८.
एकाचवेळी दोन ठिकाणी लक्ष ठेवता येणार नाही म्हणून मिस्टर वाघनं मिलींद हजारेला निशांत पुरोहितवर लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं.
"आणि तुमच्या माणसाला कामाला लावू नका! तुम्ही पर्सनली त्याच्या मागावर रहा!" मिस्टर वाघ हजारेला म्हणाला.
"पण का? इज ही अ परपेट्रेटर्?" हजारेनं विचारलं.
"कळेल लवकरच!" मिस्टर वाघ गंभीरपणे म्हणाला.
"आणि तुम्ही काय करणाराय?"
"दुसरं एक काम आहे!"
"मिस्टर वाघ! माझं जर काम झालं नाही, तर तुम्हाला खूप महागात पडेल एवढं ध्यानात ठेवा! तुम्ही काही काम करताय, असं मला तर वाटत नाही! आताही तुम्ही मलाच कामाला लावताय! एवढे पैसे तुम्ही घेतलेत ते कशासाठी?" हजारेनं मिस्टर वाघवर चिडून त्याला सुनावलं.
"तुम्हाला माझी वर्किंग प्रोसेस पटत नसेल, तर तसं सांगा. मी आत्ता ही केस सोडतो! पण पैसे रिफन्ड होणार नाहीत एवढं मात्र लक्षात ठेवा!"
"तुम्ही...!" हजारे भयंकर चिडला. पण त्याला मिस्टर वाघनं वाक्य पूर्ण करू दिलं नाही. म्हणाला,
"तुम्ही माझं काही बिघडवू शकत नाही! उलट मीच तुमच्या काळाबाजारीचा कच्चा चिठ्ठा तुमच्या सुपिरिअर्स समोर ठेऊ शकतो! त्यामुळं तोंड बंद ठेवायचं आणि सांगतोय ते करायचं!"
हजारेकडं यावर बोलण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. तो मूग गिळून गप्प बसला.
मिस्टर वाघनं यावेळी काही हिअरींग डिव्हाईस व स्पाय कॅम्स हजारेवर इम्प्लॉट केले.
"यामुळं आपण कनेक्टेड राहू आणि तुमच्या सोबत काय काय चालू आहे ते देखील मला कळत राहील. डोन्ट यू डेअर टू रिमुव्ह दीज्! आदर वाईज युअर फाईल विल बी इन सुपेरिटेन्डेन्से्स हँड्स!"
हजारेनं नाराजीनं नुसतीच मान हलवली!
"कपडे बदलले, की त्या कपड्यांवर देखील हे कॅरी करायचं!" मिस्टर वाघनं त्याला धमकी वजा ताकीद दिली.
"हो!" हजारे फक्त इतकंच म्हणाला आणि त्याच्या मिशनवर निघाला!
'आपण स्वतः कुऱ्हाडीवर पाय मारलाय!' असंच त्याला वाटत असणार याची मला खात्री आहे. (मला माहित आहे, मी पुन्हा पुन्हा हे रिपीट करतोय, पण हजारेची अवस्था मीच चांगल्या प्रकार समजू शकतो...)
"तुम्ही नुसत्या ब्लुटूथनं पण त्यांच्याशी कनेक्टेड् राहिलाच असता. मग ते रेडिओ डिव्हाइसेस तुम्ही त्याच्यावर का लावलेत?"
"मित्च्! तुझे प्रश्न काही संपत नाहीत! प्रत्येक गोष्ट तुला एक्स्प्लेन करावी लागते..."
"सांगा!" मी त्याला थांबवत म्हणलो.
"कारण तो काय करतोय, त्याच्या समोर काय होतंय ते मला जाणून घ्यायचं होतं, पण माझ्यासोबत काय होतंय, मी काय करतोय हे त्याला मला कळू द्यायचं नसतं. ब्लुटूथ वापरलं असतं, तर मी काय करतोय ते त्याला कळत गेलं असतं. एवढं सिम्पल आहे हे!" असं म्हणत त्यानं माझी अक्कल काढली.
तिकडं हजारे निशांतच्या घरावर पाळत ठेवण्यासाठी निघाला, तर इकडं मिस्टर वाघ मिथिलच्या मागावर गेला...
मिथिल रात्री बारा तीसला घराबाहेर पडला. एकटाच ड्राईव्ह करून तो कोठेतरी चालला होता. मिस्टर वाघही त्याच्या कस्टमाईज्ड '69 फोर्ड मस्टँग'नं त्याचा पाठलाग करू लागला.
मिथिलला फॉलो करत असताना त्यानं हजारेवर बसवलेली डिव्हाईसेस गाडीच्या स्क्रिनला ब्लुटूथ कनेक्टिव्हिटीनं जोडली (हॅकिंगची भीती नको म्हणून तो सहसा अशा कामात वायफाय वापरायचं टाळतो). आणि आता हजारे जे काही पाहत व ऐकत होता ते मिस्टर वाघ देखील त्याच्या गाडीच्या स्क्रिनवर पाहू आणि ऐकू शकत होता.
त्याला दिसत होतं, की एक गाडी येऊन एका माणसाला त्यातून बाहेर टाकण्यात आलं आणि ती गाडी निघून गेली. त्या व्यक्तीनं आपलं डोकं जोरात दाबून धरलं होतं. जणू असह्य वेदना त्याला होत आहेत. तो मानेला, डोक्याला जोरात झटके देऊ लागला. लडखडत पुढं जाऊन तो समोरील घराच्या दरवाजाला धडकला. आणि तो वाढत जाणाऱ्या वेदने पुढं हताश होऊन आपलं डोकं जोरजोरात त्या दरवाजावर आदळू लागला...
दरवाजाच्या आवाजानं आतून दरवाजा उघडला गेला. दरवाजा उघडणारा व्यक्ती कपड्यांवरून नोकर आहे ते दिसत होता. तो समोर येताच त्या व्यक्तीला काय झालं कोणास ठाऊक, पण एका जनावरा सारखा तो त्याच्यावर झपटला आणि त्यानं त्याला त्याच्याकडील चाकूनं मारून टाकलं. त्या नोकराला बाजूला फेकून मग ती व्यक्ती घरात शिरली. कदाचित त्याला होणाऱ्या वेदना चालूच असाव्यात. कारण तो रक्तानं माखलेल्या हातानं डोकं दाबून धरून लडखडत आत गेला होता...
हे सगळं पाहून हजारे। इतका सुन्न झाला होता, की काय करावं हे अचानक घडलेल्या या घटनेनं त्याला उमगलंच नव्हतं. त्यामुळं त्या नोकराला वाचवायला तो पुढं झाला नव्हता.
पण आता मात्र तो सावरला. आणि त्या घरात शिरला.
आत, तो पाहत होता, की एक स्त्री खाली रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे आणि त्या व्यक्तीनं निशांतला पकडून त्याच्या मानेवर चाकू ठेवला आहे आणि तो असबद्ध काही तरी बडबडत आहे...
"नो लेफ्टनंट! नो! आय विल नॉट लेट यू टू डू दॅट! नो... डाय! यू डिजर्व थिस लेफ्टनंट!..."
हे पाहून हजारेची भंबेरीच उडाली होती. तसा तो घाबरट नव्हता. पण सगळं कसं अनपेक्षितच त्याच्या समोर घडत होतं. त्यामुळं तो जरा गोंधळला होता. तरी त्यानं हिंमत करून त्याची पिस्टल बाहेर काढली होती!
"स्टॉप अँड लिव्ह हिम!" त्यानं त्या व्यक्तीला ऑर्डर दिली.
पण त्या व्यक्तीनं काही न ऐकता निशांतचा गळा चिरला. हे पाहून हजारेनं त्या व्यक्तीवर गोळी चालवली...
......................................…...……………......................................................................................
गोळी लागल्यानं; का तिच्या आवाजानं कळलं नाही, पण ती व्यक्ती खाली कोसळली आणि अचानकच भीषण शांतता पसरली...
सगळं संपलं होतं. कदाचित; तात्पुरतं... पण तितकंही थोडं नव्हतं... मिस्टर वाघनं स्क्रिन वरून नजर हटवली. त्याच्या लक्षात आलं, की मिथिलची गाडी स्लो झाली होती. आणि ती थोडं अंतर जाऊन एका मोडकळीस आलेल्या बिल्डिंग बाहेर थांबली होती.
मिस्टर वाघनं जरा दूरच आपली गाडी उभी केली. जेणे करून मिथिलला संशय येऊ नये. आत काय चालू आहे हे तो त्याच्या गाडीत बसून बघत-ऐकत होता...
"एक मिनिट!" मी मिस्टर वाघला मध्येच थांबलं.
"तूझे वाचक तुझ्यावर वैतागत असतील नाही? तू इंटरेस्टिंग प्लॉट आला की थांबवतोस! तुझ्या संपादकांकडं खूप तक्रारी येत असतील तुझ्या." तो मला चिडवण्यासाठी बोलला.
"नाही त्यांना मी लिहिलेलं आवडतं! आणि मी फ्रीलान्स काम करतो!" मी त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला.
"बरं बोल. काय अडकलंय?" त्यानं मला शंका विचारायला परवानगी दिली.
"तुम्ही मिथिलवर कधी कॅमेरा आणि रेडिओ इंप्लान्ट केलात?"
माझ्या प्रश्नावर तो काही बोलला नाही. फक्त त्यानं त्याचा स्मार्ट टीव्ही ऑन केला. त्या टीव्हीवर मला मी आणि मिस्टर वाघ समोरासमोर बसलेले दिसत होतो.
"तुझ्यासमोर काही घोगावतंय का?"
मिस्टर वाघनं असं विचारल्यावर मला जाणवलं, की खरंच माझ्या डोळ्यासमोर काही तरी घोंगावत होतं. मी त्यावर फोकस केलं. एक मधमाशी माझ्या समोर घोंगावत होती. ती जशी माझ्या दिशेनं उडत आली, तसा माझा चेहरा टीव्हीवर मोठा होऊ लागला. मी हात पुढं केला आणि ती मधमाशी माझ्या तळहातावर बसली. मी त्याला जवळून पाहिलं, तर ती पूर्णपणे मेटॅलिक होती.
म्हणजे, ती मधमाशी, खरं तर एक टायनी कॅमेरा होता.
'स्ट्रेंथन इंटरनॅशनल्स' ही कंपनी माझ्यासाठी अशी डिव्हाइसेस बनवते.
"स्ट्रेंथन इंटरनॅशनल्स तर सरकारसाठी काम करते. मग तुम्हाला कसं...?"
"मी त्यांचा शेअर होल्डर आहे. मी इन्वेस्टीगेटर असल्यानं टेस्टिंगसाठी ही मला पुरवली जातात."
'म्हणजे त्यांना माहीत असतील तुमचे उद्योग?' असं मला विचारायचं होतं, पण मी खूप सौम्य शब्दात विचारलं, की -
"मग त्यांना तुम्ही काय करता ते माहीत असेल?"
माझ्या प्रश्नावर तो हसला. म्हणाला,
"नाही! कारण त्यांनी काही जरी मला टेस्टिंगसाठी दिलं, तर आधी मी ते मॉडीफाय करतो."
"तुम्ही त्याच्या उपकरणाशी छेडछाड करता हे त्यांना समजत नाही?" मी परत शंका विचारली.
"ही डिव्हाइसेस माझ्यासाठीच बनवलेली असतात. त्यामुळं एकदा का मी त्यांना रिपोर्ट दिला, की त्यानंतर मी यांच्याशी काय करतो याचा ते फार विचार करत नाहीत. अनलेस जोपर्यंत याचा चुकीचा वापर होत नाही. शिवाय गोपनियतेच्या नावाखाली मी त्यांना मला कधी ट्रॅक न करण्याची ताकीद दिली आहे! म्हणून काही जरी छेडछाड केली तरी ते लोक ऑब्जेक्शन घेत नाहीत!"
"पण कशावरून त्यांनी तुमची माहिती ठेवली नसेल? नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत ती कंपनी खूपच कटिबद्ध आहे असं मी ऐकलंय!"
"हो बरोबराय तुझं. म्हणूनच एक दिवस मी त्यांचा सगळा डेटाबेस चेक केला होता. माझी कोणतीच माहिती त्यांच्याकडं नसल्याचं मला दिसून आलं. आपली मॉरल्स सांभाळणारी कंपनी आहे ती! त्यामुळं त्या बाबतीत मी निर्धास्त आहे!"
गाडीतील स्क्रिनवर मिस्टर वाघ पाहत होता, की सहा लोकांची 'गोलमेज परिषद' भरली होती. त्यांतील एकाला हार्टचा त्रास असावा, कारण तो पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन होता आणि ऑक्सिजन मास्क त्यानं तोंडाला घातला होता. ते बोलत होते... खरं तर मिथिलच बोलत होता,
"नाऊ वी आर रेडी टू प्रोड्युस द नर्व गॅस यू वॉन्ट. विदाऊट एनी हर्डल्स. आवर पाथ इज नाऊ इजी अँड क्लिअर! अँड फॉर दॅट, आय अल्सो रजिस्टर्ड् अ पेस्टीसाईड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. सो वी कॅन प्रोड्युस दि नर्व एजंट्स ऍट व्हेरी लार्ज अमाऊंट अँड नोवन विल नो दॅट एवर!"
("तुम्हाला जो नर्व गॅस हवाय त्याची निर्मिती लवकरच सुरू होईल. कोणत्याही अडथळ्यांशिवाय. आपली वाट आता सोपी आणि मोकळी झाली आहे. त्यासाठी मी एका पेस्टीसाईड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं आहे. या कंपनी अंतर्गत आपण खूप मोठ्या प्रमाणात नर्व एजंट्स तयार करू शकतो. आणि कोणाला संशयही येणार नाही!")
मिथिलचं हे बोलणं ऐकताच मिस्टर वाघ गाडीतून खाली उतरला आणि त्या बिल्डिंगच्या एंटरन्सपाशी गेला.
तेव्हा त्याला बाहेरच थांबवण्यात आलं. पण मिस्टर वाघनं त्या व्यक्तीची कम्प्रेसर लावलेली 'ग्लॉक सेवेन्टीन' सेमी ऑटोमॅटिक पिस्टल हिसकावून घेऊन त्याला अडवणाऱ्या व्यक्तीला तिच्याच गननं गोळी मारली.
अगदी पॉईंट ब्लॅन्क! गनला कम्प्रेसर असून देखील आवाज झालाच.
(मला आठवतंय एकदा मी मिस्टर वाघला विचारलं होतं, की "फिल्म्स मध्ये गन्सना सायलेन्सर लावलेलं दाखवतात. तर त्यानं खरंच आवाज थांबतो?"
यावर तो मोठ्यानं हसला होता. त्यानं सांगितलं, की "देअर इज नॉट सच थिंग लाईक सायलेन्सर. गन्सना आवाज कमी करण्यासाठी जे लावतात, त्याला कम्प्रेसर म्हणतात. पण ते असूनही गन्स चालवली की बऱ्यापैकी आवाज होतोच!")
यामुळं मिस्टर वाघनं त्या व्यक्तीवर गन चालवल्यावर आतील लोकांना त्याचा आवाज नक्कीच ऐकू गेला असणार आणि ते सावध देखील झाले असणार हे नक्की!
पण मिस्टर वाघनं त्यांना बाहेर येण्याची संधीच दिली नाही. त्यानं एक स्मोक बॉम्ब रिलीज करून आत सोडला आणि दार बाहेरून लावून घेतलं. आणि आपली मस्टँग घेऊन ती जागा त्यानं सोडली...