीच सरला दिसते. आणि हा उदय कोण? त्याने का आपला अस्त केला? येतो सांगून पठ्ठयाने दिला वाटते गुंगारा. येथे शेण खाल्ले असेल लेकाने तर आता जाईल सांगली-कोल्हापूरला. येथे कशाला तोंड दाखवील !” असे तो तरूण मनात म्हणाला. त्याने त्या वेलीजवळ लिहिले, “अरेरे ! एक पक्षी उडून गेला, दुसरा रडत राहिला ! संसार हा असा आहे. प्रेम म्हणजे ताटातूट ! प्रेम म्हणजे मृगजळ ! प्रेम म्हणजे बुडबुडा ! सुंदर, परंतु भंगुर !”

त्या तरूणाला जणू गद्यकाव्याची स्फूर्ती आली. त्याचे इकडे काव्य होत होते. परंतु सरला बाणविध्द हरिणीप्रमाणे विव्हळ होऊन जात होती. तिच्याने चालवेना. ती थकली. तिने टांगा केला. एकदाची घरी आली.

आता फार दिवस वाट पाहणे शक्य नव्हते. उदयचा पत्ता नाही. त्याचे पत्रही नाही. शेवटी पित्याच्या कानावर सर्व हकीगत घालण्याचे तिने ठरविले. ती रात्री लिहीत बसली होती. परंतु एकाएकी तिने लिहिणे थांबविले. बाबा करतील का क्षमा? ते मला नेहमी विषवल्ली म्हणत आले. त्यांचे माझ्यावर थोडेही प्रेम नाही. मी जिवंत आहे की मेलेली आहे याचीही त्यांना पर्वा नाही. त्यांच्यासमोर का अश्रू ढाळू? का पदर पसरू? ते शिव्या देतील. नाही नाही ते बोलतील ! वास्तविक मला शिव्या देण्याचा त्यांना काय अधिकार? त्यांनी उतारवयास फिरून नाही का लग्न केले? मग मला त्यांनी काय म्हणून नावे ठेवावी? मी माझे आयुष्य कसे कंठावे? मी का मनुष्य नाही? मी का देवता आहे? देवतांनाही भुका असतात. मी बाबांना नेहमी म्हणे, “कसे आयुष्य कंठू?” ते काही बोलत नसत. त्यांनी माझी कधी पर्वा केली नाही. माझ्या सुखदु:खाचा त्यांनी कधी विचार केला नाही. कशाला त्यांना लिहू? कशाला त्यांच्या शिव्या ऐकू? उदयलाही ते शिव्या देतील. माझ्या प्रियतमाला ते वाटेल ते बोलतील. निमूटपणे निघून जावे. कोठे जावे? पंढरपूर आहे. तेथे आधार आहे असे म्हणतात. जाऊ का तेथे? घेतील का मला? ती विचार करीत होती.

शेवटी तिने निश्चय केला. तिने जायचे ठरविले. तिने फोटो घेतले. सारी प्रेमाची पत्रे घेतली. तीच तिची संपत्ती होती. तिने तो रूमाल घेतला तिने लुगडी, दोन पातळी, पोलकी, सारे घेतले. एक सतरंजी, एक घोंगडी, एक चादर, एक उशी. लहानशी वळकटी तिने बांधली. एक कडीचा तांब्या घेतला. तिची तयारी झाली. घर सोडून जाणार. ती अंथरूणावर बसली, रडली. किती रडणार? “उदय, कोठे रे तू आहेस? कोण माझे अश्रू पुशील? प्रेमाने हात धरील? उदय !” असे म्हणत होती.

उजाडण्याच्या आत निघणे भाग होते. तिने कपाळाला कुंकू लावले. आजपासून मला सुवासिनी होऊ दे. कोणाची लाज नको. देवासमोर भरल्या कपाळाने जायला मला लाज वाटणार नाही. मग जगाला कशाला भ्यावे? तिने एका डबीत कुंकू काढून घेतले. पुन्हा ती तेथे खाटेवर बसली. थोडया वेळाने उठून ती गच्चीत गेली. तेथे ती उभी राहून सभोवती पाहात होती दूर पर्वतीची टेकडी अस्पष्ट दिसत होती. आणि तो कालवा, ते बाभळीचे झाड ! तिला त्या गोष्टी दिसत नव्हत्या. परंतु मनाच्या डोळयांना दिसत होत्या. त्या दिवाळीत ती व उदय या गच्चीत बसली होती. त्या वेळेस तिने फोनो लावला होता. आणि एक गाणे ऐकता ऐकता उदयचे डोळे भरून आले होते.

“उदय, का रे डोळयांत पाणी?” असे मी विचारले.

“आपले हे सुख राहील का असा मनात विचार आला. खरेच का सारा असार पसारा आहे? हे जग, ही दुनिया, हा संसार म्हणजे का शून्य? मग त्या प्रभुराजाने हे सारे निर्माण तरी कशाला केले? सरले, अशी दिवाळी पुन्हा येईल की नाही? आजचे हे निरभ्र, निर्मळ, अपरंपार प्रेम ! हे टिकेल का? का ताटातुटी होतील? अश्रू कपाळी असतील? का आपणच एकमेकांस विटू, कंटाळू?” असे उदय त्या वेळेस बोलला.

“उदय, सुखाच्या वेळेस कशाला काल्पनिक दु:खाच्या छाया? पूस डोळे नि हस. हा क्षण तरी आनंदाचा असो. या आजच्या पेल्यात तरी दु:ख नको मिसळू, आणि उद्या असलेच दु:ख नशिबी, तर तेही गोड करू. उदय, प्रेमाचे दु:ख ही सुध्दा एक अमोल वस्तू आहे. ज्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याच्यासाठी हुरहूर वाटणे, त्याच्यासाठी डोळे भरून येणे, हृदय खालीवर होणे, ही एक थोर भाग्याची गोष्ट आहे. ज्याच्यासाठी आपण रडू असे कोणी असले म्हणजे झाले. प्रेम सुख देवो वा दु:ख, जीवन देवो वा मरण. ते सारे गोडच आहे. खरे ना? ऐक. मी दुसरी एक प्लेट लावते.” असे मी म्हटले. आणि उदय हसला.

“किती छान तू बोलतेस ! त्या प्लेटी बंद कर. तूच प्रेमाचे उपनिषद गा.” असे तो म्हणाला.
सरलेला किती आठवणी येत होत्या. परंतु तिच्या पाठीमागे कोण उभे होते?

“सरले, काय करतेस?”

“बसले आहे विचार करीत.”

“झोप. नाही तर पुन्हा ताप येईल.”

“बाबा, तुमचे माझ्यावर प्रेम आहे का?”

“प्रेमबीम मला समजत नाही.”

“मग मी मेल्ये तरी चालेल?”

“मला जास्त बोलता येत नाही. जा नीज.”

ती खाली गेली. खोलीत बसली. विश्वासराव पुन्हा आपल्या खोलीत गेले.

सरलेच्या मनात वडिलांना सारे सांगावे असे किती किती आले. परंतु वडिलांच्या सहानुभूतिशून्य उत्तरामुळे तिने शेवटी काही सांगितले नाही. आणि आता ती उठली. तिच्याजवळ काही पैसे होते. पहाट होत आली होती. पारिजातकाच्या फुलांचा वास येत होता. अद्याप त्यांना बहर नव्हता. थोडी फुले होती. तिने वळकटी घेतली. आपला तांब्या घेतला. ती निघाली. देवाचे स्मरण करीत निघाली.
एक टांगा करून ती स्टेशनवर आली. स्टेशनवर फार वेळ राहायला लागू नये अशी तिची इच्छा होती. बाबा एखादे वेळेस शोधीत यायचे. बाबांना काहीच निरोप मी ठेविला नाही. लिहू का त्यांना चार ओळी? नको, नकोच हा विचार. त्यांना कोठे एवढे प्रेम आहे? ते माझा विचारही करणार नाहीत आणि शोधाच्या यातायातीत पडणार नाहीत.

उजाडतच एक गाडी होती. सोलापूरकडे जाणारी. ती त्या गाडीत बसली. आणि गाडी निघाली. स्टेशनावर कोठे उदय दिसतो का हे ती पाहात होती. त्या कालव्याच्या काठी पर्वतीच्या बाजूस कसा अकस्मात धावून आला ! आज नाही का येणार? उदय, कोठे रे तू आहेस? का तू आजारी आहेस? तू माझ्या वडिलांकडे आलास तर, ते काय सांगतील? मी बाबांना कळवून ठेवू का? नको. देवाची इच्छा असेल तसे होईल.

गाडी जात होती. ती जुनी पत्रे वाचीत बसली होती. पुण्यास असताना उदयने लिहिलेली पत्रे. त्यांत तेही एक पत्र होते.

“तू मला विसरून जा.” खरेच का मला विसरून जाण्याची त्याची इच्छा होती? परंतु मी बळेच त्याला गुंतविले. फसविले. अडकवले. उदय, तुझा नाही दोष. माझ्या मोहाची फळे मला भोगू दे. माझ्या प्रेमाची फळे मला भोगू दे. हे का दु:ख आहे? मी हे दु:ख का मानू? माझ्या मोहाची फळे असे का म्हणू? माझे प्रेम का क्षुद्र आहे? उदयसाठी मी मरेन, सर्वस्व सोडीन. वाईट केल्याचे हे दु:ख नाही. फक्त जगात नीट राहता येत नाही. लोक नाके मुरडतील, मला कोणाचा आधार नाही, याचे वाईट वाटते. मी केले ते वाईट असे मला वाटत नाही. उदय माझा आहे. मी त्याच्या चरणी जीवन दिले आहे. त्याने दिलेला प्रसाद माझ्याजवळ आहे. परंतु हा प्रसाद माझ्याजवळ कोठे राहणार आहे? तो पंढरपूरला ठेवूनच मला कोठे तरी भटकत जावे लागेल ! बाळाला जवळ घेऊन नाही का जाता येणार? भिकारणी पोटाशी पोर बांधून हिंडतात. मी नाही का हिंडणार? परंतु भिकारणीबरोबर तिचा पतीही असतो. त्या भिकारपणातही त्यांना एकमेकांचा आधार असतो. मला कोण?

पुन्हा पत्र वाचताना ती रमली. आठवणीत रमली. मी उदयला म्हणायची, “उदय, समक्ष आपण भेटतो, बोलतो. मग पत्रे कशाला देतोस?” तो म्हणायचा, “समक्ष सारे बोलता येत नाही. समोरासमोर जणू संकोच होतो. लाज वाटते. परंतु पत्र लिहिताना हृदय मोकळे होते. आणि पत्र पुन:पुन्हा वाचायला मिळते. बोललेले शब्द सारे थोडेच लक्षात राहतात? परंतु समग्र पत्र जवळ ठेवता येते. पत्र म्हणजे आठवण, भेट. जणू आपण आपले हृदय काढून देत असतो. पत्र म्हणजे हृदयाचा भाग. हृदयाची पाकळी.” आणि मीही नसे का त्याला पत्रे देत? मीच नेहमी लिहायची. उगीच काल्पनिक शंका घ्यायची. उदय, तुझे नाही हो माझ्यावर प्रेम असे म्हणायची. आणि एकदा दु:खाने मग तो म्हणाला, “तुला असेच वाटत असेल तर माझा नाइलाज आहे. माझे दुर्दैव. अजूनही तुला असेच वाटत असेल तर मी काय करणार? विश्वास ठेवायचा असेल तर ठेव. खरोखरच तू माझी आहेस. माझ्या हृदयात तू आहेस.” त्या वेळेस उदयचे तोंड किती उदास, दु:खी व खिन्न होते ! मी त्याला म्हटले, “उदय, गेली अभ्रे, गेले संशय. आता हस.” तर म्हणाला, “तुझी अभ्रे, तुझे संशय चटकन जातात. पटकन हसतेस, मला नाही तसे जमत. मी उगीच काल्पनिक संशय कधी घेत नाही. होता होईतो रागावत नाही. परंतु माझा राग एकदम जातही नाही. मला हुकमी हसू येत नाही. ते आतून यावे लागते.” उदयचे कसे बोलणे ! तो फार दाखवीत नसला तरी किती त्याचे माझ्यावर प्रेम ! त्याच्या एका कटाक्षात प्रेमाचे सागर असत. माझ्या अनंत अश्रूंत व बोलण्यात त्याच्या प्रेमाच्या निम्मेही नसेल. उदयचे प्रेम मुके होते. वाचाळ नव्हते. म्हणूनच ते असीम होते. उदय, ते तुझे प्रेम माझ्याजवळ आहे. तुझा देह आज कोठेही असो, तुझा प्रेमस्वरूप आत्मा माझ्याजवळ आहे.

अशा विचारात ती रमे. पत्रातील काही ओळी वाचाव्या नि स्मृतितरंगांवर तरंगावे असे चालले होते. आणि आता ती प्रत्यक्ष सृष्टीत उतरली. पंढरपूरला काय करायचे? ही पत्रे जवळ ठेवायची का? कशाला? तेथील चालकांनी वाचली तर? उदयचे आणि माझे प्रेम ! ते आम्हांलाच माहीत. असो. ही पत्रे जगाला कशाला दाखवा? उदय, तुझी ही पत्रे मला तोंडपाठ आहेत. जुन्या बायकांना व्यंकटेशस्तोत्र वगैरे पाठ येते. भटजींना वेद पाठ असतात. मलाही प्रेमवेद पाठ आहे. हे प्रेमाचे व्यंकटेशस्तोत्र पाठ आहे. उदय, ही पत्रे मी चंद्रभागेच्या प्रवाहावर सोडून देईन. ही पवित्र प्रेमळ पत्रे ! ती रत्नाकराजवळ जावोत. या पत्रांतील भावनांची खोली, यांतील प्रेमाची उत्कटता व गंभीरता उचंबळणार्‍या अगाध सागरालाच समजेल. चंद्रभागा ही पत्रे आदराने व आस्थेने समुद्राला नेऊन देईल. त्याच्या अमोल खजिन्यात ती राहतील.

कुर्डूवाडी स्टेशन आले, ती उतरली. पंढरपूरला जायला गाडी होती. परंतु रात्री १० ला पोचणार होती. कोठे रात्री जायचे? बसू चंद्रभागेच्या तीरी. विचार करीत ती गाडीत तर बसली. तिच्या मनातील तगमग किती सांगावी, कशी सांगावी? अनाथ स्त्रीच्या जीवनात कोण डोकावेल? अशा आसन्नप्रसवा अगतिक स्त्रीच्या हृदयात कोण पाहू शकेल? दु:ख, लज्जा, निराशा, अंधार, वेदना, यातना, अपमान, उपेक्षा, सर्वांची तेथे मिळणी आणि अश्रूंद्वारा त्यांचे संमीलित स्वरूप बाहेर प्रकट होत असते.

पंढरपूर जवळ आले. डब्यात बडवे होते. तिची विचारपूस करीत होते. परंतु ती एक अक्षरही बोलली नाही. पंढरपूर आले. विठूची नगरी आली. अनाथांना, हतपतितांना आधार देणारी नगरी. संतांनी जेथे भेदातीत प्रेमाचा पाऊस पाडला, ती नगरी आली. ती स्टेशनच्या बाहेर आली. टांगे उभे होते.

“कोठे जायचे?” एका टांगेवाल्याने विचारले.

“मंदिराजवळ ने.” ती म्हणाली.

ती टांग्यात बसली. मंदिराजवळ टांगा आला. ती उतरली. आत भजने चालू होती. अभंग कानांवर येत होते. ती तांब्या व वळकटी घेऊन आत गेली. एका बाजूस बसली. ते अभंग ती ऐकत होती. रात्रभर कोणा ना कोणाचे भजन चालूच होते. अखंड नामसंकीर्तन.

“येई गा तू येई गा तू पंढरीच्या राया ।

तुजवीण शीण वाटे दीन झाली काया ॥” येई.

हा अभंग एक भक्त भक्तीने म्हणत होता. सरलेला रडू आले. केव्हा येईल उदय असे सारखे तिच्या मनात येईल. पहाटेची वेळ होत आली. मंदिरात गर्दी होऊ लागली. ती चंद्रभागेच्या तीरावर गेली. तिने तोंड धुतले. तिने स्नान केले. आणि तेथेच ती बसली. तीरावर माणसेच माणसे. तिने आपले लुगडे वाळत टाकले होते. तिने ती पत्रे काढली. ते फोटो काढले. तिने फुले आणली होती. तो फोटो तिने हृदयाशी धरला. तिला हुंदका आवरेना. “उदय, कोठे रे आहेस राजा? मी अभागिनी आहे. ये, ये रे, ये असशील तेथून.” असे ती म्हणे. त्याच्या त्या फोटोकडे ती पुन:पुन्हा पाही. कसे आहेत डोळे ! कसे आहेत ते राजीव-लोचन? “उदय, तुझा फोटो पाण्यावर सोडून देते. रत्नाकराजवळ जाऊन तो राहील !” असे म्हणून तिने त्या फोटोची पूजा केली. अश्रूंचे अर्ध्य दिले. आणि तो फोटो तिने पाण्यावर सोडून दिला. ती पाहात होती. चंद्रभागेच्या प्रवाहात कोणी दिवे सोडतात. सरलेने आपली प्रेमपताका सोडली होती. प्रेममूर्ती सोडली होती आणि तिने ती सारी पत्रे घेतली. तिने ती एकदा हृदयाशी धरली. आणि शेवटी ती पत्रे तिने चंद्रभागेजवळ दिली. जणू प्रेमाच्या फुलांची चंद्रभागेला ती भेट देत होती.

“चंद्रभागे, संतांचे प्रेम तू अपार चाखलेस. आता हे माझे प्रेम थोडे चाख. हे माझ्या जीवनातील प्रेम ! हे का अमंगल आहे, अशुचि आहे? नाही. हेही निर्मळ आहे. या प्रेमाची ही पत्रे घे. प्रेमपुष्पांच्या या सुगंधी पाकळया घे.”

तो फोटो चालला. ती पत्रे चालली. सरला उभी होती. पायांखाली चंद्रभागा वाहात होती. डोळयांतून प्रेमगंगा वाहात होती. किती वेळ तरी ती उभी होती. परंतु शेवटी थकली. पोटात कळ येते असे तिला वाटले. ती चरकली. ती परत आली. पाण्यातून बाहेर आली. वळकटी व तांब्या घेऊन निघाली. लुगडे वाळले होते. तेही तिने घेतले. हळूहळू चालत होती. कशीबशी घाट चढून आली. आणि तिने एक टांगा केला.

“त्या अनाथ आश्रमांकडे ने.” ती म्हणाली.

टांगेवाल्याने ओळखले आणि त्याने टांगा नीट नेला. सरला उतरली. अनाथ परित्यक्तांना आधार देणारे ते खरे प्रभुमंदिर होते. प्रभूच्या मूर्ती तेथे वाढत होत्या. तेथे जिवंत परमात्मा होता.

व्यवस्थापकांच्या कार्यालयात ती गेली. प्रश्नोत्तरे झाली :

“दहा दिवस झाल्यावर तुम्हांला जावे लागेल.” सांगण्यात आले.

“मी जाईन. बाळाला ठेवाल ना?”

“ठेवू.”

“किती तुमचे उपकार ! तुम्ही जणू मायबाप आहात.” सरलेला बोलवेना.

तिची तेथे व्यवस्था झाली. पोट दुखायचे राहिले होते. ती खिन्न होती. तिने दोन घासही खाल्ले नाहीत.

“नीट खातपीत जा. म्हणजे बाळंतपण नीट होईल. हातीपायी नीट सुटाल. अनुभव आहे का?

“हा पहिलाच अनुभव.”

“म्हणून जपा. असे दु:ख करीत नका बसू. त्या बाळासाठी तरी नीट राहा.

“मी माझीच काळजी करीत होत्ये. माझ्याच विचारात मी मग्न होत्ये. माझ्या बाळाचा विचार मी केलाच नाही. आईच्या दु:खाने आरंभापासून तो जणू दु:खी. बाळ, तू नको दु:खी होऊ. तू हस, माझ्या पोटात हस, बाहेरही हस. माझ्याजवळ अश्रू भरपूर आहेत. तुझ्याजवळ भरपूर आनंद असो. माझ्या जीवनातील सारे चांगले ते तू घेऊन ये. माझ्यात अमृताचा काही अंश असला तर तो तू घेऊन ये. माझे विष तुला न बाधो !” असे ती म्हणे.

दोनचार दिवस गेले. तिच्याजवळ कोणी येत. बसत. तेथे काही स्त्रिया होत्या. अशाच अनाथ मातांची परित्यक्त मुले तेथे होती. त्या मुलांकडे पाहून अपार वाईट वाटे. आईबापांपासून दूर असणारी मुले ! समाजाच्या दयेवर पोसली जाणारी मुले ! परंतु त्या मुलांच्या माता जेथे असतील तेथून नसतील का वार्‍याबरोबर आशीर्वाद पाठवीत? नसतील का प्रेम पाठवीत? एकान्तात त्या पोटच्या गोळयांना स्मरून त्या नसतील का स्फुंदत, सद्गदित होत? त्या मुलांना स्मरून त्यांचे स्तन नसतील का भरून येत? हृदय नसेल का ओसंडत?

आणि तेथे असणा-या परित्यक्त मातांचे, वंचित मातांचे नाना अनुभव. ती एक कामगार भगिनी होती. तिला नवरा नव्हता. एका गिरणीत ती कामावर होती. जरा रूपाने बरी होती. आणि मालकाच्या कोणा नातलगाची दृष्टी गेली. आणि त्याचा परिणाम तिच्या येथे येण्यात झाला.

“परंतु येथे तरी पाठवावयाची व्यवस्था केली त्याने.” सरला म्हणाली.

“पैशाने सारे करतात. माझ्या घरच्यांची पैशाने त्याने समजूत घातली. मी तिची व्यवस्था करतो म्हणाला.”

“तुम्ही त्याच्यावर फिर्याद करायची.”

“गरिबांचे कोर्टात काही टिकत नाही. तो पैसेवाला. तो सहीसलामत सुटेल. मीच वाईट चालीची ठरायची. भाऊ म्हणाले, “नको बभ्रा.” भाऊही पैशाने शांत झाले होते. मालकाने त्यांना गप्प बसवले होते. माझ्यासाठी सारी व्यवस्था झाली. गुपचूप येथे पाठविण्यात आले. उद्या मी जाईन.”

अनेक स्त्रियांचे अनेक अनुभव, निरनिराळया जातींच्या स्त्रिया. परंतु ज्यांच्यात पुनर्विवाह तितका रूढ नाही अशाच जातींतील स्त्रिया तेथे अधिक होत्या. ब्राम्हण होत्या. मारवाडीही होत्या. सर्वांची एकच कथा. एकच अनुभव. “तुझी बाई काय हकीगत?” असे सरलेला त्या विचारीत. तो प्रश्न ऐकून सरला उठून जाई. तिला खूप दु:ख होई.

एके दिवशी पहाटे सरला प्रसूत झाली. उदयच्या बाळाचा उदय झाला. सारे नीट झाले.खाटेवर सरला होती. जवळच पाळण्यात बाळ होते ती मध्येच उठे. त्याला पाजी. बाळ कसे आहे ते बघे. डोळे अजून नीट उघडत नव्हते. बाळाला सोडून जावे लागणार म्हणून तिला वाईट वाटत होते. ती रात्री जागत बसे. बाळाला मांडीवर घेऊन बसे. “बाळ, आईबाप असून तू त्यांना पारखा होणार? माझ्यासारखा तूही अभागी ! तुझी आई तुला सोडून जाणार. बाळ, आईला नावे नको ठेवूस, मी अगतिक आहे ! माझा उपाय नाही बाळ ! शक्य होताच तुला नेईन.” असे म्हणून ती त्याला हृदयाशी धरी.

बाळ रडू लागले, की ती त्याला हलवी. एके दिवशी ते लहान अर्भक ओक्साबोक्सी रडत होते. काही केल्या राहीना.

“उगी, उगी. नको रे रडू. तू का तुझ्या आईसाठी रडत आहेस? मी दोन दिशी जाणार म्हणून का रडत आहेस? आता कोठले आईचे दूध मिळणार म्हणून का रडत आहेस? तुला जगन्माता दूध पाजील. ती तुला हालवील. ती तुला खेळवील. रडू नको, उगी.”

काय करावे तिला समजेना. शेवटी तिलाही रडू आले. मांडीवर बाळ रडत होते, आणि तीही रडत होती. परंतु शेवटी ते मूल थकले, झोपले. तिने त्याच्याकडे पाहिले.
“झोप. आईच्या मांडीवर झोप. दोन दिवस ही मांडी आहे. मग नाही हो सोन्या ! मी गेल्यावर रडू नको. तुला मारतील, आदळतील, रागाने कुस्करतील. हट्ट नको करीत जाऊ. मिळेल दूध ते गुटगुट पीत जा. समजलास ना? मी तुला परत नेईन. खरेच नेईन. आईजवळ येशील हो परत.” असे ती म्हणत होती.

दहा दिवस झाले.

“तुम्हाला आता गेले पाहिजे.” व्यवस्थापक म्हणाले.

राहू दे ना आणखी थोडे दिवस.”

“तसा नियम नाही. संस्थेला परवडत नाही.”

“माझ्या हातातील बांगडया संस्थेला देणगी घ्या. माझी ही मोत्यांची कुडी घ्या. तुम्ही आश्रय दिलात, त्याची परतफेड यांनी होणार नाही. ते तुमचे उपकार फिटणार नाहीत, परंतु मला आणखी पंधरा दिवस राहू दे. बाळाचे डोळे नीट उघडू देत. आईला तो नीट पाहून ठेवील. घ्या ह्या बांगडया, ही कुडी. मी लिहून देते. आणि जाताना मला थोडे पैसे द्या. पंधरा-वीस रूपये द्या, नाही नका म्हणू.”

सरला आणखी काही दिवस तेथे राहिली.

परंतु शेवटी जाण्याचा दिवस आला. तिने बाळाचे पुन:पुन्हा मुके घेतले. आपले चिमणे हात बाळ हलवी. त्याचे डोळे सुंदर होते. तो आता ते उघडू लागला होता.

“त्यांच्या डोळयांसारखेच तुझे डोळे आहेत. बाळ, जाते हो. रडू नको. मी नेईन हो तुला.”

तिला बोलवेना. ती व्यवस्थापकांना म्हणाली, “मी माझे बाळ पुन्हा परत नेईन. हे बाळ कोणाला देऊ नका. येथे संस्था बघायला कोणी येतात. कोणी उदार आत्मे एखादे मूल घेऊन जातात. किंवा एखाद्याला मूल नसेल तर येथले वाढवायला नेतात. माझा बाळ नका देऊ कोणाला. मी सारे पैसे देईन. त्याचा खर्च देईन. परंतु आज माझ्याजवळ काही नाही.”

“तुमचे मूल ठेवू. तुम्हाला शक्य झाले म्हणजे या. बाळ घेऊन जा. त्याची आम्ही काळजी घेऊ. तुम्ही त्याची चिंता नका करू.”

तेथील सर्वांचा निरोप घेऊन सरला निघाली. वळकटी व तांब्या घेऊन निघाली. बाळाच्या पाळण्याजवळ ती उभी राहिली. तिच्या पोटचा गोळा येथे होता. उदयच्या व तिच्या परम प्रेमाला लागलेले ते सुंदर फळ ! तिला तेथून जाववेना. तिचा पाय निघेना. तिने त्याला पुन्हा काढून घेतले. पुन्हा तिने त्याला पाजले. त्याच्याकडे पुन्हा एकदा तिने पाहिले. त्याला हृदयाशी धरले.

“बाळ, जाते हो. जाते ही तुझी आई दुर्दैवी, अभागी आई ! सुखी राहा. नेईन हो लौकर तुला.” असे म्हणून कष्टाने त्याला पाळण्यात ठेवून सरला रडत बाहेर पडली. सर्वांना प्रणाम करून पंढरपूर सोडून ती निघाली. सरले, कोठे जाणार तू?

***