Paris - 8 in Marathi Travel stories by Aniket Samudra books and stories PDF | पॅरिस - ८

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

पॅरिस - ८

१० मे, २०१८

कालचा एकूण गोंधळ निस्तरून झोपेस्तोवर दीड वाजून गेला होता. त्यामुळे अर्थातच सकाळी उठायला जाम जिवावर आले होते. वातावरण आज चांगलेच गार होते, साधारण ४ डिग्री तरी असावे आणि त्यात इथे वाहणारे गार वारे अजूनच झोंबत होते. वाटत होतं, सगळे प्लॅन्स रद्द करुन परत झोपून जावं.

स्वातीताईंच्या प्लॅन नुसार आजची सकाळ आम्ही पॅरिसमधल्या कॅनल्स वरील एका क्रूज राईडला जाणार होतो, अर्थात हि राईड नेहमीसारखी नसून वेगळीच आहे, काय ते तेथे गेल्यावरच तुम्हाला कळेल असं सांगून तिने आमची आमचा उत्सुकता आधीच वाढवलेली होती, शिवाय तिकिटं हि काढलेली असल्याने उठून पटापट आवरले, ब्रेकफास्ट उरकला आणि बाहेर पडलो.

सेंट मार्टिन कॅनाल क्रूझ

साधारण २.३० तासाच्या ह्या राईडची सुरुवात होते तीच मुळी जमिनीखालच्या टनेल्स मधुन. सर्वत्र अंधार आणि मधूनच काही ठिकाणी प्रकाशाकरता वरती जमिनीला खोदलेल्या मोठ्या खिडक्यांमधून येणाऱ्या प्रकाशामुळे मस्तच वातावरण निर्मिती झाली होती. पाण्याला आलेला गर्द हिरवा रंग एकूणच त्या प्रसंगाला एक गूढतेचे वलय प्राप्त करत होता. लगेच क्रूझला असलेल्या स्पीकर्समधून कमेंटरी सुरु झाली, अर्थात ती फ्रेंच मध्ये असल्याने समजत काहीच नव्हते.

साधारण १५-२० मिनिटं त्या टनेल्स मधून प्रवास करून आमची क्रूज जमिनीवर आली आणि काही मिनिटांमध्येच ह्या राईडचा वेगळेपणा आमच्या लक्षात आला. आमच्या समोर एक भव्य लोखंडी गेट होते

नक्की काय होणार आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती. थोड्यावेळाने ते गेट हळू हळू उघडू लागले तसे त्या फटींमधून वेगाने पाण्याचा प्रवाह सुरु झाला. जस-जसं ते गेट उघडायला लागले तस पाण्याचा वेगही वाढला आणि थोड्याच वेळात आमच्या लक्षात आलं कि त्या वाढलेल्या पाण्यामुळे आमची बोट हळू हळू वर उचलली जात होती. जेंव्हा ते गेट पूर्णपणे उघडले गेले तेंव्हा लक्षात आलं काय प्रकार आहे ते.

हा कॅनाल जणू लांबच्या लांब पायऱ्याच होत्या. क्रूजचा प्रवास सर्वात खालच्या लेव्हलने सुरु होतो. समोरचे गेट उघडले गेले कि त्यातून आलेल्या पाण्यामुळे खालच्या पायरीवर असलेली बोट समोरच्या पायरीच्या उंचीच्या बरोबर येते आणि मग त्या गेटमधून पुढे सरकते. असे कमीत कमी ८-१० गेट्स पुढे आम्हाला लागले. आजूबाजूला गर्द झाडी, ज्यातील कित्तेक झाडं शंभरवर्षाहून पूर्वीची होती. कॅनाल ला लागून असलेल्या इमारतीही काही शतक पूर्वीच्या असूनही अगदी मस्त शाबूत होत्या. त्या गावांमधील जीवनमान बघून खूपच छान वाटत होतं. आजूबाजूच्या बागा म्हातारे-कोतारे आणि लहानग्यांच्या बागडण्याने भरून वाहत होत्या, टिनेजर्स सायकलिंग, जॉगिंग, स्केटिंग करण्यात मग्न होती, तर तरुण जोडपी उन्हात अंथरून टाकून मस्त सन-बाथ घेत पहुडलेली होती. असं वाटत होतं, "काय मस्त लाईफ आहे यार इथलं"

समोरच गेट उघडून पाणी यायला लागायचे तसे त्या थंड पाण्याचे तुषार अंगावर उडत होते, आधीच आम्ही थंडीने काकडून गेलो होतो, त्यात हे थंड पाणी अजूनच भर घालत होते. साधारणपणे ३ तासाचा प्रवास करून शेवटी आम्ही किनाऱ्याला लागलो

दुपारनंतरचा प्लॅन आयफेल-टॉवर ला जायचा होता. अंधार पडल्यावर पूर्ण आयफेल-टॉवर दिव्यांनी उजळून निघतो त्यामुळे दिवसा उजेडाचा आणि रात्रीचाही आयफेल बघता येईल ह्या उद्देशाने तेथे पोहोचण्याचं ठरवलं होतं. साधारण ९.३० पर्यंत व्यवस्थीत ऊन असते आणि नंतर मात्र एकदम पटापट अंधार पडतो, त्यामुळे साधारणपणे ८ ला तिथे पोहोचु असे ठरले.

हातात भरपूर वेळ होता. मग तिथल्याच एका विस्तीर्ण बागेत शिरलो. थंडी प्रचंड असल्याने भर दुपारचे ऊनही कोवळे भासत होते. भूक प्रचंड लागली होती. बरोबर बरंच काय काय आणलेले होते, ते हादडले, तिथेच आईस्क्रीम्स खाल्ली आणि मग त्या हिरवळीवर स्वतःला झोकून दिले.

सहज आजूबाजूला नजर फिरवली, अनेक कुटूंब उन्हाचा आनंद घ्यायला आलेली दिसत होती. काही काही तर अगदी ३-४ पिढ्या एकत्र दिसत होत्या. इथे भारतात राहून आपण उगाचच आपली संस्कृती, आपली कुटुंब पद्धतीचं गोडवे गातो का असं वाटून गेलं. बारकी बारकी पोरं बॉल्सच्या मागे धावण्यात मग्न होती तर नुकतीच मिसरूड फुटलेले स्केटिंग बोर्डवर विविध स्टंट्स करण्यात मग्न होते. आमच्या मागे नुकत्याच बहुदा लांब पल्ल्याचा सायकलिंग करून आलेल्या ४-५ तरुणी खिदळत होत्या. एकूणच वातावरण एनर्जेटिक होते.

पलीकडे दोन अर्धनग्न तरुणी उन्हात टॉपलेस पहुडल्या होत्या, केवळ एक रुमाल टाकून त्यांनी आपले उरोज झाकले होते. तर त्याच्याच शेजारी १०-१२ किशोरवयीन मुलं गप्पा मारत आपल्याच मस्तीत होते. त्या एका तासात त्यांच्यापैकी कुणीही त्या तरुणींकडे ढूंकूनही बघितले नाही, किंवा काही टिप्पणी केली नाही. मस्त रेकॉर्डवर गाणी लावून, खाणं -पिणं करत एकमेकांशी मस्ती करण्यात ते मग्न होते.

थोडा वेळ टाईमपास करून मग निघालो आयफेल-टॉवर कडे.

ह्यावेळी त्या भूमिगत मेट्रोने जाण्यापेक्षा ट्रामचा पर्याय आम्ही निवडला. काहीसा कंट्रीसाईड असलेला हा भागही सुंदरच होता. छोटासा रस्ता, कडेनी बसकी पण आकर्षक घर. विविधरंगी फुलांनी लगडलेल्या त्याच्या बाल्कनी बघायला छान वाटत होते. ट्रामला गर्दी मजबूत होती, एकूण लोकही परिसमधली सोफिस्टिकेटेड क्लास पेक्षा कामगार वर्गातली वाटत होती.

मागच्याच आठवड्यात बायकोचा भाऊ पॅरिसमध्ये होता आणि डिस्नेलँडच्या इथूनच त्यांची ३००० युरो असलेली बॅग चोरीला गेली होती, पासपोर्ट्स दुसऱ्या बॅगेत असल्याने नशिबाने वाचले. इन-जनरलच युरोपमध्ये चोऱ्या-माऱ्या खूप होतात ऐकून होतो. एकमेकांना खाणाखुणा करुन बरोबरच्या पर्स, बॅगा, खिसे सांभाळण्याचं सुचवले.

१५-२० मिनिटांतच आम्ही टूर-आयफेल स्टेशन ला पोहोचलो. आनंदाने मन उचंबळत होते. जे चित्र आजवर फक्त वह्यांचा कव्हर्सवर, चित्रांमध्ये, टिव्हीवरच बघितले ते आज प्रत्यक्षात समोर अवतरणार होते. स्टेशनमधून बाहेर आलो, २-४ मोठ्या इमारतींना ओलांडले आणि समोर 'तो' होता. भव्य, चॉकलेटी रंगाचा, निळ्या आकाशावर उठून दिसणारा, सूर्याच्या सोनेरी किरणांनी चकाकणारा 'आयफेल-टॉवर'.

'आयफेल-टॉवर'चा इतिहास तसा सर्वन्यात आहे, सो त्याबद्दल नाही लिहीत, पण एक गोष्ट मात्र आवर्जून लिहावीशी वाटते ते म्हणजे, जेंव्हा 'आयफेल-टॉवर' चा आराखडा तयार करण्यात आला आणि जेंव्हा त्याचे बांधकाम सुरूच होत होते, तेंव्हा फ्रान्स मधील अनेक पुरोगामी, तत्त्ववेत्ते, थोर-मोठ्या लोकांनी त्याला विरोध केला होता. असली घाणेरडी वास्तू आपल्या सुंदर पॅरिस शहरात नको म्हणून धिक्कारले होते. 'आयफेल-टॉवर' ची काळी सावली आपल्या पॅरिसवर पडून त्याला विद्रुप बनवेल असाच सूर सगळ्यांनी लावला होता. पण नशिबाने त्यावेळच्या सरकारने ह्या मागण्यांना भीक घातली नाही आणि आज ह्याच 'आयफेल-टॉवर' ने पॅरिसला वेगळी ओळख मिळवून दिली, जगातल्या ७ आश्चर्यांमध्ये तो गणला गेला, कित्तेक प्रवाशांना त्याची भूरळ पडली आणि इतक्या वर्षांनंतर आजही ती कायम आहे. आजही कित्तेक जोडपी एकमेकांना प्रपोज करण्यासाठी 'आयफेल-टॉवर' चीच स्वप्न बघतात.

तसं म्हणलं तर खरंच काय आहे त्या 'आयफेल-टॉवर' मध्ये? साधा धातूचा उंचच उंच सांगाडा तो. पण खरं सांगायचं तर त्याच्या सौंदर्याला न्याय देऊ शकेल असा अजून तरी कुठला फोटो माझ्या पाहण्यात आलेला नाही. जेंव्हा त्याच्यासमोर आपण उभं राहतो आणि 'आयफेल-टॉवर' आपल्या नजरेत सामावून घेण्याचा प्रयत्न करतो, तेंव्हाचा तो अनुभव शब्दात व्यक्त करता येणं केवळ अशक्य आहे. कित्ती तरी वेळ आम्ही स्तिमित होऊन जागेवरच उभं होतो.

एकाबाजूला सेन नदीचे मोठ्ठे पात्र होते, तर दुसऱ्या बाजूला चॅम्प्स-दे-मार्सची विशाल हिरवीगार बाग.

'आयफेल-टॉवर'चे किती फोटो काढले असतील त्याला काही गिणतीच नाही, पण कुठलाच फोटो मला आवडत नव्हता. माझ्यातला फोटोग्राफर त्यावेळी चक्क हरला होता.

संध्याकाळचे ९.३० होऊन गेले आणि सूर्य मावळतीला झुकू लागला. 'आयफेल-टॉवर' वर जायला बऱ्यापैकी गर्दी होती, पण आमच्यापैकी कुणालाच वरती जाण्यात उत्साह नव्हता. 'आयफेल-टॉवर'च्या समोरच एक मोठ्ठे म्युझियम आहे त्याच्या पायऱ्यांवर बसून 'आयफेल-टॉवर'चा व्हू खूपच मस्त दिसतो, आम्ही तिकडेच निघालो.

रस्ता ओलांडायला थांबलो होतो तेंव्हा ४-५ फेरारी आणि पोर्शे बुंगाट आवाज करत तेथून गेल्या. नुकतेच लग्न झालेले कपल खिडकीतून अर्ध बाहेर येऊन बोंबलत होते. प्रश्नच नाही, त्यांच्या आनंदाला पारावर नसणारच.. पैसा रे पैसे!!

एका ठिकाणी थांबून सेल्फी स्टिकच्या वापराने आम्ही 'आयफेल-टॉवर'च्या समोर उभे राहून फोटो काढायचा प्रयत्न करत होतो, पण म्हणावा तसा फोटो येत नव्हता, इतक्यात एक तरुण स्वतःहून पुढे आला, बहुदा तिथलाच राहणार असावा. स्मित हास्य करून त्याने आमच्याकडून स्वतःहून कॅमेरा घेतला आणि ढीगभर फोटो काढून दिले.

सूर्य एव्हाना मावळला होता, पण लायटिंग सुरु व्हायला वेळ होता. हळू हळू गर्दी जमु लागली होती. बरोब्बर १०.३० वाजता दिवे लागले आणि दर १५ मिनिटांनी ते प्रखर प्रकाशाने चमचम करायचे . ते दृश्यही खरोखरच लाजबाब होते. वर्थ-द-वेट.

तासभर तेथे थांबून निघालो, शेवटी, शेवटची मेट्रो पकडायची होती. हवेत प्रचंडच गारठा होता. खास आयफेलसमोर घालायचे म्हणून वेगळी शॉपिंग करून कपडे न्हेले होते, पण निम्मे फोटो जाड जॅकेट्स आणि स्वेटर्समध्येच काढावे लागले.

संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात चकाकणारा आयफेल आणि रात्रीच्या अंधारात १५ मिनिटांनी लक्ष लक्ष दिव्यांनी चमचमणारा आयफेल मनःपटलावर कायमचा कोरला गेला होता.

[क्रमशः]