Maze Aavadte Kathakar--- Pu.L.Deshpande in Marathi Biography by suresh kulkarni books and stories PDF | माझे आवडते कथाकार --- पु.ल.देशपांडे !

Featured Books
Categories
Share

माझे आवडते कथाकार --- पु.ल.देशपांडे !

पु.ल.देशपांडे! कोण होते?असे विचारण्या पेक्षा, काय काय होते हे विचारणे सयुक्तिक होईल.
लेखक,-नाट्य, ललित, प्रवास वर्णन, भाषणे, -पटकथा लेखक, दिग्दर्शक, कवी, संगीत दिग्दर्शक, उत्तम रसनेचे खवय्ये, जाणकार श्रोते, शिक्षक, आणि एक विद्यार्थी सुद्धा! पंडित नेहरूंची दूरदर्शनच्या पहिल्या वहिल्या प्रसारणासाठी, मुलाखत घेणारे पहिले मुलाखतकार पु.ल.च होते. रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका पण, त्यांच्या हातातून सुटल्या नाहीत! आणि एक छान ,उमदा माणूस! असे all -in -one व्यक्तिमत्व माझ्या पाहण्यात तरी नाहि.

मी पु.ल.देशपांडे यांचा मोठा चाहता आणि छोटासा वाचक आहे. जितके वाचलय त्यानेच मला त्यांनी आपलस केलंय आणि आपण पु.ल.ना अनेक जन्मान पासून ओळखतो, हि भावना पण मनात रुजून गेलीयय. ते कधी परके वाटलेच नाहीत. बैठकीत अण्णा(माझे वडील )सोबत, रोज गप्पा मारत बसत असावेत असेच वाटते. पण असे त्यांच्या सगळ्याच वाचकांना वाटत असावे.

माझ्या वाचनात त्यांचे सगळेच्या सगळे साहित्य आलेले नाही. 'व्यक्ती आणि वल्ली', 'असामी असा मी', 'बटाट्याची चाळ',आणि 'मराठी वांग्मयाचा(गाळीव)इतिहास' इतकीच पुस्तके वाचली आहेत. त्यामुळे मी त्यांचा 'इतकाच' वाचक आहे.

पु.ल.नी विपुल लिखाण केल आहे, पण त्या पेक्षाही, त्यांच्या लिखाणावरील लिखाणासाठी, इतरांनीच अधिक झरण्या झिजावल्यात! (त्यात अस्मादिक सुद्धा आहेत.) पु.ल.नच्याच भाषेत सांगायचे तर 'नाका पेक्षा' या उपऱ्या लेखनाचाच मोतीच जड!

पु.ल.म्हटल कि 'व्यक्ती रेखाचा'ब्रम्हदेव डोळ्या पुढे उभा रहातो. 'गणगोत', 'गुण गाईन आवडी', 'मैत्र' हे त्यांनी त्यांच्या जवळच्या माणसांवर लिहिले व्यक्ती चित्रे आहेत. तर 'व्यक्ती आणि वल्ली'या काल्पनिक व्यक्तींवर लिहलय. निखळ 'कथा' त्यांनी लिहल्या नसल्या तरी, त्यांची प्रत्येक व्यक्तिरेखा हि एका अर्थी कथाच असते. म्हणूनच मी 'माझे आवडते कथा लेखक' यात, पु.ल.ना घेवून आलोय! त्यांनी फक्त कथा सुत्रा एवजी, विनोदनिर्मितीस प्राधान्य दिले आहे. त्या मुळे त्यांच्या लेखनात 'कथा'गौण ठरते. 'म्हैस'हे एकमेव कथा मी वाचलीय. पु.ल.ची म्हणून ती ग्रेट. पण 'कथा'म्हणून मला ती सुमारच वाटली!

'व्यक्तिरेखा' हा प्रांत अनेक लेखकांनी पालथा घातलाय, हुकुमत आहे ती मात्र पु.ल.नचीच! अगदी आजही! 'असामी असा मी', 'बटाट्याची चाळ'या जरी, व्यक्तीरेखा नसल्यातरी, त्यात हि अफलातून व्यक्ती चित्रण आहे. 'बटाट्याच्या चाळीचा'डोलारा तर, अशाच अवलिया आणि भक्कम व्यक्तीरेखाच्या 'नगा'वर उभा आहे!

मी त्यांच्या काल्पनिक व्यक्तीन पुरतेच लिहणार आहे. खरेच अशी कोणती रसायने, या व्यक्तिरेखांना 'चिरंजीव'करून गेलीत? हा मला नेहमीच प्रश्न पडतो. त्यांची कोणतीही व्यक्ती रेखा घ्या, झटकन डोळ्या पुढे उभी रहाते. खरे तर त्यांच्या लेखनात त्या व्यक्तीचे 'बाह्य'वर्णन नेसतेच किवा असलेच तर,खूप त्रोटक असते. जसे 'होका यंत्रा सारखी टोपी', 'मळखाऊ कोट' किवा 'गुड्ग्याखाली दोन बोट धोतर' असेच काहीसे. वय,उंची आकार,यांचा उल्लेख नसतो. भव्य कपाळ, कुरळे केस /विरळ केस, टपोरे /मिचमिचे डोळे, असल्या वर्णनाची त्यांच्या पात्रांना गरज नसते. ते सारे व्यक्ती रेखा वाचताना संदर्भात समजते. तरी 'नंदा प्रधान', 'पेस्तन काका'यांना, त्यांनी उदार मनाने एखाद दुसरे वाक्य दिले आहे. 'नंदा प्रधान' साठी ---'जवळपास पावणे सहा फुट उंची, सडपातळ, निळ्या डोळ्याचा, लहानश्या पातळ ओठाचा, कुरळ्या केसांचा नंदा-----' इतकेच वाक्य खर्ची पाडले आहे! असे असून हि त्यांचा नारायण, हरितात्या, सखाराम गटणे, म्हटले कि ती व्यक्ती चटकन डोळ्या समोर, खरे तर असे म्हणणे बरोबर नाही, ती व्यक्ती आपल्या मनात साकारते. प्रत्येक वाचकाच्या मनात - नारायण, हरितात्या, नामू परीट- यांच्या आकृत्या वेगळ्या वेगळ्या असतील. कारण आपण, नामुचा कोडगेपणा, नारायणचा कार्यात झोकून देण्याचा गुण, किवा हरीतात्यांच इतिहासात रमण्याची वृत्ती, मनत साठवून ठेवतो आणि नकळत आसपासच्या मंडळीत त्यांना शोधात असतो!आणि ते सापडतो पण! आणि हेच ते पु.ल.नचे 'चिरंजीव रसायन'!(असे मला वाटते.) या शिवाय त्या प्रत्येक व्यक्तीची एक अंगभूत कथा असते. म्हणूनच त्या व्यक्ती रेखा, तुमच्या, माझ्या इतक्या सहज आणि सजीव वाटतात. त्यांच्या सगळ्याच व्यक्ती रेखा 'देखण्या'आहेत. हरितात्या, चितळे मास्तर, शेवटी डोळेओले करून जातात. अंतू बर्वा आपली आंतरिक व्यथा, वाचकांच्या पदरी बांधून जातो. (आणि माझ्या सारखा वाचक त्या जपून पण ठेवतो!), नंदाच उद्धस्त जीण हेलकावून जात.

खरे तर 'नंदा प्रधान' हि पु.ल.नची सगळ्यात वेगळी व्यक्ती रेखा आहे. एक अनोख्या पद्दतीने लिहिलेली कथाच आहे. त्यांच्या इतर व्यक्ती आणि वल्ली आपल्याला आसपास सहज सापडतात. पण 'नंदा प्रधान'शोधूनही सापडत नाही! हेवा करावा असे देखणे व्यक्तिमत्व, अमाप पैसा, तरी दुर्दैवी आणि उधवस्त जीण, नशिबी आलेला जीव! आई, बाप, प्रियासी, बायको-- अहो, प्रत्येक नात्याचा विस्कोट झालेला! इतके घाव सोसलेला माणूस काहीसा अबोल होतो. पु.ल.नि 'नंदा'तसाच साकारलाय! पु.ल.ना 'नंदा प्रधान'उभा करताना, नक्की कस लागला असणर!

मला भावलेली दुसरी व्यक्ती रेखा आहे, 'जनार्दन नारो शिंगणापुरकर'! या भारदस्त नावाच्या, फाटक्या 'बोलट' ची व्यथा तुम्हाला ऐकायचीय? फक्त खालील संवाद वाचा.
-------"जन्या! माझ्या म्हातारपणा बद्दल बोलतोस--आणि गाढवा तू पंचावन्न वर्षाचा थेरडा ,तू माझ्या बाजूला रुख्मिणी म्हणून उभा होतास तो ?"
"तेच! त्यासाठीच बोंबलतोय मी! ह्या, ह्या लेखकाला तुम्ही तेव्हडे म्हातरपणी सुभद्रेच काम करताना वाईट दिसला" हातातले वर्तमानपत्र नाचवत म्हणाला "आणि मी --माझ बोळक झालेलं तोंड घेवून रुख्मिणी म्हणून उभा होतो. मी नाही दिसलो त्याला? अरे साल्यानो, टीका करायची म्हणून तरी आमच नाव एकदा आयुष्यात, कागदावर छापलं असत तर, काय जात होत तुमच्या बापच!"
नट - बोल्ट हि नाटकाच्या संदर्भात वेगळी संकल्पना असते. याच नाव होत, कौतुक होत तो 'नट' होतो आणि बाकी जे दुर्लक्षित असतात त्यांना 'बोलट' म्हणून हिणवल जात. जनार्दन नरो शिंगणापूरकर या, बोलटाची व्यथा, कुठे तरी अंतःकरणाला पीळ पाडून जाते.

पु.ल.नच्या व्यक्तीरेखान मधील 'कथा'शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे. आपणास हि भावेल हि आशा.
शेवटी सर्वाना एकच आशिष ----'पु.ल.म भवतु !'

सु र कुलकर्णी . आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय.पुन्हा भेटूच.Bye.