सकाळ जरा लवकरच झाली सुप्रीची. घड्याळाचा काटा ७ वर होता. बाहेरचा आढावा घेण्यासाठी तिने हळूच डोकं बाहेर काढलं. अजून उजाडायचे होते. सगळीकडे धुकं होतं. समोरचं तसं पण काहीच दिसतं नव्हतं. उत्सुकता खूप भरलेली होती सुप्रीमधे.... तशी हळूच ती बाहेर आली. बाहेर तरी तिच्या शिवाय कोणीच नव्हतं. बाकीचे tent अजून तरी बंदच होते आणि त्यातील प्राणी अजून चादरीत गुरफटलेले होते. हळूच तिचं लक्ष आकाशच्या तंबूकडे गेलं. तंबूचं प्रवेशद्वार तिला जरा उघडं दिसलं. पुन्हा एकदा कुतूहलाने सुप्री पुढे गेली. एका डोळ्याने तिने आतमध्ये चोरून बघितलं. तर आत कोणीच नव्हतं, तसं तिने पूर्णपणे आत डोकावून पाहिलं. बापरे !!! कुठे गेला हा माणूस... तशीच ती पळत पळत सगळ्यांना जागे करू लागली. डोळे चोळत चोळत हळू हळू सगळे जागे होऊ लागले.
" एवढी मस्त झोप लागली होती... काय झालं तुला... " संजना आळस देत म्हणाली.
" अरे... तो... मिस्टर A.... त्याच्या तंबूत नाही आहे... त्याची सॅक पण नाही आहे.... गेला वाटते तो... " सुप्री म्हणाली.
" मी बघतो.. " एक जण पुढे जात म्हणाला.
" तुझ्या बघण्याने तो काय तिथे परत अवतरणार आहे का ? " सुप्री जरा रागात म्हणाली. खरंच आकाश नव्हता तंबूत.
एव्हाना सगळ्यांची झोप उडाली होती. काय करावं ते कळतं नव्हतं. "तो" असा कसा सोडून जाऊ शकतो आपल्याला....
" मला वाटते ना, या सुप्री मुळेच तो वैतागून निघून गेला असणार " एक मुलगी म्हणाली.
" हो हो.. मला पण तसंच वाटते. किती त्रास दिला हिने... त्याला. " अजून एकाने त्यात आपले विचार मांडून घेतले.
"हे बरं आहे.. एकतर मी त्याला बोलावून घेतलं... I mean... माझ्यामुळे तो मदत करायला तयार झाला... आणि आता मलाच सगळे बोलत आहेत... मी गरीब आहे ना म्हणून मला बोलतात सगळे. " सुप्रीचं तोंड एव्हडंस झालं.
सुप्री गप्प झाली आणि सगळी कडे शांतता पसरली. तिच्या एकटीच्या बडबडीमुळे एव्हढा आवाज होत होता. पण शांतता झाल्यावर आजूबाजूचे आवाज येऊ लागले. तसं पण ते सर्व जंगलात होते. पहाट होतं होती तसे वेगवेगळे पक्षी जागे होऊन आपले पणाची जाणीव करून देत होते. कित्ती प्रकारचे पक्षी एकमेकांना साद घालत होते. जंगल जागं होतं होते. ते आवाज ऐकण्यात सगळे गुंग झाले. पहिल्यांदाच घडत होतं ना तसं, शहरात राहणाऱ्या या "प्राण्यांच्या" बाबतीत.
सकाळचे ७.३० वाजले तसा आकाश परत आला. बघतो तर सगळेच जागे झालेले आणि बाहेर एकत्र बसलेले. आकाशला ते पाहून गंमत वाटली.
" अरे व्वा !! मला वाटलं नव्हतं, कि तुम्ही एवढ्या लवकर जागे होता सगळे... छान... " आकाशला आलेलं पाहून सगळयांना हायसं वाटलं.
" ओ मिस्टर A ...... सांगून जाता येत नाही का... कुठे गेला होता तुम्ही... सगळ्यांना वाटलं कि माझ्यामुळे पळून गेलात तुम्ही... किती बोलले हे सगळे गरीब मुलीला... " सुप्री पुढे येत म्हणाली.
" बरं झालं बोलले सगळे.... छान झालं. " आकाश हसत म्हणाला.
" कुठे गेला होता तुम्ही सकाळीच... सगळ्यांना काळजी वाटतं होती. " संजना सुप्रीच्या मागूनच बोलली.
" पुढची वाट शोधायला गेलो होतो... आपल्याला कसं कसं जायचे आहे ते बघून आलो... आणि घाबरलात वाटते सगळे... " आकाश सगळ्यांकडे बघत म्हणाला. " घाबरायचे कशाला... हा निसर्ग आपलाच आहे... तो आपली खूप काळजी घेतो... फक्त आपणच त्याची काळजी करत नाही." सगळे आकाशच बोलणं ऐकत होते. "चला आता गप्पा पुरे... सामान बांधायला घ्या... अर्ध्या तासात पुढच्या प्रवासाला निघूया... " असं म्हणताच सगळ्यांनी सामान आणि तंबू आवरायला घेतलं.
अर्ध्या तासात, ते सगळे आकाश सोबत निघायला तयार झाले. आपापल्या सॅक पाठीवर लावून सगळे तयार झालेले बघून आकाश म्हणाला...
" इथून काही अंतरावर एक गाव दिसलं मला. तिथे जाऊन काही मिळते का ते बघू.... मला वाटत नाही तिथे काही वाहनांची सोय होईल तुमच्यासाठी... भेटलंच तर आनंद आहे... चला निघूया.. " आकाश जाण्यास निघाला तशी संजना म्हणाली.
" लगेच निघायचे का... " त्यावर आकाश थांबला.
" म्हणजे ? ",
"लगेच म्हणजे आता अजून उजाडलेलं नाही... त्यात समोर एवढं धुकं आहे... अस्पष्ट दिसते सगळं... मग हा प्रवास आताच सुरु करावा का... असं माझं म्हणणं होतं.. "त्यावर आकाश म्हणाला.
" ते गावं, मी लांबून बघितलं. तिथे जाण्यास किती वेळ लागेल ते माहित नाही. आता निघालो तर संध्याकाळच्या आधी पोहोचु.... शिवाय कोणीतरी म्हणालं मला... इकडे एकही "छान" असं दिसलं नाही... "आकाश सुप्रीकडे पाहत म्हणाला. सुप्री उगाचच इकडे तिकडे बघत ,आपण काही ऐकलंच नाही असा भासवत होती. " ते छान बघण्यासाठी आत्ताच निघावं लागेल... चला लवकर"
सगळे आकाशच्या मागोमाग त्या जंगलातून कुठेतरी वरच्या बाजूला चालत होते. त्याने सांगितल्याप्रमाणे, प्रत्येकजणाने एकमेकांचे हात पकडले होते. समोरचं काहीच दिसतं नव्हतं, एवढं धुकं होतं. त्यातल्यात्यात आकाश सोबत होता म्हणून... तो सगळयांना रस्ता दाखवत होता. सुप्री आणि संजना एकत्र होत्या. त्यात सुप्रीला कुठेही बघण्याची सवय... त्या दोघी कधी एकमेकींना तर कधी समोर अचानक येणाऱ्या झाडावर आपटत होत्या. आपटत-धोपटत दोघी आपल्याच धुंदीत चालत होत्या. आकाशने ते बघितलं. त्या जश्या जवळ आल्या तसं त्याने विचारलं,
" डोकं आपटून घेयाची सवय आहे का दोघीना.... " त्यावर सुप्रीचा reply
" आमचं डोकं आहे.. ते आपटू नाहीतर काहीपण करू.... तसं पण काही होणार नाही आम्हाला... आधीच डोक्यावर पडलेले आहोत आम्ही.... " आणि हसायला लागली जोरात...
" गप्प येडे... " संजना म्हणाली. आणि आकाश कडे बघत सॉरी म्हणाली.
"चला हा पटपट.... कारण तुम्हीच दोघी मागे आहात. हरवला कुठेतरी तर परत येणार नाही शोधायला." ,
" नका येऊ... माझा गणू आहे, माझी काळजी घ्यायला." सुप्री म्हणाली.
"ok ,ठीक आहे." म्हणत आकाश पुढे गेला. संजना घाबरली , सुप्रीचा हात पकडून तिला ओढतच पुढे घेऊन आली.
अशीच १०-१५ मिनिटे गेल्यावर , एका मोकळ्या जागी ते आले. आकाशने सर्वांना थांबायला सांगितले. त्याने माणसं मोजली. सगळे होते. " आता, आपल्याला वर चढण चढायची आहे. तर खबरदारीने चढाई करा.... इथून पुढे जाण्याचा हा एकचं रस्ता आहे, त्यामुळे हि चढाई करताना , सगळ्यांनीच एकमेकांचे हात धरून चढाई करुया. मी पुढे आहे, माझ्या बरोबर मागोमाग या सर्वानी.... सावकाश एकदम... " सर्वच गंभीर झाले. एकमेकांचे हात पकडून हळूहळू ते सर्व आकाशच्या मागून जात होते. आजूबाजूला पूर्णपणे धुक्याची दाट चादर. कुठे चाललो आहोत, कधी पोहोचणार , हे आकाश शिवाय कोणालाच माहित नव्हतं. थोडीशी चढाई झाल्यावर आकाश "थांबा" म्हणाला.
" सगळे आहेत ना सोबत... कोणाचा हात सोडला नाहीत ना... " आकाशने विचारल्यावर " आम्ही एकत्र आहोत सगळे... " असा सगळ्या ग्रुपने आवाज केला.
" बरं, आता सगळ्यांनी डोळे बंद करा. " आकाश म्हणाला.
"कशाला ओ मिस्टर A... ढकलून देणार का आम्हाला डोंगरावरून... " सुप्रीने लांबूनच विचारलं...
" ज्यांना यायचे असेल त्यांनीच या... कोणावर जबरदस्ती नाही... " सुप्री त्यावर गप्प झाली.
एकमेकांचे हात पकडून , पकडून ते चालत होते, आकाश वर पूर्ण विश्वास ठेवून... " डोळे बंदच ठेवा.... मी सांगेन तेव्हा उघडा." आकाश पुन्हा पुन्हा तेच सांगत होता. ५ मिनिटे झाली असतील चढाई करून. पुन्हा आकाशचा आवाज आला. सगळ्यांचे डोळे बंदच होते. " आता एक सपाट जागा आली आहे... तर मी सांगेन तिथेच सगळ्यांनी उभं राहा.... ","हो" सगळ्यांनी आवाज दिला. पुढे अजून २ मिनिटे चालल्यावर आकाशने सगळयांना थांबवलं. आकाश एकेकाचा हात पकडून त्यांना योग्य ठिकाणी उभं करत होता. डोळे अजून बंदच सगळ्यांचे...
" ओ मिस्टर A... उघडू का डोळे... " सुप्री बोलली.
"wait.. अजून नाही... "..... २-५ मिनिटे अशीच गेली असतील," आता हळू हळू डोळे उघडा... " आकाशचा आवाज आला आणि सगळ्यांनी डोळे उघडायला सुरुवात केली.
============================= क्रमश :