Nishant - 1 in Marathi Moral Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | निशांत - 1

Featured Books
Categories
Share

निशांत - 1

निशांत

(1)

अनया चला आता घरी आत्ता येतील बाबा ..
सोनालीने बाहेर येऊन खेळणाऱ्या मुलीकडे पाहून हाक दिली ..
निळ्या फ्रॉक मधील अनयाने जोरात हात दाखवला
“आई फक्त पाच मिनिटे थांब ..गेम बघ संपत आलाय ..
सोनाली आत गेली आणि तिने सुमितला हाक दिली
“ये रे सुमित चहा झालाय आणि पुर्या पण तयार आहेत ..”
सुमित आणि अन्वया दोघे टेबलवर येऊन बसली
आई कसल्या आहेत ग पुर्या असे म्हणत अन्वयाने पुरीच्या वाडग्यात हात घातला मात्र ..सोनाली ओरडली .
अग अन्वया आताच बाहेरून आलीस न हात धुवायची काही पध्धत ?
आई माझे हात नेहेमीच साफ असतात हे बघ गोरे गोरे ..होय न रे काका
सुमित कडे पाहून अन्वया बोलली ..
सुमित ने हसुन तिच्या डोक्यात एक टप्पल मारली आणि म्हणला .
ओ गोर्या गोर्या बाई जा पटकन हात धुवून या नाहीतर तुमची खैर नाही !!!
आईच्या मोठ्या डोळ्याकडे पाहत जीभ चावत पटकन अन्वया बेसिनकडे पळाली
”वहीनी अजून दादा कसा आला नाही ?
पार्टीला जाणार आहात न तुम्ही ?
“हो रे आता तुमचे चहा खाणे झाले की फोन करते तुझ्या दादाला..
तेव्हा कुठे कामातून डोके वर निघेल तुझ्या दादाचे “
अमित एका मोठ्या कंपनीत सीईओ होता .
सोनाली पण एमबीए झालेली होती. त्यांच्या लग्नाला आता पंधरा वर्षे झाली होती .खरेतर लग्नाआधी सोनाली पण नोकरी करीत होती,
पण पाच वर्षापूर्वी सासुबाईंचे निधन झाले ..सासरे आधीच वारले होते .
तिच्या दोन मुली तेव्हा अन्वया आणि अनया दहा आणि पाच वर्षाच्या होत्या
त्यांच्याकडे आता कोण बघणार?
शिवाय घरचा सगळा व्याप पण सासुबाई गेल्यामुळे तिच्याकडेच आला .
लहान दीर सुमित तेव्हा नुकताच दहावीत गेला होता .
घरी पण येणे जाणे, व्रत वैकल्ये, कर्मकांडे बरीच होती .
सासुबाईच्या माघारी अमितचे म्हणजे तिच्या नवर्याचे म्हणणे पडले की तिने पूर्ण वेळ घरची जबाबदारी बघावी .
आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने नोकरीची गरज नव्हतीच .
मुलींच्या शाळा ,सुमितचे शिक्षण यात पाच वर्षे कशी गेली तेच नाही समजले .
सुमित आता इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता .
मोठी अन्वया दहावीला आणि धाकटी अनया पाचवीत होती .
पहीली एकदोन वर्षे सासुबाईंची उणीव भासली पण आता सारे ठीक होते .
सुमितला पण आई गेल्यावर मानसिक आधाराची खुप गरज होती.
तो त्यावेळेस सोनालीने दिल्यामुळे सोनाली आणि त्याच्यामध्ये एक “भावनिक” नाते तयार झाले होते .

सोनालीची तयारी झाली आणि आता अमितला फोन करणार तोच अमित घरी आला .”अरे बर झाल मी फोन करणार होतेच तुला ...”
“मी विसरलो नाहीय ग पार्टीचे म्हणून तर वेळेत आलो ..
बाकी या लवेंडर साडीत एकदम “फाकडू “दिसतेयस तु..”
“झाले का सुरु तुझे फ्लर्ट करणे ..अरे लग्नाला पंधरा वर्ष झाली आपल्या
आता कशाला इतके कौतुक पाहिजे ?”
सोनाली तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहत हसून बोलली .
“काय करणार आपण आहातच इतक्या सुंदर ...हो कि नाही रे सुमित ?
आतून बाहेर येणाऱ्या सुमितकडे पाहुन अमित म्हणाला ..
“मग आमची वहीनी एक नंबर आहे बर का ....”सुमित पण लगेच म्हणाला .
तोपर्यंत अन्वया आणि अनया दोघी आईला बिलगल्या ..
“होय ग आई तु आहेसच ग भारी ..”
“बर बर असुदे आता लवकर अभ्यासाला बसा सात वाजत आलेत
आणि रात्री दहाच्या आत झोपून जायचे ..नो गेम्स बर का ..
“सुमित लक्ष ठेव रे यांच्याकडे ..मस्ती नको करू देऊ.”

सोनाली सुमित कडे पाहून म्हणाली ..
“वहीनी जा ग तुम्ही बिन्दास्त मी देतो लक्ष यांच्याकडे ..
अन्वया मात्र म्हणाली ..”ए आई लवकर या ग तुम्ही ..
तु घरी आल्याशिवाय मला झोप नाही येत “
थोड्याच वेळात अमित आणि सोनाली गाडी घेऊन बाहेर पडले .
तिकडून परत येईपर्यंत बारा वाजून गेले होते .
दार उघडताच सोफ्यावर अन्वया वाचत बसली होती .
अग का झोपली नाहीस अजून ?..चल बघु आतमध्ये .
आणि सुमित कुठे गेलाय ?
काका झोपलाय आत ..आणि अनया पण झोपलीय .
मम्मा मी आज तुझ्याजवळ झोपु ?चालेल का ?
अचानक हा प्रश्न ऐकुन सोनालीला नवल वाटले ..
पण मग ती समजली कदाचित एकटे वाटत असेल पोरीला .
अमित पण म्हणाला “मी अनयासोबत झोपतो ग ..
तु झोप अन्वयाजवळ ..”
सोनाली सुमितच्या बेडरूम मध्ये डोकावली .
सुमित बेडवर अस्ताव्यस्त पसरला होता .सोनालीने दार ओढून घेतले .
पुढच्या आठवड्यात चुलत दिराच्या मुलीचे लग्न होते .
कार्यक्रम गावातच असल्याने सोनालीचे घर भरून गेले होते .
नंतरचे आठ दहा दिवस कसे निघुन गेले समजलेच नाही .
त्याच्या पुढच्या आठवड्यात मैत्रिणीच्या मुलीचे लग्न होते त्याचा सीमांतपूजनाचा कार्यक्रम रात्री होता .
सोनाली आणि अमितने जायचे ठरवले होते .
पण हा बेत सांगितला तेव्हा अन्वया अचानक भडकली आणि दोघांच्या जाण्याला तिने आडकाठी केली .
सोनाली म्हणाली सुद्धा अग काका आहे की घरी ,
आम्ही लगेच येऊ जाऊन पण अन्वयाने नाही म्हणजे नाही जाऊ दिले दोघांना .
अमित पण म्हणाला “तिचा मूड नसेल तर नको जायला आपण “
आजकाल थोडी नाराज असायची अन्वया ,तशात तिची दहावीची पूर्वपरीक्षा जवळ आली होती ,कदाचित त्यामुळे थोडा मूड ऑफ असेल असे वाटले सोनालीला ..
प्रिलीम पंधरा दिवसावर होती ते झाले की सेन्डोफ होऊन शाळा बंद होणार होती.
अभ्यास एकदम जोरात चालु होता .
अन्वया पहिल्या दोन तीन नंबरात येणारी होती. त्यामुळे तशी काळजी नव्हती .
पण का कोण जाणे ती आजकाल फार बोलत नव्हती ,खाणे पिणे झाले कि आपल्या रूम मध्ये स्वतःला बंद करून घेत होती .
सोनाली थोडी काळजीत होती पण अमित म्हणाला परीक्षेच्या विचाराने थोडी अस्वस्थ असेल .ते मात्र पटले ते सोनालीला .
मात्र यापुढच्या एक दोन महिन्यात आपण कायम घरी अन्वयासोबत राहायचे असे सोनालीने मनाशी पक्के केले .
सुमितला मात्र या सेमिस्टरला खास मार्क नव्हते मिळाले .
त्याचे सारखे बाहेर जाणे पण वाढले होते .
रात्र रात्र कसल्या कसल्या फिल्म पाहत असायचा ..
घरी येणारे मित्र पण खुप नवीन, नवीन आणि विचित्र असायचे .
“सुमित कोण आहेत रे हे नवे मित्र आणि रात्री आजकाल उशिरा का येत असतोस”
असे बोलून सोनालीने एकदा त्याला हटकले होते .
पण नेहेमी हसत खेळत बोलणारा सुमित अचानक सोनाली वर चिडला होता .
“वहीनी तु आमच्या मित्रांच्या भानगडीत नको पडू ..”असे त्याने सुनावले होते .
अशा प्रकारचे त्याचे उद्धट बोलणे सोनालीने प्रथमच ऐकले होते ..
अमित ऑफिस कामाच्या गडबडीत ,त्यात अनयाचे स्नेहसंमेलन आणि अन्वयाचा अभ्यास या साऱ्यामध्ये तिने सुमितचे बोलणे मनावर नाही घेतले .
आणि सुमित विषयी कोणतीच तक्रार ती कधीच अमित कडे करीत नसे कारण हा आईवेगळा दीर तिनेच पुर्वीपासुन स्वतःच्या मुला सारखा वाढवला होता.
त्याच्या मनाविरुध्द कधीच काही केले नव्हते .
नंतर मात्र अन्वयाच्या परीक्षेचे दिवस जवळ येऊ लागले तसतसे तिचे खाणे पिणे ,अभ्यास यात सोनाली पुरेपूर गुंतून गेली.
शाळेच्या प्रिलीम मध्ये अन्वयाला खुप चांगले मार्क्स मिळाले होते .
अन्वया पण खुश होती कारण तिची मम्मा सतत तिच्या सोबत असायची .
अन्वयाच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस अमितने रजा घेतली होती.
अन्वयाला पेपरला सोडणे, आणणे ही जबाबदारी त्याने उचलली होती .
परीक्षा मस्त पार पडली आणि लगेच अन्वया आजी आजोबाकडे मुंबईला सुटीसाठी निघून गेली .
यानंतर अनयाची परीक्षा होती ती झाली की अमित आठ दिवस परत रजा घेणार होता मग सर्वांनी कुलू मनाली फिरुन यायचे ठरवले होते .

क्रमशः