पॅन्टवाली मुलगी
रसुलवाडी डोंगर कपारीतले एक गाव. 500 घराचा उंबरा. वाडी असली तरी शहरीकरणाच्या छायेतले गाव. मातीच्या सारवाव्या लागणाऱ्या भिंती जाऊन सिमेंट काँक्रीटचे बंगले उभे राहिलेले. गावानं गावपण मात्र जपलेले. आठरा पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. बारा बलुतेदारानी आपली बलुतेदारी कायम ठेवलेली. लोहार, चांभार, शिंपी, बामण, वाणी, न्हावी समदी मंडळी एकोप्याने रहात होती. गावाला पण निसर्गाने आगळे वेगळे लेणे बहाल केले होते. गावाच्या एका टोकाला नदी होती. ती बारमाही दुथडी भरून वाहत होती. नदीकाठावर चार पाच पुरातन मंदिरे होती. वर्षातून एकदा गावजत्रा भरत होती. जत्रेला हौशे, नवशे, गवशे समदे येत होते. नदीकाठाला गावस्वरूपी एकच स्मशानभूमी होती. गावातले कधी कोण गचकले तर येथे गर्दी होत असे नाहीतर चिटपाखरूही तिकडे फिरकत नसे. गावात छोटी ग्रामपंचायत होती. लहान मोठी दुकान, हॉटेल, टपऱ्या, होत्या.
गाव तस चांगलं होत. लिहण्या वाचण्या इतपत पोर बाळ, म्हातारी कोतारी शिकलेली होती. बारावी पर्यंत शाळा होती. कॉलेजला मातूर तालुक्याच्या गावाला जावं लागायचं. मास्तर मंडळी गावतलीच होती. शाळा सुटली की ते पोटासाठी शिकवण्या करायचे. पाटील, सुतार, कुलकर्णी, इनामदार यांची चारपाच घर जरा पुढारलेली होती. गावात एकोपा असल्याने एकच पाणवठा होता.
गाव छोटं असल्यानं गावात जरा जरी कोठे खुट्ट झाला तरी लागोलाग ते समद्या गावाला समजायचं. म्हातारी माणसं दिवसभर पारावर पडून असायची. नजरा कमी झाल्या असल्या तरी नवखा कोणी गावात आला की यांच्या भुवया उंचावल्या जायच्या. गावात आधुनिकतेचे वारे अजून तरी आले न्हवत. बायां लुगडं, साडी, चोळी, यातच होत्या. गाऊन, मिडी मॅक्सी, स्लीव्हलेस नायटी असले प्रकार गावात आले न्हवते.
म्हाताऱ्या बायका नऊवारी नेसायच्या. तरण्या बाया सहावारी घालायच्या. बायांनी अंग उघड ठेऊन फिरणे दुरचीच गोष्ट. बायांची अंग पूर्ण वस्त्रांनी झाकलेली असल्यानं गड्यांच्या नजरा भिरभिरत न्हवत्या. शाळेतल्या पोरींना पण अंगभर ड्रेस होता. त्यामुळे गावात टीव्ही आलं, मोबाईल आलं, तरी त्यांच्यात मात्र काहीही फरक पडला नाही.
एक दिवस मात्र इपरितच घडलं. सकाळची दहा वाजण्याची येळ. गावात येणाऱ्या पहिल्या एस.टी च आगमन झाल. गाडी थांबली. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिण्यासाठी टपरीवर गेलं. गाडीतन प्रवाशी खाली उतरू लागलं. त्यातच एक पॅन्टवाली पोरगी उतरली अन समध गाव खडबडून जाग झालं. पॅन्ट टी शर्ट डोळ्याला गॉगल लावलेली पोरगी पहिली अन जो तो गाडीच्या दिशेने धावू लागला.
भुवया कोरलेल्या, बसक्या नाकाची, नाकात बारीकशी चमकी, गोरीपानं, गुबगुबीत गाल, केसाचा बॉंबकट, भरगच्च छाती, पांढरेशुभ्र दात, चालताना पुढं माग लयबध्द हालचाल करत एक पाखरू गाडीतन उतरलं. अवघे गाव तिच्याकडे पहातच बसलं. एक इरसाल म्हातार पुढं आलं अन म्हणाले, “ काय ग पोरी. कुठंन आली. नाव काय तुझं? “
पोरगी मोठी बनेल होती. म्हाताऱ्याच्या नजरेतला भाव तीन ओळखला. ती म्हणाली,” आबा मी इगतपुरीची. नाव हाय संगिता. मला संगी नावानचं समदी ओळखत्यात. “
तिन एक पत्ता इचारला अन त्या दिशेने जायला निघाली. जो तो तर्क करू लागला आयला कुणाच्यात आलय हे मॉडेल. अखेर चंदू न्हाव्यान अर्ध्या तासातच बातमी आणली की ती पोरगी तालुक्याच्या गावाला कॉलेज शिकण्यासाठी आलीय. तिथं खोली मिळाली नाय म्हणून आपल्या गावात खोली घेऊन राहणार हाय. आता रोज तीच दर्शन होणार म्हटल्यावर गावातल्या तरुण मंडळीनी नव्हे तर म्हाताऱ्यांनी सुद्धा बाळसे धरले.
पँटवाल्या पोरीची अर्थात संगीची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली. गावातल्या शाळा मास्तरन तिची भेट घेऊन कमी फीत प्रायव्हेट शिकवणी घेण्याचं सांगून टाकल. पोरगी देखील महाबीलंदर तिने तात्काळ होकार दिला.
तिला काय पाहिजे काय नको हे पाहण्यासाठी आख्ख्या गावात चढाओढ लागली. आलेल्या दिवशीच दहा बारा जण आपलीच पोरगी समजून तिला जेवणाचं आवातन द्यायला आले. संगीन घरीच स्वतः जेवण बनवणार असल्याचं सांगितलं.
दुसरा दिवस उजाडला. सकाळी पॅन्ट शर्ट वाली संगी तालुक्याच्या गावाला कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडली. ओठाला लाल रंगाची लिपस्टिक लावली होती. घट्ट टी शर्ट मुळे छाती भारदस्त सेक्सी दिसत होती. पायात पैंजण होते. त्याचा आवाज करत ती निघाली. जाता जाता मास्तर ना भेटली. संध्याकाळी शिकवणीला येते असा निरोप दिला. मास्तरच दिवसभर शाळेत लक्ष लागत न्हवते. कधी एकदा संध्याकाळ होते असे त्यांला झाले.
अखेर सहा वाजता पॅन्टवाली मास्तरांच्या घरी शिकवणीला आली. मास्तर एकटेच होते. त्यांनी तिला आपल्या जवळ बसवून घेतलं. दहा पंधरा मिनिटं नुसतच तिचा चेहरा बघत बसलं. मास्तर इंग्रजी शिकवीत होते. त्यांनी तिला काही वाक्ये लिहायला सांगितली.
तिची स्पेलिंग लिहताना चूक झाली हीच संधी साधून मास्तरांनी तिचा गाल ओढला. ती म्हणाली, मास्तर परत गाल ओढायचा नाही सांगून ठेवते. आधीच माझे गाल फुगलेले आहेत. मला ते आणखी फुगवायचे नाहीत. मला फुगलेले गाल आवडत नाहीत.
मास्तरांनी तिला फुगलेल गाल का आवडत नाहीत असे विचारले. ती म्हणाली आव मुलांना आता फुगलेल्या गालापेक्षा गालावरची खळी आवडते. गाल फुगलेलं असलं की लव्ह करताना व्हठाचं किस नीट घेता येत नाय.
तीच उत्तर ऐकून मास्तर उडालच. त्याच्या दिवास्वप्नात गावातील बायांच गालच दिसू लागलं. त्यान त्या दिवसाची प्रायव्हेट ट्युशन थांबवली. संगीला उद्या ये म्हणून सांगितलं. मास्तर खूप वेळ तिच्या बोलण्याचा विचार करीत बसलं.
हळूहळू पँटवाल्या पोरीचे मास्तराकडे येणे जाणे वाढू लागले. लोकांच्या नजरेत ही बाब आली. त्यांनी मास्तरीन बाईंच्या कानावर ही बाब घातली. पतीच्या संसाराला हातभार लागावा म्हणून त्याबी नोकरी करत होत्या. थोड्या दूर अंतरावर नोकरीस होत्या. मास्तर असे काय बी करणार नाय याची त्यांना खात्री होती. मात्र गावकडन निरोप आला अन त्यांनी समधी काम सोडून गावाकडं धाव घेतली.
मास्तरिण बाई घरी आली पहाते तर काय मास्तर संगीच्या खांद्यावर हात टाकून तिला परदेशी भाषेचे प्राथमिक धडे देत होता. आपला नवरा पॅन्टवाली पटवल या भीतीने त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व त्या मास्तर समवेतच राहू लागल्या. त्यांनी खाजगी शिकवणी घेण्यास मास्तरांना प्रतिबंध केला. मास्तर बिचारे बेचैन झाले.
मास्तरच काय गावातल्या समध्यांची अशीच आवस्था पॅन्टवालीन केली होती. रात्री झोपतच तरणी, म्हातारी माणस उगाचच हसत होती. स्वतःचाच गाल ओढत होती. पॅन्टवाली समजून बायकोचाच किस घेत होती. बापय गडयाना काय झालंय हेच बायस्नी कळना. धुणं धुण्यासाठी पाणी भरण्यासाठी आलेल्या बाया याचीच दबकत दबकत चर्चा करीत होत्या.
शेवटी गावातल्या बायांनी पुढाकार घेतला. सायंकाळच्या येळी संगी घराकडे आली. त्यांनी तिला बोलावलं अन ठासून सांगितलं की तुला जर या गावात रहायचं असलं तर साडीच नेसावी लागलं. पॅन्ट शर्ट वर नाही फिरता येणार.
संगीला त्यांनी रोज साडी नेसायची. गावात प्रायव्हेट ट्युशन लावायची नाही. तरण्या व बापय गड्याशी बोलायचं नाही. आशा अटी घातल्या. संगीने त्या मान्य केल्या. फार काळ तिला या अटी पाळता आल्या नाहीत. दोन महिन्यातच तिने दुसऱ्या गावात पलायन केले. गावातल्या बायांनी सुटकेचा निश्वास सोडला. पॅन्टवाली संगी दुसऱ्या गावी गेली अन गाव पुन्हा मुळपदावर आलं.
प्रदीप जोशी विटा