Bhatkanti - Suruvaat aeka pravasachi - 1 in Marathi Fiction Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग 1)

Featured Books
Categories
Share

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग 1)

आकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पावसाचे थेंब मिसळून, घुसळून एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. त्या थंड वाऱ्याच्या झोतानेच त्याला जाग आली होती. आकाश त्याच्या तंबू मधेच पहुडला होता. डोळे उघडले आणि तंबू मधून डोकं बाहेर काढलं. छान वारा सुटला होता. प्रसन्न वातावरण अगदी, तसाच डोळे चोळत बाहेर आला. अंग आळोखे - पिळोखे देत वाकडं-तिकडं करत आळस दिला. घड्याळात पाहिलं तर सकाळचे ७.३० वाजत होते. तरीही अजून सूर्य देवाचे आगमन झाले नव्हते. आकाश तंबू पासून जरा पुढे आला. आजूबाजूला बघू लागला.


समोरच्या डोंगरावर राजमाची पुन्हा जोरदार पावसाच्या तयारीत गुंतून गेली होती. नुकताच पडून गेलेला पाऊस जणूकाही सांगून गेला होता, तयारीत राहा, जोरदार येतो आहे पुन्हा. त्या बाजूचा सर्व परिसर धूक्यात हरवून गेला होता. जसं काही पांढऱ्या शुभ्र रंगाची शालच पांघरली होती तिथे..... तीनच रंग होते त्या परिसरात, आभाळाचा काळसर रंग, धुक्याचा शुभ्र रंग आणि राजमाचीचा करडा हिरवट रंग.... किती छान द्रुश्य होतं ते. आकाश पुन्हा तंबूत आला. त्याने त्याचा कॅमेरा उचलला. आणि पटापट ३-४ फोटो काढून घेतले. शहरात कूठे दिसते असं द्रुश्य,बरोबर ना...


५ - १० मिनिटं आकाश ते सर्व पाहत होता. समोरच वातावरण अधिक गडद होऊ लागलं होतं. राजमाची तर आता जवळपास दिसेनाशी झाली होती. बोचरा वारा सुरु झाला.शहारलं अंग आकाशचं. पावसाची चाहूल होती ती. आजूबाजूला नजर फिरवली असता चोहोबाजूनी हत्तीच्या आकाराचे मेघ जमा होतं होते. त्यांचा रंगही हत्ती सारखाच काळा, सोबतीला वारा होताच. मधेच एखादी पांढरी शुभ्र लकेर ढगांमध्ये चमकून जायची. विजेचा आवाज अस्पष्ट असा असायचा. थोडावेळ असाच शांततेत गेला. कूठेतरी दूर असा एखादा पक्षी उगाचच ओरडायचा, थोड्यावेळाने त्याचा आवाज ऐकून त्याला प्रतिसाद देयाचा कोणीतरी. आकाश ते सर्व मनात भरून घेत होता. अचानक प्रचंड थंड वाऱ्याचा झोत आकाश कडे झेपावला. गारठून गेला आकाश अगदी. पावसाची नांदी होती ती. दूरवरून येणारा पाऊस आकाश बघत होता. काही क्षणात तो आपल्यापर्यंत पोहोचेल हे आकाश जाणून होता. पट्कन एक फोटो काढला आणि कॅमेरा पावसापासून वाचवण्यासाठी त्याच्या तंबूत शिरला.


पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू झाली. हत्तीचं जणूकाही त्यांच्या सोंडेतून सर्व ठिकाणी पाणी ओतत होते. मधेच एखादी वीज चमकून आपलं अस्तित्व स्पष्ट दाखवून जात होती. सर्व धरित्री चिंब होत होती. समोर राजमाची अक्षरशः स्नान करत होती. तो निसर्गरम्य सोहळा आकाश डोळे भरून बघत होता. छान वातावरण अगदी...... तास-दीड तास तो सोहळा चालू होता. त्यानंतर हळूहळू सूर्यदेवाचे दर्शन होऊ लागले तसा पाऊस आता जाईल असा अंदाज आकाशने लावला. तसे झाले सुद्धा. १० - १५ मिनिटात पाऊस थांबला. आकाश पुन्हा तंबूच्या बाहेर आला. आभाळ बऱ्यापैकी मोकळं झालं होतं. सूर्यदेव त्यांच्या कामाला लागले होते. आजूबाजूचा सर्व परिसर धुवून गेला होता. समोरची राजमाची हिरव्या रंगाने नटली होती. किती उजळून दिसत होती आता ती. धुकं सुद्धा आता विरळ होतं होता. पायथ्याशी असलेली गावं आता दिसू लागली होती. आकाशने त्याच सामान , तंबू पुन्हा बांधायला घेतला. निघायची वेळ झाली ना. सामान बांधून झालं, त्याने घड्याळात पाहिलं, सकाळचे ९.३० वाजलेले. तरी पायथ्याशी असलेली गावं अजून सुस्तावलेली भासत होती. मधेच एखादा पक्षी उगाचच केकाटत जात होता. आकाशने त्याची सॅक पाठीवर लावली. पुन्हा एकदा वारा वाहू लागला होता. आकाशचे पाय निघत नव्हते. , तरी काय करणार ना... पुन्हा जावे लागेल शहरात. एकवार त्याने राजमाची कडे नजर टाकली आणि परतीच्या प्रवासाला लागला.


आकाश एका मॅगझीन साठी फोटो काढायचा. तो एक professional photographer होता आणि traveler सुद्धा. भटकंती करायला खूप आवडायची त्याला. त्याने काढलेले फोटो तर किती फेमस होते. कितीतरी पुरस्कार मिळाले होते त्याला. ते मॅगझीन सुद्धा त्याने काढलेल्या फोटोज वर चालायचे जणूकाही. कारण बहुतेक लोकं आकाशने काढलेल्या फोटो साठीच ते मॅगझीन विकत घेयाचे. खूप फॅन्स होते त्याचे. एवढे छान फोटो क्लीक करायचा आकाश.

पण एक होतं त्याचं. तो कधीच समोर यायचा नाही. एवढे फॅन्स होते त्याचे, पण एकानेही त्याला पाहिलं नव्हतं किंवा त्याचा फोटो बघितला होता. फेसबूक वर त्याने एक फोटो टाकायचा बाकी, धडाधड कंमेंट्स, likes चा नुसता पाऊस पडायचा. तरीही FB वर त्याचा स्वतःचा असा एक फोटो नव्हता. एवढे पुरस्कार त्याला मिळालेले, तरी एकदाही तो स्वतः पुरस्कार घेण्यासाठी गेला नाही किंवा सोहळ्याला हजेरी लावली नव्हती. अलिप्त रहायचा. त्याला त्याचे घरचे आणि ऑफिस मधले.... एवढेच काय ते जवळचे, निदान मानवाच्या वस्तीतले तरी. घरीसुद्धा परिस्तिथी छान अशी. आई-वडील सरकारी नोकरीत. मोठया भावाचा बिझनेस. त्यामुळे आकाशला तशी काम करायची गरजच नाही. आई-वडिलांनी सुद्धा बिझनेस मध्ये लक्ष देयाला सांगितलेले. पण त्याचं मन रमायचं नाही त्यात. त्याला निसर्गच आवडायचा. त्याचे मित्र सुद्धा तेच, झाडं-पशु-पक्षी... निसर्ग. त्याचं निसर्ग हेच पहिलं प्रेम.... त्याला जणू काही माणसांचा तिटकारा होता. पण कधी गरजूला लगेच मदत करायला जायचा पुढे. फोटोग्राफीची आवड कधी पासून लागली ते माहित नाही. पण तो स्वतःच शिकला ते कसब आणि वर्षांच्या अनुभवाने त्याची फोटोग्राफी एवढी सुधारली. तो त्याच्या घरी सुद्धा राहायचा नाही. ऑफिस मध्ये ही क्वचित दिसायचा. त्याचं सगळं सामान एका मोठया सॅक मध्ये भरून ठेवलं होतं त्याने. ती सॅक घेऊनच कूठे कूठे फिरत बसायचा एकटाच. वाटेल तिथे जाऊन राहायचा. बहुतेक वेळेस तो राना-वनात, दऱ्या-खोऱ्यात फिरत राहायचा आणि फोटोग्राफी करत रहायचा. महिन्यात २ - ३ दिवस ऑफिसमध्ये यायचा, काढलेले फोटोज वर काम करून ते प्रसिद्ध करण्यासाठी मॅगजीन कडे देऊन टाकायचा. त्याची सॅलरी जमा झाली का ते बघायचा, पाहिजे तेवढे पैसे काढून पुन्हा प्रवासाला निघायचा.
------------------------------------------------------------------------------------------------------
"ओ काका.... इसको जरा दो पुरी जादा देना... दो दिन से इसने कूच खाया नही .... " सुप्री , त्या पाणीपुरी देणाऱ्या माणसाला बोलली. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह, तरी त्याने दोन पाणीपुरी जास्तच दिल्या संजनाला.


" काका, आता हिला दिला तसं मला पण द्या ना.... मी पण दोन दिवस जेवली नाही आहे." सुप्री एकदम काकुळतीने बघत म्हणाली. तसा तो हसला. पाणीपुरी खाणारे सगळेच हसू लागले. extra पाणीपुरी दिली त्याने, वर बोलला देखील.
" तुम दोनो तो खाते-पिते घर कि लागती हो... दो दिन तो बहुत होते है, मुझे पता था तुम्ह मजाक कर रही हो, मैने ऐसे हि देदी... हमेशा हसते रहना.... " संजना ने छानशी smile दिली आणि दोघी संजनाच्या scooty वर बसून निघाल्या.


" काय ग खुळे.... काय बोललीस त्याला, मी जेवली नाही दोन दिवस... कुठल्या अँगलने वाटते तरी का मी तशी.... पागल. " संजना सुप्रीला म्हणाली.
"अगं... पण दोन-दोंन extra पाणीपुरी तर भेटल्या ना... " सुप्री डोळा मारत म्हणाली.
" तू पण ना खरंच... कधीतरी मार खायाला लावणार आहेस, तुला पण आणि मला पण." संजना scooty चालवत म्हणाली.

संजना आणि सुप्री.... म्हणजेच सुप्रिया... दोघी शाळेपासूनच्या मैत्रीणी. दोघींचा स्वभाव सुद्धा जवळपास सारखाच. मध्यम शरीरयष्टी, उंचीही जवळपास सारखी . दिसायला जरा वेगळ्या होत्या दोघी. संजना जरा सावळी होती. सुप्रिया बऱ्यापैकी गोरी होती. सुप्री नुसतीच हसत राहायची, काहीही कारण काढून... संजना सुद्धा हसरी होती, पण उगाचच हसत राहायची नाही. दोघी लहानपणापासून एकत्र असल्या तरी खूप वेळा भांडण सुद्धा झाली होती. अगदी टोकाची भांडण. तरीसुद्धा त्या अजूनही सोबत होत्या. संजना तिला "सुप्री" बोलायची. पण सुप्रियाचे एक काही धड नव्हतं. कधी संज्या तर कधी संजू बोलायची.... असो, कोणत्या नात्याने त्या अजून सोबत होत्या , ते त्यांच्या घरी सुद्धा कळत नव्हतं. फारच कौतूक होतं दोघींचं. शाळेत एकत्र, कॉलेज एकत्र आणि आता जॉबला सुद्धा एकत्र होत्या. सकाळ झाली कि जॉबला जायचे आणि संध्याकाळ झाली कि फिरायला जायचं हेच होता त्यांचं आयुष्य. दोघींचं विश्व फक्त. त्यात तिसऱ्या कोणाला प्रवेश नव्हता, अजिबात नाही.