ऊंबरखिंड
लोहगड आणि विसापूर दोन्ही किल्ल्यांवर १००० ते १५०० ची शिबंदी होती...पण मराठयांनाकडून काडीचाही प्रतिकार होत नव्हता... कारतलबखान स्वतःच्या अक्कल हुशारीवर खूष होत होता... शाहीस्तेखानाने अगदी विश्वासाने शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकण काबीज करण्याच्या मोहीमेवर पाठविले...कारतलबखानाने आपल्या स्वारीचा मार्ग एकदम गुप्त ठेवला होता..आपल्या बरोबर असलेल्या कछप, जसवंत कोकाटे, जाधवराव हे सरदार व रायबाघन ही स्त्री सरदार (सावित्रीबाई देशमुख उर्फ पंडिता रायबाघन) यांनाही खबर लागू दिली नव्हती...रायबाघने दोनतीन वेळा समजावयाचा प्रयत्न केला...आपण आता मराठयांच्या सह्याद्रीत आहोत..आणि ह्या सह्याद्रीने आतपर्यंत मराठयांशिवाय कोणालाही आपल्या अंगा-खांदयावर खेळायला दिले नाही.. आणि हे मावळे म्हणजे शिवाची भुते आहेत कसे कुठून येतील आणि मारून जातील पत्ता पण लागणार नाही...आणि ह्या सह्याद्रील्या घाट-वाटा मराठयांना तोंडपाठ आहेत...पण ऐकेल तो कारतलबखान कसला...
फौजफाटा पण भला मोठा २०,००० पायदळ, घोडे, हत्ती, बैल आणि बैलगाड्या ..सैन्यासाठी असलेला शिधा.. तंबू, धनुष्य-बाण, भाले, बंदुका , अनेक छोट्या तोफा आणि लाखोंची संपत्ती... आणि मराठे काय करत होते तेव्हा ?? घाबरले होते काय...येवढा मोठा शत्रू आपल्या वर चाल करून येत आहे..आणि त्याची साधी खबरही कोणाला नसावी ?? आपले हेर खाते असे कसे गाफील ??...बहिर्जी नाईक आणी हेर खाते गाफील ....शक्य तरी आहे का?? खानच्या गोटातल्या बित्तम बातमी राजांपर्यत पोहचत होती..राजांचे हेरखाते किती सक्षम आहे याचा अनुभव अजून खानाला यायचा होता.
खानाने तो बोरघाट मार्गाने उतरणार अशी हूल उठवून दिली...आणि खुद्द राजांना गाफील ठेवून राजांवर अचानक हल्ला करून त्यानां सळो की पळो करून सोडण्याची खान स्वप्ने रंगवत होता. राजांनी अजून एक डाव खेळला...मराठयांची फौज पेण च्या आसपास तयार आहे..अशी खबर खानापर्यंत व्यवस्थित पोहचती करण्यात आली.खानाने लोणावळ्यापासून खाली कोकणात उतरणारी आंबेनळीची वाट धरली. खानाचे सैन्य सह्यादीच्या घाट-वाटा बाबत अडाणी होते. कित्येक जण तर हा सहयाद्री पहिल्यांदा बघत होते आंबेनळीच्या पायथ्याशी चावणी नावाचे बारीकसे गाव होते. त्याच्या परिसरात खान पोहोचला. चावणीपासून ऐन कोकणात जाणारी अरुंद वाट होती.गर्द जंगल, काही काही ठिकाणी तर सूर्यकिरणांना पण यायला मज्जाव अशी घनदाट झाडी
दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरातून ही वाट जात होती.खानानं या मार्गाने आपल्या सैन्याला चालण्याचा आदेश दिला. या वाटेचे नाव ऊंबरखिंड असे होते. खानाच्या आदेशानुसार फौज तो दुष्कर घाट उतरू लागली...हत्ती,घोडे,बैल सह्याद्रीचे रूप पाहून जागोजागी अडत होते...राजांच्या मावळ्यांनी वाटेतले तलाव, विहिरी आणि पाण्याचे जे काही स्रोत असतील त्यांची कोंडी करून ठेवली होती...जवळ होते ते पाणी आता संपत आले होते..आडवळणाची वाट फक्त एकावेळेला एकच जण जाऊ शकेल अशी जागा..आणि वरून सूर्य नारायण तळपत होता...आणि सहयाद्री आपल्या मावळ्यांच्या कर्तबगारीवर पोटातल्या पोटात हसत होता..पाणी नाही..आराम करायला जागा नाही...अनेकांची तर भीतीने गाळण उडाली होती...मजल दरमजल करीत पूर्ण फौज आता उंबरखिंडीच्या नळीत पोटात आली होती..फौजेतला शेवटचा हत्ती खाली उतरतो ना उतरतो...
तेवढ्यात अचानक कर्णे, तुतारी हलगी वाजू लागली खानाची फौज जिथल्या तिथे गारठून गेली आणि " हर हर महादेव" च्या गर्जना खिंडीत घुमू लागली ..आणि काही कळायच्या वीज कोसळावी तसे मावळे तुटून पडले..खानाची पहिल्या तुकडीला साधा प्रतिकार करायचीही संधी मिळाली नाही..बाण, भाले, दगड धडाधड येऊन आपटू लागले...मराठे आहेत कि भुते??... प्रतिकार करणार तरी कसा मराठे कुठून मारा करताहेत तेच कळत नव्हते. खानाच्या सैन्याने मागे पळायचा प्रयत्न केला, पण मागची वाटही अडवली गेली होती...पुढे वाटेवर प्रति-शिवाजी नेताजी पालकर थैमान घालत होते आणि तिथे मागच्या वाटेवर साक्षात राजे उभे होते..खान गोंधळला..अगदी रडकुंडीला आला...तासाभरातच २ ते ३ हजार सैनिक कापले गेले होते...रायबाघन समजून चुकली होती..सह्याद्री आणि राजांनी मिळून मोठा डाव टाकला होता...आता फक्त एकच मार्ग होता "संपूर्ण शरणागती" तिनेच खानाला शरण जाण्याचा सल्ला दिला.
तो सल्ला ऐकुन कारतलबखानाने आपला वकील राजांकडे पाठविला... राजांनीही एक अट ठेवली आपली सारी साधन संपत्ती आहे तिथेच सोडून निघून जावे.ती अट मान्य करण्याशिवाय काही मार्ग नव्हता...राजांनी युद्ध थांबविण्याचा आदेश दिला...खुद्द कारतलबखान आणि त्याचे अनेक सरदार पायी पायी पाठी फिरले...सगळयांची कसून तपासणी होत होती.. सैन्याकडे काही चीजवस्तू नाही ना याची शहानिशा करून साऱ्या सैन्याला जाऊ दिले आणि पुढचे चार दिवस मावळे आरामात खानाच्या सैन्याची शस्त्रे, उत्तम वस्त्रे, डेरे-तंबू यांचे सामान, दागिने, घोडे, बैल इत्यादी प्राणी अशा गोष्टी गोळा करत होते.