Shepur asnanya pranyachi sabha in Marathi Children Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | शेपूट असणाऱ्या प्राण्यांची सभा

Featured Books
Categories
Share

शेपूट असणाऱ्या प्राण्यांची सभा


शेपूट असणाऱ्या प्राण्यांची सभा
शहरापासून काही अंतरावर एक हिरवेगार जंगल होते. तिथे राखलेली नानाविध प्रकारची झाडी फुला-फळांनी बहरली होती. जमीनीवर सर्वत्र पसरलेले मऊशार गवत अनवाणी फिरणारांच्या पायाला गुदगुल्या करीत असे. ते जंगल तसे जवळ असल्यामुळे माणसांनी नेहमीच गजबजलेले असे. विशेषतः सायंकाळी तिथे भरपूर गर्दी असायची. त्यादिवशीही सकाळी सकाळी त्याठिकाणी भरपूर गर्दी होती. परंतु ती गर्दी माणसांची नव्हती तर खास अशा प्राण्यांची होती. तसे त्या जंगलात राहणारे ते प्राणी असले तरी त्यातले काही प्राणी त्यादिवशी मुद्दाम एकत्र येत होते. त्या त्यांच्या 'गेट टुगेदर' या कार्यक्रमाला त्यांनी एक विशेष नावही दिले होते...'शेपूट असणाऱ्या प्राण्यांची सभा!' ती सभा माकडाने आयोजित केली होती. सभेला सर्व शेपटीवाले प्राणी उपस्थित झालेले पाहून आनंदित झालेले माकड मोठ्या उत्साहाने म्हणाले,
"वा! वा! आमंत्रित सारे आलेले पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आजची सभा मी मुद्दाम सकाळी ठेवली आहे कारण सायंकाळी इथे मानवांची गर्दीच गर्दी असते. पाय ठेवायला त्यांनाच जागा नसते तर आपण सभा घेणार कुठे आणि कशी?"
"हे मात्र छानच केले. आपण एक करूया माणसे नेमतात तसा एक सभापती आपण आपल्या सभेसाठी नेमूया." गायीने सूचना केली.
"अगदी बरोबर आहे. आपण आपल्या सभेसाठी सभापती म्हणून पोपटरावांची निवड करुया." घोडा म्हणाला.
"व्वाह! नाव तर छान सुचवले आहे पण सभेचा पोपट होऊ नये म्हणजे मिळवलं." हसतहसत मनीमाऊ म्हणाली आणि सारे हसत सुटले. तसा पोपट म्हणाला,
"एक मासा सोडला तर मी तुम्हा सर्वांपेक्षा लहान आहे. असे असताना तुम्ही मला हा मान दिला. मी आपला आभारी आहे. चला तर मग सभेला सुरुवात करूया. आपल्याला देवबाप्पाने एक विशेष अवयव दिला आहे. शेपूट म्हणतात त्याला. आपण देवाकडून शेपटीची लूट केलीय असे म्हणूया. प्रत्येकाला ही शेपूट देऊन देवाने जणू उपकारच केले आहेत. या शेपटीने आपण काय काय करणार ? हे गोमाते, तुच सांग, या शेपटाचे तू करशील काय?"
पोपटाने केलेला प्रश्न ऐकून गोमाता पुढे आली. जोरात हंबरून म्हणाली,
"इथे येणारी, गर्दी करणारी माणसे ना भलतीच घाण करतात. त्यामुळे होतात माशा. ह्या माशा की नाही नको तिथे बसतात आणि सोबत कुठली ना कुठली घाण घेऊन मिरवतात. अशा माशा शरीरावर बसल्या की, समजा त्यांच्या पायाला लागलेली घाण आपल्या शरीराला चिकटणार आणि मग आपल्याला नको तो आजार होणार. म्हणून मी या माझ्या शेपटीचा उपयोग करते. माझी ही शेपटी मी एकसारखी माझ्या शरीराभोवती फिरवत राहते त्यामुळे एकही माशी माझ्या शरीरावर बसणे तर सोडा पण माझ्या आसपासही फिरकत नाही. "
"व्वा! गोमाते, व्वा! खरे आहे तुझे. त्या माशांना जवळ येऊच दिले नाही तर आपल्या शरीराला घाण लागणार नाही आणि कोणताही आजार होणार नाही." असे म्हणत सभापती पोपट यांनी घोड्याकडे पाहिले. तसा घोडा खिंकाळत, समोरचे दोन्ही पाय उंचावून म्हणाला,
"गोमाता जे म्हणाली ते पटलय मला. मी तिने सांगितलेले सारे लक्षात ठेवीन आणि तसेच करेन म्हणजे सारखी शेपटी हलवून दुश्मनांना जवळ येऊच देणार नाही."
"किती छान! घोडेदादा, खुपच मस्त...." असे म्हणून पोपटरावांनी कुत्र्याकडे पाहून विचारले,
"इमानदार म्हणून ख्याती असलेले आणि आबालवृद्धांमध्ये मिसळणारे, लोकप्रिय असे आमचे मित्र कुत्रोजीराव, आपले काय मत आहे?"
"खरे सांगू का, माझ्यापेक्षा जास्त माझी काळजी घेणारी एक जात या भुतळावर आहे आणि ती म्हणजे मानव! भलेही त्यांच्यामध्ये भांडणे असतील, जाती-धर्म भेद असतील परंतु सारेच मला पोटच्या पोराप्रमाणे जपतात. म्हणून मी सतत खुश असतो, आनंदी असतो. नेहमीच आनंदाने, खुशीने, समाधानाने माझी शेपटी हलवत होतो, हलवतो आणि हलवत राहणार."
"अगदी बरोबर आहे. आपण इथे उपस्थित असलेल्यांपैकी माणसाच्या सदैव जवळ राहणारा प्राणी एकमेव तो म्हणजे कुत्रा. तसे माणसाच्या घरात प्रवेश करणारा अजून एक प्राणी इथे आहे. तो म्हणजे 'म्यांव म्यांव मनीताई'...मनीमाऊ, सांग बरे ..." राघू उर्फ पोपट म्हणाला. तशी मांजर सावधपणे इकडेतिकडे बघत ते म्हणतात ना मांजराच्या पावलाने पुढे येत असताना शेजारच्या तळ्यात विहार करणारा परंतु सभा सुरू झाल्यापासून तलावाच्या काठावरील पाण्यात बसलेला मासा म्हणाला,
"अग, अग, मनीमाऊ, एवढे का घाबरतेस? इथे कुणी माणूस नाही की तो तुझ्या पाठीवर काठी मारेल. बिनधास्त ये आणि बोल."
"मासेदादा, माणूस नसला तरीही हा कुत्रा आहे ना, लोचट. सारखे त्या माणसांच्या पुढे पुढे करतो, लाळ घोटत राहतो आणि मी दिसली की, माझ्यावर हल्ला करतो.." मांजरी बोलत असताना कुत्रा म्हणाला,
"मोठी सांगतेस आणि तू काय कमी आहेस ग, घरात कितीही माणसे असली तरीही सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकून बरोबर दुधावर डल्ला मारतेसच की आणि त्या बिचाऱ्या उंदरांना कस खेळवून खेळवून मारतेस...." कुत्र्याला मध्येच थांबवून पोपट म्हणाला,
"नाही. नाही. असे नाही. किमान आजतरी सर्वांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून आनंदाने गप्पा मारू. सांग, मनीमावशी, तू तर वाघाची मावशी. तुला कुणाला भ्यायची गरज नाही." पोपट म्हणाला आणि कुत्र्याकडे बघून खाकरत मांजरी पुढे येत म्हणाली,
"नाही. मला कुत्र्यासारखे शेपूट हलवता येत नाही. किंवा त्याच्यासारखं 'कुत्र्याचं शेपूट वाकडं' असे म्हणून मला कुणी हिणवत नाही. मला ना एखादे वेळी कुणाच्या घरात जाता आले नाही, दूध मिळाले नाही, उंदीर सापडला नाही ना मग मला येतो खूप राग. रागारागाने मी माझी शेपटी फुगवत जाते. ती माणसं नाही का राग आली की, दात खातात तशी मी आपली शेपटी फुगवते."
"राग व्यक्त करण्याची तुझी तऱ्हा जगावेगळीच आहे . ..." असे म्हणत सभापती पोपटाने खारीकडे पाहिले आणि म्हणाला,
"खारूताई, अग आता तू सांग, तू तुझ्या शेपटीचा कसा उपयोग करणार ते?"
"माझे काय पोपटराव, जीव माझा केवढासा? पण जेंव्हा पडते कडक थंडी तेंव्हा शेपटीचीच करते बंडी. शेपूट अशी अंगावर पांघरल्यासारखी केली ना थंडी जाते भुर्रर पळून...."
"चांगलाच उपयोग करतेस की शेपटीचा. अहो, वानरबाबा, आता तुमची पाळी, देऊनी टाळी सांगा बरे, शेपटीची काय गंमत निराळी." पोपटाने विचारताच 'हूप..हूप' करीत पुढे येत माकड शेपूट हलवत म्हणाले,
"कधी नेतो शेपूट वरती, कधी आणतो खालती. उड्या मारताना हाले शेपूट माझी भारी."
माकडाच्या उत्तरावर मान डोलवत सभापतींनी तळ्याच्या काठावर पाण्यात बसलेल्या माशाकडे बघत पोपटाने विचारले,
"तुमचे काम तर भलतेच भारी. पाणी तुमच्यासाठी जीव की प्राण. सांगा बरे, इवल्या इवल्या शेपटाचा तुम्हाला उपयोग काय?" तो प्रश्न ऐकून माशाने आनंदाने पाण्यात मारला सूर. काही क्षणात पुन्हा काठावरच्या पाण्यात येऊन म्हणाला,
"खरे आहे. पोपटराव, तुझे. पाणी माझा आत्मा आहे, श्वास आहे. पाण्याशिवाय एक क्षणभरही जगण्याची मी कल्पनाच करू शकत नाही. माणसांना किंवा इतर प्राण्यांना जसे हातपाय असतात त्याप्रमाणे शेपटी म्हणजे माझ्यासाठी दोन हात आणि दोन पाय. शेपटाच्या सहाय्याने पाण्याच्या प्रवाहात पोहत राहीन... शेवटपर्यंत पोहत राहीन."
"तसे पाहिले तर इतरांपेक्षा तुझे वेगळे आहे. काय म्हणतात ते तुझे जीवन तसे सीमित आहे पण तू ते आनंदाने ते स्वीकारले आहेस. तुझी सकारात्मकता, तुझी समाधानीवृत्ती वाखाणण्याजोगी आहे...." असे माशाबद्दल कौतुकोद्गार काढत सभापतींनी लगेच कांगारूकडे बघत विचारले,
"तुझे काय?" पोटावर असलेल्या पिशवीतील बालकाला थोपटत कांगारू हसत म्हणाले,
"माझे काय? हा हा हा माझी शेपूट म्हणजे माझा पाय...पाचवा पाय. ..."
"असे आहे तर..." असे म्हणत राघूने मोराकडे पाहिले पण पोपटरावांना बोलू न देता मोर स्वतः थुईथुई नाचत, रंगीबेरंगी पिसारा फुलवून म्हणाला,
"माझे पंख, माझा पिसारा हेच माझे सर्वस्व. पंखावरचे एक एक पीस फुलवत जाईन.त्या पिसांना धरून पावसाळ्यात मी नाचत जाईन. कसे वाटले?" मोराने विचारले.
"छान! छानच! शेपूट ही देवाने दिलेली देणगी आहे. देवाचा आशीर्वाद आहे. तिचा मान ठेवणे म्हणजे देवाचा सन्मान केल्यासारखे आहे. एक करा, आपापल्या शेपटीचा वापर करा. नाहीतर.."
असे म्हणत पोपटराव जमलेल्या सर्व प्राण्यांवर नजर फिरवत असताना मांजरीने घाईघाईने विचारले,
"नाहीतर? काय होईल?"
"तुला माहिती आहे का, पूर्वीच्या मानवांनाही शेपूट होती परंतु मानवाने त्याच्या शेपटीचा कधीच उपयोग केला नाही. आणि मग कालांतराने त्याची शेपूट झडून गेली. देवाने ती वापस घेतली. तुमचे तसे होऊ नये म्हणून शेपटीचा उपयोग करा. सर्वांना धन्यवाद। सर्वांचे आभार..." असे म्हणत सभापती पोपट यांनी सभा संपवली...
(ताजाकलम:- ही कथा आदरणीय ग. दि. माडगूळकर यांच्या बालकवितेवर अवलंबून असून नागेश शेवाळकर यांनी गदिमा यांच्या बालकवितांवर आधारित लिहिलेला बालकथासंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे.)

नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका फेज ०१
क्रांतिवीरनगर लेन ०२
जयमल्हार हॉटेलजवळ
थेरगाव, पुणे. ४११०३३
९४२३१३९०७१