0
सुहास २ मिनिटे अवाक झाला.. तिच्याकडून अश्या प्रतिसादाची त्याने अपेक्षाच केली नव्हती..
रेवतीने सुहासच्या कानाखाली लावून दिली खरी पण नंतर ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागली..
तिला तिच्या भावनांना आवर घालता आला नाही.. इतक्या दिवसाची घुसमट आणि अस्वस्थता तिच्या डोळ्यांवाटे बाहेर पडत होती..
सुहासला रेवतीची एकंदरीत स्थिती पाहून आता पूर्ण खात्री पटली होती कि तिला सत्य परिस्थितीची जाणीव झालेली आहे.. त्याच उद्विग्न मनःस्थितीत नियंत्रणाबाहेर जाऊन तिने हा प्रतिसाद दिला असावा..
आपल्या आजाराबद्दल हिला कळले म्हणजे प्रतीकला सांगायला भाग पाडले असणार रेवाने.. नाहीतर तो स्वतःहून सांगणे शक्यच नाही..
प्रतीकने रेवतीला ते भेटले तेव्हा सगळे सांगितले होते.. "रेवती मन घट्ट करून ऐक.. ऐकल्यावर तुला त्रास होणार हे माहित आहे.. त्याची जाणीव होती म्हणूनच मी आणि सुहासने तुला या सगळ्ययांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता.. पण आज आमच्यावर तू हे सत्य उलगडण्याची वेळ आणलीसच..”
रेवती अगदी प्राण पणाला लावून प्रतीक काय सांगणार याचा विचार करत होती.. तिचे मन कदाचित काहीतरी अघटित घडल्याचा किंवा घडणार असल्याचा कौल देत होते..
फक्त तिच्या काळजाचा ठोका चुकायचा तेवढा बाकी राहिला होता..
“तर ऐक.. सुहासचा ब्लड कॅन्सर दुसरी स्टेज संपून तिसऱ्या स्टेजमध्ये आहे.. कळले आहे तसे हॉस्पिटलच्या फेऱ्या चालू आहेत" प्रतीक
पुढील माहिती रेवतीला सुहासकडून हवी होती..
आणि म्हणूनच ती आज सुहासला भेटायला आली होती.. अगदी त्याची कोणतीही सबब न जुमानता..
सुहासने आजारपणाबद्दल आणि एकंदरीत सगळ्या परिस्थितीबद्दल रेवतीला माहिती दिली..
बराच वेळ शांतता पसरली होती..
ते दोघे निघाले तरी रेवती शांतच होती..
सुहासने एक-दोनदा तिच्या कडे पहिले.. पण तिचे लक्ष नव्हते.. एकटक कुठेतरी बघत विचार करत करत ती चालली होती..
विचारांच्या लाटेवर स्वार होत.. त्या प्रवाहाबरोबर वाहत वाहत रेवती खूप पुढे निघून गेली.. तिला काय करायचे होते हे तिने मनाशी पक्के केले होते..
त्या प्रवाहातून स्वतःला बाहेर खेचत.. चालता चालता रेवती अचानक थांबली.. सुहासला ही तिने हाताला पकडून थांबवले.. त्याचा हात हातात घेत
त्याला विचारू लागली "तुझे माझ्यावर किती प्रेम आहे?" सुहासला या वेळेला हा प्रश्न अगदीच अनपेक्षित होता.. त्यामुळे तो थोडा वेळ शांत उभा होता..
"बोल ना.." रेवती
"चांदण्यांची असंख्य फुले गगनांगणातून निखळून धरेवर यावी.. आणि ते सारे धरेवरील चांदण शिंपण वेचण्यासाठी जेवढा अवधी लागावा ना तेवढे प्रेम मी तुझ्यावर करतो.." सुहास
सुहासच्या उत्तराने तिच्या चेहऱ्यावर आपसूकच एक निर्धाराची रेषा उमटली..
तिने त्याच्या डोळ्यांत खोलवर पहिले.. त्याचा पकडलेला हात आणखी आश्वस्थपणे दाबत.. त्या गवसलेल्या निर्धाराच्या पायरीवर चढून रेवती बोलू लागली..
“आपण आपल्या घरी सांगू या का आपल्या दोघांबद्दल.. मला तुझी हक्काने काळजी घ्यायची आहे.. इतके प्रयत्न करायचे आहेत की माझे प्रयत्न पाहून हा आजार आपल्या आयुष्यातून कायमस्वरूपी पळून जाईल..”
सुहास अर्थातच रेवतीच्या हा वेडेपणा पाहून अवाक झाला होता..
"हि मुलगी स्वतःचे आयुष्य मातीमोल करायला निघाली आहे.. भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची या क्षणी तरी कोणालाच कल्पना नाही.. त्यामुळे असे पाऊल उचलणे शुद्ध मूर्खपणाचे ठरेल.." सुहास विचार करत होता..
पण रेवती काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती.. तिच्यातील बंडखोर वृत्तीने तिच्या सद्सद्विवेक बुद्धिविरुद्ध बंड पुकारले होते..
रेवतीने सुहासचे काहीही ऐकले नाही.. ती तिच्या निर्धारावर कायम होती..
तिने आधी स्वतःच्या घरी सांगितले..
अर्थातच रेवतीच्या आई-बाबांना धक्का बसला की आपली मुलगी प्रेमात आहे.. आणि या मुलीने आपल्याला याआधी साधी कल्पनाही दिली नाही..
पण त्याहून ही मोठा धक्का हा होता की ती व्यक्ती कॅन्सरपीडित आहे हे माहिती असूनही रेवती त्याच्याशीच लग्न करू इच्छित होती..