अजूनही वाट पाहतेय ती...
ती नेहमी पावसाची वाट पहायची. हात फैलावून डोळे मिटून चिंब चिंब भिजायची. मोहरून जायची. म्हणायची,
'ये... ये... मुसळधार ये... रिमझिम ये... कसाही ये ... '
'भिजवून टाक मला.'
'तुझ्या बाहुपाशांत सामावून घे मला.'
'घट्ट आलिंगन दे.'
'एकरूप होऊन जाऊदे मला तुझ्यात...'
काळेभोर टप्पोरे डोळे, रेखीव भुवया, नाजूक पण सरळ नाक, गौरवर्ण अशी ती. नेहमी केसांची वेणी घातलेली. त्यात एखादं गुलाबाचं फुल असणारचं. कधी गुलाबी, नारंगी, लाल, पिवळ्या, पांढऱ्या रंगाचं गुलाब असल्याशिवाय ती कधी परिपूर्ण वाटलीच नाही. ऑफिसला स्कुटीवरून जायची पण एकदम फुल फ्रीडम मध्ये. डोक्यात हेल्मेट नाही की तोंडावर स्कार्फ नाही. भुर्रकन निघून जायची. आजूबाजूची लोकं चार हात लांबच राहायची. पावसाळ्यातही तिनं कधी रेनकोट व छत्री घेतलेली नसायची. चिंब भिजून यायची. बदलायला दुसरा ड्रेस नेहमी बरोबर ठेवायची. खूप आवडायचा पाऊस तिला. नेहमी आतुर असायची, पावसाच्या सरींना अंगावर घ्यायला. बेभान होऊन जायची. लहान मुल होऊन खेळायची, बागडायची अन मनसोक्त नाचायची, धुंद होऊन जायची.
ती म्हणते, माणसं फक्त स्वतः पुरता विचार करतात. फायद्यासाठी जवळ येतात. स्वार्थासाठी नाती जोडतात. अन कामं झालं की दूर होतात. त्यामुळे अनोळखी लोकांपासून दूरच राहायची. स्वतःहून नवीन ओळख कधी तिनं करून घेतलीच नाही. माझी अन तिची ओळख परीक्षेला झाली होती. माझ्या मागच्याच बाकावर बसायची. ती ओळख केव्हा मैत्रीत अन नंतर प्रेमात बदलली कधी कळलंच नाही. पावसाळ्यात दोन तीन वेळा तरी मला लोणावळ्याला न्यायची. धबधब्याखाली मनसोक्त भिजायची. तिला सावरता, सांभाळताना माझी धांदल उडायची. गाडीवर पावसात घट्ट बिलगून बसायची. नेहमी माझ्या डब्यातली पोळी भाजी खायची. घरचं असं कुणी नव्हतंच तिला डबा द्यायला. अनाथ आश्रमात राहायची. अनाथ होती.
कुणाच्याही लग्नात बेधडक जायची. वरातीत बिनधास्त नाचायची. तिला जेव्हा जेव्हा म्हणायचो, 'अगं.. तुला काही कळतं की नाही? लोक काय म्हणतील?'
तेव्हा किशोर कुमारच गाणं ऐकवायची..
कुछ तो लोग कहेंगे,
लोगों का काम है कहना |
छोड़ो बेकार की बातों में,
कहीं बीत ना जाए रैना |
मुक्त जगायची. सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी.
सारखं म्हणायची,
'हे जीवन एकदाच मिळतं.'
'सो जे वाटतं ते करा.'
'मुक्त जगा.'
लोकांचा जास्त विचार नका करू.'
'लोकं नावं ठेवायलाच असतात.'
'तुम्हाला जे वाटतं ना ते ते करा.'
'क्या पता कल हो ना हो?'
लेडी शाहरुखच होती ती. लहान मुलांच्यातच रमायची ती. लहान मुलं खूप आवडायची तिला.
म्हणायची,
'मुलं म्हणजे देवाघरची फुलं!'
'किती निरागस !'
'किती गोंडस !'
'निष्पाप अन गोड असतात.!'
पण नियतीला पाहावलं नाही तिचं असं आनंदी जगणं. महिना झाला असेल, अजूनही ती बेडवरच आहे. काहीच कळत नाही तिला. डोळे उघडे आणि फक्त पापण्यांची उघडझाप होते. कशाचीच संवेदना नाहीये तिला. तिचं सगळं करावं लागतं. आता कुणालाच ओळखत नाही. पाऊस असो की लहान मुलं, आता काहीच वाटतं नाही तिला त्यांचं. संवेदना शून्य झालीय ती.
सिग्नल वर थांबली होती. रिमझिम पाऊस पडत होता. तिचा सखा तिला भेटायला आला होता. आकाशाकडे तोंड करून, दोन्ही हात फैलावून ती त्याला आपल्या कवेत येण्यासाठी आवाहन करत होती. सिग्नल सुटला तरी तिला त्याचं भान नव्हतं. हॉर्नचा गोंगाट जेव्हा वाढला तेव्हा ती भानावर आली. पटकन गाडी स्टार्ट केली आणि निघाली भुर्रकन. डाव्या बाजूला सिग्नलची वाट पाहत असणाऱ्या टँकरने वेग पकडला होता. ती आपल्याच धुंदीत निघाली होती. पण या वेळी मात्र, नियतीनं डाव साधला होता. टँकरचा ब्रेक दाबल्याचा कर्णकर्कश आवाज झाला. तिची स्कुती टँकर खाली फरफटत गेली. सुदैवाने ती बाजूला फेकली गेली होती.
डॉक्टरांनी सांगितलं की, मेंदूला जबरदस्त मार बसला आहे. सगळी मेमरी लॉस झाली आहे. रिकव्हर होईल की नाही? काहीच सांगू शकत नाही.
कम्प्युटरचं बरं असतं ना !
डिलीट केलं तरी पुन्हा रिकव्हर करता येत !
माणसाच्या मेंदूचं काय?
किती बरं झालं असतं ना !
तेही फॉरमॅट किंवा रिकव्हर करता आलं असतं तर !
आम्ही खूप प्रयत्न करतो. पण, ती मात्र काहीच प्रतिसाद देत नाही. जवळचं असं कुणी नाहीये तिला. आज मात्र शरीर, बुद्धी, मन, संवेदना सगळ्यांनीच अनाथ झाली आहे. जेव्हा जेव्हा बोलायची, तेव्हा तेव्हा शिवरायांचा आणि शंभूराजांचा उल्लेख आल्याशिवाय तिचं बोलणं कधी पूर्ण व्हायचंच नाही. नेहमी त्यांचे दाखले देत असायची. त्यांचे विचार सांगायची.
'कितीही कठीण परिस्थिती असो. डगमगायचं नाही. माघार घ्यायची नाही. हरायचं नाही.'
'निसर्ग नेहमी तुमची परीक्षा पाहत असतो. कारण, तुला जे यश मिळणार आहे. ध्येय गाठायचं आहे'
'त्यासाठी खरंच तू लायक आहे का? पात्र आहेस का? तुझात खरंच ते मिळवण्याची हिम्मत, ताकत, सहनशीलता आहे का ?
मी सुद्धा अजून हरलेलो नाहीये. अजूनही तिची साथ सोडलेली नाहीये. अजूनही जेव्हा जेव्हा पाऊस येतो ना ! तेव्हा तेव्हा तिला पावसात भिजायला सोडतो. न जाणे तिला तिचा सखा पुन्हा आठवेल आणि पुन्हा एकदा ती नव्यानं पावसात चिंब चिंब भिजेल.
त्या पावसाची वाट अजूनही पाहतेय ती...
अन मी ही....
मित्रांनो, कदाचित त्या दिवशी तिनं हेल्मेट घातलं असतं तर तिची अशी अवस्था झाली नसती.
सर्व मित्र आणि मैत्रिणींना माझी कळकळीची विनंती आहे.
कृपया, बाईक चालवताना हेल्मेट वापरा.
होईल थोडे दिवस त्रास, पण आपली काळजी आपणच घ्यायला हवी ना!
- धन्यवाद,
- ईश्वर त्रिंबकराव आगम
- वडगांव निंबाळकर, बारामती.
- ९७६६९६४३९८