Bhatkanti - Suruvaat aeka pravasachi - 8 in Marathi Fiction Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ८)

Featured Books
Categories
Share

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ८)

समोर एक मोठ्ठा डोंगर दिसत होता. अजूनही धुकं होतंच. तरी सूर्यप्रकाशामुळे धुकं हळूहळू विरळ होतं होते. समोरचं द्रुश्य अजूनच स्पष्ठ दिसायला लागले होते. लांबच्या लांब तो डोंगर पसरला होता. काही ठिकाणी ढग विसावले होते. मधून मधून उंचच उंच धबधबे आणि झरे ओसंडून वाहत होते. पाणी मिळेल त्या वाटेतून स्वतःला झोकून देत होते. पूर्ण डोंगर हिरव्याकंच हिरवाईने नटून गेला होता. मधूनच एखादा पक्षांचा थवा नजरेस पडत होता. नजर जाईल तिथे हिरवळ आणि झरे.... त्यात सूर्योदय होतं असल्याने पूर्ण हिरवाई आता चमकत होती. आजूबाजूने वाहणाऱ्या धुक्याने त्या सर्वांचे चेहरे आणि कपडे ओले केले होते. त्यात मधेच येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळुकेने अंग शहरल्या सारखं होतं होते. शहरातल्या त्या "पाखरांना" हे द्रुश्य नवीनच होतं, डोळे भरून ते बघत होते. आकाशने सुद्धा दोन -तीन फोटो काढून घेतले पटकन. नंतर त्या ग्रुपकडे नजर टाकली. त्यांना कोणीतरी " स्टॅचू " केलं आहे असंच वाटलं असतं बघणाऱ्याला. त्यांचाही फोटो आकाशने काढून घेतला. फोटोत काहीतरी दिसलं त्याला. सुप्रीच्या डोळ्यातुन पाणी वाहत होतं. हळूच बाजूला जाऊन उभा राहिला. रुमाल पुढे केला. तेव्हा सुप्री भानावर आली... " No thanks.... " म्हणत स्वतःच्या हाताने तिने डोळे पुसले.


थोडावेळ सगळेच तिथे बसून होते. मनात ते सगळं भरून घेत होते. संजना दुसऱ्या एका मैत्रिणी बरोबर बसली होती, सुप्री मात्र जरा लांबचं पण एकटी बसली होती. आकाश संभ्रमात पडला. संजना जवळची मैत्रीण बाजूला गेल्यावर आकाश संजनाच्या बाजूला जाऊन बसला.
" बोलायचे होते काही... बोलू का... " आकाशने संजनाला विचारलं.
" हो ... बोला ना... " संजना त्या निसर्गाकडे पाहतच म्हणाली.
" म्हणजे हे जरा विचित्र वाटते म्हणून विचारत आहे मी.... तुमची मैत्रीण सुप्रिया... मघाशी तिच्या डोळयात पाणी बघितलं मी... आणि आता सुद्धा ती तिथे दूर जाऊन बसली आहे ... तुम्ही तिच्या best friend आहात ना... तरी असं का... " संजनाने आकाशकडे पाहिलं, आणि पुन्हा ती समोर कोसळणाऱ्या झऱ्याकडे पाहू लागली.
" सुप्रीला मी खूप आधीपासून ओळखते. शाळेपासून... ती स्वच्छंदी आहे, मनमोकळी आहे.... life कडे एका वेगळ्याच नजरेने बघते ती. सारखी हसत असते.... लोकांना कधी कधी वेडीच वाटते ती, पण अचानक भावुक होते कधी कधी.... म्हणजे मला सुद्धा कळत नाही का ते.... तस कधी रडताना बघितलं नाही तिला, पण अशी कधी ती इमोशनल होते, तेव्हा डोळ्यात पाणी येते तिच्या.... थोडावेळ कोणाशीच बोलत नाही ती... एकटी एकटी राहते, जवळ कोणीच नको असते तिला... मी सुद्धा नाही. असं खूप वेळा झालं आहे... मग नॉर्मल झाली कि येते हाक मारत, तेव्हा पुन्हा तीच हसणारी,बडबड करणारी सुप्री असते ती.... "


"मग तुम्ही कधी विचारण्याचा प्रयत्न केला नाही तिला ? " आकाशचा प्रश्न...
" विचारलं एक-दोनदा... उत्तर आलंच नाही तिच्याकडून.... तिला तिची space देते मी... " संजना सुप्रीकडे बघत म्हणाली. आकाश सुद्धा सुप्रीकडेच बघत होता. एकटीच कुठेतरी दूरवर नजर लावून बसली होती.
" मला सुद्धा काही बोलायचे आहे तुम्हाला... " संजनाच्या आवाजाने आकाशचं लक्ष सुप्रीवरून संजनाकडे आलं. " काय ते ? " ,
"त्यादिवशी... तुमच्या अंगावर चिखल उडाला... म्हणजे मुद्दाम नाही उडवला.... त्याबद्दल सॉरी.. " आकाश हसला त्यावर.
" ठीक आहे... चालायचं ते... शहरात आलं कि असे प्रकार घडतात माझ्या बाबतीत... त्याचं काय एवढं वाईट वाटून घेयाचं... शिवाय ते तर मी कधीच विसरलो देखील.... तुम्हीसुद्धा मनातून काढून टाका ते... " संजनाला ते ऐकून बरं वाटलं.
" तुम्ही शहरात का राहत नाहीत... घरी कोण कोण असते... means जर तुम्हाला सांगायचे नसेल तर सांगू नका हा,... "
"शहरात आहे माझी फॅमिली... पण मला इथेच बरं वाटते... " संजना त्यावर काही बोलली नाही.


थोडावेळ दोघेही शांत होते. नंतर आकाशच बोलला. " ते तिथे दूरवर गाव दिसते आहे ना... तिथे जायचे आहे आपल्याला... थोड्यावेळाने निघूया... तोपर्यंत तुमची friend नॉर्मल होते का बघा... " म्हणत आकाश उभा राहिला... सगळयांना आकाशने ५ मिनिटात तयार होण्यास सांगितले. सुप्री देखील काहीही न बोलता तयार झाली. पुढच्या ५ मिनिटात सगळे त्या जागेचा निरोप घेऊन निघाले. झाडा-झुडुपांनी भरलेल्या त्या वाटेतून जाताना सगळ्यांना एक वेगळीच मज्जा येत होती. आकाश चालत चालत सगळ्यांकडे लक्ष ठेवून होता... specially, सुप्रीकडे जास्त लक्ष होतं त्याचं. अजूनही ती गप्पच होती. पुढच्या २ तासांनी, कधी चालत कधी विश्राम करत ते सगळे गावाजवळ पोहोचले.


पावसात कसं हिरवं हिरवं होतं गावं.... इथेही तसंच होतं. वाटेवर जणू हिरव्या रंगाची शाल पांघरली होती निसर्गाने, मोठ्या सोहळ्यात जसे "red carpet" असते ना अगदी तसंच, या सर्वांचे स्वागतच होतं होते त्याने. चोहीकडे रानटी गवत उभे राहिलेले होते. त्यातून बैलगाडीच्या सतत जाण्याने , चाकाच्या बाजूची मधेच दोन बाजूंना वेगळी वाट निर्माण केली होती. गवत तरी किती हुशार बघा... ते तेव्हढा भाग सोडून बाकीकडे उगाचच मोकाट पसरलेलं. त्या गवतांवर चरणारे किडे, नाकतोडे निवांत बसून त्यांचं काम करत होते. याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं त्याचं. त्यातल्या त्यात काही पक्षी त्या किड्यांवर ताव मारत होते. ते सुद्धा निवांत... अजून पुढे, दूरवर पसरलेली शेतं नजरेस पडत होती.... कसली ते माहित नाही, फक्त बुजगावणं असल्याने ते शेत आहे हे कळत होतं. मधेच एखादा गोफण गरगर फिरवत दूरवर दगड भिरकावयाचा... त्याबरोबर शेतात लपून बसलेला पक्षांचा थवा केकाटत बाहेर पडायचा. हे सर्व मोहवून टाकणारे होते.

गावाच्या हद्दीत जसा प्रवेश केला तसा शेणाने सारवलेल्या जमिनीचा छान सुगंध येऊ लागला. दारासमोर चिख्खल झालेला, तरीही शहरातल्या लोकांसारखे गावातले कोणी नाक मुरडत नव्हतं. त्यातूनच अनवाणी पायाने चालत ते आपल्या कामाला निघत होते. काहीजण या सर्वाना बघून , त्याची विचारपूस करायला आले. माणुसकी अजून कुठे जिवंत आहे ती या गावांमध्ये. आकाशने वाट चुकलो आहोत, शहरात जाण्यासाठी वाहन शोधत आहोत हे सांगितलं. दुर्दैवाने त्या गावात तरी तसं कोणतीच व्यवस्था नव्हती. आकाशने ते सर्व ग्रुपला समजावून सांगितलं. परंतु एकाने ... पुढच्या गावात तसं वाहन मिळू शकेल असं सांगितल्यावर सगळे खुश झाले. आकाशने सर्वांकडे बघितलं, दमलेले सगळेच, शिवाय दोन दिवसापासून कोणीच अंघोळ नाही केलेली किंवा पोटभर जेवले होते. गावात आलोच आहे तर इथे आजचा दिवस थांबून उद्या सकाळी निघूया, असा विचार आकाशने सगळयांना बोलून दाखवला, सगळ्यांना ठीक वाटलं ते. गावात तर tent लावू शकत नाही, त्यामुळे गावापासून पुढे,थोडंसं लांब एका लहानश्या पठारावर त्याने मुक्काम करायचा ठरवलं.


तिथे जाऊन आकाशने प्रथम सगळ्यांना तंबू लावायला मदत केली...
" मी गावात बोललॊ आहे... ते मदत करायला तयार आहेत.... ज्यांना कोणाला अंघोळ वगैरे करायची असेल तसं जाऊन त्यांना सांगा... ते करतील व्यवस्था, जेवणाचे ते आणून देतील स्वतःच... कळलं ना सगळ्यांना... " आकाश बोलला.
" आणि तुम्ही.... तुम्ही कुठे निघालात.. " संजनाने विचारलं. आकाश निघायच्या तयारीत होता, ते ऐकून थांबला.
" संध्याकाळ होण्याच्या आता येतो परत... पुढचा रस्ता कसा आहे ते बघायला हवं ना... " ,
"तुम्हाला भूक लागत नाही का... " संजनाने विचारलं.... त्यावर आकाश फक्त हसला. त्याची सॅक लावली पाठीला. आणि निघून गेला. सर्वाना सांगितल्याप्रमाणे, सगळ्यांनी अंघोळ वगैरे करून घेतली. एवढ्या दिवसांनी काहीतरी चव लागेल असं खायला मिळाल्यावर सगळ्यांनी, गावकऱ्यांनी दिलेल्या जेवणावर आडवा हात मारला. पावसानेही जरा उसंत घेतली असल्याने छान वातावरण होतं बाहेर. पोटभर जेवून , दमलेले सगळी शहरी मंडळी... आपापल्या तंबूत जाऊन शांत झोपले.

============================= क्रमश :