"अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स"
लेखक - सूरज काशिनाथ गाताडे
स्क्रीन रायटर्स असोसिएशन मेम्बरशीप नंबर - 21831
Charecter Introducing -
मिस्टर वाघ हा एक सत्यान्वेषी आहे. एक क्रूर डिटेक्टिव्ह. समोरचा माणूस गिल्टी आहे हे त्याला क्लिअर झालं, की तो त्याला सरळ मारून टाकतो. अगदी पोलीस समोर असले तरी. आणि पोलिसांनाही हे समजत नाही. स्वतः फॉरेन्सिक एक्सपर्ट असल्याने फॉरेन्सिक डिटेक्शन मध्ये तो सापडत नाही.
प्रस्तुत कथेत मिस्टर वाघ नैनितालमध्ये होणाऱ्या विचित्र आत्महत्यांची जटिल केस उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या केस मध्ये त्याला गोवलेलं असतं, अनुषा नांवाच्या नैनिताल मधील एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हने. मग काय ते दोघे यशस्वी होतील का? आणि यात त्यांच्या समोर कोणत्या गोष्टी येतात ते आपल्या कथेत पहायला मिळेल...
१. एलिसेस् वंडरलँड -
नैनिताल; उत्तराखंडमध्ये स्थित तलावांचं शहर... सर्वांत जास्त तलाव असलेलं भारताचं लेक डिस्ट्रिक्ट. आणि येथील सर्वांत प्रमुख तलाव 'नैनी' वरून या शहराचं नांव 'नैनिताल' पडलंय. चारी बाजूंनी बर्फाच्छादित पहाडांनी घेरलेलं हे शहर... या शहराला कोठून ही पाहिलं, तरी बेहद सूंदरच दिसतं...
दिवसा जितकं सूंदर, त्याहूनही रात्री खूबसुरत! रात्री शहरातून वाहणारं गार वारं मन आल्हाददायक आणि शांत करून जातं...
पण त्या दिवसाची रात्र विचित्र आणि अतिशय भयावह होती... रात्रीच्या शांततेत एक खूपच विदारक आणि वेदनेनं भरलेली अशी किंकाळी शहराची शांततेचा फाडून टाकणारी ठरली...
पण त्यापूर्वी कोणाचं तरी वेडसर हसू आसमंतात भरून गेलं होतं. आणि ऐकणाऱ्याच्या लक्षात आलं होतं, की हे विदारक हसूच किंकाळी मध्ये परिवर्तित होऊन अचानकच थांबलं होतं...
'एंजल्स पॅरडाईझ' या हॉटेलमध्ये गोंधळ सुरू झाला. सगळा हॉटेल स्टाफ बाहेर धावला. पाहतात, तर दहाव्या फ्लोरवर राहणाऱ्या त्यांच्या एका कस्टमरने त्याच्या रूमच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती...
कर्नाटकाहून खास करून त्याच्यासाठी आलेल्या चहाचा आस्वाद घेत मिस्टर वाघ ही घटना मला सांगत होता... नेहमी प्रमाणं आई घरी नाही हे पाहूनच तो आला होता. आई असल्यावर किचनचा ताबा घेता येणार नाही असं असेल कदाचित; की आई विषयी त्याला भीती वाटते हेच मला अजून समजलं नाही. कारण तो आई नसतानाच घरी येतो...
असो, काही विशेष असल्याशिवाय तो ही गोष्ट सांगण्यासाठी आवर्जून येणार नाही हे माहीत असल्यानं मी देखील काळजीपूर्वक ऐकत होतो... आता हा आणखी वेगळा कोणता बॉम्ब फोडणार आहे याची मी मनातल्या मनात वाट पाहत होतो... आणि खरंच ही घटना होती ही तितकीच महत्वाची! मी असं का म्हणतोय, ते पुढं कळेल... पण यावेळी मिस्टर वाघ खरंच अनपेक्षित वागला होता. तसा तो नेहमीच वागतोच... पण यावेळी ही बाब मला मोठा धक्का देणारी ठरली होती हे नक्की...!
(या कथेचं मला 'अ स्ट्रेंज थिंग' हे नांव ठेवायचं होतं, पण मिस्टर वाघनं 'दि सायरन कॉल्स' हे नांव सुचवलं. म्हणून दोन्ही नांव ठेवली.)
"आणि त्याचवेळी त्या खोलीत एक सूंदर मुलगी आपले कपडे घालून त्या खोलीतून बाहेर पडली. त्या गोंधळामुळं ही गोष्ट त्यावेळी कोणाच्या लक्षात आली नाही..."
"एक मिनिट!" मी मिस्टर वाघला मधेच थांबवलं,
"काही वेडंवाकडं तर सांगणार नाही आहात ना?" मी विचारलं.
"वेडंवाकडं म्हणजे?" त्यानं खुदकत विचारलं.
मला कसं बोलावं कळेना म्हणून मी गप्प राहिलो. त्यावर तो हसला.
"नाही तसं काही नाही. ऐक तर. आज मी तुला एलिसच्या वंडरलँडची सफर करवणार आहे!" तो मिश्किलपणे म्हणाला. पण काही क्षणातच तो गंभीर झाला.
"आता मी जे तुला सांगणार आहे ते खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि ते तू लिहून काढवंस असं मला वाटतं." तो म्हणाला.
त्याच्या भावना क्षणात कमालीच्या बदलतात. आणि त्या बऱ्याचदा विरुद्ध टोकांच्या असतात. तो कधीच एकाच भावनेवर जास्त काळ टिकून राहत नाही. हे पाहून मला नेहमीच अजब वाटतं.
"ठीक आहे सांगा." मी म्हणालो. माझ्याकडं दुसरा पर्यायच नव्हता. याला कोण नाही म्हणणार?!