ते फार्महाउस गावाच्या बाहेरच्या बाजूला होते . पूर्णपणे मोकळ्या ओसाड माळरानावर . छोटी-मोठी खुरटी झुडपे सोडली तर एकही मोठे झाड त्याठिकाणी नव्हते . ओसाड माळरानावर असलेले ते फार्महाउस भयाने ओतप्रोत भरलेले होते . गण्याला वाटेत वेळोवेळी दिशेचं ज्ञान होत होतं . तो त्या पोलिसाला सांगत होता आणि असे करत करत तिघांचाही ताफा त्या फार्महाउस कडे चालला होता . शेवटी ते फार्महाउस पाशी पोहोचले . त्याठिकाणी पोहोचेपर्यंत सूर्य मावळून संध्याकाळचा गार वारा सुटला होता . पश्चिमेकडे पसरलेल्या लालिम्याच्या पार्श्वभूमीवर ते फार्महाउस शिकारीसाठी टपून बसलेल्या आहे हिंस्र श्वापदाप्रमाणे दिसत होते . गार वाऱ्यामुळे की अनामिक भीती मुळे तिघांच्याही अंगावरतीं शहारे येत होते . काळोख पसरत चालला होता . त्यांनी रस्त्याच्या बाजूलाच गाडी उभा केली. फार्महाउस पर्यंत गाडी जात नव्हती. मुरमाड व काट्याकुट्यांची एक पायवाट जात होती . दूर असलेले ते फार्महाउस अंधाराची चादर ओढून कोणत्यातरी अघोर कार्यात व्यस्त असल्यासारखे भासत होते
शैलाने पाऊलवाटेवर पाय ठेवला व ती त्या दोघांचीही वाट न बघता सरळ चालू लागली .
" शैला थांब जरा मिळून जाऊ ....
गणेश तिच्या मागोमाग पाउलवाटेकडे जात म्हणाला पण जेव्हा त्याची पावले वाटेवरती पडली तो मंतरल्याल्याप्रमाणे तिकडे चालू लागला । त्या फार्महाऊसमध्ये जे काही होते , त्याची शक्ती अपार होती . ते तिघेही संमोहित अवस्थेत त्या फार्महाउस कडे खेचले जाऊ लागले . आता पूर्ण अंधार पडला होता . कातळ काळोखात बुडून गेलेल्या त्या फार्महाउस समोरच एक लोखंडी प्लेट होती . तिला वरती हुक होता . शैलाने ती प्लेट उचलून एका बाजूला केली . आत एक भुयार होतं . तिघही त्या पायर्या उतरून खाली गेले.
जेव्हा गण्या शुद्धीवर आला तेव्हा त्याने पाहिले तिघेही त्यांच्याच उंचीच्या खांबाला बांधले गेले होते . त्यांचे हात मागच्या बाजूला व संपूर्ण शरीराभोवती दाव्याने गुंडाळा केला होता . त्यांच्यापुढे सहा-सात फूट व्यासाची व दीड-दोन फूट उंच वर्तुळाकार वेदी होती . त्याच्या वरती काळे पडलेले रक्ताचे डाग होते . ती वेदी बळी देण्यासाठीच वापरली जात असावी . त्यांच्या उजव्या बाजूला एक यज्ञकुंड होतं . त्याचा वापर नक्कीच चांगल्या कामासाठी केला जात नसनार. यज्ञकुंडाच्या आजूबाजूला चित्र विचित्र साहित्य होत . हळद , कुंकू , गुलाल , तांदूळ , लिंबू , मिरच्या , बीबे , कातडी चपला , मांसाचे तुकडे , हाडे , कसले तरी केस आणि दोन-तीन मडक्यात काही तरी भरून ठेवलेले होत . अशा चित्रविचित्र वस्तू त्या ठिकाणी पसरलेल्या होत्या . त्यांच्या डाव्या बाजूला उंच , विशाल , अजस्त्र आणि तितकीच विचित्र मुर्ती दिसत होती . ती अंधारात गडप झाली होती . त्या वर्तुळाकार वेदीवर बरोबर मध्यभागी लावलेल्या मशालीच्या उजेडात याचा अर्धवट दिसत असलेल्या भागाण कुणालाही घाबरवायला पुरेसा होता . समोरच सिंहासनासारखं काहीतरी दिसत होतं . अंधार असल्याने त्याच्यावर कोणी बसलेय का नाही याचा अंदाज लागत नव्हता .....
" झालं का पाहून ...? निरीक्षण करून ....."
उजव्या बाजूच्या यज्ञकुंडात जवळ कोणीतरी उभं असलेलं अंधुक उजेडात दिसत होतं .
" बप्पा तुम्ही इथे ...." गण्या
" हो मीच ...."
" मला माहित होतं की तुम्ही येणार आमच्या मदतीला ....."
" मग मी येणारच होतो..... पण तुमच्या नाही त्यांच्या , आमच्या हुकुमच्या मदतीला ....."
" काय .....कोण हुकुम .....? बाप्पा काय बोलताय .....?"
बप्पा जरा पुढे सरल्यामुळे त्या मशालीच्या उजेडात त्यांच्या चेहऱ्यावर खुनशी हास्य दिसत होतं......
" तुला काय वाटलं मी तुमच्या बाजूने आहे.......? "
आणि आसमंत एक कुत्सित हास्याने भरून गेला. बाप्पा त्यांच्या मूर्खपणावर हसत होते .
" अरे मीच तुमचा बळी देणार , आणि पुन्हा आमच्या हुकुमना जिवंत करणार , पूर्ण शक्तीनिशी ......"
पुन्हा एकदा बाप्पांनी हास्याची कारंजी उडवली . इतके दिवस जा बप्पा वर गण्याने आंधळेपणाने डोळे झाकून विश्वास ठेवला होता . तेच शत्रू होते . त्याला एकदाही जाणीव का झाली नाही ......? त्याला पश्चाताप वाटत होता . त्याने बाप्पा वर विश्वास ठेवला त्याचा त्याला राग येत होता . स्वतःच्या मूर्खपणाने इतरांनाही त्यांने संकटात टाकलं होतं .
" म्हणजे ते सत्याचा शिलेदार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी खोट्या होत्या ..... आमचा बळी द्यायचा होता म्हणून गुंफलेलं जाळं होतं तर.....
गण्या निराश होऊन म्हणाला
" नाही रे ते सगळं खरं होतं . फक्त मी त्यात कुठेच नव्हतो . तू सत्याचा शिलेदार होतास आणि आहेस . पण मी नव्हतो . मी तुला मदत करायला नव्हतो मी तुझा बळी देण्यासाठी तुझ्याशी मैत्री जोडली होती...... "
" मग इतक्या दिवस मी तुझ्यासोबतच होतो .... मग तू आमचा बळी का नाही दिलास....?
" अरे बळी देण्यासाठी योग्य वेळ , योग्य ठिकाण आणि योग्य तयारी करावी लागते . सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या तरच त्याचा उपयोग होतो..... आणि तुम्हा मूर्ख लोकांना कळलं सुद्धा नाही मी त्या बळीचीच तयारी इतक्या दिवस करत होतो आणि मूर्खासारखं तुम्ही मला साथ देत होता ...... म्हणून मी तुमचा मनापासून आभार मानतो
आणि पुन्हा एकदा बप्पा त्यांच्या गडगडाटी हास्यात हरवून गेले....
" बहोत खुब ... बहोत खुब ... सेवक , ये जो भी खेल तुम ने खेला है उस खेल के पीछे मेरा दिमाग है ये मत भुलना.....
त्यांच्यासमोर असलेल्या सिंहासनावरती एक गडद काळी छाया अवतरल्यासारखे वाटत होते . तिथुनच त्या भसाड्या आवाजाचा उगम होता... बप्पांनी सिंहासनाकडे वळून कुर्निसात करतात तसं केलं .
" तुझा जगणार नाहीस.... तुझा जगण्याचा हव्यासच तुझ्या मृत्यूचं कारण झाला होता , आणि आता ही होईल ....." इतका वेळ शांत असलेली शैला गंभीर आवाजात म्हणाली .
" हो तुझा आता शेवट होणार आहे ..." गण्याही त्याच गंभीर आवजात म्हणाला....
" गणेश , ये गणेश , तू आलास , माझ्यासाठी आलास ... " तो अंजलीचा आवाज होता " आता आपण या साऱ्यांना संपवू , तू खरंच किती शूर आहेस तू माझ्यासाठी या संकटात पडतोयस , खरंच मी किती भाग्यवान आहे मला तुझ्या सारखा मित्र मिळाला..... मला आज खरंच खूप आनंद झाला......"
आणि ती हसू लागली . एकाएकी कोमल मधुर असणारा तिचा आवाज बसका व चिरका होऊ लागला.... हळूहळू तो आवाज भसाडा होऊ लागला.....
" हाssss हाssss हाsssss किती सहजपणे फसतात काही मूर्ख लोक ..." तोच तो त्या हुकुमच आवाज होता...
" अंजली , अंजली कुठे गेली ...? काय केलस तू तिला.....? "
पुन्हा एकदा तो हसला
" अंजली कधी नव्हतीच .....तिची प्रतिकृती मीच निर्माण केली होती . तुझी फक्त एक आठवण आठवण मी उलटी फिरवली होती..... आठव , आठव तो पकडापकडीचा खेळ . तुम्ही झाडावर चढला होता . तू घसरतो , मग ती तुला पकडते . पण हे कधी घडलं नव्हतं हे सारं खोटं आहे . ही आठवण मी तुझ्या मनात कोरली आहेत . खऱ्या आयुष्यात पकडापकडी खेळताना तू घसरलाच नव्हता . घसरली होती ती अंजली , आणि अंजलीला तू वाचवू शकला नव्हता . अंजली घसरली तेव्हा खाली पडून तिचा मृत्यू झाला व ती तेव्हाच मुक्त झाली . मात्र तिच्या आठवणीचा उपयोग करून मी तुला फसवलं....हा हा sssssss
तो आवाज गन्याला त्रास देत होता . त्याने गण्याचं सर्वस्व हिरावून घेतलं होतं . बप्पा ही त्याच्या विरोधात होते . आता अंजली कधी अस्तित्वातच नव्हती हे जेव्हा गाण्याला कळालं तेव्हा तो पूर्णपणे ढासळून गेला . ते फक्त आता दोघेच उरले होते . तो आणि शैला . त्या दोघांना या बलाढ्य शक्ती विरुद्ध लढा द्यायचा होता . त्यांची मदत कोण करणार होतं....? मदत केव्हा होणार होती .....? त्याच्या मृत्युनंतर....!
गण्याला राग आला , खूप राग आला . तो वैतागला त्याच्या आयुष्यावर , त्याच्या दैवावर . त्याला जगण्याची मुळीच इच्छा नव्हती. तो ढासळून गेला . त्याचा आत्मविश्वास , त्याचे आधार कोसळले . उन्मळून पडलेल्या वृक्षाप्रमाणे त्याची अवस्था झाली . एक वादळ त्याच्या आयुष्यात आलं होतं . त्या वादळाने त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली होती . त्या वादळाने त्याच्या आयुष्यात परिवर्तन आणलं होतं . पण तेच परिवर्तन , तीच कलाटणी त्याच्या आयुष्याला घातक ठरली होती . तू लढायला सक्षम होता . लढा द्यायची ताकद त्याच्यामध्ये होती . पण त्याच्यापुढे प्रश्न होता लढायचं कशासाठी ....? लढायचं कोणासाठी....?
" पण मग गण्याला तू त्या अघोरी बेटावरून का वाचवलं........? " शैला विचारत होती गण्या आता काही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नव्हता . तो हरवला होता . त्याचे जगण्याचे आधार हरवून गेले होते . त्याची जगण्याची इच्छा या क्षणाला नष्ट झाली होती .
" मीच वाचवलं होतं त्यावेळी त्याला . कारण मला गाण्याचा माझ्यासाठी बळी द्यायचा होता. तो खरंच उत्तम बळीचा बकरा आहे . बळी जाण्यासाठी ज्या काही अटी गुणधर्म लागतात ते त्याच्यामध्ये पुरेपूर भरलेले आहेत . तुमच्यासारख्या स्पेशल माणसांचा बळी दिल्यानंतर तो खूप खुश होतो . त्यावेळी जो कोणी बळी देत होता त्याच्या कचाट्यातून त्याला कसं सोडवले मी हे माझं मलाच माहित आहे . आणि आता ती वेळ आलेली आहे . आता मी गण्याचा बळी देणार .... नंतर मला शरीर मिळणार , तेही नेहमीसाठी... अमरत्व , चिरंजीव अमर्याद काळासाठी अनंत जीवन . म्हणूनच मी आत्ता या जगावर राज्य करण्यासाठी तयार आहे......
" तुला जर आमचाच बळी हवा होता तर इतर लोकांना तू का मारलं ......? ती डायरी, गोगलगाय हे सारं कशासाठी होतं......? "
" तुला काय वाटलं , मी फक्त चार-पाच , दहा-पंधरा माणसे मारली असतील .... मी तब्बल 1109 माणसे मारली आहेत आतापर्यंत ......तेही स्वतः अमर होण्यासाठी ....मागची पाचशे ते सहाशे वर्षे याच उपद्व्यापात मी गुंतलेलो आहे..... आणि हा सेवक पिढ्यानपिढ्या तेच करत आहे....आता तुमच्या असामान्य सत्यतेचा बळी दिला कि 1111 बळी पूर्ण होणार आणि मी अमर होणार .....हा हा हाssssss...
" सेवक भरपूर झालं बोलंणं , त्या पैलवानाला आता वेदीवर टाक ,आपल्या शिकारी गोगलगाय खुप भुकेल्या आहेत....
" जी हूकूम.....
तो पोलीस अजूनही बेशुद्ध होता . बापाने त्या पोलिसाला सोडवले व वेदीवरती टाकले . वेदीच्या बरोबर मध्यभागी जे होल होते त्यातून गोगलगाय निघू लागल्या व पोलिसाच्या शरीराभोवती गराडा करू लागल्या....
बप्पा त्याचं शक्ती च्या बाजूने होते ज्याविरुद्ध त्यांना लढायचे होते . पोलीस आता शिकार झाला होता , आणि गण्या हतबल झाला होता . तो काही ऐकायच्या करायच्या मनस्थितीत राहिला नव्हता . आता उरली होती शैला . तीलाच दुष्ट शक्ती विरुद्ध काही ना काही करायला पाहिजे होते......
शैलाचे हात बांधलेले होते . ती ते सोडवायचा प्रयत्न करू लागली . तिचे मन पूर्णपणे ते हात सोडवण्यावर गुंतले . मनाची पूर्ण शक्ती , शरीराची पूर्ण शक्ती तिने हात सोडवण्यासाठी वापरली आणि तिचा हात सुटला.....
तिने हालचाल केली नाही . ती तशीच थांबली . तिने विचार केला ' आपल्याला जर यांना पराभूत करायचं असेल तर ते एकट्याला शक्य नाही . आपल्या गण्याचेही हात सोडवावे लागतील .....पण कसे?
तिने गण्या कडे पाहिले . गण्या निश्चिल , डोळे झाकून उभारला होता , जणू काही तो बेशुद्ध पडला होता .
शैला पटपट विचार करणे भाग होते . अजून घाई केली नाही तर त्या पोलिसाचा मृत्यू होणार होता , आणि काही क्षणानंतर त्या दोघांचाही बळी दिला जाणार होता . ती विचार करत होती . तिला एक कल्पना सुचली आणि तिने जलद हालचाल केली . ज्या यज्ञकुंडपाशी बाप्पा बसले होते त्या यज्ञकुंडात पाशी असलेल्या सर्व वस्तू तिने विखरून टाकल्या . दोन-तीन मडक्यात जे काही द्रव भरून ठेवले होते ते तिने सांडून दिले . यज्ञकुंडात पेटलेला अग्नी तिने विझवून टाकला........
आणि पुढे काही करणार तोवरच ती हवेत उचलली गेली ...
तिच्या गळ्याभोवती दाब वाढू लागला जसं कोणी तिचा गळा दाबत होतं . तिला श्वासोच्छवास घेणं कठीण जाऊ लागलं . डोळ्याभोवती काळा निळ्याजांभळ्या पिवळ्या तांबड्या चित्रविचित्र रंगाच्या रेषा दिसू लागल्या . दृश्य धूसर होऊ लागलं . काहीही ऐकू येईनासा झालं . सर्व ज्ञानेंद्रियांच्या संवेदना बधिर झाल्या . तिला वाटल आपला मृत्यू झाला.......