Pralay - 7 in Marathi Detective stories by Shubham S Rokade books and stories PDF | प्रलय - ७

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

प्रलय - ७

प्रलय-०७

      त्या गोल वर्तुळाकार नकाशा भोवती सर्व जण जमले होते . जलधि राज्यात आज कितीतरी वर्षांनी त्या युद्ध कक्षात ही तात्काळ  बैठक बोलावली  होती .  काही विशेष मंत्रीगण , हेर पथकाचे प्रमुख ,  सेनाप्रमुख प्रमुख सल्लागार आणि स्वतः महाराज कैरव त्या ठिकाणी उपस्थित होते . महाराज कैरव बोलत होते , 
" आपल्या राज्यसभेत आणि संशोधन शाळेत ज्या काही गोष्टी झाल्या त्या तुम्ही पाहिल्या . तो माणूस आणि त्याचे ते विचित्र शब्द , हे आपण सर्वांनी ऐकलं आणि पाहिलं आहे . तो काय करू शकतो हे ही आपल्याला ज्ञात आहे  .  आपला शत्रू त्या काळ्याभिंतीपलीकडे आहे आणि त्यांची संख्या जरी कमी असली तरी ते आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहेत आणि महाराज विक्रमांनी ती भिंत पाडण्याची आज्ञा दिली आहेत .  त्यांच्या काही सैन्याच्या तुकड्या त्यांचं कार्य पूर्ण करण्यासाठी पश्चिमेकडे निघाल्या आहेत . आपल्या राज्याची पुढची दिशा काय असावी ? आणि पुढे कोणती पावले उचलावीत यासाठी ही बैठक तात्काळ बोलावलेली आहे . कारण आपण लवकर कृती केली नाही तर त्याची फळे आपल्या संपूर्ण राज्याला , राज्यातील  सामान्य जनतेला भोगावी लागतील . एक जबाबदार राजा म्हणून राज्यातील प्रमुखांचे मते घ्यावीत असं मला वाटलं , म्हणून या ठिकाणी तुम्हाला बोललेलं आहे . यशवंत जी तुम्ही राज्याचे सेनाप्रमुख आहात , तुम्ही या समस्येकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता....
" महाराज कैरव आपली सेना कोणत्याही क्षणी युद्ध लढण्यास तयार आहे आपण फक्त आदेश द्यावा....
" यशवंतजी मी तुमचं मत विचारले आहे....?
" महाराज खरं बोलायचं झालं तर या पृथ्वीतलावर ती आपले राज्य सर्वात शक्तिशाली व सामर्थ्यशाली आहे  .  आपल्या राज्यातील सैन्य व सैनिक सर्व बाजूनी इतर सर्व राज्यांपेक्षा उजवे आहेत . त्यांची प्रशिक्षण पद्धती त्यांच्याकडे असणारी हत्यारे त्यांना पुरवले जाणारे चिलखत , टोप हे सर्व उच्च प्रतीच्या संशोधनातून तयार केले जातात . त्यांना सहजासहजी हरवने कोणालाही शक्य नाही...... काळी भिंत जरी पाडली तरीही आपल्याला काही फरक पडत नाही  . कारण राज्यसभेत आणि संशोधन शाळेत जे काही अवतरलं होतं त्याला काळी भिंत थांबवू शकली नाही ,  त्यामुळे ती पडली तरी काही हरकत नाही . उलट आपण त्या बाटी जमातीकडून त्या बासऱ्या व त्यांची वाजवण्याची पद्धत शिकून घेतली पाहिजे .  त्या बासऱ्याचं उत्पादन सुरू करून आपल्या सैनिकांना त्याच पद्धतीने वाजवायला शिकवलं पाहिजे .  जेणेकरून आपण त्या तसल्या व्यक्तींवर ती त्याचा वापर करू शकतो....
" त्यांना दक्षिणेकडच्या देवाचे पुजारी किंवा अंधभक्त असे म्हणतात .  बाटी जमातीचा नायक ही त्या सभेसाठी उपस्थित होता .  त्याने सेनाप्रमुखांना सांगितले ,
"  आमच्या पारंपरिक कथेमध्ये या अंधभक्तांचा उल्लेख आहे ,  ज्यावेळी दक्षिणेकडील देव जागृत होईल त्यावेळी जागोजाग असे अंधभक्त उद्भवतील , ही खरे तर सामान्य माणसे असतात . पण या सामान्य माणसांना जेव्हा दक्षिणेकडचा देव  त्याच्या सेवेत घेतो , त्यावेळी हे लोक अंधभक्त बनतात . त्यांना काही दिसत नाही ,  त्यांना फक्त तेच दिसते जे त्यांचा देव दाखवतो .  त्यांना स्वतःचं मत नसतं , ना व्यक्तित्व असतं , ना ते विचार करू शकतात , ना स्वतः कोणती कृती शकतात . त्यांना कोणतीच जाणीव नसते . ज्यावेळी एखादा माणूस अंधभक्त होतो त्यावेळी आपण समजून जायचं की तो मृत आहे  आणि सर्वशक्तिमान आहे ....
" पण तुम्हाला ती बासरी आणि त्या बासरीची धून याबाबत माहिती कशी झाली ...?  महाराज कैरवांनी आणि त्या नायकाला विचारले
" आमच्या सर्व जमातीचे त्या भिंतीपलीकडे एक प्रार्थना स्थळ होतं .  त्याठिकाणी आमच्या त्या प्रार्थनास्थळांची मुख्य पुजारीन ,  जिला आम्ही राणी देवालिका असं संबोधतो , ती आम्हाला कथा सांगते , भविष्य सांगते आणि भूतकाळही सांगते..... राणी देवालिका  पद हे परंपरेने चालत आलेले असतं . ज्या राणीनेच आम्हाला बासरी विषयी सांगितलं , ती अकरावी राणी देवालिका होती , मी लहान होतो तेव्हापासून तीच राणी देवालीका होती ,  तिने आम्हाला हे सर्व सांगितले...
" मग या रानी देवालिकेला भेटणं शक्य आहे का...?  महाराजांनी विचारलं
" ज्यावेळी दक्षिणेकडचा देव जागृत झाला त्यावेळी पहिल्यांदा आमचं प्रार्थनास्थळ त्याच्या प्रकोपाने नष्ट झालं  . नष्ट झालं म्हणण्यापेक्षा  आमच्या स्वतःच्या लोकांनीच ते नष्ट केलं  अंधभक्त पहिल्यांदा बाटी समाजात उद्भवले . त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या आमच्या जमातीचे सर्व लोक मिळूनही त्या अंध भक्तांना थांबवू शकले नाहीत . त्यावेळी ही बासरी ची संकल्पना कोणाच्याच लक्षात आली नाही . नंतर जेव्हा ही घटना सगळीकडे पसरली त्यावेळपासून आम्ही सर्वजण स्वतःजवळ बासरी बाळगू लागलो ....
" या अंध भक्तांविषयी तुम्हाला अजून काय माहित आहे...?  त्यांना कशाप्रकारे मारू शकतो आणि त्यांच्या अजून कोणत्या कमकुवत जागा आहेत....?  महाराज कैरवांनी त्याला विचारले....
" मला फक्त त्या बासरी विषयी माहित आहे आमच्या कबील्याचीही  एक पुजारीन आहे,  तिला या जुन्या पुराण्या बऱ्याच गोष्टी माहित आहेत .  तुम्ही तिला विचारू शकता , 
 तो बाटी जमातीचा नायक म्हणत होता...
" मी लहानपणापासून बऱ्याच गोष्टी ऐकत आलो आहे ,पण त्या फक्त गोष्टी म्हणूनच मी मानत होतो . मात्र या गोष्टी खऱ्या होत आहेत,  एकूण एक , एकापाठोपाठ एक . त्यामुळे आम्हाला आमचे मूळ घर सोडून स्थलांतरित व्हावे लागत आहे.....
महाराज कैरवानी कौशिककडे पाहिले , 
कौशिक म्हणाले....
" महाराज मी अगोदरच त्यांच्या संर्व कबिल्याना आपल्या राज्यात स्थलांतरित करण्यासाठी आपली सैनिकांची तुकडी पाठवलेली आहे .  यांच्यापैकी यांचे बरेच कबीले आपल्या राज्यात आलेले आहेत , तर काही कबीले अजून येत आहेत . नायकांनी आत्ताच ज्या पूजारनीचा  उल्लेख केला , त्या पूजारनीला आणण्यासाठी आत्ताच सैनिकांची एक तुकडी पाठवतो ......

पुढे सेनाप्रमुख , कौशिक व इतर मंत्र्यांनी आपले विचार मांडले .  त्यांचा निष्कर्ष एकच निघत होता . महाराज विक्रमांनी भिंत पाडायची ठरवली आहे तर त्यांना पाडू दे त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही , आपण आपल्या राज्यातील लोकांचा विचार करून त्यांच्या साठी जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्या करू . 

बऱ्याच वेळानंतर राज्याचे प्रमुख सल्लागार महर्षी सोमदत्त बोलले...
" महाराज कैरव जेव्हा तुमचे वडील हयात होते त्या वेळेपासून मी या राज्याचा महर्षी म्हणून सेवा करत आहे .  काळ्या भिंतीपलीकडे जे काही आहे , त्याने एकेकाळी या संपूर्ण पृथ्वीतलावर हाहाकार माजवला होता . काळ्या भिंतीपलीकडील सम्राटाने पृथ्वीवरती प्रलय आणला होता .  त्या प्रलयानंतर  एका नवीन युगाची सुरुवात झाली . त्या सम्राटाला हरवण्यासाठी पृथ्वीतलावरील सर्व राज्ये एकत्रित झाली होती .  अजूनही त्यांना सहयोगी राज्ये म्हणून संबोधले जाते .  त्या सर्व राजांनी मिळून त्याला त्या भिंतीपलीकडे बंदिस्त करून , ती भिंत बांधली. इतकी वर्ष झाली तरी अजूनही ती जमीन , तो भाग राहण्यालायक  नाही , तिकडे जीवन नाही... मागच्या वेळी जेव्हा काही मूर्ख लोकांनी त्या काळ्या  भिंती पलीकडील मदतीने जेव्हा पृथ्वीतलावरचे राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता ,  त्यावेळी  भिंतीच्या अलीकडील सहयोगी राज्यांनी मिळून त्या मुर्खांना मृत्युदंड दिला होता...... अधूनमधून असे लोक उद्भवताच जे काळ्या भिंतीपलीकडील मदतीने पृथ्वीवरचे साम्राज्य ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतात... पण इतकी वर्षे झाली एकदाही ती भिंत पाडण्याचा प्रयत्न झाला नाही . कुणाचीही भिंत पडण्याची हिंमत झाली नाही . आणि आत्ताच असे काय झाले महाराज कि विक्रमांनी हा आदेश दिला.....? खरेतर त्या मूर्ख विक्रमला महाराज म्हणायला माझी जीभ लवत नाही . ज्यावेळी महाराज विक्रमाचा राज्याभिषेक होणार होता व सर्वांना निमंत्रणे गेली होती  ;  त्यावेळेस मी आपल्याला सल्ला दिला होता ,   विक्रम एवजी महाराज विश्वकर्मा ना रक्षक राज्याचे राजा बनवावे.... मला विक्रम मध्ये पूर्वीपासूनच काहीतरी विचित्र दिसत होतं . तो रक्षकाचा वंश असू शकत नाही .  महाराज सत्यवर्मा व महाराणी शकुंतलेचा पुत्र असू शकत नाही . त्याने भिंत पाडण्याचे आज्ञा दिली आहे म्हटल्यानंतर त्यामागे नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट असणार आहे ,  जी आपल्याला दिसत नाही . आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .  महाराज माझं मत विचाराल तर मी प्रामाणिकपणे सांगतो की कसंही करून त्या मूर्ख विक्रमाला ती भिंत पाडण्यापासून थांबवायलाच हवं . एक मिथक व अंधश्रद्धा म्हणून जर आपण त्याकडे बघत असाल तर आपलं चुकत आहे . महाराज जर ती भिंत पडली तर आपल्याला , आपल्या सर्वांना , सर्व मानव जातीला फार मोठे बलिदान द्यावे लागेल.....
" पण महर्षी कितीतरी शतकात आपण त्या भिंती मुळे आपले रक्षण झालय अशा गोष्टी ऐकल्याच नाहीत...
उलट ती भिंत आपले अस्तित्व दाखवून देत आपल्याला त्यापलीकडे जाण्यापासून थांबवण्याचा आलेली आहे .  त्या पलीकडे असलेली  खनिज संपत्ती जर आपल्या राज्यात आली तर आपल्या राज्यात, व इतरही अनेक राज्यात  अजून मोठ्या प्रमाणावर सुख-समृद्धी येऊ शकते..... सेनाप्रमुख यशवंतजी महर्षींना विचारत होते....
" सेनाप्रमुखजी काही गोष्टींचे अस्तित्व जरी दिसत नसले तरी त्या असतात .  आपण त्यांचं अस्तित्व नाकारू शकत नाही . एखादी गोष्ट दिसत नाही म्हणून ती नाही असे नसते .  एखादी गोष्ट आपल्याला जाणवत नाही म्हणून ती नाही असे नसते . एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही म्हणून ती नाही असेही नसते . बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला कुठेही दिसत नाहीत जाणवत नाहीत पण वेळ आल्यावरती आपले अस्तित्व दाखवून देतात......
महर्षींच्या या वाक्यांवरती संपूर्ण सभा विचार मग्न झाली....
क्रमःश