Bayko aani Maitrin in Marathi Women Focused by suresh kulkarni books and stories PDF | बायको आणि मैत्रीण !

Featured Books
Categories
Share

बायको आणि मैत्रीण !

दोन घट्ट वेण्या घालून सोबत शाळेत येणारी शेजारची 'निमी ', अचानक एके दिवशी सुंदर पौनी टेल करून येते. 'ये तुम्ही पोर पोर, तिकडं पलीकडं खेळा' म्हणणारी, हल्ली स्वतःच दूर जाऊन खेळते. फडतूस विनोदाला घोड्या सारखं खिंकाळून हसणारी, मंद गालातल्या गालात हसते. काल पर्यंत, 'ये मला सायकल शिकव ना ' म्हणणारी,, 'चल निमे आपण सायकल खेळू, मी, शिकवतो तुला', म्हणलं तरी ' नको आई रागावते अन मला काम पण आहे.' म्हणून येण्याचे टाळते. शाळा सुटल्यावर, गरगर दप्तर फिरवून पाठीवर घेत धूम घरा कडे पळणारी 'निमा', आता मात्र छातीशी वह्या पुस्तकांचा गठ्ठा धरून, ह्ळुहुळू डौलदार पावले टाकत चालते. काहीतरी तिच्यात बदलेले असत. पण काय? ते लक्षात येत नाही. पहिली पासून आपल्या सोबत रोज शाळेत येणारी, रोज दिसणारी, भांडणारी, रागावणारी, रुसणारी, चिडणारी, चिडवणारी, हीच का ती 'निमी'? ती बदललीय?, कि आपण बदलोय?, का? दोघे हि बदललोय ?काही काळाने याची उत्तरे दोघांनाही मिळतात. निसर्गाचा रोल हळुवार उलगडत असतो. नव्याने तिची ओळख होत असते. तिची जवळीक हवीहवीशी वाटते. दोन दिवस 'ती ' नाही दिसलीतर, अनामिक हुरहूर लागते, बेचैनी वाढते, आतून पोकळ वाटायला लागत, कधी एकदा, तिला पाहतो असे होते. हल्ली तिच्याशी वाद आणि संवाद हि सपंण्याच्या मार्गावर असतो. नजरेची भाषा विकसित झालेली असते. न बोलता एकमेकांना, सार काही कळत असत! हि अवस्था असते 'मैत्रिणी'ची 'प्रियसी' होण्याची! काही मायनर डिटेल्स सोडले तर बहुतेकांची हीच स्टोरी असते.

हि 'प्रियसी', फेज शिक्षण -नौकरी पर्यंत चालू रहाते. सोबत सिनेमा, हॉटेलिंग, बागभ्रमंती, भन्नाट बाईक रायडींग, चॅटींग, गप्पा, 'गिफ्ट्स ' ..... बरच काही! मग विषय निघतो लग्नाचा.
' आई विचारत होती, आपलं 'हे ' किती दिवस चालणाऱय? लग्नाचं विचार म्हणाली. '
' निमे, करू ग लग्न. काय घाई आहे? मला जरा घरी विषय तर काढू दे. तुझ्या घरची सम्मती दिसतेय. पण आमच्या कडे जरा अवघडच आहे. बाबांचा तसा काही प्रॉब्लेम नाही. ते काही आईच्या शब्दा बाहेर नाहीत . (आजकालची पिढी 'बाप'ला गृहीत धरतेय, आईचे संस्कार दुसरे काय?). पण आमची आई म्हणजे ना, एकदम 'महा माया -जगदंबा ' आहे! तिला 'पटवावे ' लागेल!'
यात शंका घेण्यासारखं काही नाही. काल पर्यंत 'बबड्याला ' आवडतात म्हणून बेसनाचे लाडू करणारी,(सिनेमातली असलीतरी -गाजर का हलवा नायतर मुली के पराठे करणारी ), थोडं अंग तापलं तर रात्र रात्र जागणारी, खेळताना थोडं खरचटलं कि, ' नीट बघून न खेळायला काय झालं ? रोज मेल ते कोपर ,गुडघे फोडून घेणं!', तोंडाने शिव्या देत, हाताने जखमेवर हळद भरणारी, परीक्षेच्या वेळेस, रात्री - बेरात्री चहा करून देणारी, न सांगता तहानभूक सांभाळणारी आई, -बबड्या निमीशी लग्न करायचं म्हटलंकी एकदम बदलते! डायरेक्ट अमरीश पुरी होते!
'खबरदार, त्या नकट्या, निमीच्या नादी लागशील तर?' रुद्रावतार
' आग ,ती फार चांगली मुलगी आहे. मला ती खूप खूप आवडते. अन तू पण मागे तिच्या आईला, 'तुमची निमा गोड दिसतीय हो ', म्हणाली होतीस ना?'
'मेल्या, ते मागे, आत्ता नाही! तू जर तिच्याशी लग्न करशील तर,---------------------------
--तंगड तोंडींन,
--घराबाहेर काढीन,
--मीच, कायमच घर सोडून जाईन,
--विहिरीत /रेल्वे खाली उडी मारून जीव देईन,
--मेरा मरा हुवा मुह देखोगा --(सिनेमातली )---
--खानदान कि इज्जत मिट्टी मे ----(फारच जुन्या सिनेमातली ) महा रुद्रावतार !
या पैकी एक, किंवा अनेक, किंवा सगळ्या धमक्या देते.
लेकराच्या आनंदात आनंद मानणारी माउली, लेकराच्या प्रेमविवाहाला का विरोध करते कोणास ठाऊक?

या स्थितीत दोन फाटे फुटतात. एक पोट्याच्या हट्टा पुढे हतबल होऊन लग्नास परवानगी देणे. (या कॅट्यगिरीत आम्ही म्हणजे,आमच्या सौ.आणि मी येतो.) किंवा खंबीर पणे विरोध कायम ठेऊन ,इमोशनल ब्लॅकमेल करून, त्यांच्या प्रेमात खोडा घालणे व आपल्याला हवी तशी चार चौघीत उठून दिसणारी (टांगळी ), नाकी-डोळी (चष्मा सोडून )नीटस ,देव धर्म पाळणारी ( महालक्षीम्याच्या सोवळ्यातलत्या स्वयंपाकाची सोय ), वडील धाऱ्यांचा (म्हणजे फक्त सासूचा )मान ठेवणारी ,काळी सावळी ( डोमकाळी ),'सून ' पाहून पोराला बायको म्हणून देणे. (या कॅटॅगिरीत अस्मादिकांच्या मातोश्री येतात.येथे मला जरा सांगायचे आहे. खरे तर मला आईच्या विरोधात जाऊन लग्न करायचे नव्हते. तिच्या नाराजीवर मला माझा प्रेमाचा महाल उभारायचा नव्हता. शिक्षकांपेक्षा सिनेमांचेच आमच्यावर संस्कार ज्यास्त! हा हि त्यातलाच एक! ' तुम अगर मेरी नही हो सक्ती, त त तो किस और की भी नही!' असे म्हणत, प्रियसीला ओरबाडणे, मारणे -(दोन्ही अर्थानी) - थोबाडावर ऍसिड फेकणे असले संस्कार आमच्या सिनेमांनी केले नाहीत.! आपल्या सुखा पेक्षा, इतरांच्या सो कॉलेड दुःखाचीच, आम्हाला ज्यास्त काळजी! जरा ज्यास्तच विषयांतर झालेले असो.)

आईची निवड योग्य निघते. 'सून ' म्हणून, 'ती ' आईच्या सर्व अपेक्षा पूर्ण करते. कधी दुरोत्तर नाही, भांडण नाही (अर्थात आईशी), ' काही दिवस चंदू भावजी कडे जाऊन या, तेव्हडाच तुम्हाला (आणि आम्हाला पण ) बदल होईल, त्यांना पण तुमची सेवा करण्याची संधी मिळेल!' असलं कुचकाड सजेशन नाही, जेवण खाण, औषध पाणी, सण वार, सोवळं ओवळं, पुरण वरण, सवाष्ण ब्राम्हण, सब कुछ, एकदम जिथल्या तिथं!

'आई ' म्हणून तर ती अमीर खान पेक्षा परफेक्शनिस्ट! मुलांच्या शाळा, अभ्यास, परीक्षा, क्लास, सगळं सांभाळत असते. ( मुलांबरोबर माझ्या आईला हिने दुधाचा कप देताना, आईच्या डोळ्यात एकदा मी पाणी पाहिलं होत! खोटं कशाला बोलू!).

आणि ' बायको ' म्हणून विचारलं तर? लाखात एक! अशी बायको होणे नाही! देवांनी असले 'मॉडेल ' बहुदा बंद केल्याचा संशय याव इतकी 'ती ' युनिक असते! 'बायको ' मग ती कोणत्याही चॅनलची असो -मैत्रीण कम प्रियसी ,वा डायरेक्ट, -अंतरपाट धरल्यावर ती जशी विरुद्ध बाजूला असते, तशी अंतरपाट जाऊन लग्न लागले तरी, ती आपला स्टॅन्ड सोडत नाही! आयुष्य भर नवऱ्याच्या विरोधातच! काहीही कारण असो वा, काहीही कारण नसो! नवरा समजा रोज गुळगुळीत दाढी करणार असेलतर, 'काय मेल ,चिकणी दाढी घोटता! जरा विजू भावजी कडे पहा! बारीक दाढी ठेवत जा, जरा तरी मॅनली दिसलं!' आपण आपल्या नवऱ्याच्या पुरुषत्वाचे लक्तर काढतोय हे त्या 'भार्ये' ला काळात हि नाही. जर नवरा जीन -टी शर्ट घालत असेल तर, ' काय मेले कळकट कपडे घालता, पोलक्या सारख्या टी शर्टातुन, टच टच ढेरी दिसतीय, तसेच घालून फिरता! तुमच्या पेक्षा तो बाबू धोबीतरी बरा रहातो! इतके कसे हो, बावळट!'
'चल, आज बाहेर जेवायला जाऊ' म्हणलं, कि हिचे उत्तर तयार ' काही नको. सकाळच्या पोळ्या उरल्यात,
वाया जातीत!', इतपत ठीक पण त्याला जोडून, 'पैसा काय झाडाला लागलाय, रोज रोज हॉटेलबाजी करायला? पैल्यापासून उधळा स्वभाव.!', हि अनावश्यक पुस्ती येतेच. बरे घरीच जेऊ म्हणलंतर, ' काही हौस नाही,मौज नाही! एखाद दिवस डोसा खावा म्हन्लतर, यांच्या पोटात पाय शिरतात! माझंच मेलीच नशीब फुटकं ! ' ( या टप्प्यावर अश्रू पात सम्भवतो ). मला वाटते हि उदाहरणे सॅम्पल साठी पुरेशी आहेत.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्याशी नातं बदलत असत. लग्ना नंतर ती बायको होते. पहिल्या मुलानंतर आई होते. हे मातृत्व खूप विशाल असत. ते सहसा आटत नाही. (आता विषय निघाला म्हणून आणि तुम्ही आपले आहेत म्हणून सांगतो, कोठे बोलू नका. आमच्या लग्नाला छातीस वर्षे झालीत,आता आमचं नातं विचारलं तर ती माझी 'आई ' अन मी तिचा 'बाप ' असं काहीस आहे.!). बरेचदा ती 'बाप 'पण होते! 'दादा गिरी' नेहमीचीच!, नवऱ्याला कोणी नाव ठेवलं कि हि बया जाम आक्रमक होते. (त्याला नावे ठेवण्याची मोनापली फक्त हिचीच असते!). आणि 'वकील' (कि व -kill !) होते, तीच जज पण असते, वेळ प्रसंगी डॉक्टर, नर्स, होते! शिवाय नवऱ्याच्या वागण्याच्या, बोलण्याचे आणि पगाराचे ऑडिट तीच करते! हे सर खरं असलं तरी ती नवऱ्याला हवी तशी ' मैत्रीण ' मात्र ती कधीच होत नाही! पण का ?
हाच प्रश्न मी आमच्या शाम्याला विचारला .
' का? आहे तशीच बायकोला मैत्रीण करून घे!' शाम्याचं सोल्युशन
'अरे पण -- '
' का? लहान पणी घट्ट वेण्याची, बावळट निमी मैत्रीण म्हणून चालली ना? मग आता काय झालं? सुरश्या मैत्रिणीचं 'असणं ' महत्वाचं असत 'दिसणं' नाही! '
'तरी ... '
' मला तू स्पष्ट वहिनी कडून काय अपेक्षा आहेत सांग. '
'काय शाम्या, तशी ती चांगलीच आहे, पण तीन थोडस स्वतःत बदल केला, तर ती the बेस्ट होईल. तश्या या केवळ माझ्याच नाहीतर बऱ्याच जणांच्या अपेक्षा असतील. उदाहरणार्थ तिने स्वतः च्या प्रकृतीची काळजी घ्यावी, थोडं वजन कमी करावं, चौफेर नसले तरी, काही तरी सकस वाचन करावं, एखादा छंद जोपासावा, अनावश्यक बोलणे टाळावे, माझंच खरं, हा अट्टाहास टाळावा, इतरांचं (म्हणजे माझं )मत हि जाणून घ्यावं, बदलत्या जमान्याबरोबर बदलावं, चांगले कपडे घालावेत. '
' झालं? एकंदर तुम्हा नवऱ्यांना ' फुलपाखरा' सारखी बायको मैत्रीण म्हणून पाहिजे?'
'काहीस तसेच! '
' सुरश्या, उद्या सकाळी दाढीच्या नव्हे, तर ड्रेससिंग टेबलच्या आरश्या पुढे उभा रहा आणि स्वतः कडे पहा! वहिनीला बदलायच्या भानगडीत पडू नकोस! स्वतःस बदल! 'फुलपाखरं ' फुला भोवती पिंगा घालतात, सुरणाच्या गड्यावर नाही! '
मला शाम्याने दाखवलेल्या 'आरश्याची ' भीती वाटतेय! तिला हवा तसा मी झालो नाही तर, ती मला हवी तशी कशी होईल? मैत्रिणीची, प्रियसी आणि प्रियसीची बायको करणं सोपं असत. पण बायकोची पुन्हा मैत्रीण करणं कठीण असत. क्या खयाल है आपका ?

----सु र कुलकर्णी , आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच , Bye .