Bakulichi Fulam - 11 in Marathi Fiction Stories by Komal Mankar books and stories PDF | बकुळीची फुलं ( भाग - 11 )

Featured Books
Categories
Share

बकुळीची फुलं ( भाग - 11 )

काळोखातलं प्रखर चांदणं आणि मंदमस्त वारा ह्या निसर्गी निर्मित वातावरणाचा मिलाफ म्हणजे स्वर्ग सुखं उपभोगल्या सारखं वाटू लागतं.....

निर्विकार थंड वारा अनुजच्या देहाला भेदत होता... दुपार पर्यंत काय पावसाची सततची रिपरिप चालू होती , आणि आता बघा अवकाशात चांदण्याचा सडा... लुकलुकणाऱ्या चांदण्याकडे बघत अनुज एकांतात स्वतःशीच गप्पा मारत टेरिसवर उभा होता . हातातला कॉफीचा मग ठेऊन त्याने खिशातून फोन काढला आदितीला कॉल करू का ? नाही नको , ... असं म्हणत त्याने खिश्यात फोन ठेऊन दिला . खरचं येईल का ती ?
की जाईल ह्या खेपेलाही तशीच न सांगता निघून....

दोन , तीन दिवस तशीच निघून गेली... आदितीला अनुजचा कॉल नाही की मॅसेज नाही , आता तर ती घरी येईल ही आशा अनुजने सोडून दिली .

त्या दिवशी सकाळी सकाळी आठ वाजता दाराची बेल वाजली .

अनुज आपल्या खोलीत खिडकीपाशी उभं राहून बाहेरचा पाऊस न्याहाळत होता . एका हातात कॉफी मग आणि दुसऱ्या हातात टॅब घेऊन तो कविता टाईप करत होता . बाहेर कोण येतंय कोण जातंय ह्याची त्याला काही कल्पना नाही .

" अगं तू , एवढ्या पावसात..... ये आत ये... भिजली नाहीस ना बाळा ? किती वर्षांनी डोळे भरून बघते आहे तुला... फार दुबळी झालीस ग...." अनुजच्या आईने दरवाजा उघडला . आदितीला पाहून ती आनंदून गेली .

" नाही काकू.... एवढ्या पावसात येणार नव्हते पण संध्याकाळची फ्लाईट आहे ना ! आणि अण्या सांगत होता तुम्ही माझी खूप आठवण करता म्हणे , आता आलीच तर भेट घेऊन जावं म्हटलं.... परत तिकडे गेल्यावर लवकर काही येणं होतं नाही . "

" हो तुला कशी आमची आठवण येणार बस्स हा.... मी पाणी आणते तुला . "

आदितीने मानेनेच होकार देत हलकीशी स्माईल दिली . तिचं लक्ष समोर खेळणी खेळत असलेल्या मुलांकडे गेलं . त्यांना बघून आदितीच मन अगदी भरून आलं होतं . ती इकडे तिकडे कुठे अण्याची बायको दिसते का म्हणून शोध घेत होती . एवढ्यात पाणी घेऊन अनुजची आई आली ,

" हे घे पाणी .... कुणाला शोधते आहे का ? हा अण्या आतच तर होता इथे बाळासोबत खेळत..... कदाचित खोलीत गेला असावा...."

" किती गोड आहेत ही मुलं..... अगदी अण्या सारखी दिसतात . "

अनुजची आई हसायला लागली ,

" हो हो , गोड आहेत पण खरचं अण्या सारखी दिसतात का ही ?"

" हो ना काकू..... का अण्यासारखी नाही दिसत का ?"

" अगं अण्याच अजून लग्नच नाही झालं..... " आदितीला हे ऐकून धक्काच बसला तिला वाटलं अनुजची आई आपली मज्जाक तर घेत नाही आहेत .

" काय सांगताय काय काकू तुम्ही ? अनुजने अजून लग्न नाही केलं तर ही मुलं कुणाची ? "

" अगं छोट्या मुलांच वसतिगृह उभारलय ना त्याने... तुला सांगितलं नाही का ? आता चार वर्षे होतील.... ही दोन मुलं माझी जबाबदारी म्हणून आपुलकीने सांभाळते मी . अण्या ऑफिसला गेल्यावर एकटीला घर खायला धावत होत बघ . ही मुलं देखील वयाने किती छोटी आहेत ग ह्यांच कोणी नाही ह्या जगात . "

" हे तर त्याने मला कधीच नाही सांगितलं.... आणि लग्न का नाही केलं त्याने अजून...."

" कोणी तरी मुलगी आवडत असावी त्याला , खूप समजवल मी पण नाही ऐकलं त्याने... तू आलीच तर समजव त्याला लग्न करून घे म्हणावं , माझं काय आज आहे उद्या नाही . "

" असं का बोलता तुम्ही.... मी समजवते त्याला ."

" पण तुझ्यासोबत खुप वाईट झालं ग.... " नेमकं त्या कशा बदद्दल बोलत आहे आदितीला काही कळलं नाही .

" काय वाईट झालं माझं .... मला समजलं नाही . "

" अगं तुझा डिओर्स झाला ना ! खूप वाईट झालं आजकाल लग्न ही संकल्पनाच चुकीची वाटायला लागली . पूर्वीची लग्न कशी टिकत होती . पण बरं केलंस तू .... आता एकटीच रहाते का मग ? "

आदिती त्यांचं हे बोलणं ऐकून थक्कच झाली.... ह्यांना कोणी सांगितलं असावं माझ्या डिओर्स बद्दल ती विचार करू लागली , आपण अनुजला तर काहीच सांगितलं नाही . हा प्रितम त्यानेच सांगितलं असावं .

" कसल्या विचारात बुडालीस ? "

भानावर येत , " हा ..... काही नाही .... हो मी एकटीच असते . पण तुम्हाला डिओर्स बद्दल कोणी सांगितलं ? "

" कोणी काय अण्याने सांगितलं..... काय ग काय झालं , मला नव्हतं सांगायला पाहिजे का ? "

" नाही काकू असं काही नाही.... "

" बरं जा अण्याला भेटून घे..... "

आदितीला तर आता त्याला न भेटताच जावं वाटत होतं . खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली म्हणेल मी त्याच्यापासून . पण काय सांगणार होती भेटल्यावर हेच की ,' माझा डिओर्स झाला .' घरी येऊन भेटून नाही गेली तर त्याचं ही वाईट वाटेल त्याला . शेवटचं अनुजच्या आईला तिला विचारायचं होतं ,

" काकू एक सांगू शकता काय ? "

" हो बोल ना ... काय ? "

" अण्याच कुणावर प्रेम होतं माहिती आहे तुम्हाला ? "

" हो.... माझ्या समोर बसलेल्या मुलीवर ... " आदितीने दूरवर बघत म्हटलं ,

" पण त्याने मला हे कधीच सांगितलं का नाही ? "

" कसं सांगेल ? कॉलेज संपल्यानंतरच तू लग्न करून परदेशी निघून गेली . " आदिती काहीच बोलली नाही ,

" बाळा , एकदा विचारून बघ त्याला .... तू जरी त्याच्यावर प्रेम नसली करत तरी तो आजही तुझ्यावरच प्रेम करतो . "

" काकू ..... तो आताही स्वीकार करेल माझा असं वाटतं तुम्हाला ? "

" हा प्रश्न मला काय विचारतेस.... तू गेली तेव्हापासून तो तू येण्याचीच वाट बघतो आहे ."

आता मात्र आदितीला त्याला भेटल्या वाचून राहवलं नाही . ती उठली आणि अनुजच्या खोलीत गेली .

" आदिती तू ? " दाराचा आवाज येताच अनुज मागे वळला .

" हो..... येऊ ना आत ? "

" ये ना ... मला वाटलं न सांगताच निघून गेलीस की काय ? "

" ह्या वेळेला तुझी भेट घेतल्याशिवाय जाणार नव्हते.... अरे काय टॅबवर कविता टाईप केली दिसते . " आदितीच त्याच्या हातात असलेल्या टॅबकडे लक्ष गेलं .

" हो ..... बाहेर पाऊस पडत होता , त्या पावसाकडे बघून कविता सुचत होती तर बसलो टाईप करत.... "

" पूर्ण झाली असेल तर म्हणून दाखव ना ! "

" तू हसू नको मात्र...."

" नाही हसणार रे म्हण ....."

अनुज कविता म्हणायला लागला ,"

आज आला होता तो अचानक असाच दाटून .....
कुंद वारा होता त्यांच्या सोबतीला ,
काळोख होता विस्तीर्ण ....

मृदगंधाचा ओलावा पसरला होता जिकडेतिकडे .....
ढग धावत होती ,
रिपरिप थेंब गिरवत तोही त्या ढगात शिरत होता
वळवाचा ना तो .....
पुन्हा पुन्हा एकवार नव्याने बरसत होता ....

गडगडाटाने काळजात धस्स करून जायचा
वीज अशी कडाडली , ढग मध्येच गडगडले की
वाटायचं , स्तब्ध हो .... नुसता बरस
आक्रंदन नको करुस ...... मला तुझ्या अश्या
रूपानेही शहारल्या गत होतं .....

मधेच येणं अन निघून जाण तुझं
किती किती वाट पाहायला लावतं .....
अरे सततचा राहणं असाच संथ , तुझ्यात
मिसळून जावं वाटतात सारेच दुःख ....

मग नकोस होतं तुझं अवेळी येणं
भावनाही अश्याच येतात तुझ्यासारख्या
अवेळी न सांगता , आणि निघूनही जातात तश्याच
कशाचाही थांग पत्ता लागत नाही !

सारं कसं माझं त्रिकोणी जगणं
तुझ्याचभोवती रेगाळलेलं .....
तू असावा , शब्दांची मैफिल पुन्हा सजावी आणि
मी त्या शब्दात गुंतून जावे
पाऊस पाऊस होऊन ती ओळ बहरावी
किती रे साज तुझा असा अलगद कोसळण्याचा ..... "

" व्वा ...... अप्रतिम कविता लिहिली पावसावर ..... आजही आवडतो तुला पाऊस ? "

काहीवेळ निःशब्द उभा राहत अनुज म्हणाला ,

" हो आवडतो , तोच एक असतो माझ्यासोबतीला..... "

" एक विचारू तुला ? "

" विचार ना ! "

" वसतिगृह उभारलं मुलांचं हे भेटल्यावर सांगितलं नाहीस.... "

" तू पण कुठे सांगितलं मला तुझा डिओर्स झाल्याचं..... "

दोघेही आता काहीच बोलत नव्हते खूप वेळ दोघात शांततेची दरी कोसळली होती ,

" त्या दिवशी पण तू इथे येऊन मला भेटणार नव्हती , अचानक मी तिथे यायला आणि तुझी भेट व्हायला..... "

" मला नव्हतं भेटायचं..... परत त्याच आठवणी तेच दिवस आठवतात आणि मन खिन्न होऊन जातं . "

" मग या अश्या अचानक होणाऱ्या आपल्या भेटी किंवा अकस्मात येणाऱ्या भेटीच्या वेळी यांना नशिबाचा भाग मानलाच पाहिजे ना ! "

" तुला माहित्ये मी Destiny वर विश्वास नाही ठेवत...."

" स्वतःवर तरी ठेवते ना !"

" हो.... आता तरी सांगणार आहेस का तू ? "

" कधीचा सांगणार होतो . "

" हो , मग सांगितलं का नाहीस ? "

" तू हातात पत्रिका ठेऊन गेली होती माझ्या ...."

" तू थांबवायचं होतं मला . "

" तुझ्या बसलेल्या आयुष्याची घडी विस्कटायची नव्हती मला . "

" घडी बसलीच कधी होती रे अण्या..... घराच्यांचा मर्जीत स्वतःच्या मनाविरोधात गेली . इथून तुमच्या सर्वांपासून दुर.... शेवटी तिथे जाऊन एकटीच पडले . "

" आता तरी मला सोडून जाऊ नकोस , नाही करू शकलो ग लग्न मी तुझ्यावर प्रेम केलं होतं ना ... आणि मला माहिती आहे तुझंही माझ्यावर प्रेम होतं ... पण तुझ्या आयुष्यात असं एकटेपणाच वादळ यावं हा विचार कधीच आला नव्हता मनात.... तू जगात जिथे कुठे असेल तिथे नेहमी आनंदात रहावी हिच प्रार्थना करायचो . काल मला प्रितमने कॉल करून सांगितलं तेव्हा विश्वासच बसत नव्हता , मी म्हणायचो तू खूप सुखी असेल तुझ्या संसारात . "

"आयुष्यात काही वादळं .... चांगल होण्यासाठीच येत असावी..... नियतीचा डाव आधीच रचलेला असतो . मी येताना ठरवून आली की काहीही झालं तरी तुला भेटायचं नाही , पण त्या दिवशी गार्डनमध्ये तू दिसला आणि पाऊले आपसुकच तुझ्या ओढीने जवळ आली . आता तुझ्या दुर जाणारं नाही..... "

आदितीला बकुळीच्या फुलांचा खोलीत सुहास येत होता ,

" अण्या ..... इथे कुठे बकुळी आहे का ? "

" हो ती काय तुझ्या बाजूच्या टेबलवर पातेल्यात ....."

"........माझ्या ओंजळीत टाक ना ! "

मोठ्या अट्टाहासाने तिने ओंजळीत घेतलेली बकुळी वाळली होती केव्हाची ,
आठवांचा गंध मात्र अजूनही दरवळत होता आस्मंतात....

-------- समाप्त
ब्लॉग :- komal1997mankar.blogspot.com

====================================================
====================