nikalachi pariksha -२ in Marathi Moral Stories by Swapnil Tikhe books and stories PDF | निकालाची परिक्षा - २

Featured Books
Categories
Share

निकालाची परिक्षा - २


निकालाची परीक्षा – २

"नाही नाही, असे काही शक्य नाही. येईल तो इतक्यात." - कुमुद

आपल्या मुलाला कोणी पळवले आहे किंवा तो घर सोडून गेला आहे या दोन्ही कल्पना कुलकर्णी कुटुंबाच्या कल्पनेपालिकडच्या होत्या, त्यामुळे साहजिकच कुमुद अशी कुठलीही शक्यतासुद्धा नाकारत होती.

"अहो मॅडम काळ बदलला आहे आता. अशा खूप केस बघितल्या आहेत मी." - पिंकीचे वडील.

'काळ बदलला आहे' हे स्वतःचे वाक्य स्वतःच अशा प्रकारे ऐकून सदा मात्र निरुत्तर झाला होता.

परन्तु पिंकीच्या वडिलांना दुजोरा देण्याची जणू स्पर्धाच सुरु होती, प्रत्येकजण आपल्या ओळखीतल्या जणांचे असे प्रसंग वर्णन करू लागला होता.

"अहो परवाच आमच्या हास्य क्लब मधल्या एका गृहस्थाच्या नातवाने आत्महत्या केली, कारण काय तर 5 टक्के कमी पडले म्हणून घरातले ओरडतील अशी भीती त्याला वाटली."

शेजारचे कदम काका गंभीर आवाजात पण मनापासून बोलू लागले. त्यांच्या या वाक्याने खोलीत क्षणभर शांतता पसरली आणि सदाच्या काळजाचा ठोका चुकला.

"या नवीन पिढीतील मुलांचे आणि पालकांचे खरेच अवघड आहे. अरे दोन-चार टक्के कमी पडले म्हणून इतके ओरडायचे? आणि मुलाने पण लगेच आत्महत्या करावी?

आमच्या वेळी तर शाळेतले मास्तर अगदी चड्डी ओली होईपर्यंत मारत असत तरी आमची मस्ती काही थांबली नाही, नाहीतर ही आजची मुलं. पालकांनी थोडे ओरडले की गंगा-जमूना यांच्या डोळ्यात उभ्या राहतात." - कदम काका विषय पुढे सरकवण्यासाठी बोलले.

"बरोबर आहे कदम, पण पालकांचे पण थोडे चुकतेच बघा. मुलांना शिस्त लावणे, संस्कार करणे हे काम अतिशय गरजेचे आहे पण ते करताना मुलांवर मानसिक तणाव निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायला नको का?"

"आमच्या वेळी बाप ओरडला की आजी जवळ घ्यायची, आजी ओरडली की बाप पतंग आणायला पैसे द्यायचा. एकंदरीत शिस्त लागतानाच नकळतच मनावरील तणाव दूर व्हायचा."

"आजच्या मुलांना मनातले बोलायला तसेही असतेच कोण? घरात इन-मिन तीन माणसे, आवडता विरंगुळा म्हणजे मोबाइलमध्ये डोके घालून बसणे. मग असली दुर्बुद्धी होणार नाहीतर काय?"

नकळतच घरात आता सध्याच्या पिढीतील पालक आणि मुले यांच्या समस्यांविषयी चर्चासत्र सुरु झाले होते. सगळेजण आपली मते ठाम पणे मांडू लागले होते. या सगळ्याला अपवाद फक्त सदाचा होता. तो बाजूला बसून सगळे निमूटपणे ऐकत होता. एरवी त्या चर्चेमध्ये बोलली जाणारी वाक्ये सदालाही माहीतच नव्हती असे नाही. खरेतर त्याचीही त्या सर्व मुद्यांना केवळ संमतीच नव्हती, तर आपण सर्व योग्यच करतो म्हणजेच पालकत्वाची जबाबदारी अत्यंत उत्तम रीतीने पार पडतो आहोत असाही त्याचा ठाम समज होता.

केवळ आजच्या अपवादात्मक परिस्थितीमुळे नेहमीचीच चर्चा आणि नेहमीचीच वाक्ये त्याच्या मनावर घाव करत होती, त्यामुळे नकळतच तो आत्मपरीक्षण करू लागला आणि त्याला ती चर्चा ऐकतानाच त्याच्या हातून किती गोष्टी सुटून गेल्या किंवा कमी पडल्या याची बोचरी जाणीव होऊ लागली.

आपण निनादला सतत ओरडून खूप मोठी चूक करत आहोत, त्याला आपली शिस्त जाचक वाटू लागेल इतकी बंधने त्याच्यावर घालू पाहत आहोत हा विचार प्रथमच त्याला पटू लागला होता. त्याच सोबत काहीच वेळापूर्वी लोकांनी केलेले निनादचे कौतुकही आठवू लागले त्यामुळे आपण उगाचच हट्टीपणा करून निनादवर चिडत होतो आणि त्याचा परिणाम म्हणून आजचा प्रसंग उभा ठाकला आहे या निष्कर्षापर्यंत तो काही क्षणातच पोचला.

आता मात्र त्याला निनादची खूप आतुरतेने आठवण येऊ लागली होती, त्याला निनादला केवळ भेटायचे होते, त्याच्याशी खेळायचे होते, गप्पा मारायच्या होत्या आणि बरेच काही करायचे होते. त्याच विचारात खूप आशेने त्याने खोलीभर नजर फिरवली पण त्याला हवा असलेला निनाद अजून परतला नव्हता आणि त्याची निराशा झाली.

"हे बघा कुलकर्णी, तुम्ही असे हताश होऊ नका. त्याने कसलीच चिट्ठी लिहिली नाहीये किंवा फोनही आला नाहीये त्यामुळे मला तरी काळजी करण्याचे कारण वाटत नाही." - पिंकीचे वडील, घरातील चर्चेमुळे मूळ मुद्दा बाजूलाच राहात आहे हे त्यांनी ताडले आणि चर्चा परत मूळ मुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रयत्न यशस्वीही झाला, सगळ्यांनीच त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

"आपण असे करूयात,

कुलकर्णी तुम्ही सर्व घर पालथे घाला. निनादने अशी काही चिट्ठी लिहिली असेल तर ती मिळून जाईल, मी काही माणसे घेऊन जवळपासच्या बागा, मैदाने, मॉल वैगेरे बघून येतो.

बाकीच्यांनी सोसायटीच्या आसपास तो कुठे दिसला होता का याची चौकशी करा." - पिंकीच्या वडिलांनी पुढचा मार्ग सांगितला. सगळ्यांनाच तो पटला आणि त्याप्रमाणे सगळे शोध घेऊ लागले. तासभर झाला तरी कोणीच परत आले नाही. सदाचे घर पूर्ण तपासून झाले होते, निनादची कसलीही चिठ्ठी मिळाली नव्हती.

पिंकीचे वडील घरी आले.

"मी शाळेतील वॉचमनपाशी चौकशी केली.

निनाद बराचवेळ चौथऱ्यावरच रडत होता असे त्याने सांगीतले. सगळी मुले घरी गेल्यावर त्याने चौकशी केली तेव्हा निनाद काहीच न बोलता तेथून निघाला. तुमचे घर जवळ असल्याने वॉचमनने फार लक्ष घातले नाही.

पण तो बाहेर पडताच एक म्हातारी व्यक्ती त्याला भेटली एक चॉकोलेट दिले आणि आपल्याबरोबर घेऊन गेली. निनादही आनंदाने त्यांच्या बरोबर गेला. त्यामुळे ते ओळखितलेच कोणीतरी असावेत असा वॉचमनचा गैरसमज झाला." - पिंकीचे वडील शिस्तबद्ध पद्धतीने सांगत होते.

त्यांचे बोलणे ऐकून प्रथमच सदाच्या वडिलांचा धीर सुटत होता, त्यांची खुर्चीवर चुळबुळ सुरु झाली. सदाची परिस्थिती फार वेगळी नव्हती.

"तुम्हाला काही चिट्ठी मिळाली का?" - पिंकीचे वडील

"नाही. सगळे घर शोधले पण काही मिळाले नाही." - कुमुद.

"मला अंदाज होताचं, कारण वॉचमन म्हणतो त्या प्रमाणे तो एका वयस्कर माणसाबरोबर गेला होता, म्हणजे तो स्वतःहून कुठे गेलेला नाही म्हणजेच त्याने चिट्ठी ठेवायची तयारी केलेली नाही." - पिंकीचे वडील.

"मग आता?" - सदाच्या वडिलांनी चिंतातुर आवाजात विचारले.

"आता दोन शक्यता उरतात.

एक तर तो, तुमच्याच कोणत्यातरी नातेवाईकाकडे किंवा ओळखीतल्या वयस्कर व्यक्तीबरोबर गेला आहे किंवा कोणीतरी वयस्कर व्यक्तीने त्याचे अपहरण केले आहे." - पिंकीचे वडील तर्क लावत बोलत होते.

त्यांचे ते तर्क ऐकून सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले.

"तुम्ही एक काम करा,

तुमच्या ओळखीतल्या वयस्कर लोकांना फोन करा आणि चौकशी करा. अर्थात निनाद मिसिंग आहे असे न कळू दिलेलंच बरे. थोडी सावधगिरी बाळगा.

मी माझ्या लोकांना घेऊन परत एकदा बागा आणि सार्वजनिक ठिकाणे ढूंडाळतो.

आणि हो आणखी एक महत्वाचे." - पिंकीचे वडील

"काय?" - सदाचे वडील, आता पिंकीचे वडील अजून काय सांगतात या काळजीने सदाच्या वडिलांनी विचारले.

"काही विशेष नाही, पण आताच्या प्रयत्ना नंतर देखील निनाद सापडला नाही तर तुम्ही पोलिसात रीतसर तक्रार करावीत असे मला वाटते.

म्हणजे मला पूर्ण ताकदीने तपास करता येईल इतकेच." - पिंकीचे वडील

पोलिसात तक्रार करायची म्हणजे खरेतर कुलकर्णी कुटुंब पहिल्यांदाच पोलीस ठाण्यात प्रवेश करणार होते, त्या कल्पनेनेसुद्धा सगळ्यांचीच दातखिळ बसली.

"अहो, घाबरू नका. मी देखील असेल तिथे." - त्यांची समजूत काढायला पिंकीचे वडील म्हणाले.

"आता वेळ घालवू नका. नातेवाईकांना तुमच्या वयस्कर मित्रांना फोन लावा.

तुम्हाला जर कोणाचा फोन आला, तर मात्र वेळ न घालवता तात्काळ मला कळवा. माझा नम्बर आहेच तुमच्याकडे.

मी निघतो." - पिंकीचे वडील घाई घाईने गेले.

आता मात्र निनाद लवकरात लवकर घरी परत यावा असेच सगळ्यांना वाटत होते.

त्यातच सदाच्या वडिलांची तब्येत खराब होऊ लागली, त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. कुमुदने त्यांना पाणी आणून दिले, सदाच्या वडिलांनी पाणी घेतले आणि कपाळावरील घाम पुसला.

"सदा, मला त्रास होतो आहे रे.

मी थोडे खाली मोकळ्या हवेत जाऊन येऊ का?

बरे वाटले की लगेच येतो." - सदाचे वडील निराशेने म्हणाले.

सदानें मानेनेच होकार दिला.

"अहो, मी येऊ का तुमच्या बरोबर?" - सदाच्या आईने काळजीने विचारले.

"नाही तशी गरज नाही, तू इथे सदाला आणि कुमुदला मदत कर." - सदाचे वडील

असे बोलूत, चपला घालून सदाचे वडील जड मनाने घरातून बाहेर गेले.

आता मात्र घरात फक्त सदा, कुमुद आणि सदाची आईच बाकी होते.

त्यांनी ओळखीतल्या वयस्कर माणसांची यादी करून त्यांना फोन लावायला सुरवात केली.

बाहेर गेलेले शेजारी एक एक करून परतले. कोणालाच काही माहिती नसल्याचे सांगून परत आपल्या घरी गेले. आता संध्याकाळ झाली होती.

निनादचा अजूनही पत्ता न लागल्यामुळे सगळ्यांचाच संयम सुटत चालला होता. पिंकीचे वडीलही परत आले होते, त्यांना अजून काहीच माहिती मिळू शकली नव्हती. सदानें आता रीतसर पोलिसात तक्रार करावी असेच त्यांचे म्हणणे होते. सदाचा मात्र त्याला साहजिकच विरोध होता. पिंकीच्या वडिलांनी सदाला आपले म्हणणे पटवण्याचा

पुरेपूर प्रयत्न केला.

"बाबा आले की मग निर्णय घेऊ." - सदा

सदानें वेळ मारून नेण्यासाठी उत्तर दिले. आता मात्र पिंकीचे वडील फार बोलू शकले नाहीत. निराशेनेच ते घराबाहेर पडले.

आता परत घरात केवळ तिघेच उरले होते, सदाचे वडीलही अजून परत आले नाही म्हणूनदेखील चिंता वाढू लागली होती. सर्वच ओळखितल्याना फोन करून झाले होते. पण कुठेच काही पत्ता लागत नसल्याने सगळेच हतबल झाले होते. कुमुद शेवटचा पर्याय म्हणून देव्हाऱ्यासमोर ठाण मांडून बसली. सदाची आई सदाजवळ बसून सदाला धीर देत होती.

"आई, मी खरच इतका वाईट आहे का?

मी निनादला चांगल्यासाठीच ओरडतो न?" - सदा

सदाच्या आईने त्याला अधिक न बोलण्याचा सल्ला दिला पण सदाचे मन अजूनही त्याला शांत बसू देत नव्हते. आपले नक्की काय चुकले हाच प्रश्न त्याच्या मनात राहून राहून येत होता.

"आई माझे नक्की काय चुकले?" - न राहवून त्याने आईला विचारले, आणि सदाच्या आईने मानेनेच नाही म्हणून सांगितले.

"नाही कसे? सदा चुकलेच तुझे." - सदाचे वडील ठणठणीत आवाजात म्हणाले. नुकतेच प्रतल्यामुळे अजूनही ते दारातच उभे होते.

"अहो काय बोलताय तुम्ही?" - सदाची आई

"बरोबरच बोलतो आहे." - सदाचे वडील, त्यांचा आवाज इतका चढला होता की शेजारच्या लोकांना अगदी सहज ऐकू गेला असता.

"याला समजायला नको, उठसूट त्या मुलाला ओरडत असतो. अरे वेळेत उठतो, सगळा अभ्यास स्वतःहून पूर्ण करतो. शाळेतून कसली तक्रार नाही, किंवा त्याने इतर कुणाला त्रास दिला, खोड्या काढल्या म्हणूनही एकही तक्रार नाही. शिस्तीत घरी येतो, आई वडिलांचा आदर करतो, तुमचे सगळे नियम पाळतो. इतकेच काय त्याचे मित्र कोण असावेत हे देखील तुम्हीच ठरवायचे? त्याने काय खावे काय खाऊ नये हेही तुम्हीच ठरवायचे. अजून काय अपेक्षा आहेत याच्या? नाही आज मला कळुनच जाऊदे.

तुमच्या या असल्या वागण्याने माझा सोन्यासारखा नातू आज घर सोडून जाणार होता-" - सदाचे वडील रागाच्या भरात बोलत होते पण आपल्या हातून काहीतरी चूक झाली आणि नको ते शब्द बाहेर पडले हे समजून ते शांत झाले.

त्यांचे शेवटचे वाक्य मात्र कुमुदने अचूक पकडले होते.

"बाबा, जाणार होता? म्हणजे नक्की काय आता कुठे आहे तो? बाबा मला तरी सांगा?" - कुमुद अस्वस्थ होऊन प्रश्न करत होती.

"शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही सगळे आधी शांत व्हा." - कदम काका तिथे आले होते. सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते.

"गिरी.. शांत हो पाहू. अरे किती ओरडतो आहेस."

"भाऊ आजपर्यंत या मुलावर मी कधी हात उचलला नव्हता रे. पण आज मात्र मला माझा नियम मोडावा असे वाटते आहे." - सदाचे वडील कदम काकांना म्हणाले.

"समजतंय मला, पण शांत व्हा. सगळे शांत झाल्याशिवाय पुढे बोलण्यात काहीच अर्थ नाही.

तुम्ही सगळे शांत झालात की मगच मी तुम्हाला सगळी हकीकत सांगतो. अगदी निनाद कुठे आहे ते सुद्धा." - कदम काका

त्यांच्या या वाक्याचा अपेक्षित परिणाम झाला. निनाद कुठे आहे हे जाणून घेणे सगळ्यांनाच गरजेचे होते, त्यामुळे सर्वांनीच आपल्या भावनांना आवर घातला. आणि थोड्याच वेळात परिस्थिती अटपक्यात आली.

"गिरी.. एक काम कर. निनादची चिट्ठी सदाला दे. ती वाचल्यावर आपले काय चुकले हे आपसूकच त्याला कळेल." - कदम काका शांतपणे म्हणाले.

"काय बोलताय तुम्ही? कसली चिट्ठी?" - सदा आणि कुमुद जवळ जवळ एकत्रच म्हणाले.

कदम काकांनी हातानेच शांत व्हा अशी खूण केली आणि सदाच्या वडिलांनी त्यांच्या सदऱ्याच्या खिशातून एक चिट्ठी बाहेर काढली.

सदानें पटकन वक नजर चिट्ठीवरून फिरवली आणि त्याला अश्या लगेच समजला.

ती चिट्ठी निनादची त्याच्या हस्तक्षरात लिहिली होती, त्याला निकालाची वाटणारी भीती स्पष्ट व्यक्त केली होती, त्याचबरोबर जर मार्क कमी पडले तर सदासमोर कसे उभे राहायचे अशी काळजीही व्यक्त केली होती. त्याचबरोबर त्याचा सदा आणि कुमुदवर असणारा विश्वास व्यक्त केला होता. सर्वात धोकादायक शेवटची ओळ होती. त्यात त्याने जर मार्क कमी पडले तर घरी न परतण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला होता.

सदा ती चिट्ठी वाचून भडाभडा रडू लागला. सदाच्या वडिलांना संताप अनावर होत होता.

कदम काकांनीच दोघांनाही शांत केले.

"हे बघ सदा, निनादच्या परीक्षेचा आजचा निकाल म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्या दोघांचीही परीक्षाच होती. निनाद त्याच्या परीक्षेत नापास झाला असता तर फार तर त्याचे एक वर्ष वाया गेले असते, पण तुम्ही नापास झाला असता तर मात्र तुम्हाला निनादलाच गमवावे लागले असते. या निकालाच्या परीक्षेत तुम्ही आज नापास होता होता वाचला आहात. गिरीच्या हातात वेळीच ही चिट्ठी पडली आणि त्याने मला निरोप दिला. मी स्वतःच शाळेत जाऊन निनादला चॉकोलेट दिले आणि घरी घेऊन आलो. आताही तो माझ्या घरीच आहे.

खरे तर गिरी आणि मी त्याला तुझ्यासमोर आज आणणारच नव्हतो, रागाच्या बाबतीत हा गिरीधर तुझा बाप आहे बर का. मला त्याने जाम बजावले होते काही झाले तरी त्याने सांगितल्याशिवाय निनादला आज घरी परत सोडायचे नाही. पण पिंकीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार करायचे म्हणल्यावर मात्र आम्ही फार काही ताणले नाही आणि सगळे सत्य तुमच्यासमोर मांडले.

आता तू शांत झाला असशील, निनादच्या निकालाला योग्य पद्धतीने हाताळणार असशील तर मी निनादला आणतो.

नाही नाहीतर तो बिचारा परत घाबरून जायचा." - कदम काका

"काही गरज नाहीये त्याची, याला चांगली अद्दल घडलेच पाहिजे." - सदाचे वडील

"काका खरेच सांगतो, मी तयार आहे. आज पर्यंत वडिलांचा शब्द खाली पडू दिला नाही, आताही पडू देणार नाही. आता मात्र मी या निकालाच्या परीक्षेत चांगल्या मार्कानेच उत्तीर्ण होईल." - सदा

"सदा, झाड जर मोठे वाढवायचे असेल तर त्याला ऊन, पाऊस, वारा सगळेच योग्य प्रमाणात लागते. त्याची मुळे चांगली घट्ट असावी लागतात. याला अनुसरूनच जगाचा एक साधा नियम आहे, एका झाडाच्या सावलीत दुसरे झाड कधीच मोठे होत नाही. पालकत्वाच्या बाबतीत हा नियम नेहमीच लक्षात ठेव. बाकी तू सूज्ञ आहेसच." - इतके बोलून कदम काकांनी सदाची पाठ थोपटली आणि निनादला घेऊन येण्यासाठी घरी परतले.

काहीच क्षणात निनाद घरी परतला होता, सदा आणि कुमुद त्याला परत परत कवटाळून भेटत होते, कदम काका आणि गिरीधर कुलकर्णी निकालाची परीक्षा पाहून दुरूनच हसत होते.

समाप्त.

स्वप्निल तिखे.