Aaja Gunha Kar le - 2 in Marathi Short Stories by Aniket Samudra books and stories PDF | आजा गुन्हा कर ले (भाग-२)

Featured Books
Categories
Share

आजा गुन्हा कर ले (भाग-२)

“वॉस्को..वॉस्को..वॉस्को..वॉस्को..”
“पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..”

बसचालक, खाजगी वाहतुकदार, टॅक्सीवाल्याच्या आवाजाने गोव्याचा स्टेशनपरीसर गजबजला होता. काळरात्र ओसरली होती आणि सुर्याची सोनेरी किरणे गोव्याच्या निळ्याश्यार समुद्राला चमकवुन टाकत होती. कालच्या रात्रीचे आमचे ते विद्रुप मुखवटे अंधारात विरुन गेले होते आणि आम्ही गोव्यात आलेल्या असंख्य पर्यटकांपैकीच एक होऊन गेलो होतो.

दिन्याने यावेळेस एक बऱ्यापैकी हॉटेलपाशी गाडी थांबवली..
“दिन्या.. अरे लय महाग वाटतेय हॉटेल.. परवडायचे नाय..” दिन्याला म्हणालो..
दिन्या परत एकदा तस्साच भयानक हसला आणि त्याने जाकीटाच्या खिश्यातुन पैश्याची पुडकी काढुन माझ्यासमोर फेकली..
“दिन्या.. इतके पैसे?? कुठुन आणले..” मी चाचरतच विचारले..
“काल त्या म्हाताऱ्याला टपकवला ना.. त्याच्या खोलीत कॅश-पेटीची किल्ली होती.. म्हणलं इझी-कॅश… कश्याला सोडा..उचलली..” दिन्या बेफीकीरीने म्हणाला.. “शिवाय ते बघ वर काय लिहीले आहे..” दिन्याने कॅसिनोच्या ग्लो-साईनकडे बोट दाखवले..

दिन्या खऱंच स्मार्ट आहे हं.. कसं काय सुचतं त्याला हे सगळं.. म्हणुनच तो भयानक असुनही माझं आणि त्याचं जमतं.

आमची रुम मस्त होती.. शिवाय ए/सी. कॉम्लेमेंट्री म्हणुन वाईनची बॉटल सुध्दा होती. तिथल्याच एका खुर्चीत मी स्वतःला लोटुन दिले.. दिन्याने तोपर्यंत टि.व्हि. लावला. अनपेक्षितपणे “ड्राईव्ह-इन” ची बातमी न्युज चॅनल्स वर दाखवली जात होती. इतक्या लवकर ही गोष्ट मिडीया पर्यंत पोहोचेल असं वाटलं नव्हतं

ब्लर व्हिजन करुन न्युज वर त्या नग्नावस्थेतील पोरीचे आणि रुममध्ये मान मोडुन पडलेल्ल्या म्हाताऱ्या मॅनेजरच प्रेत दाखवत होते.

“कुठल्यातरी एखाद्या विकृत, मनोरुग्ण माणसाचे हे काम आहे..” पोलीस न्युज-रिपोर्टरला माहीती देत होते.. “आम्हाला खोलीत आणि मॅनेजरच्या डेस्क पाशी एका माणसाचे ठसे सापडले आहेत. इतकेच नव्हे तर ह्या मॉटेलचे मॅनेजर मोठ्ठे आंबट-शौकीन होते. आपली इच्छा भागवण्यासाठी त्यांनी मॉटलमध्ये कित्तेक ठिकाणी बेमालुमपणे क्लोज-सर्कीट कॅमेरे बसवले होते. मॉटेलवर एका-रात्रीपुरत्या येणाऱ्या जोडप्यांची लाईव्ह क्लिपींग्ज ते मोठ्ठ्या चवीने बघत असतं. अर्थात त्यामुळे आम्हाला क्ल्यु मात्र मिळाला आहे. ह्या रुम मध्ये येणाऱ्या त्या खुन्याचे क्लिप्स आम्हाला मिळाले आहेत. साधारणपणे २५-२७ वयोवर्षाच्या, ५ft.9″ च्या एका गोऱ्या तरुणाचा आम्हाला शोध आहे. ”

“एकाच माणसाचे??” मला आश्रर्य वाटले.. “पण आम्ही तर तिघं होतो.. निदान खोलीत तरी आम्हा तिघांचे ठसे सापडायला हवे होते. म्हाताऱ्याला आम्ही दिन्याच्या मागे लपलो असल्याने दिसलो नसु पण कॅमेरात पण कुणीच कसे दिसले नाही.. आश्चर्य आहे. तस्सेच संजुच्या प्रेताचं काय? ते कसं कुणाला सापडले नाही? त्याबद्दल कोणीच कसं काही बोलत नाही.. दिन्याने काय केलं असेल नक्की त्याचं?”

“खुन्याबद्दल काही सुगावे आम्हाला हाती लागले आहेत.. पण त्याबद्दल अधीक आत्ताच सांगणं योग्य ठरणार नाही..” पोलीस बोलत होता..

“अबे छोड बे.. साला.. नाही सुगावा मिळाला म्हणुन मिडीया फाडुन खाईल या मामुला म्हणुन तो आपलं फेकतोय..आपल्यासारखे दिसणारे हजार सापडतील ह्या करोडो लोकांमध्ये आपल्याला ते शोधु पण शकणार नाय..” दिन्याने नेहमीचे बेफीकीरीचे विधान केले आणि त्याने चॅनेल बदलला.

काही वेळातच दारावर ‘टकटक’ झाली. दिन्या चित्याच्या चपळाईने उठला. तो दारापाशी गेला आणि त्याने ‘कि-होल’ मधुन बाहेर कोण आहे ते पाहीले. तो मागे वळला तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच भयानक हास्य होते. हळु आवाजात त्याने मला बाथरुमकडे जायला खुण केली.

बाहेरुन..”रुम सर्व्हिस..” एक मधाळ आवाज ऐकु आला.

मी धावत दारापाशी गेलो आणि की-होल मधुन डोकावुन बाहेर पाहीले.

गडद निळ्या रंगाचा बॉडी-फिट मीडी घातलेली, एका फिक्क्ट हिरव्या रंगाच्या रिबिनेचा आपल्या पाठीपर्यंत घनदाट मोकळे सोडलेल्या केसांचा पोनी बांधलेली एक तरुणी उभी होती.

दिन्याच्या मनामध्ये काय चालले आहे हे जाणवुन माझ्या अंगावर काटा आला.

“नको दिन्या.. आत्ता नको.. इथे भर वस्तीमध्ये..कालची घटना ताजी असतानाच अजुन एक..प्लिज नको..” मी काकुळतीला येऊन म्हणालो..

“रुम सर्व्हिस…” बाहेरुन परत तोच आवाज ऐकु आला..

“च्यायला.. ही पोरगी जात का नाहीये.. मरायचे आहे का हीला..” मी मनोमन विचार केला.
दिन्याने डोळे मोठ्ठे केले आणि मला बाथरुममध्ये जायची खुण केली.

केवळ नाईलाजास्तव, जड पावलांनी मी बाथरुममध्ये गेलो आणि दार आतमधुन लावुन घेतले.

बाहेरचे दार दिन्याने उघडले होते..

“दिन्या अरे हे काय चालवले आहेस तु?” बेडवर निपचीत पडलेल्या त्या वेट्रेसच्या प्रेताकडे बोट दाखवत मी विचारलं.. “म्हणजे आता इथुनही कल्टी मारावी लागणार तर..छ्छा!!”

“काला है तो काला होगा
मौत का ही मसाला होगाss
चुना कथ्थार जिंदगी तो
सुपारी जैसा छला होगा

बाप ने जना नही तो
पापीयोंने पाला होगा
भला बुरा, बुरा भला है
खोटे पर सब खरा भला है..”

दिन्या आपल्याच तंद्रीत मद-मस्त होता. शेवटी मीच त्या तरुणीचे प्रेत ओढत-ओढत बाथरुम मध्ये आणुन टाकले. एकुणच सगळ्या प्रकारांनी थकवा आला होता म्हणुन बेड वर स्वतःला झोकुन दिले, काही क्षणातच झोपेच्या आधीन होऊन गेलो.

डोळे उघडले तेंव्हा उन्ह खुप खाली उतरली होती. दिन्या खोलीत नव्हता, कुठेतरी बाहेर गेला होता. ‘आज रात्रीच इथुन निघायचे’, मी मनोमन ठरवुन टाकले. दिन्या आला तर बेस्टच नाहीतर एकटे..

तोंड धुवायला बाथरुम मध्ये गेलो.. ‘ते’ प्रेत अजुनही आहे त्याच स्थितीत पडुन होते. मला फार काळ बघवले नाही. पटकन फ्रेश होऊन बाहेर आलो. कपाटातुन बऱ्यापैकी दिसणारे कपडे काढले. आरश्यात स्वतःला एकदा न्हाहाळले आणि रुम लॉक करुन बाहेर पडलो.

हॉटेलच्या बेसमेंट मध्ये असलेला कॅसीनो पर्यटकांच्या गर्दीने तुडूंब भरला होता. दिन्याचा कुठेच ठावठिकाणा दिसत नव्हता.

“ऍन्टीक्वीटी.. ऑन द रॉक्स..” तेथील बारटेंडरला ऑर्डर देऊन तेथीलच एका खुर्चीवर स्थानापन्न झालो. दोन जळजळीत घोट घश्याला घासत पोटात गेले आणि जरा बरं वाटलं. डोकं एकदम हलके झाले. उरलेला घोटही एकादमात संपवला आणि अजुन एक ऑर्डर दिली. इतक्यात खिश्यात पैसे आहेत की नाही याची जाणीव झाली. खिश्यातुन पाकीट काढुन बघतच होतो इतक्यात.. “हाय हॅंडसम, कॅन आय बाय यु वन लार्ज व्हिस्की?” मागुन एक आवाज आला.

माझ्या मागेच एक २७-२८शीतील तरूणी माझ्याकडे अर्थपुर्ण कटाक्ष टाकत उभी होती. कुरळे केस, कॉफी कलरचे डोळे, लार्ज ओपन नेक टी-शर्ट आणि लो-वेस्ट जीन्स घातलेली एक तरूणी मला व्हिस्की ऑफर करत होती.

“वेल शुअर.. व्हाय नॉट!!.. मी पैसे रुममध्येच विसरुन आलो..”

शेजारचीच खुर्ची ओढुन ती तरूणी मला घसटुन बसली.

“दिन्या नसल्याचा फायदा.. तो असला की सगळ्या तरूणी त्याच्याभोवतीच घोटाळत असतात. मी सुध्दा इतका काही वाईट नाही.. जस्ट दॅट दिन्याचा इन्फ्ल्युएंन्स जास्त असतो..” स्वतःशीच विचार करत होतो

व्हिस्कीचे घोट एकावर एक पोटात जात होते. त्या तरूणीची घसट जास्तच वाढली होती. हळु हळु व्हिस्कीपेक्षा अधीक मादक आणि अधीक ज्वलंत मला ती तरूणी भासु लागली. डोळे जड होऊ लागले तसे मी पेग घेणे थांबवले.

“मग.. पैसे घ्यायला मी तुमच्याबरोबर रुम मध्ये येऊ..”.. माझ्या गालाला हलकाच स्पर्श करत ती तरूणी म्हणाली..

कदाचीत माझ्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले होते. समोर एखादा आरसा असता तर कदाचीत मी दिन्यासारखाच दिसलो असतो.. भेसुर, हिंस्त्र.

त्या तरूणीला घेउन मी रुमवर आलो. रुममध्ये अंधार होता. म्हणजे दिन्या अजुनही परत आला नव्हता. रुममधला दिवा लावला.. “बरं झालं ते प्रेत मगाश्शीच बाथरुममध्ये न्हेऊन टाकले ते…” मनामध्ये एक विचार येऊन गेला.

खोलीचे दार लावुन टाकले आणि त्या तरूणीला जवळ ओढले. तिचे गरम श्वास माझ्या मानेवर, कानावर जळजळीत आग ओतत होते. तिच्या छातीची धडधड एखाद्या पटरीवरुन धावणाऱ्या आगगाडिच्या आवाजाइतकी स्पष्टपणे मला ऐकु येत होती. मोठ्या मुश्कीलीने तिला माझ्या बाहुपाशातुन बाजुला केले आणि नकळत कपाटाकडे गेलो. माझे हात नकळतपणे काहीतरी शोधत होते..काय???.. कदाचीत दिन्याचा लाडका ७” सुरा.

“इथेच तर ठेवला होता!! कुठे गेला..”

इतक्यात पाठीला काहीतरी थंडगार वस्तुचा स्पर्श झाला.

“हॅन्ड्स-अप मिस्टर, यु आर अंडर अरेस्ट..” मागुन तिचा आवाज आला..
“कोण?? कोण आहेस तु??”
“सि.आय.डी. इन्स्पेक्टर निशा मेहता.. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय..”

मी सावकाश मागे वळलो. खोलीमध्ये अजुन दोन बंदुकधारी माझ्यावर नेम धरुन उभे होते.
********************************************

“इन्स्पेक्टर साहेब माझ्यावर विश्वास ठेवा.. अहो यातील कुठलाही खुन मी केलेला नाही”
“अच्छा, मग तुमच्या रुममध्ये सापडलेले ते तरूणीचे प्रेत?..”
“ते.. ते.. दिन्याने मारले तिला..”
“दिन्या? कोण दिन्या? आहे कुठे तो?”
“मला..मला माहीत नाही कुठे आहे तो.. दुपारपासुन नाहीसा आहे तो..हायवे वरील खुन सुध्दा त्यानेच केले आहेत..”
“याला काही पुरावा?..”
“पुरावा?.. होता.. पुरावा होता.. संजु.. तो सुध्दा माझ्याबरोबर होता..”
“संजु? मग आता कुठे आहे तो??”
“त्याला… त्याला सुध्दा मारला दिन्यानेच.. त्या मॉटेलच्या मागे..”
“मग आम्हाला त्याची बॉडी सापडायला हवी होती! नाही का?? आम्हाला खोलीमध्ये सुध्दा फक्त एकाच माणसाचे ठसे सापडले.. आणि काही तासांतच ते ठसे तुमचे आहेत हे स्पष्ट होईल..”
“आहे.. अजुन एक पुरावा आहे.. पेट्रोल पंपावरचा तो पोरगा.. ज्याचे पैसे न देता दिन्याने गाडी बाहेर काढली होती. तो सांगु शकेल की माझ्याबरोबर ३ लोकं होती.”
“झालं.. ते सुध्दा झालं.. त्या पोऱ्यानेच आम्हाला सांगीतले की त्या गाडीत फक्त एकच माणुस होता.. मग??”
“एकच माणुस..?? कसं शक्य आहे ते.. एकवेळ संजु त्याला दिसला नाही म्हणुन दोन माणसं म्हणला असता तरी ठिक आहे.. पण एकच माणुस म्हणतो म्हणजे… इन्स्पेक्टर साहेब.. ही दिन्याचीच काहीतरी चाल आहे.. तो मला या प्रक्ररणांमध्ये अडकवुन स्वतःला सोडवु पहातोय.”
“हे बघा.. त्या हॉटेलच्या सि.सि.टी.व्ही. क्लिप्स मध्ये सुध्दा आम्हाला फक्त एकच माणुस रुम मधुन आतबाहेर करताना दिसला होता आणि तो म्हणजे फक्त तुम्ही..

ही काय गडबड आहे मला काहीच कळत नव्हते.. दिन्या असा अचानक कस्सा नाहीसा झाला होता. हे सगळे खुनाचे पुरावे माझ्या विरोधात कसे होते..?? प्रश्न.. फक्त प्रश्न..

“बर मिस्टर.. तुम्ही मला दिन्याचे आणि संजुचे वर्णन सांगु शकाल काय? आपण गोवा पोलीसांच्या मदतीने त्या दोघांचा काही माग लागतो का ते बघु..”
“हो.. हो.. सांगतो ना.. संजु.. ५.८”, गोरा रंग, मजबुत बांधा वय साधारण २८-३० च्या आसपास, चेहऱ्यावर नेहमी घाबरलेले भाव..”
“आणी दिन्या??”
“दिन्या.. ५.८”, गोरा रंग, मजबुत बांधा वय साधारण २८-३० च्या आसपास, चेहऱ्यावर नेहमी बेफीकीरीचे भाव..”

इस्न्पेक्टरच्या चेहऱ्यावर एक हास्य पसरले.. त्याने माझी कॉलर धरुन ओढत न्हेले आणि एका आरश्यासमोर उभे केले..

“बघा मिस्टर.. काय दिसते समोर??”
मी समोर बघीतले.. “हा काय चमत्कार मला आरश्यात मी न दिसता चक्क संजु दिसत होता.. भयानाक घाबरलेला संजु!!”
इन्स्पेक्टरने माझ्या कानशीलात एक जोरदार भडकावली.. “साल्या.. तुला तर फाशीला लटकवणार मी..”

प्रहार एवढा जोरदार होता की माझी माने मागे फेकली गेली.. जेंव्हा मान सरळ करुन समोर आरश्यात पाहीले तेंव्हा संजुची जागा आता दिन्याने घेतली होती.. आरश्यात आता मला दिन्या दिसत होता…

हा काय प्रकार आहे मला काहीच कळत नव्हते. इन्स्पेक्टरने पोटात एक जोरदार लाथ घातली आणि मला लॉक-अप मध्ये कोंबले.

माझे डोके भुणभुणायला लागले होते. हा सगळा प्रकार माझ्या समजण्यापलीकडचा होता. समोरच टेबलावर तो हरामी इन्स्पेक्टर, सि.आय.डी. निशा आणि पांढरा कोट घातलेला, डॉक्टरसारखा दिसणारा एक इसम दिसत होता. मी त्यांचे बोलणे ऐकु लागलो.

तो हरामी इस्न्पेक्टर हसत म्हणत होता.. “विश्वास बसत नाही अश्या गोष्टींवर. इन्स्पेक्टर निशाला इंटरनेटवर माहीती कळाली आणि म्हणुन आम्ही तुम्हाला संपर्क केला. डॉक्टर हा काय प्रकार आहे?”

“एम.पि.डी.. अर्थात मल्टीपल पर्सनालीटी सिंन्ड्रोम असे ह्या मानसिक विकाराचे नाव आहे. ह्यामध्ये एकच मनुष्य दोन किंवा अधीक व्यक्तींचे आयुष्य जगत असतो आणि मुख्य म्हणजे तो त्या व्यक्तींमध्ये इतका गुंफला जातो की त्याला सत्यातच आपल्या भोवती त्या व्यक्ती आहेत असे वाटु लागते. मग ती व्यक्ती समवयीन असु शकते, एखादा लहान पोरगा किंवा इव्हन भिन्न लिंगी व्यक्ती सुध्दा.. ह्याच्या बाबतीत सुध्दा तस्सेच झाले. त्याच्या लेखी संजु आणि दिन्या ही भिन्न व्यक्तीमत्वाची लोक त्याच्या अवतीभोवती सत्यात होती. पण प्रत्यक्षात मात्र ह्या सर्व घटनांमध्ये एकच व्यक्ती होती. एखाद्या भितीदायक घटनेत त्याचा संजु व्हायचा तर त्याचे गुन्हेगार मन जागृत झाल्यावर दिन्या.”

“ऐकावे ते नवलच..तिन तिन माणसांच व्यक्तीमत्व एकच माणुस जगतो…कमाल.. अर्थात न्यायालयात हे सिध्द व्हायला वेळ लागेल पण अशक्य नाही. केवळ पेट्रोलपंपावरील ती क्षुल्लक घटनेचा मागोवा घेताना हे सत्य पुढे येत राहीले. त्या पोऱ्याने सांगीतलेले वर्णन.. एकच माणुस इकडे तिकडे बघत कधी दिन्या तर कधी संजुशी काही तरी बोलत होता आणि आजुबाजुला मात्र कोणीच नव्हते. त्याचवेळेस ड्राईव्ह-इन मधील घटनेची माहीती पोलीसांना मिळाली, क्लिप्स चा पुरावा मिळाला. नजदीक ठिकाण गोवा म्हणल्यावर तो गुन्हेगार तिथेच मिळणार असल्याची शक्यता पोलीसांनी उचलुन धरली आणि.. पुढे काय घडले हे वेगळे सांगायला नकोच..”

त्यांचे बोलणे खुंटले ते गाण्याच्या आवाजाने. सगळे जण आश्चर्याने माझ्याकडे बघत होते तर मी आश्चर्याने माझ्याच सेल मध्ये शेजारी अचानकपणे आलेल्या दिन्याकडे..

दिन्या गाणं गुणगुणत होता..

“वोह जो कही नही है
उसपे भी तो यकीन नही है
रहता है जो फलक फलक पै
उसका घर भी जमीन नही है
अकल का खयाल अगर वो
शकल से भी हसिंन नही है
पहले हर जगह पै था वोह..
सुना है अब वोह कहीं नही है..

.. आजा गुफा ओं मै आss.. आजा गुनाह कर ले, आजा गुनाहsss करले…!!”

[ समाप्त ]