लेखन कलेचे अस्तित्व टिकवणे गरजेचे
आजच्या डिजिटल युगात लेखन प्रकारच कमी होत चाललंय. लिखाणाखेरीज अन्य मार्गांचे अतिक्रमण झाल्याने लेखन कला लोप पावते की काय अशी भीती साहित्यिक वर्तुळात व्यक्त केली जात आहे. लेखन कलेचे अस्तित्व टिकविण्याचे मार्ग शोधणे ही काळाची गरज ठरणार आहे…
लेखनचं कमी होत चालले आहे
आजची एकूण स्थिती पहिली तर लेखनचं कमी होत चालल्याचे जाणवते. पूर्वी साहित्यिक तासनतास विचारमंथन करून अन्य वाचन करून प्रभावीपणे आपले विचार व्यक्त करीत. लिखित पुस्तके हे एकमेव त्याकाळात वेळ व्यतीत करण्याचे साधन होते. विषयांचे वैविध्य होते. तोचतोचपणा लेखनात नव्हता. वाचकांची नेमकी नाळ लेखकाला माहीत होती. पुस्तक वाचत असताना हे माझ्यावरच लिहले आहे असे प्रत्येकाला वाटत रहायचे. त्यामुळेच वाचकांना साहित्याची एक प्रकारची ओढ होती. आज पुस्तके प्रकाशित होण्याची संख्या प्रचंड आहे पण दर्जाचे काय? साहित्यिक गुणवत्तेचे काय?
सोशल मीडिया कारणीभूत
आजचे युग संगणक क्रांतीचे आहे. अन्य क्षेत्राप्रमाणे साहित्य क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही. विचार व्यक्त करण्याचे शब्द माध्यम व चित्र माध्यम असे दोन प्रकार ढोबळमानाने मानले जातात. 100 वाक्ये जे विचार सांगू शकत नाहीत ते एक चित्र प्रभावीपणे सांगू शकते असे म्हटले जाते. एका दृष्टीने ते खरेही आहे. सध्या आपण बघण्याच्या जगात वावरत आहोत. सोशल मिडिया माध्यमातून सतत आपल्यावर चित्रांचा मारा होत असतो. त्यामुळे साहजिकच पुस्तक लिहणे हा प्रकारचं बंद झाला आहे. नवोदित साहित्यिक लॅपटॉप संगणक माध्यमातून लेखन करीत आहेत. ईबुकचा जमाना आला आहे.
लिहण्याच्या संकल्पनाच बदलल्या
जगात आज प्रतिभावान लेखक आहेत की नाहीत अशीच शंका येऊ लागली आहे. लिखाण आणि लेखक यांच्यातील अंतर वाढत चालले आहे. प्रेम हाच लिखाणाचा एकमेव केंद्रबिंदू बनत चालला आहे. फार पूर्वीपासून लिखाण हे अभिव्यक्तीचे साधन ठरत आले आहे. आज आपण चित्रयुगात वावरत असल्याने तेथे लिखाणाला वाव नाही. पूर्वी आत्मचरित्रे शब्द माध्यमातून लिखित असायची आज त्याला चित्र माध्यमाची जोड मिळाल्याने पानात असंख्य चित्रे आपणास पहावयास मिळतात. पूर्वी लेखनातून दुसऱ्याला मोठे केले जात असे. आज नवोदितांच्या लेखनातून केवळ आत्मप्रौढीच दिसून येते.
चिन्हांचा जमाना
आपण चिन्हांच्या जमान्यात वावरत आहोत. शब्द माध्यम होते तोपर्यंत एकमेकात सवांद होते. आज संवादाला आपण पोरके झालो आहोत. मोबाईल वापरातून चिन्हाशिवाय आपण दुसरे काय करतो. हसणे, रडणे, चिडणे आदी भावभावना आपण चिन्हानेच व्यक्त करतो. प्रतिक्रियेसाठी एखादे लांबलचक वाक्य वापरण्यापेक्षा एखाद्या चिन्हातून आपण काम भागवतो. आपल्याकडे त्यासाठी पुरेसा वेळ तरी कुठे असतो. चिन्हांच्या या जमान्यात माणूस लिखाण विसरेल की काय अशी शँका आता मला देखील वाटू लागली आहे.
लेखन व लेखक जपले पाहिजेत
नजीकच्या काळात लेखन व लेखक संपतील की काय अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यासाठी त्यांना जपण्याची गरज आहे. चित्र माध्यमाला खूप वर्षाचा इतिहास आहे. लेखनाला तो कमी आहे. चित्र निसर्गनिर्मित आहे तर लेखन मानव निर्मित आहे. निसर्गनिर्मित कोणतीही गोष्ट नामशेष होण्याच्या धोका कमी असतो. मानव निर्मित गोष्टी मात्र जतन करून ठेवाव्या लागतात.त्यासाठी लेखन जपणे काळाची गरज आहे.
कोणासाठी तरी लिहण्याची प्रवृत्ती घातक
आज लेखनात एक नवा ट्रेंड येऊ पहात आहे. धनिक व्यक्ती त्यांची योग्यता नसताना देखील आत्मचरित्र अशा व्यापारी वृत्तीच्या लेखकाकडून लिहून घेत आहेत. त्यामुळे मागणी तसा पुरवठा या न्यायाने लेखन केले जात आहे. मी एवढे पैसे देतो माझ्यावर एक पुस्तक काढा असे सांगणारी मंडळी त्यात किती वास्तवता सांगत असतील हे खुद्द परमेश्वर जाणो. त्यामुळे पुस्तके विपुल मात्र दर्जा नाही अशीच परिस्थिती आहे. दिसामागे लिहीत जावे असे म्हटले जाते ते एका अर्थाने खरे आहे. लिहताना अक्षरातून माणसाचा स्वभाव कळतो असे म्हणतात. मात्र लेखन बंद झाले तर स्वभाव तरी कसा कळणार? पूर्वी लेखकाच्या घरात बोरू, टाक दौत, लेखणी दिसत असे. आता मात्र लॅपटॉप, संगणक दिसतो. हा काळाचा महिमा.
प्रदीप जोशी
मोबा 9881157709