An lakhyache jivan badlale in Marathi Moral Stories by Pradip gajanan joshi books and stories PDF | अन लख्याचे जीवन बदलले

Featured Books
Categories
Share

अन लख्याचे जीवन बदलले

रात्र सरून दिवस उजाडला. सूर्याची किरणे हळूहळू धरतीवर पडू लागली. शेतकरी बाया बापडे भाकरी कोरड्यास बांधून घेऊन शेतीच्या कामासाठी गावकुसाबाहेर रवाना झाले. गावातली नोकरदार माणसं नोकरीचं ठिकाण जवळ करू लागली. संथ गतीने जनावरांनी गोठ्यातून बाहेर येऊन चाऱ्याच्या शोधार्थ आपला रस्ता धरला. घराघरात बायांची स्वयंपाकाची लगबग सुरू होती. लहान मुलं मुली शाळेचा रस्ता कापत होती. गावात तशी सर्वांचीच धावाधाव सुरू होती. एकटा लख्या बिचारा अजूनही अंथरुणात लोळत पडला होता. त्याला ना स्वतःची काळजी ना समाजाची.
दहा वाजल्यापासून त्याचा दिनक्रम सुरू व्हायचा. मुले मुली शाळेत येण्याची वेळ झाली की शाळेचा परिसर गजबजून गेलेला असायचा. पालकांची मुलांना शाळेत सोडण्यासाठी वर्दळ असायची. सायकली, रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहने शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबलेली असायची. तिथेच एक झाडाखाली सावलीला दिवसभर थांबून तो भीक मागायचा. काहीतरी खायला द्या, निदान चार पैसे तरी द्या म्हणून याचना करायचा. त्याचा तो नित्याचा नियम होता.
लख्यांला लहानपणीच कोणीतरी अनौरस संतान म्हणून कचऱ्याचा कुंडीजवल ठेवलं होतं. जवळच झोपडपट्टी होती. गोरगरीब भीक मागून उदरनिर्वाह करत होते. त्यातील एका म्हातारीला लख्याचे हाल त्याचे ओरडणे सहन झाले नाही. तिने लख्याला आपल्या झोपडीत आणले. त्याचे पालन पोषण केले. त्याला सांभाळणारी म्हातारी मात्र लई दिवस टिकली नाही. ती गेली अन लख्याचे पुन्हा हाल सुरू झालं. शाळेची पायरी न चढलेल्या लख्यापुढं आयुष्य कसे जगायचं हा प्रश्न निर्माण झाला. लख्या त्यावेळी जेमतेम आठ वर्षाचा होता. त्याने ठरवले शाळेजवळ आपण भीक मागत रहायचं.
आज नेहमीप्रमाणे तो नऊ वाजता जागा झाला. सार्वजनिक नळाखाली बसून गार पाण्याने आंघोळ केली.थंडीने बिचारा कुडकुडत होता. भिकारी असला तरी स्वच्छ होता. त्याने काल मिळालेल्या दहा रूपयातून एक वडा पाव खाल्ला. भीक मागण्याची कटोरी घेतली. शाळेचा रस्ता धरला.
नेहमीप्रमाणे शाळेच्या आवाराबाहेर झाडाखाली त्याने पोत अंथरले. कटोरी समोर ठेवली. शाळेची सुट्टी होण्याची वाट पाहू लागला. सुट्टी झाली मुले शाळेच्या आवारात फिरू लागली. लख्या त्यांच्याकडे मनधरणी करू लागला. हात पसरून भीक मागू लागला. मुले मात्र त्याच्याकडे नुसती पहायची व निघून जायची.
असेच काही दिवस गेले. एके दिवशी नेहमीप्रमाणे भीक मागत बसलेला लख्या मुलांना त्यांच्या सुट्टीत दिसला नाही. मुले आपापसात चर्चा करू लागली. नाही नाही ते विचार त्यांच्या मनात येऊ लागले. काय झाले असेल लख्याचे. असंख्य प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले. त्यांनी लख्याचा शोध घेण्याचे ठरवले.
शाळेचा सारा परिसर त्यांनी पालथा घातला. मात्र लख्याचा कोठेही ठावठिकाणा लागला नाही. शाळेजवळच एक बाग होती. मुले लख्याला शोधण्यासाठी बागेत गेली. एका लाकडी बाकड्यावर लख्या गाढ झोपलेला त्यांनी पहिला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले. लख्या तापाने फणफणत होता. मुलांनी शाळेतल्या शिक्षकांना ही माहिती दिली. सर्वांनी मिळून लख्याला वैध्यकीय सेवा पुरवली.
दुसऱ्या दिवशी मुलांनी लख्याचे जीवनच पालटून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वर्गणी काढली. रिकाम्या बाटल्या, टेबल, खुर्ची आदी साहित्य जमवले. गोळ्या बिस्किटे बाटल्यात भरून ठेवली. किती दराने त्याची विक्री करायची त्याच्या किमतीच्या चिठ्ठया लावून ठेवल्या. लख्या कधी येतो त्याची वाट पहात सर्वजण शाळेच्या बाहेर थांबले.
नेहमीच्या वेळेत लख्या शाळेच्या आवारात आला. त्याला मुलांनी बाहेरच थांबवले. त्याचे डोळे बांधले. लख्या पहातच राहिला. मुले काय करणार आहेत याची त्याला थोडी देखील कल्पना न्हवती. मुलांनी लख्याला हाताला धरून त्या नेहमीच्या झाडाखाली आणले. त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली. समोर छोटस गोळ्या बिस्किटाच्या विक्रीचे केंद्र पाहून लख्याला आश्चर्य वाटले.
आता भीक मागायची नाही.  कोणापुढं हात पसरायचे नाहीत. गोळ्या बिस्किटाच्या विक्रीतून येणाऱ्या पैशातून उपजीविका करायची मुलानी लख्याला ठणकावून सांगितले. लख्याचे डोळे या घटनेने पाणावले. कोठली कोण मुले त्यानी त्याला नवी दिशा दिली
प्रदीप जोशी
- 9881157709