Mazi baju in Marathi Love Stories by Kajol Shiralkar books and stories PDF | माझी बाजू

Featured Books
Categories
Share

माझी बाजू

माझी बाजू

एका कोपऱ्यातला अडगळ वजा गोदामरुपी जागेत मी माझे अस्तित्व लपून ठेवण्याचा प्रयत्न करत होते.तेवढ्यात माझ्याकडे कोणाचेतरी लक्ष गेले.पण नंतर त्यांनी मला काही विचारायची तसदी घेतली नाही .मी रडत होते.माझ्या आजूबाजूला फिरणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा माझा छुपा हेतू सुद्धा मला साध्य करता येत नव्हता .कोणी माझ्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते.मलाच माझी कीव करावीशी वाटत होती.मी शांत स्वभावाची असल्याने कोणी विचारल्याशिवाय मला काही सांगणे अवघड जात असे.त्यामुळे मीही माझ्याकडे कोणी येण्याची वाट पाहत होते .आणि तेवढ्यात स्वारींची नजर माझ्याकडे गेली पण त्याचा काही उपयोग झाला नाही .

रडण्याचा उद्देश हा होता की मी आज शाळेतला डबा व्यवस्थित धुतला नव्हता .घरी आल्यावर साहजिकच त्यांचा ओरडा पडला.सासुबाई तरी म्हणाल्या यांना , की जाऊदे म्हणून....पण नाही,स्वारी भलतीच चिडलेली.(कसंय की कुठला राग कुठे काढावा हे स्वारीला काळतच नाही मुळी.आपण का रागावलो आहोत याचे भान विसरून समोरचा जो व्यक्ती त्या क्षणी छोट्यातील छोटी चूक करेल त्यावर स्वारी गरजणार म्हणून समजा .आणि हो..यामध्ये वयाचा काडीमात्र संबंध येत नाही बरं.त्या ‘अ’वेळी समोरच्या व्यक्तीने केलेली ती फ़क़्त चूक असते.तर समोरचा व्यक्ती त्या चुकीसाठी कसा जबाबदार आहे हे पटवून देण्यात स्वारींचा राग खर्ची पडतो.यामध्ये वयाचा काडीमात्र संबंध नाही .पण राग निवळल्यावर परिस्थिती मात्र पूर्ण वेगळी असते.एखाद्याला प्रश्न पडावा की आपल्यावर रागावणारी व्यक्ती हीच की आपण कोणत्या अनोळख्या व्यक्तीशी बोलत आहोत.म्हणजेच आमच्या स्वरींचा राग हा तात्पुरता आणि क्षणिक असतो.कोणाला मुद्दामून दुखावण्याचा अजिबात हेतू नसतो परंतु स्वरींचे असे परखड बोलणे प्रत्येकालाच समजून घेता येईल असे नाही.त्यामुळे बहुतेकदा काय होते की स्वरींना समजून घेण्यात मनसे चुकतात आणि मनसे लांब जातात.परंतु स्वारींच्या जवळच्या माणसांनाच त्यांचा करारी आणि हजरजबाबी आणि तितकाच आश्वासक स्वभाव माहित आहे .आणि त्यांच्या बरोबर विरुद्ध स्वभाव माझा आहे .मी अत्यंत हळवी आणि शांत , धीरगंभीर स्वभावाची आहे त्यामुळे मनातल्या भावना पटकन ओठांवर येत नाहीत .)

तर खरंतर काल रात्री झोपायला तसा उशीरचं झाला .म्हणजे स्वारींना उद्याच्या हातगाडीवर जाण्यासाठी नवीन कुर्त्याची जोडी तयार करून ठेवायची होती.पण नेमके झाले उलटे .कामात काम वाढवले त्या भिंतीवरच्या पालीने .

म्हणजे झाले असे की मला स्वभावताच मुळी काम आटोपून झोपायची सवय असल्याने रात्रीची सर्व काम उरकून मी झोपी जाते......हो..पण हेही तितकेच खरे की माझ्यामुळे कोणाची झोप अर्धवट राहत नाही.झोपण्याची सर्व तयारी करूनच मी माझी कामं आवरते आणि मग स्वतः झोपी जाते .तर झाले असे की मी कुर्ता मस्त छानपैकी धुवून ठेवला घडी करून व्यावास्थित.इस्त्रीसुद्धा फिरवली होती बारकाईने ;म्हणजे कुठेही सुरकुती आडून कपडा दिसू नये हीच इच्छा .तर ही सर्व काम आटोपून झाल्यावर मी झोपायला जाणार तेवढ्यात पालीने घोळ घातला.

मला झोपण्याच्या जागी नेहमी पाणी घेऊन ठेवायची सवय आहे .तर नेहमीप्रमाणे मी पाण्याचा तांब्या बिछाण्याजवळ ठेवला होता.पण जशी पाल दिसली तशी मी माझ्या बिछान्याकडे धावले आणि तो पाण्याचा तांब्या धक्का लागून पडला आणि घरंगळत कपड्यांच्या दिशेने रिकामा झाला.................झालं...सर्व कामाचा बोजा पुन्हा नव्याने सुरु.

मी तशी शांत स्वभावाची असल्याने जशी कामे क्रमाने करायची होती तशी पटापट करू लागले. सर्वात आधी पाण्याचा तांब्या उचलला ,नंतर लादिवारचे पाणी पुसले ,कपडे वळत घातले आणि दिवा बंद केला.

यामध्ये सांगण्याची बाब अशी की आमची स्वारी झोपेतून जागी झाली ,शीघ्रकोपी स्वभाव असल्याने थोडीशी तोंडाची वाफ रिती केली आणि पुन्हा झोपेच्या स्वाधीन झाले .बिचाऱ्या पालीला केवढे अपशब्द ऐकून घ्यावे लागले विनाकारण .यामध्ये गमतीचा भाग सोडला तर स्वारींनी यामध्ये जास्त लक्ष घातले नाही .सासू सासऱ्यांची खोली दुसऱ्या बाजूला असल्याने त्यांची झोपमोड झाली नाही हे बरे झाले.पाणी जवळ ठेवण्याची सवय असल्याने मी रिकामा झालेला तांब्या भरण्यासाठी स्वयंपाकगृहात गेले आणि मला आश्चर्याचा धक्का बसला.मी विचार केला की सासू सासरे झोपले असतील पण चित्र काही वेगळे होते .

स्वयंपाकगृहात सासूबाई लिंबू शोधत होत्या .अधिक विचारपूस केल्यावर कळले की सासऱ्यांच्या छातीत असिडीटी झाल्याने जळजळ होत आहे त्यामुळे त्यांना व्यवस्थित झोप लागत नाहीय.मग मी सासूबाईंना सांगितले की लिंबू आज सकाळीच संपले .तुम्ही त्यांना लसूण तोंडात ठेवून चघळून चावायला सांगा मग त्यांना बरे वाटेल असे सुचवले.

किती गुणाची माझी पोर ती....असे बोलून सासूबाई लसुणच्या काही पाकळ्या घेऊन खोलीत निघून गेल्या.मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिले .एवढा त्रास होऊनसुद्धा त्या सर्व किती धीराने घेतात .अजिबात कुठे आततायीपणा नाही की कसली धावपळ नाही.सर्व एकदम शांतपणे हाताळायची त्यांची त्यावेळची ती वृत्ती मला खूपच भावली.मी त्या भिंतीवरच्या पालीचे आभारच मानले की त्या प्रसंगामुळे मी स्वयंपाकगृहात येऊ शकले आणि मला परिस्थिती कळली.नाहीतर मुद्दामून सासुबाईंनी आमची झोपमोड केली नसती.धन्य ती बिचारी पाल जिला माझ्या स्वारींकडून ऐकून घ्यावे लागले पण माझ्यासाठी ती जणू देवदूत होऊ आलेली.

रात्रीचे साधारण तीन वाजले असतील .माझा डोळा खाडकन जागा झाला.यांचा कुर्ता पुन्हा इस्त्री करून व्यवस्थित घडी करून ठेवायचा होता .सकाळी त्यांना लवकर कामाला जायचे असल्याने हे काम आत्ताच होणे गरजेचे होते .म्हणून मी सर्व क्रमाने पुन्हा कृती करत गेले .सुकलेला कुर्ता पुन्हा खाली मांडून त्यावर व्यवस्थित इस्त्री फिरवली आणि तो टेबलावर ठेवून दिला.नशीब की त्या पाण्याच्या तांब्यात थोडेसेच पाणी होते त्यामुळे कुर्ता लवकर सुकला .त्या कामानंतर मी पाण्याचा तांब्या तोंडाला लावणार तेवढ्यात आईंच्या रडण्याचा आवाज ऐकू आला .

मी धावत बाजूच्या रूममध्ये गेले आणि पाहिले की परिस्थिती काय आहे .तर सासऱ्यांचा श्वास कोंडला जात होता त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता .अश्या आणीबाणीच्या परिस्थितीत काय करावे हे सासुबाईंना माहित नसल्याने त्या पदर ओल्या करत होत्या.तर मी माझ्याकडे असलेल्या ज्ञानामुळे मी त्यांच्यावर प्रथमोपचार केले .त्यामुळे त्यांनी निश्चिंत श्वास घ्यायला सुरुवात केली आणि सासूबाई अतिशय आनंदाने , समाधानाने झोपी गेल्या .

या सर्वांमुळे गोंधळ असं झाला की मला शाळेत जाण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळे माझा शाळेत नेण्याचा डबा जो हता तो धुवायचा राहिला मग पर्यायाने मी शाळेत जाताना डबा घेऊन गेले नाही .आणि त्यामुळे दिवसभर जरा अशक्तच वाटत होते .घरी आल्यावर माझ्या स्वारींचा नेहमीप्रमाणे पारा चढला आणि मग मला बोलणी खावी लागली .

अर्थातच मला माझी बाजू मांडायची होती पण शांत आणि धीरगंभीर स्वभावामुळे मला काहीच मांडता आले नाही आणि पर्यायाने मी सर्व काही खाली मन घेऊन ऐकून घेतले .

तेवढ्यात सासूबाई आल्या आणि सासुबाईंनी त्यांना सर्व हकीगत सांगितली तेव्हा कुठे माझ्या स्वारींचा राग शांत झाला.जेवताना सुद्धा माझा चेहरा खालीच होता त्यामुळे स्वारींना सुद्धा अस्वस्थ वाटत असावे .माझंही मन अस्वस्थ होत होतं की कधी एकदा मी स्वारींशी मन मोकळेपणाने बोलतेय . पण माझा अहंकार आडवा येत होता की मीच का पहिली सुरुवात करावी .जेव्हा झोपण्याची वेळ होती तेव्हा नेहमीप्रमाणे मी माझी सर्व काम आटपायला खोलीत गेले तर खोलीत झोपण्याचा बिछाना आधीच घातला होता आणि पाण्याचा तांब्या सुद्धा जागच्या जागी होता .मला कळेना की मी तर तांब्या आणला नव्हता खोलीत.

मग लक्षात आले की ही तर स्वारींची कमाल .स्वारींनी लगेच आवरून सर्व व्यवस्थित ठेवले होते आणि बिछान्यावर झोपी गेले होते.एखाद्या छोट्या मुलाप्रमाणे मी माझ्या स्वारींच्या डोक्यावरून हात फिरवत होते .माझी बाजू मी कधीच मांडली होती आणि माझी बाजू मी न मांडताच माझ्या स्वारींच्या स्वाधीन झाली होती.

©काजोल मधुकर नम्रता शिराळकर