Paris - 3 in Marathi Travel stories by Aniket Samudra books and stories PDF | पॅरिस – ३

Featured Books
Categories
Share

पॅरिस – ३

०७ मे, २०१८

एअरपोर्ट वरचे फ्री-वायफाय पकडून सगळ्यांना व्यवस्थित पोचल्याचे कळवून टाकले. बाहेर कुठून पडायचे वगैरे बघत असतानाच शेजारी चालू असलेल्या जाहिरातींच्या होर्डिंगकडे लक्ष गेले. बेल्जीयम च्या ब्रुज गावाची काही चित्र त्यावर झळकत होती. हो, तेच बेल्जीयमचे चॉकलेटसाठी प्रसिद्ध असलेले ब्रुज.

छोटे छोटे रस्ते, टुमदार घर आणि दुकानं, भली मोठ्ठी चर्च, सर्वत्र गर्द झाडी आणि ह्या सगळ्यांमधून वाहणारा कॅनाल. त्या कॅनाल मध्ये पोहणारी बदकं, फुलांचे ताटवे..

“Wow.. is this for real?”,असंच काहीसं क्षणभर वाटुन गेलं. पटकन तिथलं ब्रोशर उचललं आणि बाहेर पडलो.

काचेचं सरकतं दार उघडलं आणि गरम हवेचा एक झोत अंगावर आला. मी आणि बायकोने चमकून एकमेकांकडे बघितलं. बॅगेतले गरम कपडे, जॅकेट्स, थर्मल वेअर सगळं सगळं आठवलं. आता?????

पण तेवढ्यात टॅक्सी आली. बऱ्यापैकी आजोबांच्या वयाचा ड्रॉयव्हर होता, अंगात काळा कोट आणि डोक्यावर फेडोरा. इंग्लिश काही घंटा कळत नव्हतं त्याला. मोबाईलवर दाखवलेला पत्ता त्याने जीपीएस मध्ये टाकला आणि आम्ही निघालो.

स्वच्छ, चकाचक गाड्या, बसेस, ट्रक रस्त्याने कुर्म गतीने चालल्या होत्या, जणू कुणाला कुठे जायची कसलीच घाई नव्हती, जसं काही सगळेजण वेळेच्या २-३तास आधीच निघाले होते. ४-५ लेन्स चा रस्ता असूनही अतिसंथ वेगाने गाड्या चालल्या होत्या. आमचे ड्रॉयव्हर आजोबा फ्रेंच भाषेत बाहेरच्या इमारतींकडे बोट दाखवून काही बाही दाखवत होते.

“No French.. only english.. english”, म्हणूनही त्यांना काही फरक पडला नव्हता.

गाडीचा स्पीड-काटा काही ४०-५० सोडायला तयार नव्हता. मला फ्रेंच येत असते तर कदाचित म्हणालो असतो, “अहो आजोबा, ह्या स्पीडने तर आमच्या इकडे पोरं पेठांमधून गाड्या पळवतात.. घ्या कि जरा स्पीड”..

शेवटी एकदाचा तो हायवे सोडून गाडी पॅरिसच्या आम्ही जेथे राहणार होतो त्या रेसिडेंशिअल भागात शिरली. छोटे छोटे रस्ते, बसकी घरं, मोठं मोठ्या, झाडं फुलांनी वेढलेले रस्त्याचे किनारे ह्याने साधी साधी गोष्ट सुद्धा सुंदर दिसत होती. पत्ता लगेचच सापडला. दणक्यात ४४.२५ युरो आणि वर ७५ सेंट्सची घसघशीत टीप देऊन आम्ही अपार्टमेंट मध्ये शिरलो. हॉलमधून बाल्कनीत आलो आणि जवळ जवळ किंचाळलोच.. दुर अंतरावर आयफेल-टॉवर दिसत होता. आयफेल-टॉवरची तीच खासियत आहे.. पॅरिस मध्ये कुठेही जा, तो दिसतोच.. Like.. its walk with you…

पण लगेच स्वाती-ताईने आम्हाला जाणीव करून दिली.. “बाबांनो तुम्ही आता पॅरिस मध्ये आहेत.. हळू बोला जरा.”

दोन मिनिटांतच जाणीव झाली, खरंच सारं किती शांत शांत होतं, कानावर असं दडपण आल्यासारखं झालं. इतक्या शांततेची सवय नसते आपल्याला. कसलाच आवाज नाही, जणू एखाद व्हॅक्युम..

चहापाणी झालं आणि जरा हुरूप आला. पॅरिस आपल्यापेक्षा साडे-तीन तास मागे, म्हणजे फार काही नाही, जेट-लॅग वगैरे काही प्रकार नव्हता. स्वातीताईने पहिल्यांदा आमचे पास हातात दिले, पुढच्या ८-१० दिवसांसाठी कुठलीही बस, कुठलीही मेट्रो, ट्राम कश्यातूनही, कितीही वेळा फिरा.. हा पास त्यासाठीच.

आम्ही सगळे फ्रेशच होतो.. “चला तर मग, लगेच श्रीगणेशा करुया..” म्हणून थोडंफार आवरलं आणि लगेचच बाहेर पडलो. तुरळक वाहतूक सोडली तर रस्ता बऱ्यापैकी ओसाडच होता. रस्त्याच्या अगदी कडेला चिल्ली-पिल्ली गोरी गुबगुबीत पोर आपल्या रंगेबिरंगी सायकली आणि स्केट्स शूज घालून खेळत होती. त्यांच्या आई बापाला आपलं पोरगं रस्त्यावर जाईल वगैरे काही फिकीरच नव्हती. आणि त्याचं कारण मला काही क्षणातच मिळालं . आम्हाला रास्ता ओलांडून पलीकडे जायचं होत, समोरून एक मिनी-कूपर येत होती म्हणून थांबलो… पण पुण्याची सवय, फुटपाथ वापरायचे नाहीत, मी रस्त्यावरच थांबलो, तर तो गाडीवाला चक्क २५-३० फूट अलीकडेच थांबला आणि मुख्य म्हणजे त्याचा सिग्नल हिरवा दिवा असताना सुद्धा.

स्वातीताईने सांगितले, इथे रस्त्याने चालणार किंग असतो. कोणीही असो आणि कुठलीही गाडी असो, तुम्ही रास्ता ओलांडणार असाल तर ते थांबणार म्हणजे थांबणार. मग भले त्याचा हिरवा सिग्नल असो कि अजून काही. फार मोठा आश्चर्याचा धक्का होता तो आणि त्याची सवय होईपर्यंत अनेक गाडीवाल्यांना आम्ही नंतर असेच ताटकळत ठेवलं होतं. आम्हाला रस्ता ओलांडायचाय म्हणून ते बिचारे थांबायचे आणि आम्ही आपलं ‘पहले आप.. पहिले आप’ करत बसायचो.

बस-स्टॉप वर डिजिटल बोर्डवर पुढच्या येणाऱ्या बस, त्यांचे नंबर्स आणि वेळ दर्शवत होते. २ मिनिटांची वेळ होती आणि २ मिनिटांत बस आली सुद्धा. ड्रायव्हरच्या बाजूलाच एक डिव्हाईस लावले होते ज्याला पास लावून आत जायची पद्धत होती. ज्यांच्याकडे पास नव्हता ती लोक सुटते पैसे ड्रायव्हरशेजारच्याच एका कंपार्टमेंट मध्ये टाकत होते आणि मुख्य म्हणजे दिलेले पैसे बरोबर आहेत कि नाही हे बघायची तसदी सुद्धा तो घेत नव्हता. बस किमान ५०-६० सीटर इतकी मोठी होती, पण आतमध्ये सीट्स मात्र फार तेर १५-२० असावीत, बाकीची जागा मोकळीच होती. सीट्स रिकामी असून सुद्धा अनेकांनी उभं राहूनच प्रवास करायला पसंती दिलेली दिसली. स्टॉप वर थोडीफार जरी वृद्ध स्त्री बसमध्ये शिरली तरी अनेक जण तिला आपले सीट मोकळं करून देत होते. बसचा एक कोपरा हा विकलांग लोकांसाठी राखीव ठेवला होता.. समजा कोणी व्हील-चेअर घेऊन बस मध्ये शिरलं तर त्यासाठी.

बस फक्त मुख्य स्टॉपलाच थांबे. पुढचा स्टॉप कुठला हे एका डिजिटल बोर्ड वर बसच्या अंतरंगात सतत झळकत असे. समजा तुम्हाला मधल्याच एखाद्या स्टॉपला
उतरायचे असेल तर, बस मध्ये दोन ठिकाणी, पुढे एक आणि बसच्या मध्ये एक, लाल बटण दिलेले होते. ते बटण दाबले कि ड्रायव्हरच्या समोरच्या बोर्डवर मेसेज झळकायचा ‘अर्रेट डिमांड’ आणि मग तो बस थांबवायचा.

सगळं यांत्रिक, कुणाला कुणाशी बोलायची गरजच नाही. सगळ्या बस हायब्रीड, बसचा आवाजच नाही, आपल्या लोकलट्रेन्स जश्या पिक-अप घेतात तसा पिक-अप. सगळ्या काचेच्या खिडक्या बंद, उघडायची सोयच नाही. कुणाचा कुणाशी संवाद नाही, बसमध्ये जो तो मोबाईलमध्येच घुसलेला. काही वेळातच आमचा स्टॉप आला आणि आम्ही खाली उतरलो.

आम्ही La Defense ह्या भागातील Grande Arche नामक ठिकाणी पोहोचलो होतो. १९८२ साली म्हणे एक नॅशनल डिझाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्याचा एक भाग म्हणून Grande Arche हि वास्तू बांधायला सुरुवात केली. १९००च्या शतकात बांधली गेली म्हणून ऐकली पॅरिसमधली माझ्यादृष्टीने ही पाहिली आणि शेवटची बिल्डिंग. बहुतेक सगळ्या इमारती ह्या १८०० किंवा त्याही आधीच्याच काळातल्या होत्या.. अर्थात त्याबद्दल सविस्तर नंतरच्या भागात.

काहीतरी काम चालू असल्याने मोठं मोठ्या सळया आणि बांबू लावलेले होते, सो त्या फोटोत मजा नाही आली, म्हणून ह फोटो महाजालावरून घेऊन टाकत आहे.

Copyright to the owner, taken from internet

तर, ह्या Grande Arche ला अनेक लोक Modern Arche असेही संबोधतात. ह्याच्या बरोब्बर समोर पॅरिसचा तो सुप्रसिद्ध Arc de Triomphe दिसतो. Grande Archeचा आकारही काहीसा तसाच करण्यात आला आहे. ह्या इमारतीमध्ये अनेक शासकीय, निम-शासकीय आणि खाजगी कार्यालय आहेत. Grande Arche काही अंशानी तिरका उभारण्यात आला आहे आणि ह्याच कारण म्हणजे ह्या भव्य वास्तूच्या बरोब्बर खालीच एक मेट्रो-स्टेशन आहे. पॅरिस मधली बहुतेक सर्व मेट्रो स्टेशन्स हि भूमिगत आहेत आणि एक-दोन नाही तर चक्क ५-६ लेव्हल्स खाली. अर्थात, ह्याबद्दलही पुढच्या भागांत सविस्तर लिहिणार आहेच.

Grande Arche च्या समोर अतिभव्य मोकळी जागा होती. अनेकजण सायकल वर स्टंट्स, स्केट्स किंवा इतर खेळ खेळण्यात मग्न होते. आजूबाजूला शॉपिंग मॉल्स, चकाकत्या उंचच उंच इमारतींचे कॉर्पोरेट कार्यालय होती. सगळंच छान होत, पण मनाला भावणार नाही. हे सर्व पॅरिसच्या प्रतिमेच्या अगदीच विरुद्ध होतं, मनात बसलेल्या पॅरिसच्या एकदम वेगळं. वाटलं हे मॉडर्नायझेशन थांबायला हवं, पॅरिसने जो १७००-१८०० सालच्या वस्तूंचा इतिहास, त्याच सौंदर्य जपलं आहे तेच पॅरिसला त्याची वेगळी ओळख करून देतं.

जरावेळ बसून मग आजूबाजूचा पॅरिस न्याहाळायला पुढे चालू लागलो. सहज घड्याळात बघितले, रात्रीचे ८.३० वाजून गेले होते, परंतु इथला उन्हाळा नुकताच सुरु झाला होता आणि त्यामुळे रात्री १०, १०.३० पर्यंत व्यवस्थित उजेड राहायचा. हे सगळे फोटो असे रात्री ९- ९.३० वाजताच काढलेले आहेत. अर्थात आम्हाला असा दिवस मोठ्ठा असण्याचा खूप फायदा झाला, उशिरापर्यंत फिरता आलं, अर्थात त्यामुळे काही टेन्शन-वाल्या गंमती पण झाल्या.. पण त्याबद्दल हि पुढच्या काही भागात.

तिथूनच पुढे असणाऱ्या बागेत बसून थोडी पेट पूजा केली. एवढ्या वेळातच सायकल वरच प्रवास करणारे अनेक जण दिसले. क्लासेसला जाणारी लहान मुलं, कॉलेज गोइंग टिन-एजर्स, ब्लेझर्स घालून ऑफिसमधून परतणारे, व्यायामासाठी बाहेर पडलेले अनेक. काही लोकं तर चक्क आपल्याकडे ती तीनचाकी हॉपिंग स्कुटर असते ना, तशी दोन चाकांची हॉपिंग स्कुटर घेऊन फिरताना दिसत होते, ह्यातही अनेक जण फॉर्मल्स, ब्लेझर्स घातलेले होतेच. कित्तेक नवीन नवीन आई झालेल्या मुली सायकलच्या मागे छोटे सीट लावून त्यात आपल्या तान्हुल्याला ठेवून फिरत होत्या. खूप मस्त वाटलं.

बागेत काही जोडपी मुक्तपणे एकमेकांची चुंबन घेण्यात मग्न होती. पहिल्या पहिल्यांदा मुलांचं लक्ष विचलित करून त्यांना आम्ही इकडे तिकडे काही तरी दाखवायचो.. पण एकूणच हा प्रकार नित्याचाच असल्याने नंतर सोडून दिलं. पॅरिसला फ्रान्सची, फॅशनची ह्याबरोबरच पप्प्यांची राजधानी म्हणलं तरी वावगं ठरू नये. अर्थात हा प्रकार खूपच क्लासी होता, त्यात कुठेही सेक्सयुअल, किंवा व्हल्गर्ल नव्हतीच.

१० वाजून गेले तेंव्हा कुठे सूर्याने मावळतीचा रस्ता पकडला. हवेत अचानकच प्रचंड गारठा पसरला होता. २४तासांचा प्रवासाचा थकवाही जाणवू लागला होता. म्हणून मग परतीचा रस्ता धरला.

गल्लो-गल्लीतले रस्त्याच्या कडेचे रेस्टोरंटस गजबजलेले होते. पॅरिसमधले हे असे रोड-साईड कॅफे खूप छान वाटायचे. आजूबाजूचे रस्ते इतके छोटसे आणि छान होते. हे रस्ते आणि असे रोड-साईड कॅफे पॅरिसची खासियत आहे. तो जो फील आहे ना, मला नाही वाटत कुठल्या फोटोंमधून तो व्यक्त करता येईल.. म्हणलं ना, पॅरिस सुंदर आहेच, पण पॅरिस एक अनुभव आहे, तो घेतल्याशिवाय त्याची मजा नै कळायची.

घरी परतलो, फ्रेश होऊन गप्पांची फड जमली. गप्पांमध्ये बृजचा विषय निघाला तेंव्हा कळले अरे, ते तर इथून बसने फक्त ४-५ तासांवर आहे. इतके सुंदर ठिकाण पाहायचा मोह सोडवत नव्हता. तिकीट-दर बऱ्यापैकी जास्ती होता, त्यासाठी बजेट पण प्लॅन नव्हते केले, पण आता आलोच आहे.. तेव्हढंच बेल्जीयम पण बघणं होईल म्हणून करुन टाकलं बुकिंग. बस दुसऱ्या दिवशी सकाळी ७ची होती आणि आत्ताच १२ वाजून गेले होते.

नुकताच २४तास प्रवास करून आलो होतो.. परत उद्या ८-१० तास प्रवास होणार होता म्हणून मग गप्पा पटकन आवरत्या घेतल्या आणि अंथरुणाला पाठ टेकवली.. चलो बेल्जीयम म्हणत..

[क्रमशः]