नेदरलँड
बेल्जियम नंतर आंम्ही निघालो नेदरलँड कडे ..
ब्रसेल्सचा शेजारी असणारा हा देश असाच खुप देखणा आहे .याला हॉलंड पण म्हणतात
ट्युलिपचा देश ..विन्सेंट चा देश ..आणि हो सायकलचा देश ...!!
नेदरलँड आणि सायकल म्हणजे 'जनम जनमका’ साथ आहे .
ही सायकल चालवायची पद्धत सगळ्याच युरोपीयन देशात आहे .
प्रदूषण कमी होतं म्हणून इथं खूपजण सायकल चालवतात .
सायकल घालवण्यात कमीपणा मानत नाहीत.
चांगली शिकलेली उत्तम पगार असणारी माणसंही सूटबुट घालुन सायकल चालवतात .
कार असतात पण कार्समागे सायकली बांधुन , कार्सवरही सायकली रचुन फिरतात .
प्रदूषण कमी व्हावं म्हणून सरकार सायकलचा पुरस्कार करतं .
महापौर पण सायकलने ऑफिसात जातात.
रस्तेही तसेच चकाचक लोण्यासारखे मुलायम आहेत म्हणा !!
नेदरलँड मधली “सायकलजनता” बघण्यासारखी असते .
फॅमिलीज सायकलवर फिरायला निघतात. सायकलवर पुढे छोट्या बास्केटीत गुटगुटीत गोरी बाळं बसलेली असतात आणि आई/बाप सायकल चालवत असतात.
नेदरलँड मधे प्रवेश केल्या केल्या डेनहॅग गावात गेलो .
युद्धात कामी आलेल्या जॉर्ज मदुरो नावाच्या सैनिकाचं स्मारक म्हणून मदुरोडॅम नावाची एक गमतीशीर जागा उभारली आहे ती पाहिली .
त्याच्या एकंदर कार्याविषयी पंधरा मिनिटाची एक छान फिल्म पण दाखवली जाते .
इथं देशातील सगळ्या महत्वाच्या जागांची मिनीएचर्स आहेत .
सोबत नेदरलँचे खास असे शेतकर्यांचे सुंदर लाकडी बूट आणि ट्यूलिप्सचेही बिगएचर्स ( बिगएचर म्हणजे लहान गोष्ट मोठ्या स्वरुपात दाखवणे )आहेत.
“बनी” नावाची बाहुली पण आहे.
ही जागा बघायला खुप गंमत वाटते , कारण आपण “गलिव्हर “च्या दुनियेत आलोय असं वाटू लागत . इमारतीच्या छपरावर हात फिरवता येत होता.सगळ्या महत्वाच्या जागा हाताने स्पर्शता येत होत्या .
हे ठेंगू लोकांचं जग वाटत होतं ... !!!
इथे एक छानसा मॉल होता जिथे एक युरोपासून चांगल्या वस्तू मिळत होत्या .
आम्ही पण एक युरोत ट्युलिप ची प्लास्टिक फुले .एक स्कार्फ काही किचेन अशी खरेदी केली .
इथे एक सुंदर सुसज्ज कॉफी शॉप होते जिथे आत खुप जुनी चित्र काढलेल्या केबिन्स होत्या .
ट्युलिप फुलांच्या डिझाईन ची टोयलेट्स कमालीची देखणी होती .
नेदरलँड हा व्हिन्सेंट व्हॅन गॉग सुंदर देश ...
त्याच्या चित्रातल्या पवनचक्क्याची आतुन आणि बाहेरून केलेल्या प्रतिकृती ट्यूलिपच्या गार्डनमधे पाहिल्या .
ट्यूलिप गार्डन म्हणजे " ये कहाँ आ गये हम " हेच आठवत .
अनेक हिंदी चित्रपटातल्या गाण्यांचे इथे शुटींग झालेय.
ट्यूलिप हे फुल अतिशय सुंदर, नाजुक आणि देखणे असते .
ट्यूलिपचे अनेक रंग आणि भरगच्च फुलोर्याच्या रांगाच रांगा.
सौंदर्याने मन मोहित होऊन जाते.
दरवर्षी ट्यूलिपचा बहर केवळ २१ मार्च ते १९ मे पर्यंत असतो . जवळपास दोन महिन्याचं हे सौंदर्य, त्यामुळे या ट्यूलिपवर सगळेजण फार प्रेम करतात .
”क्युकेनाहोफ “नावाचं हे ट्यूलिप गार्डन सरकार चालवतं आणि अत्यंत उत्तम रितीने प्रोफेशनल पद्धतीने चालवतं. हे गार्डन प्रचंड मोठे आहे.
आतमध्ये ट्यूलिपच्या बागांसोबत सुरेख साकूरा , मोठमोठाली झाडं, विपींग विलोज, पाण्याचे निर्मळ प्रवाह , कारंजी फोरेस्ट केबीन, बसायला राखलेल्या सुरेख जागा , दोन तीन वाजवी दरांची दुकानं आणि कॉफीशॉप्स आहेत .एक दोन युरोपासून भरपूर वस्तू मिळतात.
ट्यूलिप इतकं सुंदर फुल असून तोडायचा मोह कुणाला होत नाही. सगळीकडे गार्डस होते असंही नाही पण शिस्त आहे. अगदी कुणी मुलंही फुलं तोडताना नाही दिसत.
यानंतर अॅमस्टरडॅम या शहरात कॅनाल क्रूझ केली.
क्रुझ चे नाव पण लवर्स कॅनाल क्रुझ होते ..गंमत वाटली .
या क्रुझ मधुन संपूर्ण अॅमस्टरडॅमला गोल चक्कर मारता येते .
या क्रुझ मध्ये प्रत्येक टेबलला जोडलेल्या इअरफोन मधुन या भागाची सर्व माहिती सांगितली जाते .
त्यात तुम्हाला इंग्रजी ,हिंदी ,अथवा इतर काही भाषांचे निवड स्वातंत्र्य होते .
यात एकूण सहा भाषा होत्या .
वाटेत अॅनी फ्रँक चे घर आहे, ज्या छोट्या मुलीने दुसर्या महायुद्धात घराबाहेर घडणाऱ्या घटना विषयी आपल्या डायरीत नोंदी केल्या होत्या ज्याच्यावर कादंबर्या लिहिल्या गेल्या आणि सिनेमे काढले गेले आहेत .
विकेंड असल्याने सगळ्या शहरभर कॅनालच्या कडेने अनेक लोकं निवांत खात पित बसलेले दिसत होते .
काहीजण किनार्यावरच सटासटा कापडं काढून त्यांच्या छोट्या बोटीत बसत . अशा दोन/ चार माणसांच्या छोटू बोटी कॅनालमधे फिरत असतात.
अॅमस्टरडॅमला येऊन व्हिन्सेंट व्हॅन गॉग म्यूझियम आणि अॅनी फ्रँक म्यूझियम वेळे अभावी नाही बघता आले.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जर्मनी
अॅमस्टरडॅमचा निरोप घेऊन जर्मनीत कलोन गावात गेलो.
हे ऱ्हाईन नदीच्या तीरावरील सर्वात मोठे गाव आहे .
आवडत्या परफ्यूम यू डी कलोनचं हे जन्मस्थळ ,
कलोन याचा अर्थ पवित्र पाणी असा होतो .
इथलं प्रसिद्ध कॅथेड्रल तेराव्या शतकापासून बांधतायत .
ते मुद्दाम अपूर्ण ठेवतात. सतत रिपेअरींग/ बांधकाम सुरू ठेवतात.
कारण हे पूर्ण झालं तर तो जगाचा शेवटचा दिवस असणार आहे म्हणे.
माणूस म्हणलं की असले समज/अंधश्रद्धा आल्याच.
त्याला कितीही शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रगती काही करू शकत नाही..
जे सेंट पिटर कॅथेड्रल चर्च म्हणून ओळखले जाते .
इथे दररोज २०००० च्या आसपास लोक भेट देतात
हे कॅथेड्रल प्रंचंड अवाढव्य अगदी अंगावर येईल असे वाटावे इतपत विशाल आणि काळसर रंगाचे आहे .
आतमध्ये खुप जुन्या काळची ख्रीस्तकालीन चित्रे रंगीत ग्लास पेंटिंग मध्ये पाहायला मिळतात .
आठ वाजता कलोनच्या कॅथेड्रलचा घंटानाद होऊ लागला त्याचा आवाज खुप मोठा होता .
तेथून जवळच्या छोट्या रस्त्यावर एका इंडियन हॉटेल मध्ये रुचकर जेवण मिळाले .
यानंतर दुसर्या दिवशी आमची टूर जर्मन स्विस आणि एका बाजुला फ्रांस बॉर्डेर वर असलेल्या ब्लॅक फॉरेस्ट कडे निघाली .
रस्त्यात आजूबाजूला चित्रासारखी छोटी छोटी लहान गावे दिसत होती .
अतिशय घनदाट आणि हिरवेगार जंगल ..इथे तुम्हाला हिरव्या रंगाच्या अनेकविध छटा पाहायला मिळतात .
आजूबाजूला चोहीकडे उंचच्या उंच डोंगर रांगा आणि मध्यभागी खोलात हे जंगल .
वृक्षांची गर्दी इतकी घनदाट आहे की दिवसा सुद्धा अंधार पडल्याचा भास होतो
म्हणुनच ह्याला ब्लॅक फॉरेस्ट म्हणतात .
आपण खातो त्या ब्लॅक फॉरेस्ट केकचे “ओरिजिन” हेच आहे .
इथल्या ड्रूबा गावात कक्कू क्लॉक फॅक्टरी आहे .
जेथे ओरिजिनल जर्मन घड्याळे मिळतात .
सन १७०० पासून इथे घड्याळांची निर्मिती केली जाते .
तिथं कक्कू क्लॉकच घर तयार केलं आहे.
ते फार गमतीशीर आहे .या क्लॉकचे प्रात्यक्षिक म्हणुन प्रत्येक तासाला इथे पाच मिनिटाचा शो दाखवला जातो तो बघण्यासारखा असतो .
तसेच वरच्या क्लॉक शॉप मध्ये या घड्याळाचा इतिहास व त्याचे तयार होणे याविषयी तिथल्या सेल्समन कडून छान माहिती दिली जाते .
तिथं एक भारतीय रेस्टॉरंट आहे तिथे गरमागरम मसालेभात आणि चाट खाऊन ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री चा आस्वाद घेतला .
आपल्यापेक्षा खुप वेगळ्या चवीची आणि चविष्ट वाटली ती पेस्ट्री!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्वित्झर्लंड
स्वित्झर्लंडमधे प्रवेश केल्यावर लगेचच भेट दिली ती झुरीच मधील र्हाईनफॉलला .
तसा आहे हा लहानसाच.. पण त्या र्हाईननदीत फिरायला मजा येते कारण बोट फॉलजवळ नेतात , अंगावर तुषार उडतात .
तिथल्या बोटीच्या कप्तानचे वैशिष्ट्य असे की फॉलच्या अगदी जवळ बोट नेऊन पुन्हा सुखरूप आणी कौशल्याने ही बोट तो बाहेर काढत असे .व असे तो अनेक वेळा करीत असे .
बोट फॉल च्या जवळ गेल्यावर प्रचंड थरारक वाटत असे .
पाण्यात गेल्यावर कडाक्याची थंडी होती त्यामुळे बाहेर आल्यावर तेथील एका इंडियन रेस्टॉरंट मध्ये गरम गरम वडापाव आणि मसाला चहा मिळाल्यावर आमचा आनंद द्विगुणीत झाला .(कारण युरोप मध्ये एकतर तुम्हाला चहा अजिबात मिळत नाही फक्त कॉफी मिळते ती सुद्धा बिनदुधाची आणि बेचव )
आता आमची सवारी गोंडोला राईड मधुन माऊंट टिटलीसवर निघाली .
अनेक हिंदी चित्रपटातील अनेक गाण्यांचे शुटींग इथे झालेले आहे .
माऊंट टिटलीसवर बॉलीवुडचे इतके वर्चस्व आहे की वरच्या ग्लेशिअर जवळ “DDLJ” च्या राज सिमरनचा कट आऊट लावलाय.
अनेक पर्यटक तिथे फोटो शूट करतात आणि बर्फात मनसोक्त खेळतात .
केबल कार आणि माऊंट टिटलीस कोरून उभारली इमारत म्हणजे इथल्या माणसांच्या चिवटपणाची आणि इंजिनियरींगची कमाल आहे.
त्या इंजिनिअरींगची कमाल असणार्या केबल कारमधून दहाहजार फूट उंचीजवळ जाताना असं वाटत होतं की व्हॅनिला आईस्क्रीमच्या डोंगरा वरून चाललो आहे . मधेच चोकलेट चिप्स टाकलेत.
बाहेरचा देखावा प्रचंड सुंदर होता बघण्यासाठी अक्षरशः दोन डोळे अपुरे पडत होते.
ही पाच मजली इमारत माऊंट टिटलीस कोरून उभारली आहे.
आतमध्ये दोन तीन सुसज्ज रेस्टॉरंट, दोन कपड्यांची, सूविनेअर्सची, स्कीयिंग साहित्याचीची दुकानं, आईस्क्रीमचं दुकान , पारंपारिक स्विस पोषाखांचा स्टुडिओ ,तीन चार स्वच्छतागृहे , उत्तम रेस्टींग लाऊंज अशा सोयी आहेत.
इथं जास्ती प्रमाणावर खर्च करून येणारे फक्त जपानी आणि भारतीय पर्यटक होते .
बाकी स्कीईंग करायला मोजके पर्यटक आले होते पण ते सगळे परदेशी होते
माऊंट टिटलीसच्या ग्लेशिअर वर गेलो तर खुपच मस्त वाटलं .
आम्ही पण बर्फ टाकून खुप खेळलो पण नंतर हुडहुडी भरली (-2 तापमान होतं ते).
भुसभूशीत बर्फावर चालणं सोपं वाटतं. कडक झालेला बर्फाने मात्र घसरगुंडी होते .
मग अचानक हवामान विंडी झालं आणि अगदी नाजूक स्नो फ्लेक्स पडायला सुरुवात झाली.
एक्द्म भारी वाटलं . थोडं पुढे गेलो तर हा नाजूक स्नो कठोर झाला आणि भलताच वेगानं तोंडावर आपटू लागला.
तिथं उभं राहणं कठीण झालं .मग भारी वाटणं कमी झालं.खालची वाट अजूनच निसरडी झाली. त्या अर्ध्यापाऊण तासात तिथून न पडता बाहेर कसे निघता येईल याची काळजी घ्यावी लागली .दोघाचौघानी साखळी करीत ग्लेशियर वरून परत यावे लागले .
केवळ तो ग्लेशिअरचा उंबरठा ओलांडून आत इमारतीत शिरलो की छान उबदार सुरक्षित वाटायला लागल .
इथे फ्लायर म्हणुन एक भन्नाट प्रकार अनुभवला .एका झोपाळ्या प्रमाणे असलेल्या लांबलचक खुर्चीत
चारपाच लोक बसतात आणि मग ही खुर्ची बर्फात लांबवर सैर करून परत येते .
इथे ११३७१ फुट उंचीवर असलेले “जोंगफ्राऊ” नावाचे आल्प्स पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे .
जगातील सर्वात उंचावरचे पोस्ट ऑफिस इथे आहे .
येथे रेल्वेने जाता येते .
बर्फात चालून आणि इतक्या लिफ्ट आणि रांगांमधे उभं राहून दमलो मग तिथली स्पेशल अशी गरम पावभाजी आणि आईस्क्रीम खाऊन बरे वाटले .
यानंतर ल्यूसर्न गावातल्या रडणार्या सिंह स्मारकाकडे गेलो .
फ्रेंच राज्यक्रांतीत फ्रान्सच्या राजाचं रक्षण करणारी स्विस आर्मी कापली गेली, त्या स्मरणार्थ हा सिंह रडतो आहे त्याच्या पाठीत खुपसलेल्या बाणामुळे तो खुपच केविलवाणा वाटतो .
त्या चौकातच एक मोठं इंडियन रेस्टॉरंट आहे.
तिथे भारतीय तिरंगा फडकत असतो.
परदेशात असा तिरंगा दिसला की मन भरून येते .
यानंतर ल्यूसर्न गावात गेलो तिथे रोलेक्स शॉप आणि एक स्विस बँकही असलेल्या रस्त्यावरच एक मोठं तिमजली दुकान आहे.
तिथं स्विस चोकलेट आणि स्विसबेल प्रसिध्द आहेत ती खरेदी केली .
ल्यूसर्न लेक खूपच मोठे आहे .अनेक क्रुझ आणि स्टीम बोट तिथे पर्यटकांच्या प्रतीक्षेत उभी होती .
तळ्यात अनेक बदके आणि रंगीत पक्षी पोहत होते .
स्थानिक लोक मुलाबाळा सोबत तिथे येऊन फिरत होते .
मुले त्या बद्काना वेफर्स वगैरे इंग्लिश खाणे खाऊ घालात होती .
ते खाता खाता ते पक्षी काही वेळा चक्क पाण्याबाहेर जमिनीवर येत होते .
स्वित्झर्लंड मध्ये १५०० पेक्षा जास्त तलाव आहेत .
असे म्हणतात युरोपमधील ७५ टक्के पाण्याचा हक्कदार स्वित्झर्लंड आहे .
इथले कोणत्याही तलावाचे पाणी आरामात पिता येईल इतके स्वच्छ आहे.
दोन तलावांच्या मध्ये पण एक सिटी आहे तिला इंटरलाकेन सिटी म्हणून ओळखले जाते .
लेक ल्यूसर्न टूरमधे एका क्रुझ वर डीनर ठेवले होते .
लेक ल्यूसर्न इथले चौथ्या क्रमांकाचे लेक आहे
एका पारंपारिक वादकाने एक वारलीसारखं मोठं वाद्य वाजवलं ते विचित्र आवाज काढत होतं
यासेच काही गायकांनी पारंपारिक गाणी गायली .
एका वादकाने अॅकार्डीयन मात्र खूप छान वाजवलं .
पण बाकीच्या स्वित्झर्लंडमधे भलती शांतता माजलेली असते . स्विस कायदे भलतेच अजब आहेत . शांततेचा खुप बडेजाव आहे
कुत्रं पाळायचं असेल तर कर द्यावा लागतो.
रविवारी तुम्ही तुमच्याच बागेतले गवत कापू शकत नाही.
हा देश कुणालाही नागरिकत्व देत नाही ( चार्ली चॅप्लिन हा एकमेव अपवाद ).
इथं मुलांबाबतही कडक कायदे आहेत. आईबाप अपत्याला विचित्र वाटेल असं नाव ठेऊ शकत नाहीत .
...स्वित्झर्लंड खुपच देखणं आहे .
अत्यंत श्रीमंत आणि अत्यंत महाग आहे.
रस्ताभर कडेने आल्प्स वृक्षांची सोबत होत राहते.
बाहेर अत्यंत सुरेख लँडस्केप आहेत बघून काही काळाने आपण पण एखाद्या चित्रात वावरतो आहोत असं वाटायला लागतं.
सतत पसरलेले मोठमोठे हिरव्यागार शेतीचे पट्टे दिसतात ,
गायी /मेंढ्या चरताना दिसतात , पण निर्मनुष्य परिसर असतो
गवताचे भारे पांढर्या प्लास्टिकमधे गुंडाळून ठेवलेले, ओंडके कापून ठेवलेले.
माणसं मात्र कुठे फारशी दिसत नाहीत.
इथला निसर्ग माणसांनी पूर्ण काबूत आणलेला आहे.
थंड आणि अत्यंत थंड अशी दोनच हवामानं इथ असतात .
पहाडी माणसं तशीही चिवट असतात, इथली तर खुप श्रीमंतही आहेत .
स्विस सौंदर्य खुप नीटनेटके आणि अस्पर्श असल्यासारखे आहे अगदी एखाद्या पिक्चर पोस्टकार्डसारखं !!!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------