Baglyanchi maal phule in Marathi Biography by Vineeta Shingare Deshpande books and stories PDF | वा.रा.कान्त

Featured Books
Categories
Share

वा.रा.कान्त

जीवनातील अनंत शक्यतांना सहजपणे व्यक्त करणारे , शब्द आणि अर्थाचे क्षितीज गाठणारे, अव्यक्त भावनांची शब्दात उधळण करणारा अतिसंवेदनशील तरीही ’अग्निसांप्रदायिक" ठरलेले नवकाव्याच्या प्रवासातील एक विलक्षण काव्यप्रतिभा म्हणजे कविवर्य़ वा.रा.कान्त. कान्त यांचा काव्यप्रवास कवी पार्थिव अर्थात द.का.कुलकर्णी आणि कवी कृष्णाकुमार यांच्यासह "पहाटतारा(सन१९३०) या काव्यसंग्रहाने सुरु झाला. फटत्कार(१९३३) हा कान्त यांचा तत्कालीन गाजलेला काव्यसंग्रह.

" नेत्रानलि करुनी त्रैलोक्याची होळी
अन्याय असमता रगडता पायाखाली
कर ताअंडव रुद्रा विराट विश्वचिंतेत"
या ओळी कान्तांच्या रुद्रवीणा(सन१९४७) या काव्यसंग्रहातील "रुद्रास" या रचनेतील आहे. स्वातंत्र्यसंग्रामाचा परिणाम अनेक साहित्यिकांवर झाला. कान्त यांच्या काव्याचा स्वभाव व वृत्ती अतिशय दाहक आणि उग्र होती. या काव्यगुणांमुळेच त्यांना "अग्निसांप्रदायिक" म्हणून संबोधिल्या गेले. कान्त यांच्या प्रदीर्घ काव्याप्रवासातील स्वातंत्र्यपर्वाचा काळ खूप महत्वाचा ठरतो. या काळातील त्यांच्या रचनांमुळे त्यांची जनमानसात विशेष ओळख निर्माण झाली. त्यांच्या या काळातील रचनांचे अंतरंग बघता यात दुसरे महायुद्ध व त्याचे परिणाम, भारतात सर्वत्र उसळणारे स्वातंत्र्यसमर, यात ढासाळलेले सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थिती, समाजात एकीकडे प्रचलित जुनाट परंपरा व यात अडकलेले सर्वसामान्य, समाजसुधारकांचे आंतरिक संघर्ष, असंघटित नेतृत्व याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. भोवतालीची तत्कालीन परिस्थितीची चीड कन्तांनी अत्यंत रौद्र शब्दात व्यक्त केली आहे. या उग्र व ज्वलंत प्रतिमा ही त्या काळाची व वेळेची आवश्यकता होती आणि नेमकी तीच कांतांनी शब्दात व्यक्त केली.
आज स्वातंत्र्याची रजत जयंती
गीतांच्या उडवा लक्ष चंद्र ज्योती
परंतु ज्या व्यथेची जाण जी पिचलेल्या तारांत आहे
तृषेचेच गीत मी गात आहे.
तृषेचेच गीत मी गात आहे, या रचनेतील या ओळी आहेत. स्वातंत्र्य लढयात अनेक अनामिक लोकांचा सहभाग होता, त्यंचा स्वार्थ त्याग लक्षात घेऊन कान्तानी ही रचना लिहिली असावी. आज स्वातंत्र्य सत्तरीला पोहचले असले तरी परिस्थिती तिच आहे. प्रत्येक १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या तारखांना मोठ्या आवाजातील देशभक्तीपर गीतांनी श्रद्धांजली देण्यापलीकडे आपण करतो तरी काय? स्वातंत्र्योत्तर राजकीय-सामाजिक-आर्थिक विषमता आणि अस्थिर नेतृत्व या स्थितीत सर्वसामान्यांचा फार मोठा वर्ग भावशून्य होत होता. व्यवहाराच्या पाशात अधिकाधिक गुंतत चाललेल्या या वर्गाच्या जाणीवा बोथट होत होत्या, या दृष्टीने सुधारकांचे प्रयत्न थिटे पडत होते. या बोथट जाणीवांना बोच देण्याच्या दृष्टीने कांत यांचे "अग्निपथ" आणि "आशिया" हे दोन खंडकाव्य महत्वाचे ठरतात.
नागासाकीचे आम्ही दीन अंध
चाललो पथाने
कबंध जयाचे मानवतेच्या;
आम्ही जयघोष विश्वशांतिचे रक्तलांछित
शांतिनगरीचे आम्ही प्रजाजन
स्मशानवासी
निरपराध बळी संसाराचे! तेव्हा
अश्रु पुसाया निरपराधांचे
ईश्वरापाशीही नव्हता पदर
आम्ही वाळविले आसवांचे डाग
धरणीच्या गाली.
विश्वशांतीची अपेक्षा आणि प्रतिक्षा करणार्‍या कवीचे हे तळमळणारे शब्द, बॉम्ब हल्ल्यात उध्वस्तस हिरोशिमा नागासाकी आज सावरले असले तरी त्या क्रुर हल्ल्याची आठवण या ओळी करुन देतात. कवीची सामाजिक जाण आपल्या देशानच्या सीमेपर्यन्त मर्यादित नसून त्यांची विश्वशांतीची कामना या रचनेत आढळून येते.
कान्त यांची कविता रक्तरंजीत आणि दाहक तर होतीच, ती मानवतेचा पुरस्कार करणारी ही होती:
शब्दांनो इथे पहा,
आपल्या अर्थस्पर्शी डोळ्यांनी
पहा इथे;
इथे ऐक्याचे-समतेचे नालसाहेब
’दुल्हा-दुल्हा’ ओरडत नाचवत आहे
राजबिंडे फकीर सत्तेवरले अन
साजरा करीत आहेत
गरीबाच्या मरणाचा मोहरम!
बेहोष नाचतांना
देशाच्या दारिद्र्याचा"आल्यावात"
पायाला लावून शेगण
परदेशातल्या गुप्त गंगाजळीतले
बडवीत ताशे- ते तडकेपर्यन्त
समाजकल्याणाचे!
साधारण पंचवीस वर्षापूर्वीची "शब्दांनो तुम्ही अपंग बनू नका" या रचनेतील वास्तव आजही तसेच आहे. अनेकांच्या अथक प्रयत्नांनी प्राप्त स्वातंत्र्याची जपणूक व्हावी हे कान्त या रचनेत तळमळून सांगत आहेत.
कान्त यांच्या काव्यातान समाजभिमुखता जेवढ्या रौद्र रुपात प्रकट होते, तेवढेच सामर्थ्य त्यांच्या संवेदनशील काव्यातुन व्यक्त होते. या दोन जाणीवांमध्ये कान्त यांची कविता लय, ध्व्नी, रंग, रस, तर्क, भावना, स्पंदन, आशय, प्रतिमा, तत्वचिंतन, अर्थसौंदर्य, वैचारिकता अशा विशाल प्रदेशातून सहज संचार करते. कान्त यांच्या "शततारका" हा रुबायांचा संग्रह, वाजली विजेची टाळी, वेलांटी, मरणगंध या स्फूटकाव्यातून न काव्यप्रतिभेचे अनेक पैलू अनुभवायला मिळतात.
ईश्वरा, तुझी ही सृष्टी अस्ताव्यस्त,
संदर्भरहित, अर्थहीन
सौंदर्याचे अर्थ आम्ही तिला दिले,
जोडिले आगळे परिणाम
माझी कलासृष्टी भव्य तुझ्याहुनी
गभस्तीची झाडे, चांदण्याची वेल
आनंदाची ओल मातीत या.
"मावळता दृष्टी" रचनेतील या ओळी. ईश्वरनिर्मित या सृष्टीला मानवाने अर्थ प्राप्त करुन दिला आहे. मानवीजीवन व त्याच्यातील चैतन्यामुळेच या सृष्टी व तिच्या आकाराला सकारात्मकता आहे. या रचनेतून मानवाप्रती आत्मविश्वास, सामर्थ्य व सक्षमतेचा प्रत्यय येतो.

झुले चांदण्याचा झोका
चांदण्यात फिक्या शांत
देही स्पर्शाच्या लाटात
चंद्रबिंब ये वाहत
छाया निष्पर्ण फांद्याच्या
तळी झाडांच्या हालती
अर्थ दिवस-रात्रीचे
चांदण्यात मावळती.
’भोवळ" या रचनेतील या ओळी, या रचनेचा शेवट करतांना कवी म्हणतो;
तू मी दोघे झुलतांना
असे बसोनी जवळ
होतो आपणच झूला
त्याची मस्त अन भोवळ
"झोका" या दोन शब्दात कवी अपल्या जीवनातील रोजचे जगणे सांगून जातात. या झोक्यात "सुख-दुख", "आशा-निराशा" अशा खुणा सांगताना व्यवहारी जगण्यात येणारी "भोवळ" आनंददायी केली आहे. परिस्थिती कशीही असली तरी रोजचे जगणे आनंददायी असावे असे ही रचना सुचवून जाते.
कान्त यांच्या सर्वच रचना विलक्षण आहेत. ज्याप्रमाणे गर्ततेची सखोलता मापता येते नाही, आर्ततेतील आर्तता मोजता येत नाही त्याप्रमाणे कान्त यांच्या कवितेतील शब्दयोजना प्रभावी आहे आणि त्यातील भावार्थ गहन आहे.
मौन हिरवे रानांचे, निळे मौन आभाळाचे
मौन काजळी जळाचे, लाल पिवळे फुलांचे
खडे मौन पहाडांचे, मौन धावरे उन्हाचे
तारापद चंद्रमौली, मौन गहन रात्रीचे
या मौन रचनेचा समारोप करतांना ते म्हणतात;
कुठे जाऊ द्या रे तडा, काही तरी कुणी बोला
घाव घाला कुठे तरी, छळे अनादी अबोला
मौनच सारे जन्मापासुनि
मौन मृत्युच्या काठालगुनि

निसर्गातील घडामोडी व त्यातून उत्पन्न होणार्‍या आनामिक मानवे जाणीवांचा शोध कान्त या रचनेत घेतात. कान्त यांचे शब्द प्रयोजन आणि कवितांचे शिर्षक इतरांहून निराळे आहेत. जसे; "शिळ्या चिंध्या झाल्या", "पुळणीशी दुपार", "खवला", "एक निसटणे", "ऊन तिशी-पस्तीशीचे", "लाटांच्या चुर्‍यात,फेनाच्या तुर्‍यात", "ही उगीचता" इत्यादी.
कान्त यांनी अनेक काव्यप्रकार समर्थपणे हाताळले आहेत. "दोनुली" त्यांचा हा काव्यसंग्रह प्रदीर्घ काव्यानिष्ठा आणि प्रयोगशीलतेचे एक प्रतीक आहे. कवीची अनुभुती व विचार कवितेत व्यक्त होत असतांना एक अव्यक्त भावनांचे वलय त्याभवती नकळत तयार होत असते, नेमका हाच अव्यक्त भाव कान्त यांनी दोनुली या संग्रहात गुंफला आहे. कवीलाही प्रथम दोनुली द्विदलात्मक वाटत होत्या, अगदी एकाच देठावर पण वेगळ्या दिशांना झेपावत असले तरी फुल/फल एकाच प्रकारचे तयार होते. तसेच कवीच्या मनाच्या देठातून उगवलेली ही दोनुली हिचे बाह्यरुप जरी द्विदलात्मक असले तरी अंतरंग एकच आशय व्यक्त करतो.
या संग्रहाच्या प्रस्तावनेत कवीने दोनुलेची जन्मकथा सांगितली आहे. "देठाचे मनोगत" व्यक्त करतांना ते म्हणतात; कविता लिहून झाल्यावर आनंद झाला पण तरीही संपूर्ण वाटणारी रचना मनात कुठेतरी असमाधानाची बोच देत होती" काही तरी सुटत आहे असं त्यांना सारखं वाटत होतं. मनाच्या तळघरात दडून बसलेला अव्यक्त भाव शब्दात व्यक्त करताच कान्तयांची बोच कमी झाली आणि नाद-अर्थ, गेय-ताल, वास्तव-कल्पना अशा अनेक वलयात दोनुली प्रकट झाली. या संग्रहाचे आण्खि एक वैषिट्ये म्ह्णजे यातील पहिली रचना ३० ऑगस्ट १९६६ साली तर शेवटची रचना २७ डिसेंबर १९७८ रोजी लिहिली आहे. या संग्रहातील रचना "पृथ्वी-आकाश" "जन्म-मृत्यु", "प्रकाश-अंधार", उत्पत्ती-विनाश" "चेतन-अचेतन", "स्थल-काल", "सत-असत" अशा मंडलात द्विविध गतीने भ्रमण करतात.
रान:१ उभे ताड उंच टेकडीवर
हजार हजार
हिरवी हिरवी गार प्रश्न चिन्हे
उठलेली डोंगराच्या अनंत शंकाची
जन्मापासून भ्रमिष्ट पृथ्वीच्या
उत्तरे त्यांची स्फुरणारी, विरणारी
घुम्याशा धुक्यात
सोनेरी उन्हाच्या वेड्या चौकोनात

रान:२ हिरवेगार रान
सांडलेले भान
पलीकडे डोंगर: मधे चंद्रकार, खोल तुटलेला
तिरपा खोवलेला त्यात
आभाळचा तुकडा, निळा निळा
जिथे वर्तमान
हरवून बसला
पायथ्याच्या पाखराची
सकाळची शीळ
कान्त यांच्या "रान" या रचनेमध्ये पहिल्या भागात उंच उंच रानं प्रश्नचिन्हासारखी निश्चल, निशब्द उभी, ते का? केव्हापासून? कशासाठी? उभी आहेत या प्रश्नांची उत्तरे पहाटेच्या अबोल धुक्यात स्फुरतात आणि विरतात ही. तेच दुसर्‍या भागात रानाची "अनुभुती" प्रकट केली आहे. रानाने त्याचे सौंदर्य उपभोगासाठी उधळून दिले आहे. त्याला त्याचे स्वताचे आकाश आहे ज्यातून वर्तमानकाळ जाऊन पुढचा काळ नव्या जोमाने जुने विसरत येत आहे. पहिल्या भागात "स्त्ब्ध" तर दुसर्‍या भागात "गती" हा भाव प्रकट होतो, मात्र प्रश्न अनुत्तरीतच रहातात.
दोनुलीतील सर्वच रचना निसर्गावर आधारित आहे. त्यातील अनुभव स्पंदन कधी समांतर- समवर्ती तर कधी परस्परविरोधी - परस्परपूरक आहेत. कवितेतील आशय जाणून घेतांना कवीची जाणीवकक्षेचे विस्तृत स्वरुप प्रत्ययास येते.
पाणी: १ ओढ्याची ओढ तोडून थांबलेले
खिन्न, शेवाळलेले
हिरवे निळे पाणी, पिवळ्या पानजळीत
तारवटलेला डोहाचा डोळा
साचलेली झोप उजाड रानाची
निष्पर्ण झाडांची
फडफडत जाणारे त्यात दिवास्वप्न
पांढर ’कवड्या’ पंखाचे

पाणी: २ क्षितिजाशी कधी पाकळीगत मिटते
वादळलाटांनी गिळून आकाश
पुन्हा उगळते
समुद्राचे पाणी: उन्हात मोहरते
चांदण्यात पिकते पुनवेच्या राती
मोत्यांच्या दाण्यांनी
शेवटी उरते नुसते मीठ
चंद्र चांदण्यांचे, भव्य अनंताचे
विश्वात भरलेल्या ब्रम्हनंदाचे
नुसते मीठ आसवातल्या सारखे

पाणी या रचनेतील या ओळी, पहिल्या भागात पाणी सागराची ओढ तोडून नव्या दिशेला निघाले खरे पण डोहात साचून त्यावर धरलेले शेवाळ बघून ते खिन्न होते. माणसाचे बरेचदा असेच होते, मुख्य ध्येय सोडून नवीन काही करण्याच्या नादात तो बरेच काही गमावून बसतो. मात्र या कवितेचा समारोप करतांना कवी निष्पर्ण झाडातून फडफडणार्‍या पंखातून आशेचा एक किरण दाखवून देतो.
या रचनेच्या दुसर्‍या भागात पाण्याची ओढ सागराकडे आहे. सागरात हे पाणी विरुन गेल्यावर उरते फक्त मीठ, पण या उरण्यात जो ब्रम्हानंद आहे, त्याचा अनुभव म्हणजे जीवनाची फलश्रुती आहे. जीवनाचे कृतार्थ होऊन डोळ्यात पाणी यावं असं जगणं म्हणजे खरं जगणं आहे. या दोनुलीत "दुख:" आणि "ब्रम्हानंद" या दोन भावना प्रकट करुन जीवन प्रवासात थांबायच की प्रवाही रहायचं हा मंत्र देऊन जातात.
कवी कान्तयांनी निसर्गाच्या विविध रुपांची मनाच्या असंख्य अवस्थांसोबत सांगड घातली आहे. कधी वास्तव कल्पनेतून व्यक्त केले आहे की कल्पना वास्तवात मांडली आहे अनाकलनीय ठरते. कान्त यांची शब्दरचना व प्रयोजन यांचा संगम अभिनव आहे. ते वाचकाला मोहावतात, खुणावतात. निसर्ग हा कान्त यांच्या रचनेचा गाभा असला तरी आशय नेहमीच मनातील अखंड विचारांकडे झेप घेतांना आढळतो. अनेक नवे स्पंदने, नवे भाव कावीने अविष्कृत केले आहे. "ही उगीचता"या रचनेत मनातील शून्यता व्यक्त करतांना ते म्हणतात:
उगम - विलयांचे भान नसलेल्या
नि:संग निळ्या समुद्राच्या लाटा, आशयहीन
उगाच खळखळत गर्जत येतात,
आदळतात, फुटतात उगाच खडकावर
शंख, शिंपले, रंगीत गारगोट्या
उगाच तळपतात आपल्याच मस्तीत
रत्नांचे कोंभ फुटलेल्या खडकात

कधी कधी निराशा, उदासीनता, किंवा रोजच्या जीवनातील तेच तेच जगणे "उगीचच" भासू लागते, मात्र या उगीचचेतून कवीला रत्नाला कोंभ फुटतांना दिसतं आणि ही उगीचतता उगीचच नाही, हा भाव कवीने या रचनेत अचूक शब्दात व्यक्त केला आहे. ही उगीचता, अर्थशून्यता’गाते कोण मनात?" या रचनेतही कवीला उत्तर सुचवून जाते: गाते कोण मनात, गाते कोण मनात?
अभिमानाने कधी दाटला
"रचिले मी हे गाणे" म्हणता
’गीतच रचिते नित्या तुला रे" फुटे शब्द हृदयात
कळेना गाते कोण मनात?

कान्त यांच्या प्रदीर्घ काव्यप्रवासाकडे दृष्टीक्षेप टाकता, लक्षात येतं समाजातील विषमता, अन्याय, गुलामी, असाह्यता यामुळे कावीचे मन प्रक्षुब्ध होऊन ज्वालामुखीतून लाव्हा फुटावा तसे शब्द फुटलेत. या शब्दांची तीव्रता लक्षात घेता, त्यांची सामाजिक जाण किती जागृत होती व त्यांमध्ये विचारधारा बदलण्याची क्षमता होती याचे प्रचीती येते. त्यांच्या इतर काव्यातून त्यांच्या संवेदनशील व भावनाप्रधान मनाचा प्रत्यय येतो. सर्वसामान्यांच्या जाणीवकक्षेपलीकडे त्यांची जाणीव कक्षा अत्यंत व्यापक व गहन होती. या सर्व अवस्थांमधून सुक्ष्मातिसुक्ष्म जाणीवा-भावना-स्पंदनं यांची विविध रुपात गुंफण त्यांची प्रयोगशीलता आणि काव्यनिष्ठा नक्कीच नवकवितेचा पाया आहे. या लेखाचा सामारोप करतांना कान्त यांच्या ’माझे काव्यशास्त्र" या रचनेतील ओळींने करणे योग्त ठरेल:
कधी उगी रखडत
उभे मागे, आसपास
असते जे लिहायचे
अनुभूतीपणे त्याचे
स्पर्शतात मला श्वास
"चौदा ब्रह्मांड ओविली
एका गाण्याच्या धाग्यात
अनंत या आभाळाला
माझ्या बारीची चौकट"
आजही आकाशात पक्ष्यांचे थवे बघून ओठावर बगळ्यांची माळ फुले....हे शब्द सहजतेने उमटतात, बगळ्याची माळ ओवणार्‍या या कवीला कोटी कोटी दंडवत.

विनीता देशपांडे.