Avyakt - 9 in Marathi Fiction Stories by Komal Mankar books and stories PDF | अव्यक्त (भाग - 9)

Featured Books
Categories
Share

अव्यक्त (भाग - 9)

सत्तर-ऐंशीच्या दशकातील मध्यमवर्गीय जाणिवांच्या जगात स्वत:ला कोंडून घेतलेल्या स्त्री-पुरुष दोघांनाही आकर्षित करणारं असं बाह्य़ तसंच आंतरिक जग गौरी तिच्या कथा-कादंबऱ्यांतून उभी करत होती. मनात इच्छा असूनही जे बंड त्या काळातील स्त्रिया करू  धजत नव्हत्या ते बंड गौरीच्या जवळजवळ सर्वच नायिका करत होत्या.

ज्या वयात प्रश्न पडायला लागतात आणि आपण आपल्या स्वतंत्र अस्तित्वाविषयी विचार करायला लागतो त्या वयात गौरी देशपांडेच्या नायिकांशी आपली भेट झाली तर दिलासा मिळतोच, पण आपण योग्य मार्गावरून निघालो आहोत याविषयी खात्री वाटायला लागते. मला गौरी नेमकी अशाच एका वळणावर भेटली, जेव्हा माझ्या आत लपलेली व्यक्ती आजूबाजूच्या जगाकडे कुतूहलाने पाहू लागली होती. लिंगभावाचं राजकारण कळायला सुरुवात होण्याचा तो काळ होता. स्त्रीला दुय्यम स्थानावर फेकणाऱ्या, तिचं स्वत्व नाकारणाऱ्या या समाजात स्त्रीला स्वत:ची अशी स्वतंत्र ओळख नाही. ती ओळखली जाते ती तिच्या पुरुषाशी असलेल्या विविध नात्यांतून हे जाणवायला सुरुवात झाली होती. या अशा काळात गौरी देशपांडे यांच्या नायिका मला भेटल्या आणि स्त्री मुक्तपणे स्वत:च्या जगण्याचा विचार करू शकते आणि तो विचार मोकळेपणानं मांडू शकते हे भान त्यांनी दिल

मराठी साहित्यात गौरी देशपांडे ठळकपणे पुढे येण्याआधी काही लेखिका, आपल्या समाजातील स्त्रीचं स्थान, समाजानं आखून दिलेल्या चौकटीत राहताना तिची होणारी घुसमट याविषयी बोलत होत्या. ताराबाई शिंद्यांनी तशी सुरुवातही करून दिली होती. विभावरी शिरूरकरांनी तर ‘कळ्यांचे नि:श्वास’ लोकांपर्यंत पोचवले. पण गौरी देशपांडे यांच्या कथा-कादंबऱ्या वाचल्यावर लक्षात आलं की तिच्या नायिका नि:श्वास वगैरे सोडण्यात दिवस फुकट घालवत नव्हत्या. उलट त्या त्या परिस्थितीत कोणता निर्णय घ्यायचा हे ठरवत होत्या, तो घेत होत्या आणि त्या निर्णयाची जबाबदारीही घेत होत्या. स्त्रीला स्वत:चं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं हे ठामपणे मांडत होत्या.
ज्या घरात गौरी वाढली ते घर सुधारकांचं घर होतं. स्त्री-शिक्षणाची सुरुवातच नाही तर पुढे स्त्री-पुरुष नात्यातल्या लैंगिकतेबद्दल चर्चा ज्या घरात होत होती त्या घरात जन्मलेल्या गौरीला या शिक्षणानं आत्मविश्वास मिळालाच, पण स्त्री-पुरुषांतील या नात्याविषयी मोकळेपणानं बोलण्याचं बळही मिळालं. अर्थात महर्षी कर्वे आणि र. धों. कर्वे यांच्यासारख्या दिग्गज समाजसुधारकांच्या घरात जन्माला येऊनही बाई म्हणून त्या काळात बंड वगैरे करणं म्हणावं तसं सोपं नसेलच गेलं तिला. लहानपणी ‘समाजस्वास्थ्य’चे अंक चोरून वाचणाऱ्या गौरीच्या घरात सुशिक्षित बुद्धिमान स्त्रिया असल्या तरी त्यातील काही जणी या समाजात स्त्री म्हणून असलेल्या आपल्या भूमिकांमध्ये जगत असणारच. त्यामुळेच गौरीच्या अनेक कथा-कादंबऱ्यांमध्ये आई, मोठी बहीण इत्यादी पात्रं येतात ती बऱ्यापैकी पारंपरिक, मध्यमवर्गीय मानसिकता दर्शवणारीच असतात. पण बरीचशी तरुण आणि बुजुर्ग पुरुष पात्रं मात्र विचारी दिसतात. त्याचं कारण कदाचित आजोबा, काका आणि वडील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तिच्यावर असलेला प्रभाव असावा. अर्थात इतकं अनुकूल वातावरण असूनही, गौरी स्त्रीवादाच्या झाडावर चढली आणि चढल्या चढल्या धाड धाड लिहायला लागली, असं मात्र मुळीच नव्हतं. तिथं पोचतानाचा तिचा प्रवास हा खडतर नसला तरी तसा सोपा नसावाच. तिच्या नायिकांचे प्रवासही तसेच झालेले दिसतात. ‘बहुतांश लोकांनी ठरावीक मार्गाने वाटचाल करण्यात ज्यांचे भले असते अशांनी आखून दिलेल्या मार्गाने आपण आजवर का चालत आलो? आणि तेही त्याच्यात आपले फारसे भले दिसत नसताना? कुठलेही प्रश्न न विचारता पुढे जाणाऱ्या आळशी अथवा अंध अथवा हतबल अथवा प्रवाहपतित जनांच्या ओघामधून आपण पावलापुढे पाऊल का टाकत राहिलो? काही रूढ कौटुंबिक वा सामाजिक संकेतांत ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत त्यांची हुकूमशाही का सहन करत राहिलो?’, असे ‘मुक्काम’मधील कालिंदीसारखे प्रश्न विचारत विचारत ही लेखिका काही एका मुक्कामावर पोचलेली दिसते.
गौरी ज्या काळात लिहीत होती तो काळ स्त्रीमुक्तीच्या चर्चेला सुरुवात होण्याचा काळ होता. स्त्रीशोषण, तिला मिळालेलं दुय्यमत्व, तिला आलेलं वस्तुरूप या विषयी बोललं जात असण्याच्या काळात गौरी थेट या दुय्यमत्वालाच भिडली. ते नाकारलंच, पण हे दुय्यमत्व देणाऱ्या पुरुषाच्या मर्यादाही दाखवल्या. गौरीच्या कथा-कादंबऱ्यातील पुरुष फारसे अत्याचार वगैरे करताना दिसत नसले तरी काही पुरुष या समाजानं दिलेली पुरुषी मानसिकता घेऊन जगताना दिसतात. त्यांच्यातल्या या समाजमान्य पुरुषाला सामोऱ्या जाताना तिच्या नायिका कधी संतप्त होतात तर कधी अपमानित होतात. वनमाळीनं फसवल्याच्या भावनेनं अपमानित झालेली ‘दुस्तर हा घाट’मधली नमू थेट निर्णय घेऊन बॅग भरून बाहेर पडते. तर ‘थांग’मध्ये एका प्रसंगात जाग आल्यावर कालिंदी नंदनला आपल्या हातांनी लपेटून घेते त्या वेळी ‘झोपू दे ना ७७७’ म्हणत नंदन तिला माशी झटकावी तसा झटकतो. त्या प्रसंगात अपमानित झालेली कालिंदी म्हणते, ‘संतापाने माझे तोंड कडू झाले. किती वेळा केवळ याच्या मनात आले म्हणून हक्काने याने मला जागवून स्वत:चे सुख पुरवून घेतले होते, आणि मीही विकत घेतलेल्या गुलामासारखे ते मानले होते! उद्या म्हणतेच मीही ‘झोपू दे ना ७७७’. पुरुषांच्या अशा वागण्यानं व्यथित अथवा अपमानित होणाऱ्या या नायिका थेट बंड करतात आणि निर्णयालाही पोचतात. पण हे बंड म्हणजे आरडाओरडा किंवा आक्रस्ताळेपणा नसतो तर त्यात स्वत:च्या जगण्याचा तसेच आपल्या आजूबाजूच्या माणसांचा केलेला विचारही असतो. कोणत्याही निर्णयाला पोचताना भावनेपेक्षा विचारांना त्या जास्त महत्त्व देतात. त्यामुळे त्या टोकाची भूमिका क्वचितच घेताना दिसतात. ‘ओहटी’ या कथेतल्या नायिकेला जेव्हा ज्याच्याबरोबर तीन-चार वर्ष एकत्र राहतेय त्या प्रियकरानं, रामनं तीन महिन्यांपूर्वी लग्न केलं आहे हे तिच्या मैत्रिणीकडून कळतं तेव्हा आपल्या प्रियकरानं केलेल्या प्रतारणेला ती कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. उलट मैत्रीण गेल्यानंतर ती कपडय़ांना इस्त्री करत बसते. आणि त्यावर ती म्हणते, ‘इस्त्र्या करून झाल्यावर मी स्वस्थ झोपले. म्हटलं आता उद्या करता येईल विचार..’
समोर ठाकलेला कोणताही कठीण प्रसंग शांतपणे आणि थंडपणे हाताळण्याची गौरीच्या नायिकांची ही शैली कोणत्याही पुरुषाला राग आणणारी आहे. पण ही शैली तिच्या अनेक पात्रांमध्ये दिसते. नंदनला सोडून जाण्याचा निर्णय ‘थांग’मधील कालिंदी घेते तेव्हा ती म्हणते, ‘मला तुझ्याशी भांडायचे नाही. पण कृतज्ञता किंवा कर्तव्यबुद्धी अशा भावनांपोटी आता तुझ्यापाशी राहणं मला जमणार नाही.’ ते ऐकल्यावर नंदन तिच्या खाडकन थोबाडीत मारतो तेव्हा ती त्याचा हात धरते. भीती, दु:ख तर राहोच पण तिला चीडही येत नाही उलट ती म्हणते, ‘पाय पडला म्हणून आपल्याला नांगी मारणाऱ्या विंचवाची चीड येण्यात काय अर्थ असतो.’ कालिंदीची ही समज आपल्याला गौरीच्या जवळजवळ सगळ्या नायिकांमध्ये दिसते. स्वत:ला पुरुषत्वाच्या मर्यादित व्याख्येत बंदिस्त करून बसलेल्या पुरुषांचं या नायिकांना अनेकदा हसू येतं आणि शेवटी शेवटी तर त्या त्याची कीव करायला लागतात.
गौरीच्या जवळजवळ साऱ्याच नायिका या विचार करणाऱ्या आहेत. स्वत:ची बाजू त्या जितकी ठामपणे मांडतात तेवढय़ाच आस्थेनं त्या पुरुषालाही समजून घेताना दिसतात. पण त्यांच्या एकूण वागण्यात भावनिक गुंतागुंत फार कमी जाणवते. या लेखिकेनं लिहिलेल्या कथांची निवेदनं ही अशीच कोरडी, काहीशी मिश्कील, काहीशी उपरोधिक असतात. याचं कारण कदाचित ती स्वत: संवेदनशील असली तरी या व्यवस्थेनं स्त्री-पुरुषांमध्ये निर्माण केलेल्या मालक आणि दासी याचं नातं तिला अस्वस्थ करत असावं. या अशा नात्यात तरल भावबंध क्वचितच निर्माण होऊ शकतात असं तिला वाटतं. एकमेकांना समजून घेणारी आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय एकमेकांवर प्रेम करणारी माणसं न सापडणाऱ्या या समाजात लग्न हा केवळ व्यवहार मानून निभावणाऱ्या स्त्री-पुरुषांमधील नात्यांचा शोध घेताना ती दिसते. समाजात प्रचलित असलेल्या त्यांच्या भूमिकांत शिरून जेव्हा या समाजातले स्त्री-पुरुष तिच्यासमोर येतात तेव्हा त्यांच्या या प्रतिमांचंच विरेचन ती करू पाहते. म्हणूनच तिच्या कथांची सुरुवातही तशाच कोरडय़ा आणि रोकठोक भाषेने होते.
उदाहरणार्थ- ‘प्रेम म्हणजे काही तरी मनाने किंवा हृदयाने करायची गोष्ट अशी माझी बरेच दिवस समजूत होती. म्हणजे प्रेम ही भावना; त्या भावनेचा दर्शनी भाग, एक्स्प्रेशन हेही मानसिक असावं, असं वाटण्याइतकी मूर्ख मी अगदी लहानपणीही नव्हते.’ (‘आहे हे असं आहे’)  किंवा ‘धनंजयशी लग्न करायचं तसं फारसं मनात नव्हतं. म्हणजे मला तो आवडायचा, पण एखादा माणूस केवळ आवडतो म्हणून त्याच्याशी लग्न करावं असं मानण्याइतका मूर्खपणा माझ्यात त्याही वयात नव्हता. पण झालं काय, की नुकतीच एम.ए. पदरात पाडून घेतल्याने मी शिक्षणाला कंटाळले होते.. इतर काही नजरेसमोर दिसत नव्हतं. आणि मुख्य म्हणजे लग्न करतेस का म्हणून धनंजयनं विचारलं होतं. त्या काळी पोट भरायचं व वेळ घालवायचं साधन म्हणून लग्न करणं ही गोष्ट पूर्णपणे समाजमान्य होती. आताही आहे म्हणा, पण आता एखाददुसरं तरी कुणी निघतं- ‘का’? म्हणून विचारणारं; तेव्हा सर्वच आनंद होता.’ (‘आता कुठं जाशील टोळंभट्टा’)
परंपरा आणि सामाजिक चौकटींना प्रश्न विचारणारी, त्यांच्यातला विरोधाभास नेमकेपणे टिपणारी गौरी त्यामुळेच काहीशी तिरकस आणि मिश्कील शैलीत व्यक्त होत राहते. ‘एकंदरीत आयुष्यात फार बुडय़ा मारायच्या नाहीत’ असं ‘ओहटी’तील नायिका म्हणते, तर ‘राइट ऑन सिस्टर’मधली सिंधू म्हणते, ‘लग्न न होणं हे किती सुखाचं!’ स्त्रिया म्हणजे गळ्यातलं लोढणं, त्या आपल्याला कशा धाकात ठेवतात, आपला अवकाश नाकारतात, बायकांना कसं घाबरून राहावं लागतं, याच्या गोष्टी आजचा एकविसाव्या शतकातला पुरुषही करत असतो. अशा पुरुषांविषयी सिंधू म्हणते, ‘स्त्रीजातीवर उपकार म्हणून हे नरसिंह आणि साधूसंत बोहल्यावर उभे राहतात जसे काही. या बाप्यांना लग्न, मुलं, बायका यांची इतकी अडचण होते तर आपण मिळून एक गोष्ट करावी. सगळ्या सगळ्या बायकांनी मिळून एक कॉलनी करावी. मोठ्ठी. तिथे प्रवेश फी सगळ्या पुरुषांना. सदरा धुवून हवा ना, टाक पैसे. चपाती करून हवी ना, टाक पैसे. बाई हवी ना शेजेला, टाक पैसे. मूल हवं ना नाव चालवायला, टाक पैसे’.
पारंपरिक सून, बायको आणि आईच्या भूमिकेत राहणारी सिंधू सतत बंडखोर विचार करत असते. परंपरेनं लादलेलं बाईपण निभावत जगणारी ही अशी सिंधू आजही आपल्या आजूबाजूला वावरत असते. अशा बायकांच्या स्वतंत्र कॉलनीची स्वप्नं तिच्या मनात फुलत असतात. तिला पुरुषांच्या मर्यादा माहीत असतात. स्त्री-पुरुषात काय फरक असतो हे ती नेमकेपणानं सांगते. ‘जगात नुसत्या शारीरिक फरकांमुळे जसे विभाग पडतात लोकांच्यात तसा हा एक; बाकी काही नाही. काही उंच काही बुटके, काही काळे काही गोरे. काहींना दोन तंगडय़ात दांडी काहींना भोक. यापलीकडे बाया-बाप्यांत काऽऽही फरक नाही.’
पुरुषानं सतत गर्व करावा असा विशेष फरक स्त्री-पुरुषांत नसतो हे अधोरेखित करताना, व्यवस्थेच्या चौकटीत जगणाऱ्या पुरुषांच्या मर्यादा दाखवताना गौरी आक्रमक होत असली तरी ती पुरुषाचं अस्तित्व नाकारत नाही. ती तिचा पुरुष, तिला अभिप्रेत असलेला पुरुष सतत शोधत राहते. असे पुरुष तिला भेटलेले आहेतच पण ते तिच्या नायिकांनाही भेटतात. गौरीच्या कथा-कादंबऱ्यात असे बाईला समजून घेणारे, तिचा आदर करणारे, नाना (मध्य लटपटीत), हरिभाई (दुस्तर हा घाट), भन्ते (गोफ), फारूक (मुक्काम) यांसारखे पुरुष भेटत राहतात. त्यांना मनाशरीरानं ओळखणाऱ्या दिमित्री, इयान (थांग) यांच्यासारख्या पुरुषांच्या शोधात या नायिका असतात आणि तो मिळाल्यावर त्याच्यापर्यंत मनाशरीरानं पोचण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
बाईला समजून घेतानाच तिच्यावर भरभरून प्रेम करणारे असे समंजस पुरुष आजूबाजूला असतात हे गौरीच आपल्याला सांगत राहते. गौरीवर अनेकदा आरोप होतो की, ती सुधारकांच्या कुटुंबात वाढलेली असल्यानं स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा सहज मारू शकते किंवा ती केवळ उच्च-मध्यम व मध्यम वर्गाचंच प्रतिनिधित्व करते, तळागाळातील स्त्रियांचे प्रश्न तिला समजूच शकणार नाहीत. गौरीनंही हे कधी नाकारलं नाही. पण गौरीचं स्त्री असणं आणि स्त्री असूनही एक व्यक्ती असणं हे गौरीला तळागाळातील आणि गावगाडय़ातील स्त्रियांशीही जोडून घेणारं ठरतं. वर्ग, जात, लिंग या पलीकडे जाऊन आपल्या अस्तित्वाचा विचार करणाऱ्या कोणत्याही स्तरातील (मग तो आर्थिक असो की सामाजिक) स्त्री-पुरुषांना ती आपली वाटत राहते कारण ती स्त्री-पुरुष नात्यातील वास्तव सांगत असते.
सत्तर-ऐंशीच्या दशकातील मध्यमवर्गीय जाणिवांच्या जगात स्वत:ला कोंडून घेतलेल्या स्त्री-पुरुष दोघांनाही आकर्षित करणारं असं बाह्य़ तसंच आंतरिक जग गौरी तिच्या कथा-कादंबऱ्यांतून उभी करत होती. मनात इच्छा असूनही जे बंड त्या काळातील स्त्रिया करू धजत नव्हत्या ते बंड गौरीच्या जवळजवळ सर्वच नायिका करत होत्या. आत्मभान जागं झालेल्या या नायिका स्वत:शी संवाद साधत होत्या, स्त्री-पुरुष मैत्रीची चिकित्सा करत होत्या, ज्यांच्याशी मनाचे बंध जुळू शकतील असे आपापले सुहृद शोधत होत्या. आपली नाती तपासून पाहत होत्या. ज्या नात्यातला फोलपणा जाणवत होता ती तोडताना होणाऱ्या यातनांतून जातानाच स्वत:शीच नव्याने ओळख करून घेत होत्या. एक व्यक्ती म्हणून स्वत:चं स्वत्व जपत होत्या. हे सारं आपल्याकडच्या सामाजिक चौकटीत बंदिस्त असलेल्या मध्यमवर्गीय जाणिवांच्या स्त्री-पुरुषांना आवाक करणारं होतं. त्यामुळेच ऐंशीच्या दशकात स्त्री-पुरुष नात्याचा एक वेगळा विचार करणारी गौरी  स्वभान आलेल्या नव्या बंडखोर स्त्रीचं मिथकं आणणारी आणि ते दृढ करणारी लेखिका ठरली.