Swargatil sahitya sammelan in Marathi Comedy stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | स्वर्गातील साहित्य संमेलन

Featured Books
Categories
Share

स्वर्गातील साहित्य संमेलन

* स्वर्गातील साहित्य संमेलन! *
अखिल भारतीय मराठी साहित्य महानमंडळाची ती भव्यदिव्य इमारत! एखाद्या देशातील सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीला नसेल अशा त्या सुसज्ज इमारतीच्या एका मनमोहक दालनात महानमंडळाची सभा सुरू होती. अध्यक्ष ठोके पाटील आसनस्थ झाले. सचिवांनी रीतसर सभेचे कामकाज चालू केले. महानमंडळाच्या अध्यक्षांचा दर्जा पंतप्रधानांच्या बरोबरीचा असला तरीही अध्यक्षांना पंतप्रधानापेक्षा काकणभर अधिक सवलती होत्या. सोबतच महानमंडळाच्या प्रत्येक सभासदाला केंद्रीय मंत्र्याचा दर्जा होता. गत् दोन दशकांपासून अधिक वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने ही अभाषिक मराठी प्रदेशात आणि त्यातही परदेशात होत होती. संमेलनाचे यजमानपद मिळवण्यासाठी अनेक देशांची निमंत्रणे येत असत. संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी मंडळाची जी बैठक होत असे त्या बैठकीत अक्षरशः लिलाव होत असे. अब्जावधी डॉलर्स महानमंडळाच्या सदस्यांच्या तिजोरीत जमा होत असत. विदेशी चलन मिळवून देण्यासाठी मराठी साहित्य संमेलने सहाय्यभूत ठरू लागली. त्यामुळे मराठी भाषेचे वजन परदेशातही वाढले. परदेशी उच्च पदस्थ अधिकारी वा पदाधिकारी भारतात आले की, हमखास महानमंडळाच्या अध्यक्षांची भेट घेत असत.
"लेडीज अँड जंटलमन..." महानमंडळाच्या सचिवांनी इंग्रजीतून बोलायला सुरुवात केली. भाग्य, सुदैव-दुर्दैव या विचारात कुणी पडू नये कारण साहित्य महानमंडळ हे मराठी भाषेचे असले तरीही सचिव हे विदेशी असल्यामुळे त्यांचा मराठी भाषेशी दुरान्वये संबंध नव्हता.
"आजच्या सभेत मी आपले स्वागत करीत आहे. सभेपुढे असलेला पहिला विषय म्हणजे..."
"गत् वर्षी वेस्टइंडीजमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचा हिशोब तयार झाला का?" एका सदस्याने विचारले.
"अहो, महामानव झोपेत आहात काय? एवढ्या लवकर हिशोब तयार करायला का हे देशाचे अर्थखाते आहे का?"
"बघा तर. गेल्या वर्षीचे काय घेऊन बसलाय राव? पंचवीस वर्षांपूर्वी परदेशात झालेल्या म्हणजे विदेशी भूमीवर झालेल्या पहिल्या संमेलनाचा हिशोब आजही 'वाँटेड' आहे."
"मिळेल. मिळेल. पाई न पाईचा हिशोब मिळेल. सब्र का फल मिठा होता है। "
"सब्र का बांध टूट रहा है। फल जैसे कडू हो रहा है। असं नासकं फळ गोड कसं लागणार?"
"सन्माननीय सदस्यांनी शांती ठेवावी..."
"शांती केव्हाच हद्दपार झालीय. आजकाल कुणी आपल्या मुलीचे नावही शांती ठेवत नाही..."
"तेव्हा ठेवायला कुठून आणावी?"
"अब्जावधी रुपयांचा माल अध्यक्ष आणि सचिव यांनी हडप केलाय."
"हडप? सारेच का धुतल्याप्रमाणे आहेत का? कशाला आमची तोंडं उघडता?"
"वा रे वा! तुमची तोंडं उघडली म्हणून का तुम्ही खरे सांगणार आहात?"
"अहो, चोरकर साहेब, तीन वर्षांपूर्वी तुम्ही परदेशात संमेलनासाठी जायचे म्हणून दोन कोटींचा ऍडव्हान्स उचलला आहे. दिला का त्याचा हिशोब? ते जाऊ द्या. पण तुम्ही संमेलनाला तरी गेला होता काय?"
"आणि पदरमोडे, तुमचा सात पिढ्यांचा ... सॉरी! सात परदेश वाऱ्यांचा हिशोब केव्हा देणार?"
"जाऊ द्या. आपण सारे एकाच माळेचे मणी. ताटात पडले काय नि वाटीत पडले काय?"
"तुम्ही खाऊन पचवायचं आणि आम्ही ढेकर द्यायचा."
"व्हेरी राईट! टेक, सेक्रेटरी, टेक द आगे का सब्जेक्ट..."
"या वर्षीच्या संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी..."
"कुठून कुठून प्रस्ताव आले आहेत?"
"उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, झारखंड..." सचिव सांगत असताना एका सदस्याने विचारले,
"महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या संस्थांनी प्रस्ताव दाखल केले आहेत?"
"नाही. एकही नाही."
"कम्माल आहे. मराठी भाषेचा सार्थ अभिमान असणाऱ्या, मराठी बोलीभाषा असणाऱ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अध्यक्ष प्रतिनिधित्व करीत असलेल्या महाराष्ट्रातून याच वर्षी नाही तर गेली अनेक वर्षे प्रस्ताव आलेला नाही. आश्चर्यकारक गोष्ट आहे ना? "
"त्यात कसले आलेय आश्चर्य? आपण जे पेरलय तेच भरभरून उगवतय."
"होय. आपल्या मराठी महानमंडळात शंभर सदस्य आहेत. एकटे अध्यक्ष तेवढेच महाराष्ट्रीयन आहेत."
"खोटे! साफ खोटे! ठोके पाटील महाराष्ट्रीयन तर सोडा पण भारतीयही नाही आहेत..." आपण फार मोठा गौप्यस्फोट करीत आहोत अशा अविर्भावात एक जण म्हणाला.
"क..क..काय? मी भारतीय नाही? काय बोलताय तुम्ही?" ठोके पाटील आश्चर्याने विचारले.
"होय. खरे तेच बोलतोय. तुम्ही इटालियन नागरिकत्व स्वीकारलय."
"काय म्हणता?" अनेक सदस्यांनी एका आवाजात विचारले
"हो. अध्यक्ष इटालियन आहेत. दोन वर्षांपूर्वी इटालीत मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्यावेळी ठोके पाटलांनी इटालीचे नागरिकत्व स्वीकारले आहे."
"होय. स्वीकारलय. पण मी ते मागितले नव्हते. माझे साहित्य विषयक कार्य, माझी वागणूक पाहून तिथल्या सरकारने मला ते बहाल केले आहे. त्यात चोरीछुपी, लपवाछपवी काही नाही."
"ते ठीक आहे. पण आपल्या अखिल भारतीय साहित्य महानमंडळाच्या नियमानुसार केवळ मराठी माणुसच अध्यक्ष राहू शकतो. तेंव्हा ठोके पाटलांनी स्वखुशीने, सन्मानाने अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यातच त्यांचे आणि महानमंडळाचे हित आहे."
"थांबा. मला इटालियन नागरिकत्व मिळाले असले तरीही मी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेला नाही. मी आजही महाराष्ट्रीयन नागरिक या नात्याने मराठी माणूस आहे. हा घ्या पुरावा..."
"तुम्ही इटालियन महिलेशी विवाह केलाय."
"हो केलाय. पण ती मुळची भारतीय आहे. तिथे फक्त नोकरी करतेय. हा त्याचा पुरावा."
"तुम्ही इंग्लंडचेही जावाई आहात."
"मी ते लपवलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे तिला भारत सरकारने नागरिक म्हणून स्वीकारले आहे. हा त्याचाही पुरावा."
"एकापेक्षा जास्त लग्न केलेल्या माणसाला मराठी साहित्य महानमंडळाच्या अध्यक्षपदी राहता येते का ?"
"सेक्रेटरी, नियम तपासा."
"ती पडताळणी करण्यासाठी एक समिती नेमू या."
"काही नको. ती समिती भरपूर वेळ लावेल आणि पैसाही भरपूर खाईल."
"शिवाय ठोके पाटील साम, दाम, दंड, भेद असे विविध अस्त्रे वापरून त्या समितीकडून त्यांना हवा तसा अहवाल तयार करून घेतील."
"हे बघा, दोन वर्षांपूर्वी आपणच घेतलेल्या निर्णयाची प्रत?" अध्यक्षांनी एक कागद पुढे ठेवला.
"काय आहे त्यात?" काही सदस्यांनी विचारले
"महानमंडळाच्या अध्यक्षांना लग्नसंख्येची अट नाही. या ठरावानुसार आपल्या मंडळाचा अध्यक्ष कितीही लग्नं करु शकतो."
"म्हणजे तुम्हाला आय मीन या खुर्चीवर बसणाऱ्या अध्यक्षांना कितीही विवाह करता येतात?"
"हा ठराव केव्हा झाला? कसा झाला? कुणी संमती दिली?"
"शांत व्हा. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत आपण महानमंडळाचा कालावधी पाच वर्षांवरुन पंचवीस वर्षे करून घेतला होता. आठवते?"
"हळू बोला. सर्व सभासद सह्या करून निघून गेल्यानंतर आपण आपल्या फायद्याचा तो ठराव घुसविला होता."
"बरोबर. अनैतिक मार्गाने तो ठराव घेता येतो तर मग हा ठराव का घुसवता येऊ नये?"
"हा-हा विश्वासघात आहे. आम्ही अध्यक्षांवर अविश्वास आणू."
"नाही. तुम्हाला तसे करता येणार नाही." ठोके पाटील अत्यंत आत्मविश्वासाने आणि ठामपणे म्हणाले.
"का? का? तो आमचा हक्क आहे."
"काही हक्क वगैरे नाही कारण ज्या ठरावाद्वारे महानमंडळाचा कार्यकाळ पंचवीस वर्षे केला त्याखालीच एक तळटीप, ताजाकलम प्रमाणे एक ठराव घेतलेला आहे."
"कोणता ठराव?"
"ज्या दिवशी हा ठराव मान्य झालाय त्यादिवशी कार्यरत असलेला अध्यक्ष अर्थात मी ठोके पाटील पंचवीस वर्षे अध्यक्ष म्हणून राहणार. नो चेंज! नो अविश्वास! एनी प्रॉब्लेम?"
"हा तर चक्क धोका आहे. तुम्ही आम्हाला दगा दिलाय."
"धोका, दगा देण्याचा ठेका काय फक्त सन्माननीय सदस्यांनीच घेतलाय का? आफ्टर ऑल मी या महानमंडळाचा अध्यक्ष आहे." ठोके पाटील छद्मी हास्य करत म्हणाले
"समजा, उद्या तुमचे काही बरेवाईट झाले तर?"
"माझा मुलगा या खुर्चीवर बसेल."
"पण तो महानमंडळाचा सदस्य नाही आणि माझ्या माहितीनुसार तो लेखकही नाही."
"तो सभासद झाला असल्याची ही पावती. रीतसर फी भरलीय त्याने. आता राहिला प्रश्न तो लेखक आहे किंवा नाही हा. सदस्य लेखक आहेत किंवा नाहीत, त्यांच्या नावावर पुस्तक आहे किंवा नाही हा प्रश्न ऐरणीवर आलाच तर आपल्यापैकी सर्वांनाच खुर्च्या रिकाम्या कराव्या लागतील. कारण सन्माननीय सदस्यांपैकी एकाही सदस्याच्या नावावर पुस्तक तर सोडा पण साधी चार ओळींची चावटीकाही नाही."
"कोण म्हणते?हे बघा माझे हे जाडजुड पुस्तक."
"कशाला झाकली मुठ उघडता राव? सर्वांना माहिती आहे, ते पुस्तक म्हणजे कुणी तरी व्यक्तीने महानमंडळाकडे अनुदान मिळावे या हेतूने पाठवले होते परंतु दुर्दैवाने तो मयत झाला आणि मड्याच्या टाळूवरचे लोणी खावे त्याप्रमाणे तुम्ही त्या मयत लेखकाचे पुस्तक स्वतःच्या नावावर छापून घेऊन राज्य सरकारचा पुरस्कारही मिळविलात."
"जाऊ द्या ना. खा, तुम्हीच खा. काय खायचे ते खा."
"मी एकटाच नाही खात बरे. 'आओ चोरो, बाँधो भारा, आधा मेरा, आधा तुम्हारा!' हे आपले अलिखित ब्रीद आहे. त्याप्रमाणे आपण सारे इमानेइतबारे काम करतोय."
"घ्या, सेक्रेटरी. घ्या. पुढला विषय घ्या."
"त्या पाच राज्यांची निमंत्रणे आपण फेटाळून लावूया."
"अगदी बरोबर! या राज्यापैकी कुणाचाही प्रस्ताव स्वीकारला तर आपणास फूटकी कवडीही मिळायची नाही."
"ठीक आहे. फेटाळली. घेतो तसा ठराव. परदेशातून एकशे एक निमंत्रण आली आहेत."
"एकशे एक का आर्थिक बाबतीत एक से एक?"
"प्रत्येकाला रक्कम सांगितलीत ना? अंहं! मंडळाची फिस नाही हो. आमचा वाटा. त्याचे काय?"
"त्यासाठी मी प्रत्येकाला या सभेला उपस्थित राहायचे पत्र पाठवले आहे. सारे प्रतिनिधी हजर आहेत."
"वा! वा! आपले सचिव म्हणजे ना ग्रेट माणूस! तुमच्या कमिशनचे काय?"
"त्याची काळजी करू नका. आमचं ठरलय. तुम्ही कुणाचेही टेबलाखालचे टेंडर मंजूर करा. माझा वाटा वेगळा असणार आहे. त्याच्याशी तुम्हाला, मंडळाला काहीही घेणे देणे नाही."
"मला वाटते या सचिवाचीच उचलबांगडी करावी."
"तसा विचारही मनात आणू नका." सचिव धमकीवजा स्वरात म्हणाले.
"का? महानमंडळाच्या कार्यकारिणीला तसा अधिकार..."
"मुळीच नाही. शेवटी मी सचिव आहे म्हटलं. ज्या सभेत तुम्ही सर्वांनी मिळून महानमंडळाचा कालावधी पंचवीस वर्षे वाढून घेतला. अध्यक्षस्थानी जो ठराव घुसवून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले त्याच मार्गाने मीही माझी व्यवस्था केली आहे."
"राहू द्या. इथे सारेच 'कुरघोडीकर' आहेत तर."
"महानमंडळाचे नाव बदलून 'अखिल भारतीय कुरघोडीकर मंडळ' असे ठेवले तर?"
"कशाला उगाच नामांतराची गोष्ट करता? एकमेकांवर कुरघोडी करायला सारे टपले आहेत."
"आपले अध्यक्ष स्वतःचेच नाव मंडळाला देण्याचा गुपचूप ठराव घेतील."
"नामांतरामुळे पुन्हा वादंग होईल. कदाचित देश पेटेल. त्याची ठिणगी परदेशात पडेल आणि कदाचित जागतिक महायुद्धही भडकेल. त्यापेक्षा जे चाललय ते चालू द्यावे."
"सेक्रेटरी, पुढे काय?"
"थांबा. एकशे एक प्रस्ताव आले आहेत. त्यावर चर्चा..."
"काय? एकशे एक प्रस्तावावर चर्चा? असे करा. आजची बैठक उद्या सुरू करूया. प्रवासाने अंग कसे आंबून-तिंबून गेले आहे.... सेक्रेटरी...."
"झालीय. सर्व व्यवस्था ओके! प्रत्येकाच्या खोलीत गिफ्ट पॅक तयार आहे..." सचिवाचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच सारे सदस्य आपपल्या खोलीकडे धावत सुटले...
दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता महानमंडळाची सभा पुन्हा सुरू झाली. सारे सभासद खूप आनंदी, उत्साही दिसत होते. आदल्या दिवशी एकमेकांपासून दूर असणारे सदस्य बरेच जवळ आले होते. सर्वांच्या नजरेत वेगळी चमक होती. हास्य विनोदाच्या वातावरणात सचिवाने कामकाज सुरू केले. सचिवांनी एका देशाच्या प्रतिनिधीचे नाव उच्चारले. तेव्हा दुसऱ्या देशाचे सदस्य उभा राहून म्हणाले,
"असे कुणाचेही नाव घेऊ नका. जेवढे प्रस्ताव आले आहेत. ते सारे अल्फाबेटिकलप्रमाणे क्रमवार लावा." त्याप्रमाणे प्रस्तावाची जोडणी करण्यासाठी सचिवांनी दोन तासांची मुदत मागितली.
दोन तासानंतर सभा पुन्हा सुरू झाली. सचिवांनी नवीन जोडणीप्रमाणे एक-एक नाव पुकारण्यास सुरुवात केली. अखिल भारतीय साहित्य महानमंडळाची फिस एक लाख डॉलर्स होती. तसा नियमच होता. चर्चा केवळ अलिखित फिससाठी म्हणजे सदस्यांना मिळणाऱ्या रकमेबाबत सुरू होणार होती. या व्यवहाराला 'लाच' म्हणायचे नाही असाही एक ऑफ द रेकॉर्ड नियम होता. प्रत्येक देशाचा प्रतिनिधी लाज सोडून लाच वाटायला निघाले होता. बोली एवढी रंगली की ती दहा अब्ज डॉलर्सवर गेली...
अखिल भारतीय मराठी साहित्य महानमंडळाची सभा चालू असताना दरवर्षी त्याच त्याच मुद्द्यावर रवंथ करणारी चर्चा सर्वत्र सुरू होती.
"महानमंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे सोडा त्यांना तर अब्जावधी रुपयाची लॉटरी लागत असेल पण ही परदेशी माणसं एवढी प्रचंड रक्कम मोजून मराठी भाषेसाठी का धडपड करीत आहेत?"
"मराठी भाषेचे परमभाग्य हो. महाराष्ट्रात ज्या भाषेला दळभद्री म्हणून नियोजनपूर्वक नेस्तनाबूत करण्यात आले. त्याच मराठी भाषेने परदेशात केवढं मोठं स्थान निर्माण केलेय."
"एक एक मराठी माणूस महाराष्ट्रातून आणि विशेषतः मुंबईतून हद्दपार होत थेट सातासमुद्रापार गेला."
"तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण प्रश्न असा पडतो की, मराठी माणसाने परदेशच का निवडला? इतर प्रांतीय जसे मुंबईत, महाराष्ट्रात स्थायिक झाले तशी ही मराठी माणसे इतर राज्यात का नाही गेली?"
"त्याचे असे आहे, अनेक वर्षांपूर्वी मुंबईतून परप्रांतीय गेला पाहिजे अशी चळवळ सुरू होती. त्याचा परिणाम असा झाला की, परप्रांतीय तर गेलाच नाही तर तो पक्के ठाण मांडून बसला. त्या आंदोलनाचा उलट परिणाम असा झाला की, भीतीपोटी मराठी माणूस सैरभैर झाला.त्याने असा विचार केला की, मुंबईत परप्रांतीयांवर हल्ले होतात म्हणून आपण एखाद्या राज्यात गेलो आणि तिथल्या जनतेने बदला घेण्यासाठी मराठी माणसांवर हल्ले केले तर?"
"अगदी बरोबर! मुंबई, महाराष्ट्रात राहायचे नाही तर भारतातही नको या विचाराने मराठी माणूस थेट परदेशात जाऊ लागला."
"मराठी माणूस मुळातच हुशार, बुद्धिमान! त्याच्या या गुणांना इथे किंमत नव्हती, तिकडे त्याला परदेशात भरपूर वाव आणि भाव मिळाला."
"पण हाच मराठी माणूस खरा निष्ठावान. परदेशात जाऊनही मराठी भाषेला विसरला नाही."
"इथं पिकणारे मराठी साहित्य, संस्कृती, कला या साहित्य संमेलनाच्या रुपाने तिथे रुजवू लागले."
"प्रचंड पैसा ओतून परदेशी मराठी माणूस तमाशा, लावण्या, कथाकथन, कविता, नाटक पाहण्यासाठी धडपडू लागला."
"परदेशातील तेच ते अर्धनग्न आणि प्रसंगी पूर्ण नग्न सौंदर्य पाहून उद्विग्न झालेला परदेशी मराठी माणूस संमेलनाच्या निमित्ताने भरजरी शालू, पैठणी नेसणाऱ्या स्त्रीयांना पाहून आनंदी होऊ लागला."
तिकडे महानमंडळाची सभा जोरशोरात सुरू होती. लिलाव सभासदामागे पंचवीस अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. तितक्यात सचिवांनी जेवणासाठी सभा तहकूब केली. सारे सभासद बाहेर येताच 'ब्रेकिंग न्युज'साठी घुटमळणाऱ्या पत्रकारांनी त्यांना घेरले.
"सर, आगामी मराठी साहित्य संमेलन कुठे होणार?"
"कुठे म्हणजे इथेच..."
"इथे म्हणजे परदेशातच ना?"
"परदेशाचा अट्टाहास कशासाठी हो?"
"सर्वात जास्त मराठी रसिक, वाचक, लेखक भारतात असताना परदेशात का?"
"येथे केवळ गर्दी होईल पण खरे दर्दी परदेशात आहेत." मंडळाचा एक प्रतिनिधी म्हणाला
"तुम्हाला असे म्हणायचे का, की देशातले मराठी रसिक, वाचक दर्दी नाहीत? ते साहित्याला दाद देत नाहीत? भारतीय रसिकांपेक्षा परदेशी वाचकाला जास्त कळते?"
"असे बोलून तुम्ही मराठी रसिकांचा अपमान करीत आहात असे तुम्हाला वाटत नाही का?"
"तुम्हाला अब्जावधी रुपयांचे कमिशन मिळते त्यामुळे तुम्ही परदेशात संमेलन भरवता का?"
"तिथल्या ललनांसोबत मजा मारता येते हे कारण आहे का?"
"मराठी रसिकांना काही कळत नाही यामागे तुमची भूमिका काय आहे?"
"ज्या मराठी भाषेच्या, वाचकांच्या, रसिकांच्या जीवावर तुमच्या उड्या आहेत त्यांचा तुम्ही सरळसरळ घोर अपमान करीत आहात."
"अहो पण..."
"तुम्ही आता काय सांगणार? आम्ही आता हा प्रश्न सरळ रसिकांच्या न्यायालयात नेत आहोत..." असे म्हणत दुसऱ्याच क्षणी प्रत्येक वाहिनीच्या प्रतिनिधीने 'पिछे मुड' करीत प्रेक्षकांशी संवाद साधताना म्हणाले,
"जगभरात पसरलेल्या मराठी रसिकांना आमचा मानाचा मुजरा! भारतीय मराठी रसिकांनो हे बघा, आपल्या मराठी साहित्य महानमंडळाचे पदाधिकारी! ज्या मायबाप रसिकांच्या जीवावर यांनी आतापर्यंत स्वतःच्या तुंबड्या भरल्या त्याच भारतीय मराठी रसिकांना साहित्यातले काही कळत नाही असा जावई शोध यांनी लावलाय. गेली अनेक वर्षे मराठी साहित्य संमेलन याची देही याची डोळा पाहण्यासाठी चातकापेक्षाही अधिक तरसणाऱ्या, व्याकुळलेल्या मराठी रसिकांच्या बाबतीत यांची ही भाषा ऐकलीत का? मराठी मायबोली नसणाऱ्या या पदाधिकाऱ्यांनी मराठीच्या नावावर सातासमुद्रापार संमेलन भरविण्याच्या अट्टाहासाने स्वतःच्या सात नव्हे तर पंचवीस पिढ्या आबादीआबाद करून घेतल्या आणि आता हेच रसिकांना निर्बुद्ध ठरवित आहेत. तुमच्याबाबतचे यांचे हे मत कितपत खरे आहे ते ताबडतोब एस.एम.एस. करून पाठवा..."
दुसऱ्या क्षणी प्रत्येक वाहिनीने त्यांच्याकडे अप्राप्त झालेल्या परंतु तरीही प्राप्त म्हणून नोंदवलेल्या मतांची आकडेवारी, टक्केवारी दाखवायला सुरुवात केली.
दिल्लीतील शंभर-दोनशे मराठी रसिकांचा मोर्चा लगेच मराठी महानमंडळाच्या इमारतीपुढे जमला. त्यातल्या अनेकांना तर काय घडले याची नीट माहितीसुद्धा नव्हती परंतु मराठी भाषेवर, मराठी रसिकांवर अन्याय होतो म्हणून एक-एक करीत जमत होते. त्यांना पाहताच त्या इमारतीच्या परिसरातील नागरिक काय झाले असे विचारत जमू लागले. पाहता पाहता दोन-तीन हजारांचा जमाव जमला. त्यांच्यापैकी पाच-दहा लोक पोटतिडकीने घोषणा देऊ लागले. हे सारे घडवून आणणाऱ्या वाहिन्यांनी लगेच थेट प्रक्षेपण सुरू केले.
"भारतीय मराठी रसिकाला काही कळत नाही या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटते?" हा प्रश्न वारंवार विचारून त्यांनी मोठा गोंधळ सुरू केला.
"लाज वाटली पाहिजे असे बोलायला..." एक प्रतिक्रिया.
"खाल्लेल्या मिठाला न जागणाऱ्या या अवलादी आहेत." दुसरी प्रतिक्रिया.
"ज्या ताटात खातात त्याच ताटाला भोक पाडायचा हा प्रयत्न आहे."
"हा अपमान सच्चे मराठी रसिक या नात्याने आम्ही कदापि सहन करणार नाही."
"काय करणार आहात तुम्ही?" वाहिन्यांवरून विचारण्यात आलेला प्रश्न.
"तो कुणी पदाधिकारी आहे त्याच्या कानाखाली आवाज काढू."
"त्याचे दात त्याच्याच घशात घालू."
"तोंड काळे करु त्या तथाकथित पदाधिकाऱ्यांचे."
"कपडे फाडू त्याचे."
"त्याची गाढवावर धिंड काढू."
"त्यांनी माफी मागायलाच हवी."
"माफी मागा नाही तर खुर्ची सोडा."
"आम्ही त्रिवार निषेध करतो, धिक्कार करतोः"
"नुसता निषेध करून काय फायदा? गेंड्याची कातडी आहे. लातों के भुत बातों से नही मानते।"
"चला. चला." म्हणत ती गर्दी महानमंडळाच्या इमारतीत शिरली. सर्व खोल्यांची दारे बंद होती. सर्वत्र शांतता होती. लोकांनी खिडक्यांची तावदाने फोडायला सुरुवात केली. अध्यक्ष ठोके पाटलांनी पोलिसांनी फोन केला. घोषणांचा जोर वाढला. तसे एक दार उघडल्या गेले. सभासदांच्या आग्रहाखातर महानमंडळाचे सचिव रसिकांची क्षमा मागण्यासाठी हात जोडत बाहेर आले. मराठी रसिकांचा घोर अपमान करणारी हिच व्यक्ती आहे असे समजून लोकांचा राग अनावर झाला. कुणी सचिवाच्या चेहऱ्यावर काळे फासले, कुणी कपडे फाडले. काही लोकांनी स्वतःच्या चपला काढून हार करण्याची तयारी सुरू केली. तितक्यात इमारतीत पोलीस शिरले. त्यांनी दिसेल त्याला, हातात पडेल त्याने ठोकायला सुरुवात केली. बाहेर पडण्यासाठी रेटारेटी सुरू झाली. त्या गोंधळात कुणी पडले, कुणाचे डोके फुटले, कुणाचे दात तुटले, कानाच्या पाळ्या लटकल्या, डोळे सुजले, कपडेही फाटले. पळतच सारे बाहेर पडले. घाबरलेल्या सचिवांना दवाखान्यात पाठवून सदस्यांनी जेवणाची सुट्टी घेतली.
एका तासानंतर पुन्हा महानमंडळाची सभा सुरू झाली. सचिवांच्या अनुपस्थितीत सारी सुत्रं अध्यक्षांनी हाती घेतली. ते म्हणाले,
"पदाधिकाऱ्यांनो, झाला प्रकार अत्यंत वाइट झाला..."
"ज्या लोकांनी धुडगूस घातला त्यांच्या निषेधाचा ठराव घ्या."
"पण हे लोक एवढे बिथरले का? नेमके घडले काय?"
"आपल्यापैकी कुणीतरी मराठी रसिकांचा अपमान केला."
"कशाचा अपमान आणि काय? इथे दुसरे कुणी नाही. ते जे बोलले त्यात चूक ती कोणती?"
"जाऊ देत. भिंतीलाही कान असतात. अगोदरच एवढा गहजब माजलाय, गोंधळ चाललाय. त्या सचिवाला बळीचा बकरा करुन पाठवले म्हणून आपले कपडे आणि शरीर सुरक्षित राहिले."
"अशा... अशा लोकांचे काही सांगता येत नाही हो कदाचित पुन्हा नव्या जोमाने हल्ला करतील."
"होय हो. गनिमी कावा या लोकांच्या नसानसात भिनलाय. तेव्हा सभा तहकूब करा. पुढील बैठकीत निर्णय घेऊया."
"नाही. महानमंडळाच्या टाइम बाँड कार्यक्रमात बदल करता येणार नाही. एक मात्र करता येईल..."
"साहित्य संमेलन रद्द करावे का?"
"नको. नको. संमेलन रद्द करणे परवडणारे नाही. तास-दोन तासासाठी अब्जावधी रुपयांवर पाणी सोडण्याचा मुर्खपणा करू नका."
"शेवटची बोली मंजूर करुन..."
"जमणार नाही. शेवटच्या बोलीवर मी प्रत्येकी दहा कोटी रुपये वाढवतो."
तितक्यात दारावर उभ्या असणाऱ्या शिपायाने दालनात प्रवेश केला. ठोके पाटलांना कडक सॅल्यूट मारीत म्हणाला, "काही माणसे आपली भेट घेऊ इच्छित आहेत."
"कोण आहेत?"
"प्रकाशक संघटनेचे अध्यक्ष आणि इतर..."
"पाठवा." अध्यक्ष म्हणाले
काही क्षणात पाच-सह इसमांनी प्रवेश केला. एक जण स्वतःचा परिचय करून देताना म्हणाला,
"मी प्रकाशक संघटनेचा अध्यक्ष..."
"ही अशी कशी तुमची दशा? प्रकाशक म्हटला की, कसा ताजातवाना, प्राण्यांचे रक्त पिऊन धष्टपुष्ट, गलेलठ्ठ झालेल्या एखाद्या वाघाप्रमाणे..."
"तुम्हाला काय म्हणायचे आहे?" एका प्रकाशकाने विचारले
"त्याचे असे आहे, वेडे घर बांधतात, शहाणे किरायाने राहतात त्याप्रमाणे लेखक लिहितात आणि प्रकाशक ते छापून गर्भश्रीमंत होतात."
"कित्येक वर्षांपासून तुम्ही महानमंडळाचे लोक परदेशात संमेलने भरवत आहात त्यामुळे आमचे एकही पुस्तक खपत नाही. पूर्वी दरवर्षी महाराष्ट्रात संमेलने होत असल्यामुळे आमची हजारो पुस्तके खपायची परंतु गेली अनेक वर्षे आमचे एकही पुस्तक..."
"आम्ही काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे?" अध्यक्षांनी विचारले
"तुम्हाला या संमेलनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा मिळतो. आमच्या पोटावर पाय देत आहात तुम्ही."
"अखिल भारतीय साहित्य संमेलनं बंद पडल्यामुळे गावोगावी, खेडोपाडी होणारी संमेलनेही जवळजवळ बंदच पडली आहेत. त्यामुळे आमचे फार मोठे नुकसान होते आहे."
"संमेलनं पूर्वीप्रमाणे महाराष्ट्रात सुरू करा नाही तर ..."
"काय कराल?"
"तुमची ही सभा बंद पाडू, उधळून लावू."
"स्वतःचे तोंड पहा आधी."
"असे बोलून तुम्ही आमचा अपमान करीत आहात."
"कुंकू लावून आमंत्रण दिले नव्हते..." त्यांचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच प्रकाशक मंडळी धिक्काराच्या घोषणा देत बाहेर पडली. तिथे वाहिनीवाले उभे होतेच. एका प्रतिनिधीने विचारले,
"काय झाले? काय ठरले?"
"निर्णय झाला का?" पत्रकार प्रश्नांची आतषबाजी करीत असताना काही तरुण प्रकाशकांनी कुणाच्याही नकळत एकमेकांचे कपडे फाडले.
"हे...हे...बघा, आम्हा प्रकाशकांची कशी अवस्था केलीय ते."
"कुणी केली?" सर्वच पत्रकारांनी एकदाच विचारले
"दुसरे कोण असणार? महानमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी."
"का केली धक्काबुक्की?"
"आम्ही यावर्षी महाराष्ट्रात संमेलन घ्या असा हट्ट धरला."
"ते तयार झाले?"
"तयार झाले असते तर आमची अशी अवस्था झाली असती? मान्य करायला का त्यांचे डोळे आले आहेत?"
"म्हणजे?"
"अहो, साधी गोष्ट आहे, आमची मागणी मान्य केली तर प्रत्येकाचे अब्जावधी रुपये पाण्यात जातील ना? मग कशाला ते महाराष्ट्रात संमेलन घेतील?"
"एवढी कमाई असते? पण मग ही परदेशी मंडळी एवढा पैसा का खर्च करतात?"
"या संमेलनासाठी खर्च होणारी पूर्ण रक्कम त्या त्या देशात म्हणे पूर्णतः करमाफ असते."
"असे आहे तर..." एक पत्रकार म्हणाला. अगोदरच हातभर धिलपीचे दहा हात लाकूड करणाऱ्या वाहिन्यावाल्यांना नवीन विषय मिळाला. तिकडे महानमंडळाच्या सभेत चर्चा अंतिम टप्प्यात होती. सुरुवातीपासून अतिशय शांत असणारा एक प्रतिनिधी ऊभा राहिला. शांत, धीरगंभीर आवाजात म्हणाला,
"साहित्य संमेलन आमच्या देशात व्हावे यासाठी मी प्रत्येक पदाधिकाऱ्याला लाच नव्हे तर भेट म्हणून नव्वद अब्ज डॉलर..."
"क..क...काय?"
"ब...ब...बापो...?"
"एवढी रक्कम?" अनेक पदाधिकाऱ्यांची बोबडी वळली
"तुम्ही मागाल ती रक्कम देऊन मी संमेलन घेऊनच जाणार आहे."
"बोला. यापेक्षा कुणाची अधिक बोली आहे? कुणाची काही हरकत आहे?"
"काय हरकत असणार?"
"तर मग यावर्षीचे अखिल भारतीय साहित्य संमेलन..."
"थांबा. कोणताही निर्णय घेऊ नका..." बैठकीत एक वेगळाच आवाज घुमला. ऐकताक्षणी अनेकांच्या अंगावर भीतीने शहारे आले.
"कोण बोलतेय? ऊठून बोला..." ठोके पाटील म्हणाले पण त्यांच्या आवाजातही कंप जाणवत होता.
"मी बसून बोललो काय, उभा राहून बोललो काय? तुम्ही मला पाहू शकणार नाहीत."
"म्हणजे? "
"कोण तुम्ही समोर तर या. काय नाव तुमचे?"
"नावात काय आहे? असे कुणी तरी पृथ्वीवरील माणूस म्हणालाय ना? मी स्वर्गातून आलोय."
"क..क..काय?"
"म..म.. म्हणजे भ.. भ..भू..."
"नाही. मी भूत नाही, स्वर्गात भुते नसतात. ज्याच्या इच्छा अपूर्ण राहतात असा अतृप्त आत्मा भूत होऊन भटकत राहतो. मी पूर्ण समाधानी, पुण्यवान होतो म्हणून स्वर्गात पोहोचलोय. आजकाल स्वर्गात फारसे साहित्यिक येत नाहीत. आम्ही फार जुने साहित्यिक आहोत. स्वर्गातही आम्ही एकत्र आलो आहोत. गेली अनेक वर्षे आम्ही 'स्वर्गीय मराठी साहित्य महानमंडळ..."
"काय? स्वर्गीय मराठी?"
"अहो, अजून मराठी भाषा जिवंत आहे."
"असे तुम्हाला वाटते तेही तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी. मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातून मराठी केव्हाच हद्दपार झाली आहे. तुमच्या वंशावळीने तिला केव्हाच हाकलून लावलय. आम्ही आपल्या मराठी भाषेला स्वर्गात नेले आहे. दरवर्षी आम्ही स्वर्गात साहित्य संमेलन घेत असतो. यावर्षी पृथ्वीवर होणारे साहित्य संमेलन स्वर्गात भरवावे असे आमच्या साऱ्या स्वर्गात स्थायिक झालेल्या साहित्यिक मंडळीने ठरवलय. या आगामी संमेलनाचे नावही आम्ही...'अखिल त्रिभुवनात्मक मराठी साहित्य संमेलन' असे ठरवले आहे."
"प..पण.."
"समजले. चिंता करु नका. मी प्रत्येक पदाधिकाऱ्याला स्वर्गातील परिमाणात म्हणजे जोकर्स..."
"म्हणजे?"
"स्वर्गातील परिमाण आहे ते. रुपया... डॉलर.. तसे जोकर्स..."
"क..क..काय?"
"स्वर्गात येणाऱ्या प्रत्येक साहित्यिकाचा सर्व खर्च आमचे मंडळ करेल. येणारांसाठी संख्येची अट नाही. अख्खी पृथ्वी आली तरी चालेल."
"पण का हो, संमेलन संपल्यावर पृथ्वीवर परत येता येईल ना?"
"होय. निश्चितपणे येता येईल. पण ते येणारावर अवलंबून असेल."
"म्हणजे?"
"एखाद्या माणसाला स्वर्ग आवडला तर त्यास चार खोल्यांची सदनिका पूर्ण मोफत देण्यात येईल किंवा त्याला आवडलेले घर त्याच्या नावे करून त्यास पृथ्वीवर पाठविल्या जाईल. तो पुन्हा मृत झाल्यानंतर स्वर्गात येईपर्यंत जतन करून ठेवण्यात येईल. आणखी एक..."
"आता आणखी काय?"
"संमेलनासाठी एकट्या आलेल्या इसमाला मनपसंत व्यक्तीसोबत विवाह करून संसार थाटता येईल..."
"यात काही फसवणूक?"
"तुम्हाला फसवणूक झाली असे वाटले तर स्वर्गातील न्यायालयात दावा ठोकावा लागेल..."
"स्वर्गात संमेलन.... जोकर्स... सदनिका... लग्न... " असे म्हणत अखिल भारतीय मराठी साहित्य महानमंडळाचे अध्यक्ष ठोके पाटील त्यांच्या आलिशान शयनगृहातील पलंगावरून खाली पडले...
नागेश सू. शेवाळकर
थेरगाव, पुणे ४११०३३ ९४२३१३९०७१