Paris - 7 in Marathi Travel stories by Aniket Samudra books and stories PDF | पॅरिस - ७

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

पॅरिस - ७

घरी पोहोचलो आणि जरा वेळ विश्रांती घेऊन लगेचच आवरायला घेतलं. आजची संध्याकाळ स्पेशल होती. आम्ही आधीच प्लॅनिंग करून ठेवले होते. मुलं त्यांच्या मावशीबरोबर कुठल्यातरी मस्त हॉटेल मध्ये जेवायला जाणार होतो आणि मी आणि बायको पॅरिसमधला प्रसिद्ध ‘लिडो’ शो बघायला जाणार होतो. ‘लिडो’ हा कॅब्रे शो आहे पण ह्यामध्ये नृत्य करणाऱ्या मुली सेमी-न्यूड असतात. पूर्णपणे टॉपलेस. सोबत जेवण आणि शॅम्पेन.

ह्यावेळची मेट्रो जरा किचकट होती. पहिल्या मेट्रो नंतरची दुसरी मेट्रो जी पकडायची होती त्याचा प्लॅटफॉर्म पहिल्या प्लॅटफॉर्मपासून काहीसा दूर होता. बरीच डावी-उजवी वळणं घेतल्यावर आणि काही जिने चढ उत्तर केल्यावर शेवटी सापडले आणि वेळेत आम्ही लिडोला पोहोचलो.

टेबल अगदी स्टेजच्या जवळ मिळालं म्हणून आनंदात होतो तोच लक्ष शेजारच्या टेबलावर गेलं. चक्क मराठी बोलणार एक मोठ्ठ कुटुंब शेजारी बसलं होतं. आज्जी, आजोबा, आई बाबा, दोन ७-८वीतल्या मुली ९-१०विलतला मुलगा आणि कदाचित काका-काकू. आम्ही दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं.

“शो चुकला कि काय?” दोघांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह

“अश्या” शोला हे सहकुटुंब येणं शक्यच नाही. आणि ज्याअर्थी ते आलेत त्याअर्थी आपल्याला जे अपेक्षित आहे तसे इथे काहीच नाही असाच काहीसा विचार आमच्या मनात येऊन गेला. त्यांच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना कळाले कि ते पुण्याहुनच एका ‘सुप्रासिध्द’ ट्रॅव्हल कंपनीमार्फत आले होते.

समोर मोठ्ठा ऑर्केस्ट्रा फ्रेंच संगीत वाजवत होता. थोड्याच वेळात शॅम्पेनही आले. पण त्याची काहीच चव लागेना. सर्व पैसे पाण्यात गेले बहुदा असा विचार करत असतानाच ऑर्केस्ट्राने आवरतं घेतलं. काही जादूचे प्रयोग उरकले आणि पडदा बंद झाला. सर्व दिवेही मालवले गेले. तोपर्यंत खाण्यापिण्याचे पदार्थ वाटप सुरु झाले होते.

पडदा उघडला गेला, समोरच्या त्या भव्य स्टेजवर पॅरिसच्या रस्त्याचे प्रतीकात्मक रुप उभारले होते. रस्त्याच्या कडेला आणि एका खांबाला टेकून दोन जोडपी चुंबनात मग्न असतात तर रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला, एका खांबाला टेकून एक सोज्वळ, सालस शोभावी अशी, सेक्रेटरी रूपातली एक मुलगी उभी असते. केस तेल लावून गच्च बांधलेले, डोळ्यावर नर्ड प्रकारातला चष्मा, फॉर्मल शर्ट आणि फॉर्मल स्कर्ट. ती त्या प्रेमी युगुलांकडे बघते, चेहऱ्यावर काहीसे निराशेचे भाव.

थोड्यावेळाने काही टवाळ फ्रेंच मुलं तिथे येतात, ते तिला प्रेमाने छेडायचा प्रयत्न करतात, पण तेही तिला मान्य होत नाही आणि मग एक गाणे सुरु होते.

समोरच्या पायर्यांवरुन साधारण २२ ते २५ वयाच्या ५-६ मुली खाली येतात. रंगेबिरंगी पिसारा लावलेला, सोनेरी चमचमते रंगाचे अलंकार, गौर वर्ण आणि पूर्णपणे टॉपलेस. त्यांचे नृत्य सुरु होते, बरोबरीने एक जबरदस्त आवाजाची गायिका गाणं सुरु करते. गाण्याची भाषा कळत नसली तरी तिचे सूर मनाला भावतात.

त्या टॉपलेस मुलींना बघून सर्व-प्रथम आम्ही त्या कुटुंबाकडे वळलो. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्णपणे आश्चर्याचे भाव होते. त्या दोन मुली जोरजोरात खिदळत होत्या, एकमेकींच्या कानात काहीतरी कुजबुजत होत्या.. त्या मस्तीत त्यांची खुर्ची पडली तरी त्यांना भान नव्हते. तर दुसऱ्या बाजूला तो मुलगा शॉक बसल्यासारखा स्तब्ध होता. त्यांचे आई-बाबा आणि काका-काकु एकमेकांकडे बघत होते तर त्या आज्जी आपण जणू काही बघितलंच नाहीए ह्या भावनेने स्टेजकडे शून्यात बघत होत्या.

त्यांच्या नशिबाने तो नृत्य प्रकार संपला. निदान पुढचं नृत्य आणि तेथून पुढील सर्व नृत्य ठीक-ठाक असतील असा समज करुन घेत असतानाच दुसरे नृत्य सुरु झाले. ह्यावेळचे कमरेखालचे कपडे पहिल्यापेक्षा निम्याने कमी होते. मनात राहून राहून आश्चर्य वाटत होते कि त्या ट्रॅव्हल कंपनीने ह्यांना सांगितले कसे नाही कि त्यात ८०%हुन जास्ती न्यूडिटी आहे? निदान त्यांनी त्यांच्या मुलांना तरी बरोबर आणले नसते. इतक्या महाग तिकिटाचे इतके पैसे तरी वाया गेले नसते. शेवटी आम्ही त्या कुटुंबाचा नाद सोडून दिला, आम्ही तो शो बघायला आलो होतो, त्या कुटुंबाला नाही.

Image Source – Internet (france-voyage.com)

शोबद्दल अधिक लिहायची खूप इच्छा असूनही योग्य शब्दच सापडत नाहीयेत. लिडो खरोखरच अप्रतिम होता. इतकी न्यूडिटी असूनही त्यात कुठेही बीभत्सपणा, अश्लीलता नव्हती. ओपनली न्यूडिटी पाहायची सवय नसलेले आपले डोळे काही वेळानंतर मात्र एकाच ठिकाणी केंद्रित न राहता तो भव्य शो पाहण्यात गुंतून जातात. संगीत, जे थोडेफार अंगावर होते ते कॉस्ट्यूम, प्रकाश योजना, नृत्य, प्रत्येक नृत्यगणिक बदलणारे स्टेजचे रूप. कधी पाण्याची कारंजी, कधी बर्फाचे थर, कधी मोठ्ठे मोठ्ठे पूल तर कधी अजून काही. सगळा प्रकारच भन्नाट होता.

कधी गेलात पॅरिसला तर हा शो नक्की नक्की आवर्जून बघा (आपल्या लहानग्यांना बरोबर न आणता… )

दोन तासांच्या त्या अमेझिंग अनुभवानंतर आम्ही बाहेर पडलो.

Champs-Élysées रस्ता तरुणाईने सळसळून वाहत होता. १०.३० वाजून गेले आहेत हे सांगूनही खरे वाटले नसते. सर्व रेस्टोरंटस गर्दीने ओसंडून वाहत होते. हवेत प्रचंड गारठा होता आणि एव्हाना परत भूक लागली होती.

चालता चालता खाता येईल म्हणून मॅकडोनाल्ड मध्ये घुसलो खरं, पण तिथले रेट्स बघून डोळे पांढरेच झाले. एका गल्लीतल्या रेस्टोरंटमध्ये salomon chicken आणि Panini नामक एक लांबलचक ब्रेडचा सॅन्डविच बनवून मिळणार पदार्थ आणि कोक घेतले. Arc de triomphe विविध रंगाच्या दिव्यांनी उजळून निघाले होते. बहुतेक road side restaurants मध्ये रोमँटिक संगीताच्या धून वाजत होत्या. अनेक जोडपी रस्त्याच्या मधोमधच एकमेकांच्या मिठीमध्ये सामावून त्या वातावरणाचा आनंद घेण्यात मग्न होती.

ढीगभर फोटो आणि हातातले खाणे संपेपर्यंत ११.३० कधी वाजून गेले कळालेच नाही. शेवटची मेट्रो रात्री १ वाजता होती. तसा हाताशी वेळ होता म्हणून अजून १५-२० मिनिटं टाईमपास करुन परतीसाठी मेट्रोकडे वळलो आणि परत लक्षात आले कि आपण सकाळचीच चूक केलेली आहे. जेथून बाहेर आलो तो मार्गच आम्ही पूर्णपणे विसरून गेलो होतो. शेवटी रस्ता सापडेल तेथून खाली उतरलो. पहिला जिना, दुसरा, मग तिसरा.. एक पण गोष्ट ओळखीची वाटेना. ५ जिने उतरुन मुख्य प्लॅटफॉर्म ला गेलो, पण तेथून आम्हाला जी मेट्रो हवी तिचा नंबर दिसेना. पुन्हा चार जिने चढून वर आलो आणि दुसऱ्या टनेलमधून पुन्हा चार जिने खाली. पण इथेही तीच गत. असे करत करत ७-८ टनेल्स मधून प्लॅटफॉर्म्स शोधले पण एकाही ठिकाणी हवी ती मेट्रो दिसेना.

नशिबाने स्वातीताईंचा मोबाईल बरोबर आणला होता. पण इतक्या खाली त्याला म्हणावी तशी रेंज येत नव्हती. आवाज तुटक-तुटक येत असल्याने ती काय सांगतेय तेच कळेना. शेवटचं ऐकलेले वाक्य म्हणजे, “कोणी आलंच अंगावर तर मोबाईल, पैसे जे काही मागतील ते वाद न घालता देऊन टाका”
अर्थात त्यामुळे आमची अजुनंच टरकली.

घड्याळात बघितले. १२.२० होऊन गेले होते.

अधून मधून ४-५ टवाळखोर करणाऱ्या पोरांचा ग्रुप येताना दिसला कि वाटायचं, झालं आता, हे लुटणार आपल्याला

आता मात्र patience संपु लागला. स्टेशन एव्हाना बऱ्यापैकी रिकामे झाले होते. एखादी मेट्रो आल्यावर थोडीफार लोक दिसत तितकंच. चढ उतार करून पाय बऱ्यापैकी दुखायला लागले होते. दोन मिनिटं विश्रांती म्हणुन तिथल्याच एका बाकड्यावर बसलो. प्लॅटफॉर्मवरची ती भयाण शांतता अंगावर येत होती. परत जिने चढून वर आलो.. ज्या मार्गाने गेलो नव्हतो त्या मार्गाने जाऊया म्हणत दुसरे टनेल्स पार केले तरी पुन्हा तिथेच आलोय कि काय असेच वाटत होते. जणू चकवाच लागल्यासारखं झालं होते. शेवटी कुठल्यातरी एका टनेल्ने एका नवीन जागी पोहोचलो, तेथे एक information desk चालू होते.

पॅरिसला कुठल्याही व्यक्तीशी संवाद साधताना bonjour अर्थात हॅलो म्हणायची पद्धत आहे. आम्ही गडबडीत असल्याने आम्ही सरळ मुद्यालाच हात घातला.
“We have lost our way, can you please let us know where to find metro no. 14?”
“Bonjour”, त्या खडूस पोरीने प्रश्न सरळ इग्नोर मारला होता
“Yeh.. looking for metro no. 14, can you please guide us..?”
“Bonjour”, ती दुसरं काही ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी आम्ही Bonjour म्हणल्यावर तिने आमचं म्हणणं ऐकून घेतलं.

त्या बाईला कुठे जायचेय ते सांगितल्यावर मग तिने त्या स्टेशनचा मॅपच काढला आणि शक्य तितक्या समजावणीच्या पण sarcastic सुरात आम्हाला मार्ग सांगितला. बाई नक्की मागच्या जन्मी पुणेकर असणार असाच विचार मनात येऊन गेला.

पण नशीब आमच्या बाजूने नव्हतेच, आम्ही फिरून पुन्हा त्याच counter पाशीच आलो. आता परत त्या खडूस पोरीकडे जाण्यात अर्थ नव्हता. तिने नक्कीच कमीत कमी शब्दात आमचा जास्तीत जास्त अपमान केला असता. आम्ही तिची नजर चुकवून तेथून बाहेर पडलो.

मग ठरवलं, बस्स झालं आता, सरळ मुख्य रस्त्याला जाऊ आणि टॅक्सी करु. मोठ्ठा भुर्दंड बसेल, पण इथे निर्जन स्टेशनवर भटकण्यापेक्षा ते परवडले. अखेर 'Sortie' अर्थात एक्झिटचे बोर्ड बघत बघत मुख्य रस्त्यावर आलो तेंव्हा कुठे हुश्श झाले.

रस्त्यावर आल्या आल्या फोनची रेंज मिळताच स्वातीताईला फोन केला. तेंव्हा शेवटचा प्रयत्न म्हणून ती म्हणाली की समोरून कोणी येत असेल तर फोन द्या, मी बोलते.

समोरून एक माणूस येताना दिसला तसं त्याला थोडक्यात आमची परिस्थिती सांगितली आणि फोन त्याच्याकडे दिला.

त्याच्या तोडक्यामोडक्या इंग्लिश/फ्रेंच संभाषणावरुन आम्ही असा अर्थ काढला कि तिने आम्ही सध्या कुठे आहोत हे विचारले असावे. तो आजूबाजूच्या पाट्या, रस्त्याचं नावं, दुकानांची नावं सांगत होता. मग बहुदा स्वातीताईने त्याला आम्हाला जवळच्या स्टेशनवर पोचवायला सांगितलेय जिथे ती आमची वाट बघतेय.

तो फक्त follow me म्हणाला आणि चालू लागला. आम्ही त्याच्या मागोमाग चालू लागलो. तो अर्ध इंग्लिश, अर्ध फ्रेंच, अर्ध अरेबिक भाषेत आम्हाला काही बाही विचारत होता आणि जसे समजेल तसं उत्तर आम्ही त्याला देत होतो.

मुख्य रस्ता सोडून तो आता छोट्या लेन्स मध्ये घुसला. अर्थात पॅरिसमध्ये बहुतेक सर्वच रस्ते छोट्या छोट्या लेन्स आहेत, पण त्या रात्री असे लेन्स मध्ये एका अनोळखी व्यक्तीच्या मागे जाणं आमच्या खुप जीवावर आले होते. अर्थात दुसरा पर्याय पण नव्हता.

एक लेन, मग दुसरी आणि अजून एक तिसरी, ती तर अधिकच अंधारलेली होती.

चालताना सारखं तो आम्हाला, मी दुसरीकडे चाललो होतो, पण तुम्हाला सोडायला म्हणून इकडे आलोय म्हणत होता. त्याचबरोबर तिकडे स्टेशनला कोण थांबलंय? तुम्ही त्यांचे कोण वगैरे प्रश्नही विचारत होता. शेवटची मेट्रो एक वाजताची होती, आणि त्याला फक्त पाचच मिनिटं राहिली होती. आजूबाजूला रस्त्यावरही कोणी चिटपाखरू दिसत नव्हते.

बरं आपण चाललोय तो रस्ता बरोबर का चुक हेही कळत नव्हते. शेवटी आता ह्या लेन नंतरही काही ओळखीचे दिसले नाही तर सरळ मागे वळायचे आणि पळत सुटायचे ठरवले.

परंतु ह्यावेळी मात्र दैवाने साथ दिली. ती लेन ओलांडली आणि समोर ओळखीचे स्टेशन दिसले. कोणत्या शब्दात त्या अनोळखी व्यक्तीचे आभार मानावेत तेच सुचत नव्हते, पण त्याच वेळी घड्याळात १ वाजलेला दिसत होता. कसंबसं त्याच आभार मानुन एकावेळी २-२ पायऱ्या चढत स्टेशन गाठले. आम्हाला हवी असलेली मेट्रो आधीच प्लॅटफॉर्मवर लागलेली होती. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, डोक्यावर टोपी, अंगात फ्लोरोसंट जॅकेट घातलेला मेट्रोचा ड्राइव्हर मेट्रोकडे जाताना दिसत होता. आम्ही literally पळत सुटलो आणि सगळ्यात पहिल्याच डब्यात घुसलो. अतिशयोक्ती नाही करत, पण ४-५ सेकंदातच डब्याची दार बंद झाली आणि आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला सुखरुप निघालो.

[क्रमशः]