santaji jagnade wife. yamuna in Marathi Magazine by Sanjay Yerne books and stories PDF | संताजी जगनाडे महाराजांची सावली  (पत्नी),  ‘यमुना’

Featured Books
Categories
Share

संताजी जगनाडे महाराजांची सावली  (पत्नी),  ‘यमुना’

लेख- 
संताजी जगनाडे महाराजांची सावली  (पत्नी),  ‘यमुना’ 
संत संताजी जगनाडे महाराजांची पत्नी, एवढीच आणि फक्त हीच ओळख. मात्र अजूनही समाजातील स्त्रियांनाच नव्हे तर पुरूषांनाही ‘यमुना’ हे नावही ठावूक नाही ही शोकांतिकाच.
   आपल्या वारकरी संप्रदायात, भागवतधर्मात भक्ती, अभंग तथा विद्वतेनं संतपद मिळविणारे जगदगुरू संताजी जगनाडे महाराज हे चरित्र आता रूढ झाले. पण संताजी विषयीची आस्था व प्रेरणापुरूष म्हणून जी जाणीव हवी होती ती तोकडीच वाटते. संतांना जातीप्रथेत बांधल्या गेल्यानेही संताजी मराठी भाषिकांपुरतेच सिमित राहिलेत असेही निदर्शनास आले. मात्र तुकारामांचे सहलेखक म्हणून असलेली तोंडओळख यापलीकडेही संताजी हे युगपुरूष होते. मानवतेच्या कल्याणासाठी झिजणारे मार्गस्थ होते. हे लक्षात घ्यायला आता वेळ लागणार नाही. संताजीवरील उपलब्ध साहित्य हे मोजकेच व अल्पपृष्ठांचे. यातूनच संताजी जगनाडे यांचं विस्तृत चरित्र कादंबरीत बांधून ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ ही कादंबरी मी पूर्ण केली. कादंबरी खूप गाजली, तेवढीच प्रसिद्धीस पावली मात्र संताजी घरोघरी पूजला जावा, पुस्तकरूपाने तो घरी देव्हार्यात यावा ही दुर्दम्य इच्छा....   
आपला संत आपणच आकाशाएवढा करायला हवा. पण भारतीयांचे मने व्यापणारा संत आमच्या मनमेंदूत छोटा राहू नये ही खंत...
    ‘यमुना’ ही संताजीची पत्नी. मात्र कुठल्याही अभ्यासात, इतिहासात, प्रवचनात पुराणात किंवा तंत्रसाधनात साहित्यिकांनी तिची नावापुरतीही नोंद घेतलेली नाही. मात्र मी ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ कादंबरी लिहितांना ही यमुना माझ्या डोळयासमोर तरळत होती. समाजासाठी ही कारूण्यमूर्ती आहे. ती साहित्यात यावी ही इच्छा, मलाही साहित्याप्रति आस्था असल्याने व यमुनेच्या माध्यमातून नवा विषय व एक नावीन्यपूर्ण कल्पक प्रयोग करण्याचा मार्ग मिळाल्याने मी यमुनेविषयी विचार करू लागलो.
   संताजी सारखा संतसूर्य तथा क्रांतीसूर्य, तेजस्वी युगपुरूषाची ‘यमुना’ त्यांचेसोबत आजीवन सहवास करतांना, ती तिच्या आयुष्यातील क्षण कशी जगली असेल याचाही विचार यायचा. 
   गौतमाची यशोधरा, शहाजीची जिजाऊ, महात्मा फुल्यांची सावित्री, बाबासाहेबांची रमाई याप्रमाणेच संताजीची यमुना साहित्यात यावी असंच वाटायचं. यमुना एक संताजीच्या महत्तम कार्याची भागीदार होती. पण तिचं जीवन अंधारागत राहिलं. प्रत्येक पुरूषाला घडवण्यात एका स्त्रिचा हात असतो. संताजीच्याही आयुष्यातील हा वाटा यमुनेप्रति अगदी आदराचा होता तेवढाच समाजाप्रति वंदनीय आहे असे मनोमन वाटते.
   संताजी महाराजांच्या जन्मापासून ते मरणापर्यंत संताजीचे कर्तृत्व खडानखडा वाढत असतांना यमुना प्रत्येक जीवनप्रसंगात्मक घटनेची साक्षीदार होती. एवढंच नव्हे तर संताजी आणि यमुनेचं रूपही एकच होतं. यमुनेचं संताजीप्रति झिजणं, सोसणं, विरहात्मक जगणं, कुटुंबियाप्रति आदराचं वागणं, गावातलं अगदी प्रमुखतेचं स्थान, माणुसकी तत्त्वाला निपजणं, रयतेच्या कल्याणासाठी चक्रेश्वराला साखळं घालणं, सारं काही जगणं तिचं आम्हाला दिसायला हवं होतं. पण कुण्याही साहित्यिकांच्या ते लक्षात आलं नाही. संताजीच्या विचारांचा प्रसार वृक्षाच्या डेरेदार फांदयागत बहरला परंतु त्यामागे उभ्या असलेल्या यमुनेच्या वैचारिकतेचा प्रसार मात्र अजूनही खुंटलेलाच राहिला. एकंदरीत ‘यमुना’ हे दुर्लक्षित, उपेक्षित असं पात्रं. कुटुंबाला, समाजाला आणि संताजीलाही प्राणपणानं जपणारी यमुना आम्हाला दिसू नये हीच शोकांतिका दूर सारण्यास्तव आणि अगदी संताजीच्या बगलेलाच आता तिचं तैलचित्र लावून तिला पूजण्यास्तव, तिची आदर्श प्रेरणा या जगातील सर्व स्त्रियांना मिळण्यास्तव हे यमुनेचं प्रकटण आपल्या मना मनात होने अगत्याचे आहे.
   यमुनेप्रति मी कित्येक दिवस-रात्र लेखनात्मक विचार करीत अस्वस्थ होवून जगलोय. जणू यमुनामाता मला साद घालित होती. ‘मला संताजीच्या विचारपीठावर साहित्यात स्थान दे !’ अशीच म्हणत राहिली.
   ‘यमुना’ आठवतांना माझे डोळे पाणावले जायचे. संताजीबद्दल असलेला आदर तेवढाच यमुनेप्रति एक मुलगी, माता, आई आणि संताजीची पत्नी या रूपाने डोळयासमोर तरळत राहिली. मी अनेक प्रश्नात गुंतत यमुनेला या बंदिस्त संतकालखंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे.
   ‘यमुना’ लिहितांना, ‘कहाणे घराण्यातील खेड येथील यमुना वयाच्या सातव्या वर्षी सदुंबरेत संताजीसोबत लग्न होवून आली.’ एवढीच ती नोंद मी बघितली होती. तिच्याबाबत शोधूनही काही संदर्भ मिळेना. तिचं जन्मापासून ते अखेरपर्यंत जगणं, वागणं, राहणं सारं काही रितंच होतं. एवढंच काय तर घराण्यातील व्यक्तीचे नावे, पात्र, बहीण, भावंडे, नातलग याबाबतही काहीच नाही. तिचं संताजीसवे विट्टल-रूक्मिणी सारखं जगणं... फक्त विरहाचं असावं हाच कयास होता. एवढेच इमले. यमुना संताजीच्या अखेरपर्यंत होती काय ? नंतर ती कशी जगली ? कुठं जगली ? मुलाबाळाचं काय झालं ? संताजीच्या गाथेचं काय झालं ? तिचा अंत कुठे नि कसा झाला ? एक ना अनेक भंडावून सोडणारे प्रश्न...
   तुकाराम महाराजापेक्षाही जास्त वर्षे आयुष्य जगून सदोदीत या मनुवादयाशी झुंज देत अभंग निर्मिती करणारा संत संताजी निश्चितच जगद्गुरू म्हणून प्रसिद्ध व्हायला हवा होता. एवढंच नव्हे तर ते संत शिरोमणी होते, तुकारामांचे साहित्य त्यांनी जीवापाड जपले. ते आजही अभंगरचनेच्या रूपाने का असेना आपणास प्राप्त झाले आहेत. गाथेच्या रूपाने ते प्रकाशित आहेत. मात्र संताजीनेही अनेक गावोगाव प्रबोधन-कीर्तन केले. शिवाजी, संभाजी राजे अशा झुंझार छत्रपती वीरांची त्यांना साथ लाभली. त्यामुळेच ते फार फार उंच स्थानी कीर्तीवंत झालेत. मात्र हे मनुवादयाना खटकले आणि त्या लोकांनी त्यांना संपविले तसेच संताजीच्या मृत्यूनंतर त्यांचं अफाट साहित्य अभंग, नाव, कीर्ती सारं काही धुळीस मिळवलं होतं हे नक्की... या प्रसंगाचीही यमुना साक्षीदार असावी आणि म्हणूनच एवढ्या महान विभूतीच्या सहचारिणीला जातीव्यवस्थेच्या कक्षेत बांधत उपेक्षित राखल्या गेलं. नव्हे तर तिचा नामोल्लेखही संपविण्यात आला आणि अभंग दाखल्यावरून सहजच ती दूर गेली...  यमुना हे चारशे वर्षापूर्वीचे शिवकालखंडातील सामाजिकदृष्टया महत्वपूर्ण पात्र होय. मनुवादी सुस्कृतीच्या काळात रयतेचे होणारे हाल बघून राजमाता जिजाऊने स्वराज्य स्थापनेचा पूर्णत्वास नेलेला संकल्प आपणास ठावूक आहेच. अर्थात राजमाता जिजाऊ ही या युगातील पहिली महिला होय. जीने या रयतेच्या मानवतावादी कल्याणाचा मार्ग पत्करला. तो मार्गच खरेतर नामदेवादी संताच्या वारकरी भागवदधर्माचा पाया होता. आणि म्हणूनच आपण जिजाऊला रयतेच्या माता म्हणतो. त्याच काळात त्यांच्या विचारांची सहकारी होत संताजीच्या पत्नी यमुनामाई ने संताजीला या मानवतामुक्ती लढयाच्या कार्यात सहकार्यच केले नव्हे तर स्वतःला त्यांच्याशी झोकून देत कार्य केले हे लक्षात घ्यायला हवे. त्या कालखंडात स्त्रीयावर असलेली बंधने व तीचा होणारा हा छळ आपणास ठावूकच आहे. सुलतानशाही आणि मनुवादीवृत्ती एकाच आघ्याडयावर कार्य करून या देशातील व्यवस्थेचे नामोहरण करीत आर्थीक पासून शारिरीक बाबी पर्यंत शोषण करीत होत्या. या शोषणशाहीला संपविण्यास्तव यमुनाचे जगणे व तीचे तेवढयाच ताकदीने गावात उभे राहून संघर्ष करणे हे लक्षात घ्यायला हवे.
    यमुना ही सुसंस्कृत कुटुंबातील श्रीमंत व्यापारकर्त्याची मुलगी होती. तीचेवर वारकरी संप्रदायाच्या विचाराचा प्रभाव होता त्यामुळेच ती पांडुरंग भक्तीत तल्लीन असायची याचेही दाखले मिळतात. एवढेच नव्हे तर तुकारामांची पत्नी जिजाई आणि यमुना यांचं माहेर हे खेड येथिल होतं. हेही सिद्ध झालेलं आहे. मात्र यमुना हे एक करूणामयी पात्र आहे. तीच्या संसाराचा प्रवास हा खरेतर एका अग्नीकुंडातील होमयज्ञच असल्यासारखा भास होतो. तीचं मुलांना जपणं नव्हे तर पुढच्या युगाला दिशा देण्यास्तव संस्कारमयी करणं हीच तर आजच्या समाजाला मिळणारी संस्कारमयी शिदोरी आहे. मात्र आज तेली समाजाने कधीही यमुनेचा तीच्या प्रकटणाचा विचारच केलेला नाही. निव्वळ राजकीय चिंध्याचा आणि स्वस्वार्थाचा आर्थिक बाजार करण्यापलीकडील दुसरी सामाजिक दृष्टी इथे विचारमंचावरून मिरवल्याच जात नाही ही खेदाची बाब वाटते. समाजातील आर्थिक संपन्न व्यक्तीमत्वांनी रथयात्रेवर लाखो खर्च करण्यापेक्षा जर संताजी इतिहासातील निरीक्षणे व त्यातील साहित्याला प्रकटन करण्यासाठी व ते साहित्य व सामाजिक भूमिका घरोघरी निर्माण करण्यास्तव खर्च केला असता तर आज समाज बौद्ध धर्माप्रमाणे खरेच समोर गेला असता असे सहज वाटते. ज्या समाजाचं साहित्य त्यांचाच हजारो वर्षानंतर इतिहास उरणार आहे. तोच समाज जगाच्या पाठीवर पुढे उरणार आहे हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. आज चारशे वर्षानंतर यमुना याबाबतीत आपण विचार करतो आहोत. समाजात अनेक विषय समाजातील मानसांच्या दुःख दैन्य वेदना तेवढीच संपन्नता यावरही लेखनात्मक विचार होवून एक समाजाचे साहित्य व रूपरेषा समोर येणे गरजेच वाटते आहे. फारतर प्राचीन समाजाचा एैश्वर्यसंपन्न इतिहास आज काळाच्या पडदयाआड आहे. कारण देव धर्म यापलीकडील क्षितीज दृष्टी समाजात उत्पन्न झाल्याशिवाय समाजाच्या कक्षा रूंदावून समाज विकास साध्य होवू शकत नाही. यासाठी खरेच एकोपा व सामंजस्य हवे तेवढेच समाजाने पुढील उदिष्ठ पेरून कार्य करायला हवे. असे यमुनाच्या जीवनचरित्राचा बारकाहीने अभ्यास केल्यास आदी निरीक्षणात्मक बाबी समोर येतील.
 असो विषयांतर करण्यापेक्षा आपण समाजाच्या यमुनेला बाबासाहेबांच्या रमाई यासारखं आदरस्थानी ठेवून जगलो वागलो पाहिजेत. तेवढाच प्रत्येक मंचावरून तो प्रत्यय येणे गरजेचे आहे असे मला तरी या लेखविचार दृष्टीने वाटते आहे..
   असेच विचारांचे प्रस्थ मनात कवडसे घेवून येत आणि मी संताजीच्या साकार चरित्र कादंबरीचा धागा पकडीत ही ‘यमुना’ साकारली आहे.
   ‘यमुना’ मी झपाटल्यागत विचार करीत लेखनी बद्ध केली. तिचे जीवन, घटना, प्रसंग, बालपण, विरहाचं जगणं, संताजीप्रति आदर, संताजीचं मूल्य ते जीवन हे सारं काही माझ्या मनातील आदरयुक्त कल्पनेचा थरार होय. या यमुनेरूपी लेखनाला संताजी व यमुनेला एका रथाच्या दोन समान चाकात गुंफण्याचा हा अल्पसा प्रयत्न केला आहे. यमुनेप्रति कादंबरी लेखन हा रचनात्मक दृष्ट्या नवा कल्पक प्रयोग होय.
   यमुना जशी मला दिसायची, मनात तिचे पात्रं जसे रूंजन घालायचे, अस्वस्थ करायचे, तसेच केलेले हे शब्दांकण होय. निश्चितच ही यमुना सर्वांना आवडेल एवढंच नव्हे तर ती संताजीसह पूजल्या जाणार. समाजातील स्त्रियांनाही यातून नवे कल्पनादर्श मिळतील या हेतूने.....
यमुना वाहत्या प्रवाहाची धार
संताजीच्या मृदंगाची तार
सावली ज्ञानसूर्याची ती
जगली जगद्वंद माता म्हणूनी !!
- विट्टलाचरणी -
।। जय संताजी, जय यमुना ।।

   लेखक
संजय वि. येरणे
नागभीड - जील्हा- चंद्रपुर मो 9404121098
(लेखक - ‘संताजी जगनाडे एक योद्धा व संताजीची सावली यमुना’ या जगातील सर्वप्रथम निर्माण महाराष्ट्र बुक आफ रेकार्ड कादंबरीचे  निर्माते अभ्यासक आहेत. अधिक महितिसाटी वाचा प्रस्तुत कादंबरी. )