" माने , संभाळून राहा बरं ....झोपशील नाहीतर
पाच- पाच खून केलेत त्यानं तुझा पण कार्यक्रम होईल म्हणून सांगतो.....
ड्युटी वरती बदलून आलेल्या हवालदाराला , घरी जाणारा हवलदार सावधानतेचा इशारा म्हणून हे सांगत होता .....
पण त्याला हेच कळालं नाही की डायरी मध्ये फक्त तीन खूनांचा उल्लेख होता . मग पाच खून कुठून काढले .
' मी कधी केले ५-५ खून ' तो जाम वैतागला
इथे काहीतरी भलताच घोटाळा होता. त्याच्या विचारांची चक्रे उलटी सुलटी धावत सुटली . त्याच्या मनात विचारांचा गोंधळ उडाला . तेव्हाच त्याला तो बदलून आलेला हवलदार म्हणाला ....
" का ओ भाऊ , जगावर एवढा कसला राग तुमचा ....?
पाच पाच खून केले ते पण एवढ्या बेकार पद्धतीने...
तुम्हाला खून तर कसं करू वाटले एवढ्या क्रूरतेने ...? "
गोल चेहरा , सावळा रंग , पान खाऊन लाल झालेल्या ओठावरती काळी मिशी , सुटलेलं पोट आणि समाधानी चेहरा . तो माने हवालदार होता .
" मी नाही केले ......
" मग डिपारमेंट काय वेढं आहे का तुम्हाला पकडायला .....? आणि आज तर स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमच्या हेड लाच मारायला निघालात तुम्ही .....?
" अहो मी त्यांना वाचवायला गेलो होतो आणि मीच वाचवलं त्यांना . नाही तर त्यांचा मृत्यू निश्चित होता .
" रंगेहात पकडलंय तुम्हाला आज आणि म्हणताय मी वाचवायला गेलो होतो ...!
पण मला एक कळत नाही एवढं 5 खून केल्यावर एकही पुरावा सोडला नाही तुम्ही पण आजच कसे सापडला......?
गन्या काही बोलणार तोवर आवाज आला ...
" माने सोडा त्याला . काय करताय तिथे...?
" साहेब तुम्ही ...? तब्येत ठीक आहे ना ..?
" एकदम मस्त आहे , त्याला बाहेर काढा . चुकीच्या माणसाला पकडलंय .
" हो साहेब सोडतो , लगेच बाहेर काढतो .
मानेनं पळत जाऊन चावी आणली आणि लगबगीने गण्याला सोडवून बाहेर काढलं .
" गणेश , गणेशच ना.... चल माझ्याबरोबर .....
हा तोच माणूस होता ज्याला गण्याने खोलीतून गोगलगाईच्या तावडीतून सोडवूलं होतं . आता त्याच माणसांना त्याची तुरुंगातून सुटका केली .
गण्याला कळेना काय चाललं होतं ते . त्या माणसाला तरी विचारावं म्हणून तो म्हणाला
" पण तुम्ही ....
त्याला मध्येच तोडून तो म्हणाला
" चल गपचूप माझ्या बरोबर , शांत रहा , आणि तुला भूक वगैरे लागली असलच , घरी गेल्यावरती जेवण कर . मग निवांत बसून बोलू.....
त्याला इतक्या वेळ काहीच जाणवलं नव्हतं . पण जेव्हा जेवणाचं ऐकलं तेव्हा त्याला कडकडून लागलेली भूक जाणवली . दोघे घरी पोहचले . तेच घर होतं ज्या ठिकाणी तो काही तासापूर्वी आला होता . एक भयंकर अमानवी प्रकाराला ती वस्तू सामोरी गेली होती . पण त्याची खूण ती वरची खोली सोडली , तर कुठेच नव्हती . कारण जसजसा काळ पुढे जातो तसतसे स्थळ-काळात बदल होतच असतात . दार उघडंच होतं .ते दोघेही आत गेले....
" हाच ना गणेश ......
तो पोलिस कोणालातरी म्हणाला
" हो , हो हाच ....
एक मधुर आवाज त्याच्या कानावर पडला . आपसूकच त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले , आणि तो पाहतच राहिला . मूर्तिमंत सौंदर्य त्याच्यापुढे अवतरले होते . ते काळेभोर केस , गोल डोळे ,ज्याकडे पाहिल्यावर कोणताही नशा फिका वाटेल , ते गुलाबी ओठ , ज्यात गुलाबाच्या पाकळ्याहून जास्त मार्दाव होते , ते लांब काळे केस , तो अटकर बांधा , ती नाजूक कटी , सारे काही सुंदर होते........!
त्याने पाहिले , तो पाहत होता ,आणि तो पाहतच राहिला . त्याने अंजलीला पाहिलेच होते . तेव्हाही तो चाट पडला होता. पण या सौंदर्यावर तो मनातून मोहित झाला होता. त्यात वासना नव्हती ,ना प्रेम होतं . त्याच आकर्षण होतं . एक वेगळं समाधान होतं .
" गणेश ......"
तिचे ओठ विलग झाले . थोडी हालचाल झाली , पण गाण्याच्या कानापर्यंत कोणताच आवाज पोहोचला नाही .
तो एका वेगळ्याच विश्वात , एका वेगळ्या मितीत पोहोचला होता . त्याने पूर्वी दोन वेळा अशा सुंदर रूपवतींना पाहिले होते . पहिली म्हणजे शेवंता व दुसरी अंजली . पण या रुपाचे सौंदर्य काही औरच होते . गण्यासाठी जणू आजूबाजूचा स्थल-काल अनंत काळासाठी त्याच क्षणावर थांबला होता . किती वेळ झाला होता काय माहित ? तिचे सौंदर्य , ते रूप कितीही पाहिले तरी जूनं होतच नव्हतं .
इतका वेळ स्तब्ध असणाऱ्या त्या वातावरणात अचानक हालचालींचा वेग वाढला .त्याच्या सर्वांगावर शिरशीरी येऊन गेली . नि इतका वेळ फक्त डोळ्यांच्या संवेदना वाचण्यात गुंग असलेल्या मेंदूला इतर ज्ञानेंद्रियांची संवेदना वाचायला वेळ मिळाला. मग अचानक कानामध्ये आवाज वाढले . त्वचेला वेदना झाल्या . डोळ्यांनाही त्या रूपाला सोडून इतर परिसराची जाणीव झाली .
" तू तर फारच बिघडलेला निघाला की रे ...!
तो पोलीस अधिकारी म्हणाला ज्याने त्याला सोडवून आणलं होतं त्यानेच त्याच्या पाठीत धपाटा घालत गन्याला ताळ्यावर आणले .
" अरे ऐक तर ती काय म्हणते " तोच म्हणाला ..
गन्याने तिच्याकडे पाहिले ...
"आता काही नाही म्हणणार ती , आता मीच सांगतो टेबलावरती गरम-गरम जेवण वाढले आहे , जेवून घे , मग बोलू....
जेवण म्हटल्यानंतर त्याच्या पोटात आगीचा डोंब उसळला . भूक इतकी लागली होती की त्याला काही सुचलं नाही , तो सरळ टेबलाकडे निघाला .
" अरे आंघोळ वगैरे तर कर ...
" करतो , करतो विसरलोच....
सगळा कार्यभाग आटपून तो जेवायला बसला . त्याच्या आयुष्यात त्याने प्रथमच इतके स्वादिष्ट जेवन चाखले असावे . त्याला तिच्या हाताची चव फार आवडली .
" जेवण फार चविष्ट झालेय अं ....
आणि त्याने तिच्याकडे कटाक्ष टाकला .
" तिच्याकडे बघुन नको , तिनं नाही बनवलं . हॉटेलमधून मागून ठेवलं होतं काल , तिने फक्त गरम केलंय....
या प्रात्यक्षिक विनोदावर तिने हळूच हसून आपला प्रतिसाद दिला . हा विनोद जरी गण्या वरती झाला असला , तरी त्याला वाईट वाटलं नाही . उलट तिला हसताना पाहून पुन्हा एकदा त्याच स्थल-काल स्तब्ध होणार होतं , पण यावेळी त्या पोलिस अधिकाऱ्याने अगोदरच सपाटा लावला . त्यामुळे त्याला ठसकाही लागला...
" असू दे , असू दे नाहीतर पुन्हा एकदा स्तब्ध झाला असता...."
जेवण आटोपल्यावर ते तिघेही सोप्या वरती बसले . त्या पोलिस अधिकाऱ्याने बोलायला सुरुवात केली .