बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट भाग २
सुरतेच्या आसपास तिन्ही बाजूला समुद्र...पूर्ण भारतवर्षात पसरलेले मोगली साम्राज्य...एकसो एक शूर सरदार...लाखो सैन्य...घोडं-दळ,पायदळ,शेकडो जहाज ... अगणित संपत्ती... आणि त्यांचा शहेनशहा ..."औरंगजेब"... मग कोण नजर वर करून बघणार अशा सुरतेकडे...कोण बघणार ??? सह्याद्रीच्या शिवाचा तिसरा डोळा आता उघडला होता आणि औरंगजेबाच्या सुरतेवर फिरत होता...काही दिवसातच सुरत पेटणार होती ... बहिर्जी नाईक सुरतेच्या पोटात शिरले होते....नव्हे शिवाचा तिसरा डोळाच सुरतेतून फिरत होता....
कधी भिकारी, कधी व्यापारी, कधी फकीर,कधी सैनिक,कधी मजूर, कधी सैनिक अश्या हजार वेषात बहिर्जी आणि त्यांचे साथीदार सुरतेत जवळजवळ महिनाभर फिरत होते....कुठे जास्त घबाड सापडेल,कुठे अजिबात जायचे नाही...कुठच्या व्यापाऱ्याच्या महालात तळघर आहे...कोणच्या घरात तिजोरी भरभरून वाहत आहे...कुठे लपण्याच्या किंवा लपवण्याच्या जागा आहेत...कुठे चोरवाट आहे...कुठे छोट्या छोट्या गल्ल्या, कुठे मोठेमोठे रस्ते...कुठे दुकाने आणि गोदामे आहेत...कुठच्या दुकानात काय दडले आहे...हे सर्व बहिर्जी पाहत होते...आणखी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली...ऐकीव माहिती प्रमाणे जवळ जवळ ४ ते ५ हजार सैनिक...सुरतेच्या रक्षणाकरिता तैनात केले होते, पण महिनाभर सुरतेत फिरूनसुद्धा त्यांचा ठाव ठिकाणा किंवा त्यांचे काहीच अस्तित्व दिसत नव्हते....मग गेले कुठे ???
त्याचे उत्तरही लगेच मिळाले ....बहिर्जीच्या साथीदारांनी खुद्द सुभेदाराच्या महालात जाऊन माहिती काढली होती.... ४ ते ५ हजार सैनिक फक्त नावालाच होते...प्रत्यक्षात सैनिक होते १ ते २ हजार...५ हजार सैनिक दाखवून सुभेदार इनायत खान...त्यांचा पैसा लाटत होता... बहिर्जी मनातल्या मनात खूष झाले...तिथे लढाई करायला सुद्धा सैन्य नव्हते.. सगळी तयारी झाली होती... आता एक शेवटचा डाव टाकायचा बाकी होता....
एके दिवशी बहिर्जीनी त्यांचा साथीदारांना वेशीबाहेर जंगलात भेटायला सांगितले....आणि एक डाव रंगला...पूर्ण सुरत शहर झोपले होते...आणि अचानक घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू यायला लागला...आणि त्यापाठोपाठ " हर-हर महादेव" च्या घोषणा...कोणाला काय होते ते कळेचना असा कसा शिवाजी आला... इतक्या लांब...भूत विद्या अवगत आहे का त्याला...बहिर्जी चे साथीदारांनी काम चोख बजावले होते...सुरतेत गडबड चालू झाली...काळोख्या रात्री दिवस झाला...जो तो व्यापारी बैलगाड्या भरून आपला खजिना सुरतेच्या बाहेर काढला...आणि भरूच शहराच्या दिशेने पळायला लागले..बहिर्जी गुपचूप त्यांच्यावर लक्ष ठेवून होते...अर्धाहुन सुरतेचा खजिना आता भरूच शहरात आला होता...कोणी पहारेकरी नाही...किल्ला नाही.. सैन्य नाही...बस्स न लढता असा खजिना मिळाला तर काय भांडायची गरज होती...बहिर्जीनी तिथे आपले हेर पेरून ठेवले.... हि अशी गम्मत बहिर्जी नी पुढच्या महिन्याभरात अजून दोन तीनदा करून पहिली...कुठे खजिना जातो?? कुठच्या रस्त्यानं जातो?? सगळे पाहून ठेवले...
आता " शिवाजी आला .. शिवाजी आला " ऐकून सुरत मधील व्यापारी पण निवांत झाले होते...तत्यानां समजून चुकले होते कोणीतरी आपली गंमत करतेय.... पण खरी गम्मत तर बहिर्जी आणि राजे करणार होते... सुरत खरोखरीच लुटली जाणार होती... " हर-हर महादेव" च्या घोषणा. खरोखरीच होणार होत्या...सगळी बित्तम बातमी काढून बहिर्जी आणि त्यांचे काही साथीदार राजगडाकडे दौडत सुटले होते... भिवजी आणि जिवाजी राज्यांच्या स्वागतासाठी पाठीच थांबले होते... थोड्याच दिवसात "सुरत" बेसुरत होणार होती...दख्खन चे वादळ धडकणार होते...
एक मराठा सरदार ...राजांना भेटायला आला होता...स्वराज्याच्या सेवेसाठी स्वतःला हाजीर करण्याचा मनसुबा होता...काही छोटे मोठे नजराणे आणले होते...योग्य ती चाचपणी केल्यानंतर त्याला महाराजांसमोर उभे करण्यात आले...त्याने स्वतःचा मनसुबा पूर्ण राजसभेसमोर सांगितला...आणि निघता निघता राजांना आपल्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले....त्यातील मजकूर काहीसा असा होता... " नवरी मुलगी दागदागिने परिधान करून आणि नटून थटून तयार आहे... राजे तुमच्या आशीर्वादाची शुभ कार्य सुरळीत पाडण्यासाठी गरज आहे...सर्व काही आलंबेल आहे...वऱ्हाडी आणि वाजंत्री यांची योग्य ती सोय केलेली आहे तेव्हा तुम्ही आणि तुमचे समस्त कुटुंब लग्नाला चला...लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला"... तो मजकुर वाचून राजांच्या चेहऱयावर स्मित रेषा उमटली आणि राजांना कळून चुकले तो मराठा सरदार दुसरा तिसरा कोणी नसून आपला बहिर्जीच आहे...
आमंत्रणं तर आले होते आता लगबग करायला हवी होती...मुहूर्त चुकता काम नये...राजांनी आपल्या साथीदारांना आदेश दिला ५ दिवसांत...नव्या कामगिरीवर निघायचे आहे...लगबग सुरु झाली...अवघ्या ५ दिवसांत...उत्तोम उत्तम ६ हजार घोडेस्वार आणि अजून जास्त १ ते २ हजार घोडे तयार झाले... पण दिवसाउजेडी निघणे धोकादायक होते...जवळचं जसवंतसिंग कोंढाण्याला १० हजार सैन्यासह वेढा घालून बसला होता... तो जर सामोरा आला असता तर सर्व काही फसले असते...तेव्हा रोज दोन हजार सैनिक असे तीन दिवस ...बहिर्जीनी शोधलेल्या जंगलातल्या वाटेवरून...जसवंतसिंग आणि त्याच्या सैन्याच्या नजरेपासुन आणि वेढ्यापासून दूर एका गुप्त ठिकाणी थांबले होते....
राजे स्वतः आणि काही निवडक साथीदार आणि बहिर्जी नाईक वेष बदलून २ हजार घोडयांसकट मुख्य रस्त्याने निघाले... कोणी विचारले असता ते सांगत...खुद्द औरंगजेबाला हा घोडयांनाचा नजराणा पेश करण्यासाठी चाललो आहोत...मग कोण हो अडवणार त्यांना...कोणाला बादशाही मर्जी खप्पा करून घ्यायची हिम्मत होती....दोन दिवसांनी राजे आणि ६ हजार घोडेस्वार एका ठिकाणी जमा झाले...आणि तिथुन ठरल्याप्रमाणे त्र्यम्बकेश्वर मंदिराच्या दिशेनं कूच केली...राजांनी आणि मावळ्यांनी दर्शन घेतले...आणि निघता निघता बहिर्जी आणि त्यांच्या साथीदारांनी एकच अफवा सोडून दिली... औरंगाबादवर चढाई करायला चालो आहोंत...तेव्हा नुकताच शहाजादा मुज्जम तिथे रुजू झाला होता... त्याला हि बातमी समजली आता आपल्याला शौर्य दाखवायची मोठी संधी चालून आली आहे...आणि सिहासनावर हक्क दाखवायला संधी चालून येत होती...आणि मुज्जम च्या आदेशानुसार सर्व सरदार आणि सैन्य औरंगाबादच्या वेशीवर जमा झाले...राजांचे स्वागत करायला...पण राजे तिथे कुठे येणार होते...ते तर निघाले सुरतेला ...सर्व मोकळा रस्ता मिळाला.. जे काही मोगली ठाणी होती तिथे नाममात्र सैन्य होते...त्यांना तेच कारण सांगत होते औरंगजेबाला मुजरा पेश करायला चालो आहोत... इथे शहाजादा मुज्जम ला काही कळेचना हे मराठे येत का नाही...जागा सोडू शकत नाही...मराठे म्हणजे भुते कुठूनही उगवतील...
मजल दरमजल करत राजे, बहिर्जी आणि ती ६ हजार सह्याद्रीची भुते सुरतेपासून आत फक्त २ ते ३ मैलाच्या अंतरावर पोहचली होती...अजूनही कोणाला थांगपत्ता लागला नव्हता...सुरतेत सकाळ होत होती...आणी अचानक कल्ला वाढला..सोने ,नाणे लपवायला हि वेळ नव्हता... मराठयांची छावणी अचानक एका रात्रीत उगवली होती...काहींचं समजत नव्हते...हि भूत एवढ्या लांब आलीत कशी...मोठमोठे व्यापारी घाबरून इनायत खानाच्या आश्रयाला आले होते... तेवढ्यात राजांचे खंडणीचे चे पत्र इनायत खानाला पोहचते झाले...त्यात बहरजी बोहरा, हाजी कासम , हाजी बेग आणि अब्दुल जाफर आपली नवे ऐकून रडायलाच लागले ...त्यांना आपली नावे समजलीच कशी...त्यांना खंडणी ठरवण्यासाठी पाचारण केले होते ...नाहीतर दुपारनानंतर...सुरत बदसुरत होणार होती....पण कोणी आलेच नाही...उलट राजांनी पाठवलेल्या स्वारालाही धमकी देऊन पाठवले गेले...मग काय आदेश होताच हरहर महादेवच्या गजरात सुरवात झाली...बहिर्जी आणि त्यांच्या साथीदारांनी कुठे कुठे खुणा करून ठेवल्या होत्या...ती घरे, दुकाने, गोदामे सर्वप्रथम लुटली गेली..मंदिरे,चर्च, मशिदी आणि स्त्रिया आणि मुले यांच्याकडे चुकूनही कोणी डोळां वर करून पहिले नाही आणि काही सद्गृहस्थ आणि दानशूर व्यापारी...यांना कोणीही हात लावला नाही...महाल..घरे.. गोदामे.. वखारी तीन दिवस जळत होत्या...होत्या चे नव्हते झाले होते...कित्येक कैदी झाले होते...त्यातच इनायत खानाने राजांवर मारेकरी पाठवण्याच्या मूर्खपणा केला होता...त्यामुळे अजून चवताळून मराठे जे दिसेल त्याला आग लावत होते...सहयाद्रीच्या शिवाचा तिसरा डोळा आता उघडला होता... सुरतेत आता फक्त अग्नी तांडव करत होता... खूप सारी खंडणी राजांनी आता गोळा केली होती...तेवढ्यात बहिर्जींच्या साथीदारांनी खबर आणली...कोणी एक मोगली सरदार सुरतेच्या दिशेने येत आहे...लढाई करायला वेळ नव्हता.. मग काय जेवढे गोळा झाले होते तेवढे घेऊन राजे आणि बहिर्जीं आणि ती भुते राजगडाच्या वाटेला लागले...दिवसा आराम आणि रात्री प्रवास करून राजे आणि खजिना ...राजगडाच्या पायथ्याशी आला होता...
बहिर्जी नाईक, जिवाजी ,भिवाजी आणि त्यांचे हेरखातं...राजे ,राजगड आणि सह्याद्री आता निवांत झाले होते...राजा सुखरूप आला होता.....बहिर्जीनी मोठी कामगिरी बजावली होती....
खरंच सर्व काही निवांत होते ???....नव्हे सुरतेची बातमी कशी लपून राहील बादशाह पासुन...मिर्झा राजे जयसिंग नावाचे वादळ आता सहयाद्रीच्या दिशेनं तुफान वेगात सुटले होते...खुद्द राजांना औरगंजेबासमोर पेश करण्यासाठी ...तेव्हा तर बहिर्जीना जीवनातली सर्वात मोठी कामगिरी पार पाडायची होती...
समाप्त...