कवर फाटलेलं पुस्तक
भाग-II

रात्रीचे दोन वाजले असतील, दरवाजावर दोन चार वेळा थपथपाटलेला आवाज ऐकू आला.
मी-"कोण आहे, काय झालं इतक्या रात्री दरवाजा वाजवायला?"
बाहेरून कुणीतरी बोललं,"कोण जागं आहे?"
मी-"हा, बोलतोय, काय पाहिजे?"
बाहेरून परत आवाज आला,"ती तुमची मेसवाली, जास्तच कणत,विवळत आहे, तिच्याजवळ कुणीच नाही म्हणून सांगायला आलो,बघा तेवढं काय झालंय तिला."
मी झोपेतून पटकन उठलो,मित्र 'दिपकला' उठवले आणि त्याच्यासोबत मेसवालीच्या रूमवर गेलो.
ती चटईवर लोळण घालत विवळत होती.ही तिची अवस्था पाहून तिला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जाणे आवश्यक होते.मला काय करावं सुचत नव्हतं.तोपर्यंत दिपक भाड्याची ओमीनी कार घेऊन आला.येवढ्या रात्री याला कशी काय कार सापडली समजले नाही.तिला ताबडतोब दोघांनी कारमध्ये घातले.दोन किलोमीटर अंतरावर एक दवाखाना आहे, तिथे तिला ऍडमिट केले.दवाखान्यात आतल्या रूममध्ये तिला पोचवले आणि रिसेप्शनच्या ठिकाणी तिच्या एॅडमिटचा फॉर्म भरायला आलो.रिसेप्शनिस्टने पेशंटचे नाव विचारले.
मी- "शितल"
रिसेप्शनिस्ट,-"शितल, पुढे... आडनाव?"
मी शितल तेवढंच नाव ऐकून होतो,मी आत गेलो.
मी-"शितल तुझं आडनाव?"
ती-"आल्हाट.....जाधव"
मी-"आल्हाट कि जाधव?"
यावर ती काहीच बोलली नाही. मीही तिला जास्त न विचारता रिसेप्शनिस्टला येऊन तिचं पुर्ण नाव 'शितल आल्हाट जाधव' सांगितले.
रिसेप्शनिस्ट-"असे आडनाव असते का?एकच आडनाव सांगा."
मी-"कोण म्हणतं नसतं, मोहिते-पाटील असतं, वळसे-पाटील असतं,मग आल्हाट-जाधव असू शकत नाही का?हे एकच आडनाव आहे,लिहा."
पुढे रिसेप्शनिस्ट काही बोलणार इतक्यात दिपकने माझ्या हाताला धरून दवाखान्याबाहेर आणले आणि बाहेर पायरीवर बसायला सांगितले. मी आणि तो अंधारात पायरीवर बसलो.
दिपक-"सुभाष,आल्हाट आणि जाधव ही दोन वेगवेगळी आडनावे आहेत.
मी-"ते कसं काय?"
दिपक-"शितलची दोन लग्नं झालेत."
मला विश्वासच बसला नाही.
मी-"इतक्या कमी वयात दोन लग्नं?"
दिपक-"हो, तिला पहिल्या नवऱ्यापासून दोन मुली आहेत.पहिल्या नवऱ्याचं आडनाव आल्हाट होतं."
मी-"मुलींनी दोन दोन लग्न करण्याइतपत माॅडर्न आणि फॉरवर्ड नसावं"
दिपक-"तुला काय माहित, दोन दोन लग्न करायची तिला काय हौस होती का?
'तिचा पहिला नवरा इथंच कंपनीत काम करत होता, शितलच्या आग्रहाखातर त्याने कंपनी सोडून टेंपो घेतला.कंपनीच्या नोकरीपेक्षा जास्त पैसे येऊ लागले,सुखाचा संसार चालू होता.तिला एक म्हणता दोन जुळ्या मुली झाल्या.एके दिवशी, तिच्या नवऱ्याचा अॅक्सिडेंट झाला.आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.या धक्क्याने त्याच्या वडिलांच्या डोक्यावर परिणाम होऊन वेड्यासारखे फिरु लागले.सुखानं भरलं, फुललेलं घर एका वाईट घटनेनं उद्वस्थ झालं, या वाईट परिस्थितीला शितलला जबाबदार धरून तिची सासू तिला त्रास देऊ लागली.बिचारी नवरा गेल्यानंतर मुलींच्या आधाराने जीवन जगेल असे वाटले होते पण सासूने मुलींना शितलकडे न देता स्वत: जवळ ठेवून घेतले आणि ज्या टेंपोमध्ये तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता त्या टेंपो सहीत शितलला घराबाहेर काढले.ती निराधारपणे तिच्या आई-वडिलांच्या घरी आली.
माहेरच्यांनी, काही दिवस तिला ठेवून घेतले पण नंतर तिच्यासाठी नवीन स्थळं शोधायला सुरुवात केली, शितलने त्यांना साफ नकार दिला.पण तिच्या आई वडिलांनी तिला समजावले की 'तुझी लहान बहीण बिना लग्नाची आहे,जर तु अशीच इथं राहीलीस तर तुझ्या लहान बहीणीचं लग्न होणार नाही, अन् तुला असं वाटतं का की तुझ्यासारखं तिनंही संसार सुख घेऊ नये'
ती लग्न करायला तयार नव्हती पण तिनं लग्न नाही केलं तर तिच्या लहान बहीणीच्या लग्नाला अडचणी येतील, म्हणून ती दुसऱ्या लग्नाला तयार झाली.
आत्ता केलेला नवरा हा तिच्या सौंदर्याला पाहून,तिच्याजवळच्या पैशासाठी आणि ड्रायव्हिंगची हौस भागवण्यासाठी त्यानं तिच्याशी लग्न केले. तो टेंपो भाड्यामधून मिळणाऱ्या पैशांवर मजामस्ती करतो.आणि दोन-दोन महिने घरी येत नाही.बिच्चारीने पोटापाण्यासाठी मेस चालू केली पण त्या मेसची अवस्था तु बघतोसच."
दिपकने जे काही सांगितले यावर माझा विश्वास बसत नव्हता, इतक्या समजदार,प्रेमळ शितलच्या वाट्याला दुःख यावं याचं वाईट वाटू लागलेलं.
इतक्यात डॉक्टरनी आतून आवाज दिला, मी आणि दिपक धावत आत गेलो.
डॉक्टर-"घाबरण्यासारखं काही नाही,डिलेव्हरीची वेळ आहे त्यामुळे पोटात कळ मारत आहे.एक इंजेक्शन दिले आहे, थोड्यावेळात वेदना कमी होतील. पण..."
मी-"पण काय डॉक्टर?"
डॉक्टर-"पेशंटचे पाय खुप सुजलेले आहेत त्यामुळे,इथे डीलेवरीसाठी अडचणी येतील, शिवाय या दवाखान्यात पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत,त्यामुळे तुम्ही पेशंटला सरकारी दवाखान्यात अॅडमिट करावं."
मी-"बघा प्रयत्न करून इथंच, हिचं अजून हाल झालेलं पाहावणार नाही."
डॉक्टर-"इथं केस हॅंडल केली तर पेशंटच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो."
मी थोडा सुन्न झालो, काय करावं सुचत नव्हतं.सरकारी दवाखाना वीस-पंचवीस किलोमीटर लांब होता.
मी-"ठिक आहे."
असे म्हणून मी दिपकला आवाज दिला,"दिपक,बघ जरा,ओमिनी आहे का,गेली."
दिपक-"आहे पण, तो हॉस्पिटलला यायला तयार नाही."
मी-"का?"
दिपक-"इथं पर्यंत यायचं पैसे मी दिलं होतं, आता इथून पुढ जायचं पैसे द्या असं तो म्हणतोय"
मी जाऊन ओमिनी कारवाल्याला समजावले,'हि वेळ पैशाचा विचार करण्याची नाही.फार तर नंतर मी स्वतः पैसे देतो.'
आमचं संभाषण चालू होतं इतक्यात हायवेवर अॅक्सिडेंट झाला होता,त्या अॅक्सिडेंटमध्ये एक जणाची परिस्थिती गंभीर होती, त्याला याच दवाखान्यात आणलं होतं. पण त्याची इतकी वाईट अवस्था पाहून डॉक्टरनी त्याला अॅडमिट करून घेतले नाही, त्यांनाही सरकारी दवाखान्यात जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता होती.अॅक्सिडेंट पेशंटने ओमिनीवाल्याला खिशातून पैसे काढून दिले आणि सांगितले,'तुझं काय भाडं आहे ते घे पण लवकरात लवकर सरकारी दवाखान्यात पोहचव.' मग तो तयार झाला.
त्याच कारमधून अॅक्सिडेंट पेशंट आणि शितल दोघांना घातले.जाताना शितल अॅक्सिडेंट पेशंट बघून घाबरून जाईल म्हणून आधारासाठी मी तिच्या जवळ बसलो.तिच्यावेदना पुन्हा चालू झाल्या, ती आय...ग..आय...ग्रामीण.. करायला लागलेली.
मी-"शितल तुझं कोणी रिलेटिव्ह जवळपास नाही का?, फोन करून बोलावून घेतले असते."
शितल-"गावाकडं आय हाय, पण घरी फोन न्हाय, शेजाऱ्यांच्याकडे हाय."
मी-"फोन नंबर सांग."
तिने फोन नंबर सांगितला, सांगितलेल्या नंबरवर दोन-चार वेळा कॉल केला पण तिकडून फोन उचलला नाही.
मी तिला तिच्या नवऱ्याचा नंबर मागितला,तिने दिला.मी त्याला कॉल केला, पण त्यानेही कॉल उचलला नाही.रात्रीचे चार वाजले होते.
शितलच्या शरिरातून पाणी जायला लागले होते, पाठीमागून तिची साडी पुर्ण भिजली होती.मी घाबरून गेलो.इतक्यात ओमिनी दवाखान्यासमोर येऊन पोहोचली.मी शितलचा हात माझ्या खांद्यावर घेऊन एका हाताने तिच्या कमरेला आधार देत हळूहळू चालू लागलो.तिला सरळ चालताही येत नव्हते.कसंबसं तिला आधार देत रिसेप्शनच्या दरवाजापर्यंत घेऊन गेलो.समोर लेडीज नर्स बसली होती.तिला मी आवाज दिला,"डॉक्टर प्लिज पटकन या, हिला थोडासा आधार द्या."
नर्स-"काय झालंय तिला?"
मी-"डीलेवरी पेशंट आहे म्हणून म्हणतोय,जरा मदत करा."
नर्स-,"सोड तिला,मरत नाही ती, येतेय तिच्या पायाने चालत."
मी-,"अहो पण...."
नर्स-,"सोड म्हणतेय ना,सोड, येईल ती तिच्या पायाने."
मी-,"तिची अवस्था...?"
नर्स-,"तुला एकदा सांगितलेलं समजतं नाही का?,सोड म्हणतेय ना,सोड तिला."
नर्स जशी रागाने खेकसून बोलली तसं मी तिला सोडलं, वाटलं पडेल,कोलमडेल पण तसं काही झालं नाही, तिच्या डोळ्यांत पाणी आलेलं,ती जीव एकवटून थोडं थोडं पाय उचलून पुढे टाकत होती, कशी बशी रूमच्या दरवाजातून आत गेल्यावर तिनं अंग सोडून दिले, मी धावत जाऊन तिला सावरावं यासाठी पुढे झालो इतक्यात नर्सने हाताने इशारा केला,'काही नाही होत, मी आहे' आणि ती उठून आत रूममध्ये गेली.
इतका वेळ रागात बोलणारी नर्स थोडंसं स्मित करून माझ्याशी बोलली, त्यावेळी वाटलं मोठ्या हॉस्पिटलमध्ये असंच बोलतात की पेशंटला एकप्रकारे निर्भिड करण्यासाठी तिने तसं केलं असावं. मी रूमच्या बाहेरच होतो.आतून आवाज आला.
नर्स-,"सोनोग्राफी चेकअपचे रिपोर्ट कुठे आहेत,द्या हिकडे,"
शितल,"घ घरी राहिलेत."
नर्स-,"पोरं जन्माला घालायची हौस आहे,मग डॉक्यूमेंट आणता येत नाहीत का."
असं बडबडत नर्स बाहेर आली.आणि माझ्याकडे बघून बोलली,"आम्ही याआधीचे चेक अप रिपोर्ट बघितल्याशिवाय पेशंटची जबाबदारी घेऊ शकत नाही."
मी,-"मॅडम, तुम्ही तिला अॅडमिट करून घ्या, तोपर्यंत आम्ही चेक अप रिपोर्ट आणायची व्यवस्था करतो."
मी पटकन उठलो आणि दिपकला शितलच्या रुमवर जाऊन सोनोग्राफी चेकअपचे पेपर आणायला सांगितले,पण दिपकजवळचे सगळे पैसे संपले होते.अन् मीही झोपेतून तसाच आहे त्या कपड्यावर पैसे न घेता आलो होतो.
दिपक,"मी जातो पण परत यायला माझ्याजवळ पैसे राहीलेले नाहीत."
मी-"दिपक,हॅंगरला अडकवलेल्या शर्टाच्या खिशात शंभर रुपये आहेत, ते घेऊन ये,त्यातलेच वाटखर्चीसाठी घे.आणि..."
मी अजून काही बोलणार इतक्यात, तो ज्या ओमिनी कारने आम्ही आलो होतो त्या कारमध्ये जावून बसला होता.आणि ओमिनी कार निघून गेली.
शितलचे रिलेटीव फोन उचलतील म्हणून मी सकाळपर्यंत राहून राहून दोन्ही ठिकाणी कॉल करत होतो, पण फोन कुणीच उचलत नव्हतं.पहाटे साडेपाच वाजता तिच्या नवऱ्याने फोन उचलला अन् बोलला,"कोण आहे, काय झालंय इतकं रात्रभर फोन करायला?"
मी-"मी सुभाष बोलतोय,तुमची मिसेस शितल हिला प्रेग्नंशीसाठी दवाखान्यात अॅडमिट केले आहे त्यामुळे लवकरात लवकर सरकारी दवाखान्यात या"
तो-"हो, मी जवळच आलोय ट्राफीकमध्ये अडकलोय,गर्दी कमी झाली की लगेच येतो."
मी-"लवकर या, तिच्या जवळ तुमच्या घरचं कुणीच नाही,ती वाट बघतेय."
तो-"वाट बघ.."
त्याचं वाक्य पुर्ण व्हायच्या आत फोन कट झाला.
प्रेग्नंशीच्या कळा येऊन शितल जोरजोराने ओरडत होती,तिची वेदनामय अवस्था पाहून तिचा हात घट्ट पकडून आधार द्यावा असं वाटायचं पण जेंन्टसना डिलेवरी रूममध्ये अलाव नसल्यानं तिच्या असाह्य वेदना ऐकण्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हतो.
पाचवाजून चाळीस मिनिटांनी शितलने एका गोजिरवाण्या जीवाला जन्म दिला.

डिलेव्हरी नॉर्मल झाली,दहा मिनिट नर्सने तिची सर्व प्राथमिकता पुर्ण करुन त्यांनी मला त्या रुममध्ये जाण्याची परवानगी दिली.मी आत गेलो, तिच्या अंगावरची साडी खराब झालेली म्हणून फक्त एक चादर अंगावर ओढून घेतलेली.बाळ तिच्या शेजारी झोपलेलं आणि ती डोळे सताड उघडे ठेवून छताकडे पाहत होती. मी थोडी चादर खाली करून बाळ बघितलं अन् शितलच्या डोक्यावरून हात फिरवला.तसं तिचा हुंदका अनावर झाला, तिच्या डोळ्यांतून अश्रू गालांवर घळाघळा ओघळू लागले.
मी-"बाळ छान आहे."
तिनं थोडंसं स्मित केले पण अश्रूंनी जोर धरलेला, एका वेळी दोन भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या.
मी-"काय झालं,त्रास होतोय, दुखतंय?"
शितल-"न्हाय"
तिच्या डोळ्यांतील पाणी थांबतच नव्हतं,
मी-"अगं,वेडी आहेस का, असं का समजतेस 'तुझ्या सोबत तुझं कुणी नाही'.काही काळजी करू नकोस, तुझ्या मिस्टरांना फोन केला होता.टेंपो ट्राफिकमध्ये अडकल्यामुळे थोडा उशीर होईल, दुपारपर्यंत येतो, म्हणून सांगितले आहे,
थांब, तुला फोन लावून देतो,तुच खूश खबर त्यांना सांग."
शितल-"नको, ते विचारतील,बाळ काय हाय, मुलगा की मुलगी, अन् एकदा का त्यांना समजलं की मुलगी झाली हाय मग ते बिलकुल येणार नाहीत."
मी-"म्हणजे?"
शितल-"त्यांनी(मिस्टरांनी) त्यांच्या घरच्यांच्या विरोधात माझ्याशी म्हणजे 'विधवेशी' लग्न केल्यामुळे आम्हाला घराबाहेर हाकलून दिलं हाय, अन् त्यांना(मिस्टरांना) वाटतंय की मुलगा झाला तर घरचे जवळ करतील.त्यामुळे त्यांना फक्त मुलगाच पाहिजे.त्यांनी मला निक्षून सांगितले आहे,'मुलगी झाली की माझा आणि तुझा काहीही संबंध उरणार नाही,तू तुझ्या मार्गाने अन् मी माझ्या मार्गाने.'
त्यांचा फोन आला तर त्यांना जन्मलेलं बाळ मुलगा हाय की मुलगी हे सांगू नका."
"तसंही इथं आल्यावर त्याला समजेलच की.मग पुढे काय करशील?", मला त्याचा राग आलेला मी रागावर कंट्रोल करत बोललो.
शितल-"पुढचं पुढं बघू., किमान इथपर्यंत येतील तरी."
मी विचार करत होतो की हिचा नवरा,हिची मुलगी पाहून हिला नांदवणारच नसेल,तर तो इथं येऊन काय उपयोग?
शितलचं जीवन एक गुंताच, जितका सोडवल तितका अजून गुंता वाढत जात होता.
आता एकच आशेचा किरण उरलेला,तिची आई, तिला फोन लावला.फोन शेजाऱ्यांच्यात होता,तिकडून उत्तर आले,"तिची आई कामावर गेली आहे ."
मी विचारले,"शक्य असेल तर त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन 'त्यांच्या मुलीला प्रेग्नंशीसाठी शहरात सरकारी दवाखान्यात अॅडमिट केले आहे' हा निरोप द्याल का?"
तिकडून उत्तर आले,"ठिक आहे,मी जाऊन निरोप देतो, पण त्यांचा मालक सुट्टी देईल असे वाटत नाही."
मी थोडा वेळ सुन्न झालो, अन् तसाच बसून राहिलो,
डॉक्टरांनी बाळ सी.टी. स्कॅनसाठी माझ्या जवळ दिले. मी छोट्या टॉवेलने बाळाला गुंडाळले अन् घेऊन विचारत विचारत त्या विभागात पोहोचलो.माझ्यासमोर आठ-दहा लोकं नंबरने उभे राहिले होते, तिथं सगळ्यांना विनंती केली, की 'हे नुकतंच जन्मलेलं बाळ आहे,त्यामुळे याची टेस्ट लवकर होणं गरजेचं आहे'. तिथल्या एकानेही कुरबुर न करता मला नंबर दिला. मी ताबडतोब टेस्ट करवून बाळाला शितलजवळ नेवून दिलं.
पहाटे गेलेला दिपक सकाळचे आठ वाजले तरी आला नाही, म्हणून मी हॉस्पिटलच्या आवारात बाहेर येऊन वाट बघत येरझारा घालत होतो, इतक्यात दिपक आला, त्याला बघून माझी चिडचिड वाढली.
मी-"काय रे इतका वेळ लागतो का डॉक्यूमेंट्स आणायला? , इथं तुझी वाट बघून बघून माझी वाट लागली."
दिपक,"मी शितलच्या रुमवर जाऊन सगळीकडे शोधलं पण तिथं डॉक्यूमेंट्सचा एक कागद सापडला नाही.तुला फोन करून सांगायचे म्हटले तर माझ्याकडे फोन नाही,मग मी आपल्या रूमवर जाऊन तास-दिड तास झोपलो.म्हणून उशीर झाला.(खिशातून पैसे काढून देत)हे घे साठ रुपये."
मी-"साठच रूपये?"
"हो, बससाठी वीस रुपये आणि वीस रुपयांची पुरी भाजी खाल्ली,लय भूक लागली होती सुभाष,म्हणून.", दिपक लाचार होऊन बोलला.
दिपकने पैसे खर्च केले म्हणून मला राग आला होता पण त्याचा केविलवाणा चेहरा पाहून माझे डोळे भरून आले, मलाही भूक लागली होती,भूकेनं माणसाची काय अवस्था होते हे जाणवत होतं(त्याच्या खांद्यावर हात ठेवून)
मी-"चल,शेजारच्या टपरीवरून नास्ष्टा करून येवूया."
आम्ही दोघं टपरीवर जाऊन दोन दोन वडापाव खाल्ले.चहा प्यायल्याने लवकर भूक लागत नाही म्हणून पैसे कमी असतानाही अन् चहा प्यायला आवडत नसताना चहा पिलो,
चहा पिताना आठवलं, शितल?.. तिनं रात्री काय खाल्लं असेल का? अन् आता तिला भूक लागली असेल.
पैसे कमी उरले होते,किमान चहा सोबत बिस्कीट खाईल,म्हणून तिच्यासाठी दोन पार्ले बिस्कीटचे दोन पुडे आणि प्लॅस्टिक पिशवीत दोन कप चहा घेतला.
आता शंभर रूपयातले फक्त दहा रुपये उरले होते.मी दिपकला सांगितले,"तू रूमवर जा, तिथून आमच्या आॅफिसवर जा, अन् माझं नाव सांगून साहेबांच्याकडून पाचशे रुपये घेऊन ये, तसं मी त्यांना फोन करून सांगितले आहे.मी इथंली व्यवस्था करून येतो.
तो निघाला पण त्याच्याजवळ 'एस टी बस'ने जाण्यासाठी पैसे नव्हते.त्याने हात पुढे केला
दिपक-"तिकटला पैसे?"

क्रमशः
कथेचा पुढचा भाग-III
_सुभाष आनंदा मंडले
(9923124251)