ज्यावेळी डिसुझा त्याचा पुर्ण फौज फ़ाटा घेऊन मायाच्या बंगल्याकडे निघाला होता त्यावेळी माया आपलं प्लॅनींग दिपकला सांगण्यात मग्न होती.
” थॉमसला जॉनीनेच मारले हे आत्तापर्यंत तु ओळखलं असशीलच. त्यानुसार प्रथम थॉमसला मारुन त्याने तुम्हाला कोंडीत पकडले. तुमची होणारी तडफड, तगमग त्याला सुखावत होती. स्टेफनीने मुर्खपणा किंबहुना हावरपणा करुन थॉमसचा इन्शोरन्स क्लेम फ़ाईल केला. इतक्या मोठ्या रकमेसाठी पुर्ण पडताळणी होतेच आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा एजंट एन्क्वायरीसाठी पाठवुन दिला. आज नाही तर उद्या तपासात थॉमसचा मृत्यु हा बनाव होता हे लक्षात आले असते आणि पोलिस तुझ्यापर्यंत पोहोचले असते. त्यामुळे जॉनीने इन्शोरन्स एजंटला संपवुन माफीयाच्याच एका माणसाला मोहीते बनवुन तुमच्या घरात घुसवले.
शक्य असते तर जॉनीने तुला अजुन तडपवले असते. परंतु भाईला तुझा लांबलेला मृत्यु बघवत नव्हता. त्याने तुला लगेच मारुन टाकण्याचे जॉनीला फर्मावले. त्यानुसार त्या दिवशीच तुला मारण्याचा जॉनीने प्लॅन बनवला होता. परंतु इथपर्य्ंत आल्यावर तुला मरुन चालणार नव्हते. तुझी कसंही करुन जॉनीच्या तावडीतुन सुटका होणं भाग होती. म्हणुन मग मीच शेखावतला तुझ्या ठिकाणाची टिप दिली. शेखावत आणि जॉनी एकाचवेळी तेथे पोहोचले आणि त्यामुळे झालेल्या गडबडीत तुला पळुन जाता आले.”, माया
“परंतु त्यावेळी जॉनी त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी झाला असता तर?”, दिपक
“नसता झाला.. युसुफ त्याच्याबरोबरच होता. जर अशी वेळ आली असतीच की तो तुला मारणार.. तर त्या आधीच युसुफने जॉनीला मारले असते..”, माया
“पण मला एक कळतं नाही, मीच का? शेखावतला मारायला तुला दुसरा कुठलाही भाडोत्री मारेकरी चालला असता. कोणीही पैश्यासाठी शेखावतला संपवले असते..”, दिपक
“बरोबर.. पण हे भाडोत्री मारेकरी सांगकाम्या असतात. मला फक्त शेखावतलाच नाही तर माफीया टोळीच उध्वस्त करायची होती. आणि त्यासाठी फक्त हिंमत नाही तर मला डोकं असणारा कोणीतरी पाहीजे होता. ज्याप्रकारे तु त्या तुरुंगातुन शेखावतच्या हातातुन निसटलास त्यावरुन ह्या कामी तुच योग्य आहेस ह्याची मला खात्री होती..”, माया
“आणि माफियाला उध्वस्त करण्याचं कारणं?”, दिपक
“तेच.. जे मी तुला सांगीतलं.. आमच्या कामात त्यांचा हस्तक्षेप वाढला होता. दमणचं होणारं स्मगलिंग त्यांना आपल्या छत्राखाली हवं होतं आणि म्हणुनच त्यांनी पोलिसांना टिप दिली ज्यामुळे माझा नवरा कायमचा अपंग झाला… सगळं प्लॅननुसार व्यवस्थीत चाललं होतं, पण कुठुन कसा.. पोलिसांना तुझा संशय आला.. आणि आता तु माझ्यासाठी धोकादायक झालास. पोलिस तुझ्यापर्यंत पोहोचले, तर त्यांना माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही.. सो.. विथ हेवी हार्ट, गुड बाय दिपक..”, माया
“नाही.. इतक्या लवकर नाही माया…”, दरवाजा खाड्कन उघडुन डिसुझा आतमध्ये शिरला आणि त्याने युसुफवर झेप घेतली. युसुफ बेसावध होता. डिसुझाच्या हल्ल्याने तो हेलपांडला आणि त्याच्या हातातुन बंदुक निसटुन खाली पडली.
डिसुझाबरोबरच्या दोन शिपायांनी लगेच त्याला पकडले.
“हॅल्लो वन्स अगेन दिपक..”, डिसुझा दिपककडे बघुन हसत म्हणाला..
“सो! माया मॅडम! कधी वाटलं होतं, पोलिस तुमच्या दारात येऊन पोहोचतील?”, डिसुझा
“काय पुरावा आहे तुमच्याकडे इन्स्पेक्टर? तुम्ही काही सिध्द करु शकणार नाही माझ्या विरुध्द. कोणाची साक्ष ग्राह्य धरणार न्यायालय? ह्या दोघांची? तुरुंगातुन पसार झालेल्या ह्या दोघांची?”, दिपक आणि युसुफकडे बोट दाखवत माया म्हणाली.
युसुफ अविश्वासाने मायाकडे बघत होता.
“मी एक फोन फिरवला ना इन्स्पेक्टर, दहा मिनिटांमध्ये तुम्ही ह्या राज्यातुन बाहेर पडायचा रस्ता धराल, नाहकं माझ्या नादी लागु नका तुम्ही.”, माया दटावणीच्या सुरात म्हणाली.
“बरोब्बर.. अगदी बरोब्बर.. पण तुम्ही फोन फिरवायचे कष्ट घेताच कश्याला? मी काही तुम्हाला पकडायला आलोच नाहीये.”, डिसुझा आरामात हसत म्हणाला..
“म्हणजे?”, माया
“म्हणजे? म्हणजे मी तुम्हाला कश्याला अटक करु? तुमच्यावर खटला भरण्यासाठी, पुराव्यांसाठी धावाधाव करु? वरिष्ठांची नाराजगी ओढवुन घेउ? तुम्ही तुमच्याच मौतीने मरणारच आहात की. मग उलट तुम्हाला प्रोटेक्शन द्या..”, डिसुझा बोलत होता.
“नाही.. मला समजलं नाही. काय बोलताय तुम्ही??”, माया
“म्हणजे असं बघा. आज नाही तर उद्या.. माफियाला खबरं लागणारच की दिपक कुमारला तुमच्या घरातुन पकडलं.. तेथेच माफियाचा माणुस युसुफ सुध्दा होता.. मग ते अधीक शोधाशोध करतील.. थोडी आम्ही त्यांना मदत करु तुमचा प्लॅन काय होता हे कळवण्याची.. झालं तर मग.. माफिया आपल्या गोटातील गद्दारांशी कसं वागते.. हे काय तुम्हाला सांगायला हवं का? ते ठरवतील तुमचं काय करायचं..
चला.. राणे.. दोघांना ताब्यात घ्या.. आपल्याला निघायला हवं..”, असं म्हणुन डिसुझा माघारी वळला…
“थांबा..”, जरबीच्या सुरात माया म्हणाली..
राणा आणि डिसुझा माघारी वळले.. मायाच्या हातात तिचं पिस्तोल होतं.
“कुणा कुणाला मारणार तुम्ही माया मॅडम.. इथल्या इथेच १० पोलिस असतील..खालच्या गेटवर २०-२५ आणि लागलंच तर आपण अजुनही मागवुन घेउ. तुमच्या पिस्तोलात फक्त आठ गोळ्या.. बघा म्हणजे.. उगाच आत्ता काही पुरावा तरी नाही तुमच्या विरोध्द. नाहक पकडल्या जाल..”, डिसुझा
“बरोबर आहे तुमचं..”, रोखलेले पिस्तोल खाली करत माया म्हणाली..”देअर इज नो पॉईंट इन लिव्हींग.. आज नाही तर उद्या माफिया मला संपवेलच.. ते तसं मरण पत्करण्यापेक्षा हे असं..”, असं म्हणुन मायाने पिस्तोल स्वतःच्या पोटाला लावली आणि चाप ओढला..
क्षणार्धात धाड़ आवाज आला आणि माया खाली कोसळली. जमीनीवरचं महागडं क्रिम कलरच कार्पेट क्षणार्धात रक्ताने लालभडक झालं.
कुणीच जागचं हाललं नाही. मायाच्या तोंडातुन उचक्यांवाटे रक्तं बाहेर येऊ लागलं. काही क्षण तिने गचके खाल्ले आणि मग तिचा देह निष्प्राण झाला.
अचानक घडलेल्या त्या प्रकाराने सारेच स्तंभीत झाले होते. त्याच्या फायदा घेऊन दिपकने अचानक राणांच्या हातातुन पिस्तोल हिसकावली आणि त्याच्या कपाळाला लावली.
“डिसुझा.. तुमचं काम झालं असेल.. माझं नाही.. जॉनी चिकना अजुनही बाहेर मोकाट आहे.. स्टेफनीचा खुनी.. त्याचा बदला घेतल्याशिवाय मला शांत बसवणार नाही..”, दिपक
“दिपक.. मुर्खपणा करु नकोस..जॉनी चिकनाला आपण पकडु.. हे बघ तु निर्दोष आहेस.. स्टेफनी, थॉमस, मोहीते कुणाचाच खुन तु केला नाहीस. हा युसुफ ते सर्व कबुल करेल. शेखावतला तसंही तु मारलं नव्हतंस.. मायाने मारलं होतं.. हो ना?”, दिपक
“हम्म”, दिपक म्हणाला..
“मग.. तुझ्यावर पहीले आरोप सोडले तर काहीच आरोप नाहीत.. मग कश्याला स्वतःचं आयुष्य उध्वस्त करतोस? तुझ्यावर झालेला अन्यायाविरुध्द आपण आवाज उठवु.. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत…”, डिसुझा
“नाही डिसुझा.. जॉनी माझी शिकार आहे.. तुम्ही पोलिस त्याचं काहीच वाकडं करु शकणार नाही..”, दिपक
“हे तु बोलतोस दिपक? अरे तु सैन्यातला एक जबाबदार अधीकारी ना? एकदा चुक घडली.. मान्य. पण आपण ती सुधारु शकतो..”, डिसुझा
“मान्य.. मान्य एकवेळ तुम्ही ते आरोप मागे घ्याल सुध्दा.. पण माफियाचं काय? आणि तो मंत्री.. ज्याच्या दबावामुळे पोलिस माझ्या मागे शिकारी कुत्र्याप्रमाणे लागले होते.. तो मला निर्दोष होऊ देईल..?”, दिपक
“अरे वेड्या.. झालं गेले ते दिवस.. तो मंत्रीच स्ट्रींग ऑपरेशनमध्ये अडकलाय. मंत्रीपदाचा राजीनामा तर केंव्हाच दिला त्याने उलट आज तुरुंगात जातो का उद्या अशी त्याची अवस्था आहे..आणि माफीयाचं म्हणशील तर इस्माईलला तु मारलंच नाहीस.. तर ते कश्याला तुला मारण्यासाठी दिवस-रात्र एक करतील..? त्यांना बाकीची कामं काय कमी आहेत का?”, डोळे मिचकावत डिसुझा म्हणाला.
दिपकच्या मनाची चलबिचल सुरु झाली.
“दिपक.. ऐक माझं.. तुला ह्यातुन मी बाहेर काढीन, माझ्यावर विश्वास ठेव..उगाच वेडेपणा करायला जाशील आणि पुन्हा आयुष्याशी खेळ होऊन बसेल.. आण ते पिस्तोल इकडे”, डिसुझाने हात पुढे केला
दिपकने बराचवेळ विचार केला आणि आपले पिस्तोल राणाला परत केले..
एक महीन्यांनंतर..
डिसुझा आणि दिपक एका बारमध्ये बसुन बिअर पित होते. डिसुझाने आपला शब्द खरा करुन दाखवला. त्याने कोर्टाला, सरकारला अपिल करुन दिपकसाठी माफी मिळवली. झालेला प्रकारात तो अडकवला गेला होता आणि केवळ व्यक्तीगत सुडाच्या भावनेतुन मंत्र्याने दिपकला अडकवले होते हे पटवुन दिले.
झाली तेवढी शिक्षा दिपकला पुरेशी आहे हे न्यायालयाने मान्य करुन त्याला माफी दिली. सैन्यातील अधीकार्यांनीही दिपकला मानाने आहे त्या हुद्यावर परत घ्यायची तयारी दर्शवली. युसुफने दिलेल्या टिपवर पोलिसांनी जॉनी चिकनाला पकडण्यासाठी धाड टाकली.. परंतु तो पोलिसांच्या बरोबर झालेल्या चकमाकीत मारला गेला
“मला एक कळालं नाही डिसुझा..”, बिअरचे घोट घेता घेता दिपक म्हणाला…”त्या दिवशी तुम्ही माया मॅडमच्या घरी कसे काय पोहोचलात?”
“मी इन्स्पेक्टर शेखावतची फाईल मागवली होती..”,डिसुझा म्हणाला..”तेंव्हा तो इथे दमणला पोस्टींगला होता हे लक्षात आले.. मग आम्ही स्टेशन इन्चार्ज पटेल साहेबांशी बोललो.. त्यांनी त्यावेळी झालेला सगळा प्रकार सांगीतला. मायाच्या नवर्याला शेखावतने जाणुन बुजुन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणुनच त्याची दमणमधुन बदली करण्यात आली.. हेही लक्षात आले. आणि त्याचवेळी शेखावतचे आणि मायाचे कनेक्शनही.
एका दमात पन्नास लाख उभे करु शकेल अशी दमणमध्ये तरी काहीच व्यक्ती आहेत आणि माया त्यापैकीच एक होती. तुझ्याबरोबर तुरुंगातुन पळालेला दुसरा कैदी युसुफ.. माफियाचा माणुस होता.. आणि त्यालासुध्दा अनेकवेळा ह्या आधी दमणमध्ये पाहीले गेलेले होते. यु नो.. अफ़्टरऑल पोलिसांचे अंदाज.. त्यांची निरीक्षणं कधी चुकत नाहीत. आम्ही पण मायाच्या बाबतीत असाच अंदाज बांधला आणि तिकडे येऊन धडकलो..”
दिपकने आपला बिअरचा ग्लास संपवुन टाकला
“सो.. आता पुढे काय?”, डिसुझा..
“पुढे?? पुढे रिपोर्टींग टु कारगिल..”, दिपक उठुन उभा राहीला.
डिसुझा आणि दिपकने एकमेकांशी हातमिळवणी केली आणि एकमेकांना सलाम ठोकले..
“ठिक तर मग…”, दिपक
“गुडबाय.. दिपक. अॅन्ड ऑल द बेस्ट”, डिसुझा
दोघांनी एकमेकांकडे काही क्षण पाहीले आणि दोघंही आपल्या आपल्या रस्त्याला जाण्यासाठी बाहेर पडले………………………..
[समाप्त]