Bhet in Marathi Horror Stories by Vineeta Shingare Deshpande books and stories PDF | भेट ?

Featured Books
Categories
Share

भेट ?

भेट ?

"आई निघते ग ! आणि हो आज मी शेखरसोबत खरेदीला जाणार आहे. उशीर होईल. रात्रीचं जेवण बाहेरच करु" मीनल.
"अग! मीने ऐक तर, येतांना बाबांच औषध घेऊन ये. तसं आहे दोन दिवसांच. वेळेवर धावपळ नको आठवणीने घेऊन ये." आई.
"हो ग येते आता..." म्हणत मीनल घाईत निघाली.

आज ती खूप आनंदात होती. ऑफिसला हाफ डे टाकला होता. ठरल्याप्रमाणे लंचब्रेकमधे शेखर घ्यायला येणार आणि साखरपुड्याची खरेदी करायची या विचारात मग्न ती ऑफिसमधे पोहचली. कामात वेळ कसा गेला कळलंच नाही. मीनलने फाईल्स कपाटात टाकत शेखरला मिसकॉल दिला. आज बाहेर जायच म्हणून डबा घेतला नव्हता. तेवढ्यात रमा आणि मंजिरीने तिला आवाज दिला.

"शेखर येईपर्यन्त आमच्यासोबत बस जरा" रमा
"दोन घास खा ग, येईलच तो ऐवढ्यात" मंजिरीने डबा पुढे केला.
"गाडीवर असेल. गर्दीपण केवढी असते आजाकाल." मीनलच्या मनात विचार डोकवायला लागलेत. तिने घड्याळाकडे बघत परत मिसकॉल दिला.
खरंतर शेखर दिलेली वेळ कधी चुकवत नाही. आज काय झालं? विसरला तर नाही. काल रात्री याबद्दल फोनवर बोललो. एक...दिड...पावणे दोन वाजत आले शेखरचा ना निरोप ना फोन.
"येईल गं. अडकला असेल कुठल्या कामात" रमा.
"पंधरा दिवसांनी साखरपुडा आहे. माझी आटोपली अजून त्याचीच खरेदी बाकी आहे."
"वंदनाताईला फोन लावू का?" तिच्या मनात आलं.
"नको उगीच काळजी करतील." शेखरची वाट बघून कंटाळली होती. मनात नको ते विचार येत होते.
तीन वाजले. आता मात्र मीनलची सहनशक्ती संपली. मल्हार, शेखरचा मित्र त्याला फोन लावला. त्यालाही काहीच माहित नव्हतं. त्याचाही फोन शेखर उचलत नव्हता. आज कुठलेच शूटिंग नसल्याने तो युनिटवरही नव्हता.
"मग हा गेला कुठे?" या विचारत तिने परत मल्हारला फोन लावला.
"मल्हार मला रींगरोडवर भेटतोस. तिथूनच आपण शेखरच्या घरी जाऊ". मीनल
दोघं शेखरच्या घरी, शास्त्रीनगरला पोहचले. मीनलने शेजारच्या प्रमिलाकाकूकडून किल्ली आणली आणि कुलुप उघडले. घरात सगळीकडे पसारा होता. गेल्या आठवड्यात मीनल घर आवरुन गेली होती. परत एवढा पसरा बघून तिला आश्चर्यच वाटलं.

"मीनल, शेखर इतक्यात बदलल्यासारखा वाटला का"? मल्हार.
"हम्म. मला वाटलं सतत शूटिंगमुळे त्याची झोप झाली नसावी. थकला असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं रे. हा बेजावाबदार कधी वागत नाही" मीनल
"तो मिनाक्षीबद्दल काही बोलला का तुला?" मल्हार
"हो फोनवर काहितरी सांगत होता. शिरोळ्याला शूटिंग होती. तिथे भेटली." मीनल
"कोण ही मिनाक्षी, नवीन जाईन झाली का? " मीनल
"नाही. प्रॉडक्शन हाऊस मधे या नावाची कोणी मुलगी नाही." मल्हार
"इतक्यात तुला त्याचं वागणं खटकलं नाही का?" मल्हार
अरे, तुला त्याचा स्वभाव माहित आहे ना? काम करतांना झपाटलेला असतो तो. कशाच भान रहात नाही मग त्याला." मीनल पसारा आवरत म्हणाली.
"ही मिनाक्षी, कोण? याला कुठे? कशी भेटली? प्रश्न विचारायला शेखर भेटायला हवा न." मीनल

आवरतांना त्याच्या टेबलवर कंप्युटरजवळ कॅमेरा, एक सीडी आणि काही फोटो सापडले. फोटो शिरोळ्याच्या शूटिंगचे होते. त्यात विशेष काही मिळालं नाही. सीडी आणि कॅमेरा घेऊन दोघेही बाहेर पडलेत. मित्र, नातेवाईक, नेहमीचे हॉटे, टपरी, ऑफिस सगळीकडे बघून झालं, शेखरचा काही पत्ता नव्हता. शोधण्यात रात्र झाली.
"मल्हार, वंदनाताईला फोन करु का?कदाचित त्यांना माहित असेल तो कुठे आहे ते." मीनल
"आणि त्यांना माहित नसेल तर? त्या उगाच काळजी करत बसतील." मल्हार
"अरे, मोठी बहिण आहे ती शेखरची. कळवायला तर हवं." मीनल
"आज संध्याकाळच्या फ्लाईटने माधव जिजाजीं परतणार होते." मीनल
"मघाशी केला होता. परत करुन बघते"
"हॅलो...माधव भावजी, शेखर कुठे गेला माहिती नाही......."बोलता बोलता मीनलचा बांध सुटला आणि सकाळपासून घडलेलं सारं सांगितलं.
"येईल ग. काळजी करु नको. आता खूप उशीर झालाय. उद्या सकाळी नऊ-सव्वा नऊ पर्यन्त मी प्रॉडक्शन हाऊसला पोहचतो. तू आणि मल्हार दोघंही या." माधव
"चल मी पण निघतो. सकाळी पावणे नऊ वाजता मी तुला घ्यायला येतो" मल्हारने तिला घरी सोडतांना म्हंटलं.
"ठीक आहे.." मीनल

"झाली का खरेदी" चप्पल काढत नाही तो आईने उत्सुकतेने विचारलं.
"नाही ग. शेखरला वेळ नव्हता." खरं कारण टाळत मीनल म्हणाली.
"वंदनाताईशी बोलली का ?" आई
"नाही, नंतर बोलते. बाळला बरं नाही म्हणून बोलले नाही." मीनल
आधीच बाबांच्या आजारपणामुळे आई काळजीत असते. त्यात शेखरचं टेन्शन नको. हा विचार करत मीनलने आईला सांगायचं टाळलं. शेखरचा विचार डोक्यातनं जात नव्हता. सगळ कसं सुरळीत चाललं होतं, मग मधेच हे काय झालं.

शेखर राजे तिला तिच्या मावसबहिणीच्या मानसीच्या लग्नात भेटला. आधी मैत्री नंतर भेटी आणि नंतर केव्हा एकमेकांवर प्रेम झालं दोघांनाही कळलच नाही. त्याचे आईवडिल बारामतीला आणि एक बहिण ती पुण्यालाच असते. तिचं तीनमहिन्याचा बाळ केदार तो लहान असल्यामुळे साखरपुडा उरकून तीन महिन्यांनी त्यांच्या लग्नाचा मुहुर्त काढला होता.
मीनलचे वडिल रेल्वेतून रिटायर झाले होते. नुकताच त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला. आई-वडिलांची एकुलती एक बी कॉम नंतर कंप्युटर कोर्स केल्यावर एका एजन्सीत अकाउंटंट म्हणून नुकतीच नोकरीला लागली होती. शेखर व्यवसायाने एक फोटोग्राफर होता. सत्यम प्रॉडक्शन हाऊसमधे कॅमेरामन म्हणून काम करत होता. नव्या सिरिअलचं काम चालु होतं. त्याच्या शूटिंगसाठीच तो एक आठवड्यासाठी शिरोळ्याला एका फार्महाउसवर गेला होता. जायच्या आधी मीनलला भेटला. रोज फोनवर गप्पा होत होत्या. त्याच्या बोलण्यातून काहीच जाणवलं नाही, हं कोणी मिनाक्षी, रघुवीर, उज्वलामामीबद्दल तो बोललेला तिला आठवत होतं. मीनलच्या भोवती विचारांच वलय गडद होत गेलं. शेखरच्या काळजीत रात्रभर झोप लागली नाही. पहाटे पहाटे केव्हा तरी तिचा डोळा लागला.

"मीने, उठ आठ वाजले. ऑफिस नाही का? आज भावेकाकूंकडून पिकोफॉललादिलेली साडी घेऊन ये ग." आई.
आईच्या आवाजाने दचकून जागी झालेली मीनल काहीच न बोलता तयारीला लागली. विचारांचा पिंगा सुरु झाला. शेखरला परत फोन करुन बघितला. पण काहीच रिस्पॉन्स नाही.
"अगं! डबा तर घे." आई
"आज नको. असु दे. मला यायला उशीर होईल ग. काळजी नको करु." म्हणत मीनल निघाली.
"ही पोर म्हणजे नं." आईचं मन ते काळजीने कासावीस झालं. तिची घाई बघून त्यांना विचारायचा धीर झाला नाही.
ठरल्याप्रमाणे मल्हार आला. दोघांनी सत्यम प्रॉडक्शन हाऊस गाठलं. तिथे शेखर कालपासून कुठे आहे, कोणालाच काहिही माहित नव्हतं.
"मॅडम मी त्याला काल पासून फोन लावतो आहे. उचलतच नाहीया." झाकिर
"शिरोळ्यावरुन आलेपासून तेचा पत्ताच नाय. केमेरातील रीळ पन कुठे ठेवली माहित नाय. आम्ही शोधतोय. तुम्हाला भेटला तर आधी रीळ कुठे ठेवली ते कळवा. काम थांबलाय" पटेलसाहेब रागात बोलला.

"बापरे! आता याला शोधायचं तरी कुठे?" या विचारानं तिला घेरी आली.
"पोलिसात तक्रार करु या का?" मल्हार
"थांब, माधव भावजींना येऊ दे. मग ठरवू काय करायचं ते." मीनल
आता मात्र प्रॉडक्शन हाऊस मधला स्टाफही काळजीत होता. शेखर बेजवाबदार कधीच वागत नसे.
"आम्ही सगळे शिरोळ्याहून नरवा परतलो. वॅन मधून सामान काढलं. मग तो बाईक घेऊन गेला. मी त्याला शेवटचं तेव्हांच बघितलं." राजेश कुबेर त्याचा असिस्टंट आठवत म्हणाला.
"त्यानंतर मात्र भेटला नाही" सगळ्या स्टाफचं हेच उत्तर होतं.
बाईक घेऊन तो गेला कुठे. नरवा रात्री म्हणजे बुधवारी, प्रमिलाकाकूंनी तर तो घरी आलाच नाही असे म्हंटलं. मग बुधवारी रात्री हा गेला कुठे. तेवढ्यात माधव पोहचलाच.
"सगळीकडे विचारपूस केली" माधव
"हो. सर्वांना विचारलं. कोणालाच माहित नाही तो सध्या कुठी आहे ते" मल्हार
"बारामतीला आईबाबांना फोन करु का?" मीनल
"नको. मी केला होता. तो तिथेही नाही" तिच्या हातून फोन घेत माधव म्हणाले
"चलं, मल्हार तुझी गाडी इथेच ठेव. कार मधे बसा." माधव.
मग आता कुठे जायचं? पोलीसचौकीत?मीनलने रडतच विचारलं
"अर्थातच." माधव

पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली.
एकदा घरी जाऊन बघू? मल्हार
"चलं बघू" माधव
तिघंही शास्त्रीनगरच्या घरी आलेत. त्या तिघांचे प्रश्नार्थक चेहरे बघून प्रमिलाकाकूंना लक्षात आलं होतं तरी किल्ली देत त्यांनी विचारलच " शेखरचा पत्ता लागला कां ?
"नाही अजून" मल्हार त्यांना टाळत म्हणाला.
"अरे हे घे रे. काल त्याच्या नावाने एक पार्सल आलं" प्रमिला काकूंनी एक पाकिट मीनलच्या हातात ठेवलं.
"अगं बघ तरी, कोणाचं, कुठून आहे ते" माधव
मीनलने निमुटपणे पाकिट माधवजिजाजींच्या हाती ठेवले.
घरी आल्यावर शेखरच्या आठवणीने तिला आणखीनच दाटून आले होते. त्याच्या सोबत घालवलेले सगळे क्षण तिला आठवत होते. त्याचा खट्याळपणा, त्याचं चिडवणं. सारखसारखं सरप्राईज़ देणं, त्याचं स्वप्न रंगवून सांगणं. घरभर त्याच्याच आठवणी भिरभिरत होत्या. टेबलवर फोटोफ्रेममधे दोघांचा फोटोपाहून डोळ्यातून अश्रुंचा पूर वाहू लागला.
"स्वत:ला सावर मीनल" मल्हार फोटोफ्रेम उचलत म्हणाला. ही फ्रेम मी त्याला दोन वर्षापूर्वी गिफ्ट केली होती. अजून सांभाळून ठेवली आहे त्याने.
काय सांगतोस? अरे ही फ्रेम त्याला रघुवीर ने दिली." मीनल चरकलीच.
"रघुवीर? कोण रघुवीर?" मल्हार
"रघुवीर, त्याचा मित्र तो त्याला कामशेतला भेटला होता." मीनल
"माझ्या माहितीप्रमाणे त्याचा रघुवीर नावाचा कोणीच मित्र नाही" मल्हार
कसं शक्य आहे ? मीनल ओरडतच म्हणाली. आता तू म्हणशील तू उज्वलामामींना पण ओळखत नाही?
"अगं खरच नाही. मीनल मी गंमत करत नाही. ही कोण? मल्हार
"ज्यांच्यी मेस होती. तुम्ही त्यांच्याचकडे जेवायला जात होते ना." मीनल
"जस्ट अ मिनीट मीनल. ही दोन्ही नावं मी शेखरच्या तोंडून कधीच ऐकली नाही." आता मात्र मल्हार जाम भडकला.
"मी त्याला दहावर्षांपासून ओळखतो. उज्वलामामी कोण? आम्ही गोविंदमेसमधे जेवायला जायचो." मल्हार
"अरे! तो खोटं नाही बोलणार. इतक्यात याच लोकांबद्दल भरभरुन बोलत होता." मीनल

माधव त्यांचा संवाद ऐकून गोंधळलाच. तेवढ्यात त्यांनी पार्सल उघडलं. त्यात शेखरच्या नावाचा अडीचहजाराचा चेक होता. सोबत एक चिठ्ठी होती.
नमस्कार शेखरसाहेब,
तुमचं पत्र मिळाले. मनीऑर्डरही मिळाला. आता मला याचा काहीही उपयोग नाही. जिच्यासाठी तुम्ही हे पैसे पाठवले ती या जगात नाही. मिनाक्षीला जाऊन वर्ष झालं. तुम्ही कोण आहात? तिला कसे ओळखता? मला माहित नाही.
हा चेक पाठवत आहे.
धनंजय पेठे
संभाजी चौक,
नगर

पत्र वाचून सगळेच आवाक झाले. हे काय घडतय.काहीच उलगडत नव्हतं. हे पत्र, मिनाक्षी, रघुवीर, उज्वलामामी
हे कोण ? हे कोण आणि या तिघांशी शेखरचा काय संबंध ? या प्रश्नांची उत्तरं शोधायलाच हवीत.
"मल्हार, गोविंदमेस कुठे आहे?" माधव
"गोखलेरोडवर" मल्हार
"चल, मीनल तू पण चल. तिथे या प्रश्नाची उत्तरं मिळतील." पत्र खिशात टाकत माधव म्हणाला.
"मेस आणि याचा काय संबध?" मल्हार
"त्यानी एकदा घरी वंदनासाठी बेसन केलं होतं. उज्वलामामी असच करतात म्हणून सांगिल्याचं मला आठवतय." माधव

"काय घेनार शेठ ?" वेटर
"तीन चहा. ओ, गोविंदशेठ इकडे या जरा." माधव
"मी नाय गोविंद. माझा बा गोविंद. मी गणेश. बोला काय काम काढलं? गणेश
"तुमच्या कडे हा मल्हार आणि शेखर राजे जेवायला यायचे आठवतं का?" माधव.
"सहेब, अशे कितेक येतात आणि जेवून जातात कोणकोणाला लक्षात ठेवायचं. येत असतील. धंद्याचा टाईम हाय बोला लवकर." गणेश
"कोणी उज्वलामामी काम करते का तुमच्या कडे ?" मीनल.
"आयला, ही काम करायची अगुदर. आठनऊ महिन्यांपूर्वीच गचकली." गणेश
गणेशशेठचं बोलणं ऐकून तिघेही हादरलेच.
"पत्ता मिळेल का तिचा?" माधव

"आता कामशेत गाठायला हवं." मल्हार
"त्या आधी पोलिसांकडे जाऊन हे सगळं सांगितलं पाहिजे." माधव
"दिले असतील उसने. मिनाक्षीबद्दल नसेल सांगितलं तुम्हाला" ते पत्र बघुन पोलिस म्हणाले.
"सगळे सांगतातच असं नाही ना. सिक्रेट, जपत जगत असतात कित्येक जणं." हवालदार
"आम्ही शोधतो ना त्यांना. आम्ही आमच्या पद्धतीने तपास करतो साहेब. फारतर कामशेत पोलिसचौकीत बोलून एक हवालदार सोबत धाडून देतो. ओ साहेब. कुठे गेला असेलं पार्टीबिर्टी करायला. येईल परत." पोलीस
"सिक्रेट, शेखर काही लपवून ठेवणार नाही माझ्यापासून" मीनलनं चिडत पोलिसांना म्हंटलं
"असं तुम्हाला वाटतं" हवालदार
पोलिसांची तर्‍हा बघून माधव उठला.
"मल्हार, सत्यमच्या ऑफिसमधून कामशेतमधलं शूटिंग कुठे झालं होतं याचे डिटेल्स घे." माधव यांनी सुचना करत वंदनाला फोन लावला. तिच्या प्रश्नांना थोपवत त्यांनी गाडी कामशेतकडे वळवली.
"रघुवीरला गाठलं पाहिजे." माधव

ऑफिसमधून मिळालेल्या कामशेतच्या पत्त्यावर उजाड माळारान एक पडकं घर आणि विहीर होती. इथे रघुवीरबद्दल माहिती कोण देणार या विचारांत तिघांनी गावातली पोलिसचौकी गाठली. तिथे रघुवीरचे संपूर्ण नाव रघुवीर तानाजी शिर्के, त्याच्याबद्दल जे कळलं ते ऐकून ते स्तब्ध झाले. मीनलला तर ते ऐकून सुन्न झाली. आपल्या आयुष्यात असं काही घडेलं याची कल्पनाच नव्हती. आता राहिली होती ती मिनाक्षी. ती भेटली शिरोळ्याला. तिच्या वडिलांचं पत्र आलं ते नगरहून. मग जायचं कुठे? नगरला की शिरोळ्याला. काहीच सुचत नव्हतं. या तिघांचा आणि शेखरचा काय संबंध? गुंता आणि नुसता गुंता. विचारांच्या गोंधळात गुरफटलेले तिघं पुण्याला पोहचले. रात्र फार झाली होती. प्रसंगाचे गांभीर्य जाणून माधव यांनी मीनलच्या घरी या प्रकरणाची कल्पना दिली. तिकडे बारामतीलाही कळवलं. सकाळी नगर आणि शिरोळ्याला जाऊन या प्रकराणाचा छडा लावायचा ठरलं.
संभाजी चौक आला. धनंजय पेठे, दोनचार दुकानात चौकशी केल्यावर पत्ता मिळाला. निदान यांच्याकडून शेखरबद्दल काही माहिती मिळेल या आशेत ते पेठेंकडे आले. ते तर शेखरला ओळखतही नव्हते. माधवनी त्यांचं पत्र पुढे केलं. त्यांनी जे सांगितले ते ऐकून तिघेही अचंभित झाले. या तिघांचा आणि शेखरचा नक्की काय संबंध हे कोड उलगडायला एक धागा सापडला होता. तो धागा घेऊन ते शिरोळ्याला निघाले. मीनल, मल्हार आणि माधव यांची अवस्था फारच विचित्र होती. शेखर सुखरुप असू दे या विनवण्या मीनल देवाला करत होती. माधव आणि मल्हार घडलेल्या घटनांना जोडून काय सापडतय याचा अंदाज घेत होते. तेवढ्यात मल्हारच्या मोबाईलवर मॅसेज आला. सत्यमच्या ऑफिसमधून शिरोळ्याला झालेल्या शूटिंगचे लोकेशन, यूनिट जिथे थांबलं त्या जागेचा पत्ता त्यात होता.
शिरोळ्याला पोहचे पर्यन्त दुपारचे साडेचार वाजले. विचारत विचारत त्या पत्त्यावर ते पोहचले. शेखर कुठे आहे? या तिघांचा आणि शेखरचा काय संबंध? याचं उत्तर इथेच मिळण्याची त्यांना आशा होती. ते फार्महाऊसवर पोहचले तेव्हा तिथे शेखर येऊन गेल्याच कळलं.
"शेखर साहेबांचा मुक्काम इथचं आहे. कुठं जवळपास कामाला गेलेत रात्री परत येतील." वॉचमनच्या सांगण्याने सगळ्यांनाच हायसं वाटलं.
"तो येईपर्यन्त धीर ठेवायलाच हवा." मल्हार
"साहेब शूटिंगला आले होते. सगळ्यांसोबत परत गेले बी पन अचानक रात्रीला आले. एकटेच. अजून काय काम शिल्लक हाय ते करुनच घेतो म्हनले. मी आमच्या मालकांना विचारलं ते आमचं पाटिल साहेब. ते हो म्हनले....रायलं असेल एखांद काम. काम झालं नसेल म्हनून परत आले असनार...म्हनून इथे एंट्री मिळाली, आमी असं कधी बी करत नाय.एक रुम दिली हाय. तुमी त्यांच पाव्हनं काय.? बसून घ्या वरांड्यात." नाम्या वॉचमन
"ओ भाऊ, तुमच्या पाटिलसाहेबांचा फोननंबर देता का?" माधव

"हॅलो, नमस्कार, पाटिल साहेब" माधवनी त्यांना थोडक्यात जे झालं ते प्रकरण समजवून सांगितलं
"ते येत आहेत. त्यांना या प्रकरणाची थोडी कल्पना दिली आहे. बघू काय कळतयं ते." माधव

"साहेब, मी हा फार्महाऊस भाड्याने देतो. सत्यमवाले कोणी ओळखीपाळखीतून आले विचारत आणि आम्ही भाडाने दिला त्यांना बास, एवढा काय आमचा अन त्यांचा संबंध. यांच शूटिंग मी तर ते पण नाही बघितलं राव." पाटिल
दोन-तीन दिवसांपूर्वी वॉचमनचा फोन आला. कोणी एक साहेब आले. शुटिंगच थोडं काम बाकी आहे म्हणून. तसं एकदा शूटिंग संपली की व्यवहार संपला. सत्यमवाले चांगले होते म्हणून मी या साहेबांना परवानगी दिली." पाटिल
"तुम्ही एवढ्या दुरुन आलात. मी तुमची इथे रहाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करु शकतो." तिघांना काळजीत बघून आणि मीनलची अवस्था बघूनपाटिल म्हणाले.
"नामभाऊ यांची व्यवस्था करा. तुमचे शेखर साहेब येईपर्यंत थांबा तुम्ही." सांगत पाटिल गेलेत.

तिथे एका टेबलवर या तिन्ही लोकांचे तपशिल ठेवत मल्हारने धागे कुठे जुळतात हे शोधायला सुरवात केली
हे तिघं आणि शेखर.....
रघुवीर आपल्या बाळंतीण बहिणीला भेटायला कामशेतवरुन नगरला निघाला.
त्याच दिवशी उज्वलामामी तिच्या वडिलांची तब्येत जास्त झाली म्हणून पुण्याहून नगरसाठी निघाली.
त्याच दिवशी मिनाक्षी आपल्या भावासोबत अ‍ॅडमिशनचे पैसे घ्यायला तिच्या काकांकडे म्हणजे शिरोळ्याला निघाली.
"ही तर आठमहिन्यांपूर्वीची गोष्ट." मीनलने विचारलं.
"इथे शेखर शूटिंगसाठी दहा दिवसापूर्वी आला होता. मग हे सगळं काय आहे? मल्हार
"शिरोळा, या जागेचं काहीतरी कनेक्शन तर नक्की आहे." माधव
"शिरोळा, हा कॉमन स्टॉप आहे." मल्हार
"याचाच अर्थ रघुवीर आणि उज्वलामामीची बस नगरला जाताना शिरोळ्याला थांबली असेल. तेव्हांच मिनाक्षी भावासोबत शिरोळ्याला बसने उतरली." माधव
"म्हणजेच हे चौघं शिरोळ्याला बसस्थानकावर भेटले." मल्हार
"हो असं जरी झालं असेल तरी हे चौघं एकमेकांना ओळख नाहीत? मीनल

"एक मिनीट. शिरोळ्याच्या बसस्टॅंडवर चला, तिथे नक्की माहिती मिळेल." माधव
"एवढ्या रात्री काय सापडेल तिथे?" मल्हार

शेखरच्या काळजीने त्रस्त ते तिघं शिरोळा बस स्टॅंडवर पोहचले. तिथल्या चहाच्या टपरीवरच्या पोरानं जे सांगितलं ते ऐकून तिघांच्या पायाखालची जमीनच सरकली.
"आठ नऊ महिने झाले असतील साहेब. इथे या वळणावर खूप मोठा अपघात झाला होता." गणप्या
"एवढासा तर स्टॅंड आहे हा साहेब. तुमच्याजवळ जे फोटो आहेत ना त्यातली ती ही मावशी, इथच चहाप्यायला थांबली होती. ते ताई-दादा कोणाची तरी वाट बघत इथच बसले होते." गणप्या

"हा, ताई-दादा म्हणजे मिनाक्षी आणि तिचा भाऊ मंदार." मल्हार

"तोच तो साहेब. तो पलीकडे रस्त्यावर तो ठेला आहे ना तिथे केळी घ्यायला गेला. तेवढ्यात त्या तिकडून हॉटेल आहे ना तिकडून एक सुमो आली बघा खूप जोरात. धडक देत तिने फुलवाल्याच दुकान उडवलं, नंतर त्या मोचीवाल्याचं दुकान उडवलं, आमची टपरीच पण नुकसान झालं साहेब. त्या पोराला पण उडवलं. तशी फोटोतली ताई मिनाक्ष तो रघूवीर दादा आणि त्या मावशी मदतीला धावल्या. त्यांनाही उडवत गाडी वेगानं गेली साहेब. अख्खा गाव लोटला साहेब. गर्दी झाली. ही तिघे तर जागीच खल्लास झाली. त्यांना जवळच्या सरकारी दवाखान्यात नेलं होतं. तो गाडीवाला गेला पळून. हातीच नाही दावला बघा. दावला असता ना तर तेला जित्ता नसता ठेवला या गाववाल्यांन. एवढच माहिती साहेब." गणप्या

हे ऐकून माधव थरथर कापू लागले.
ए गणप्या काम नाय का ? कोनासंग बोलत बसला? शाळेचा अभ्यास पन करायचा हाय तुला ? आटप पटापटा. टपरीमागून करडा आवाज आला.
"आलो मालक" गणप्या
"ओ सायब, जाणारे समदे गेले. आता हे ऐकून तुम्ही काय करनार. दहा-पंधरा दिवसांपूर्वी एक सायब आला होता चहा प्यायला, तुमच्यावानीच प्रश्न विचारत होता. जरा झकलटच होता." टपरीवाला
"शेखर...." मल्हार
"मला नाव नाय माहित. हं पण पत्ता विचार होता या गणप्याला."
"कुणाचा"? माधव
"कुणाच रे गणप्या?" टपरीवाला.
"दवाखान्याचा" गणप्या.
हे ऐकून तिघेही तडक जवळच्या सरकारी दवाखाण्यात गेले.
"हो, थांबा रजिस्टर बघून सांगते." सिस्टर.
"त्यांच्या नातेवाइकांनी नेली की प्रेतं. बाकी माहिती इथल्या पोलिसचौकीत मिळेल." सिस्टर
घाईघाईत तिघांनी शिरोळ्याची पोलिस चौकी गाठली.
"लवकर करा हो साहेब....."मल्हार.
"शोधतोच आहे साहेब. वाईच धीर धरा." हवालदार. मीनल आणि मल्हारने आत्तापर्यन्त साठवलेला धीर आता सुटत होता.
"हे काय त्यांच सामान होतं ते कालच एका साहेबांनी नेलं. नाव... शेखर राजे ही बघा सही." हवालदार
"कोणाचं होतं ते सा..मा..न....." माधव
"त्या प्रेतांसोबत मिळालं होतं साहेब" हवालदार
"आम्ही घरच्यांना कळवलं होतं, पण ते न्यायला त्यांच्या घरुन कोणी आलं नाही बघा." हवालदार

"रघुवीर, उज्वलामामी, मिनाक्षी यांच सामान" मीनल

"मल्हार, उज्वलामामींच्या वडिलांचा पत्ता काढ." माधव
तिघांनी शिरोळ्याची धनगरवाडी गाठली.
"उज्वला, नाव घेताच...म्हातारा चरकला.
"माझं मरण ती घेऊन गेली. आता तुम्ही काय द्यायला आलतं?" म्हातारा
"कालच एक साहेब धोतरजोडी देउन गेला. ही बघा, माझ्या पोरीची शेवटची भेट आहे ती." म्हातारा
एक क्षण माधवच्या डोळ्यासमोर छातीशी एक पिशवी कवटाळलेली रक्तानेमाखलेली उज्वला तरळऊन गेली. आणि त्यांच काळीज भरुन आलं.
तसच त्या तिघांनी रघुवीरच्या बहिणीचं घर गाठलं.
"कोन हाय?..." एक क्षीण आवाज आतून आला.
"आम्ही पुण्याहून आलो..." मल्हार. अजून काही सांगायच्या आत ती बाई लहानशा बाळाला घेऊन बाहेर आली.
"नका छळू हो. आता अजून काही द्यायच राहून गेलं का?"
"कोणी...आ..लं..होतं का?" मीनल
"बाळाच्या हातातले वाळे दाखवत म्हणाली. माझ्या भावाने रघूवीरने घेतले होते माझ्या बाळासाठी, काल एक साहेब देऊन गेला."

अवसान गिळत माधव गाडीत बसला. त्याच्या डोळ्यासमोर उताणा पडलेला रघुवीर दिसत होता. त्या तिघांनी तडक मिनाक्षीच्या काकांच घर गाठलं.
"हुशार होती हो आमची पोर. मीच तिला बोलवलं. पैसे घ्यायच्या निमित्ताने भेट झाली असती. असं होणार हे ठाऊक असतं तर मी कधीच बोलवलं नसतं तिला" काकांच्या डोळ्यात पाणी तराळलं.
त्यांनी एक चुरगळलेलं पाकिट पुढे केलं. कालच एक साहेब हे देऊन गेले. त्या पाकिटात कॉलेजचा फॉर्म होता.
दादा...दादा ओरडत रडत येणारी एक मुलगी माधवच्या डोळ्यासमोर तरळून गेली.
"भावजी, शेखर कुठे असेल?" मीनलने डोळे पुसत विचारलं
"मला माहित आहे. चला" माधव ने गाडी स्टार्ट करत म्हंटलं
माधवचे हावभाव पाहून मल्हार चरकलाच. यांना कसं माहित शेखर कुठे आहे तो. गाडी शिरोळ्याच्या बाहेर पडली....घाट संपला. मंदिराजवळ माधवने गाडी थांबवली. मंदिराच्या पायरीवर, शेखर तिथेच बसला होता.
"शेखर .....शेखर ...." मीनल धावतच त्याच्या जवळ गेली. तो धूळीने माखलेला. त्याचे मळके कपडे, डोळ्यातली वेगळीच चमक
बघून मीनल आणि मल्हार दचकलेच.
"त्यांना उडवून सुसाट निघाला आणि इथेच या मंदिराजवळ तुम्ही थांबले होते ना भावजी" शेखर
म्हम...ण..जे.....ती गाडी....ते चौघं...तो अपघात...भावजी....
माधव हे ऐकायला होता कुठे.....

(विनीता देशपांडे)
-------------------------------<<<<<<<<<<<<<-------------------------