अष्टपैलू व्यक्तित्वाचे धनी : सावरकर
'देशाच्या स्वातंत्र्यासाठी शत्रूस मारिता मारिता मरेतो झुंजेन...जर यशस्वी झालो, तर माझ्या मातृभूमीला स्वातंत्र्याचा अभिषेक घालेन आणि हरलो तर माझ्या रक्ताचा अभिषेक तिच्या चरणांवर घडेल......' असे स्फूर्तिदायी, ह्रदयस्पर्शी आणि मातृभूमीबाबत नितांत आदर व्यक्त करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत..... विनायक दामोदर सावरकर!
विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ या दिवशी झाला. नाशिक जिल्ह्यातील भगूर हे त्यांचे जन्मगाव! भगूर येथे राहणारे दामोदर सावरकर हे त्यांचे वडील. त्यांच्या आईचे नाव राधाबाई सावरकर असे होते. दामोदर यांना बाबाराव आणि नारायण ही आणखी दोन मुले होती. बाबाराव विनायक यांच्यापेक्षा मोठा तर विनायकाच्या पाठी जन्मलेला नारायण हा भाऊ! नयना (नैना) ही या तीन भावांची एकुलती एक बहीण! विनायक यांचे प्राथमिक शिक्षण भगुर येथे झाल्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी त्यांनी शिवाजी विद्यालय नाशिक येथे प्रवेश घेतला. १८९२ यावर्षी विनायकाच्या जीवनात एक अत्यंत दु:खदायी, क्लेशदायक अशी घटना घडली. त्यावेळी विनायक केवळ नऊ वर्षांचे होते. त्यांची आई राधाबाई यांचे निधन झाले. सात वर्षांनंतर आलेल्या प्लेगच्या आजारात विनायकचे वडील दामोदर सावरकर यांचेही निधन झाले. दामोदरराव यांचे मोठे चिरंजीव बाबाराव यांच्यावर विनायक आणि नारायण या दोन्ही लहान भावांच्या पालनपोषण आणि शिक्षणाची जबाबदारी येऊन पडली. बाबाराव आणि त्यांच्या पत्नी येसूबाई या दोघांनी दोन्ही लहानभावांना आईवडिलांप्रमाणे आधार दिला, सांभाळ केला. लहानपणापासूनच विनायक अत्यंत हुशार आणि बुद्धिमान म्हणून ओळखल्या जात होता. विनायकची वक्तृत्व शैली आणि लेखनी या दोहोंवर प्रचंड प्रभुत्व होते. तो शालेय जीवनात उत्कृष्ट काव्य रचना करत असे. शाळेत असताना त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेली 'स्वदेशीचा फटका' आणि 'स्वतंत्रतेचे स्तोत्र' ही दोन गीते चांगलीच गाजली. त्याचबरोबरीने विनायक यांनी वयाच्या दहाव्या वर्षी इतिहास आणि इतर धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. याच सुमारास चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली. सर्वत्र संताप, चीड असे वातावरण असताना छोटा विनायक सरळ त्याच्या कुलदेवतेसमोर जाऊन उभा राहिला. कुलदेवता 'भगवती' समोर त्याने शपथ घेतली,'देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारुन मारिता मरेतो झुंजेन' अशी प्रतिज्ञा केली.
दरम्यान १९०१ या वर्षी त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल करणारी एक घटना घडली त्यावेळी त्यांचे वय जेमतेम अठरा वर्षांचे होते. रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर यांची कन्या यमुनाबाई यांच्यासोबत विनायकचे लग्न झाले. याचवर्षी विनायक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला. विनायक माध्यमिक शिक्षण घेत असताना तो चाफेकर बंधूंच्या देशप्रेमाने भारावून गेला. त्यांच्याकडे आकर्षित झाला. विनायकचे शाळेत असतानाही चौफेर वाचन होते. 'काळ' या वर्तमानपत्रातील लेख आणि विचार यांच्या प्रभावाने त्यांच्या राष्ट्रभक्तीला चालना मिळाली. विनायकची पुढे शिकण्याची इच्छा आणि त्याची प्रखर बुद्धिमत्ता लक्षात घेऊन बाबाराव यांनी त्यांना फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. विनायक यांचे सासरे चिपळूणकर यांनीही विनायकाच्या शिक्षणासाठी मदत केली. फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी देशभक्ती, पारतंत्र्य आणि देशप्रेम या विषयावर तेजस्वी विचार मांडले. १९०५ या वर्षी विनायक दामोदर सावरकर यांना मुंबई विद्यापीठाची बी. ए. ची पदवी मिळाली. हे यश मिळताच एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडली. त्यावेळी हुशार विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन उत्तम शिक्षण घेता यावे म्हणून 'शिवाजी शिष्यवृत्ती' मिळत असे. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या वतीने ही शिष्यवृत्तीची योजना पुरस्कृत होती. लोकमान्य टिळक यांनी या शिष्यवृत्तीसाठी विनायक यांच्या नावाची शिफारस केली. त्यावेळी विनायक दामोदर सावरकर यांना खूप आनंद झाला. कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले. तिथला अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करून आल्यानंतर त्यांनी मुंबईच्या विल्सन विधी महाविद्यालयातून एलएलबी हा अभ्यासक्रमही आत्मसात केला. १९०५ याच वर्षी एक आगळावेगळा प्रसंग घडला. बंगालची फाळणी झाली आणि सावरकरांनी पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयाजवळ दसऱ्याच्या दिवशी विदेशी वस्त्रांची होळी पेटवली.
* अभिनव भारत संघटनेची स्थापना *
हे सारे करत असताना राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा ह्यासाठी त्यांनी 'अभिनव भारत' नावाची एक संघटना थेट लंडनमध्ये स्थापन केली. या संघटनेच्या स्थापनेचा इतिहास तसा विलक्षण आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे सावरकर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ०१ जून १९०६ रोजी 'परशिया' या बोटीतून लंडनला निघाले. बोटीत अनेक भारतीय तरुण होते. त्यांच्याशी सावरकरांचा परिचय झाला. या प्रवासात सावरकरांनी त्या तरुणांसोबत देश स्वतंत्र कसा करता येईल अशी सातत्याने चर्चा सुरू केली. केशवानंद आणि शिष्टाचारी या दोन तरुणांशी खास मैत्री झाली. एखादी गुप्त संस्था स्थापन करण्याचा विषय निघाला आणि शिष्टाचारी म्हणाले की,अशी संस्था आपल्यासारख्या मुठभर तरुणांनी स्थापून काही उपयोग होणार नाही. आपल्याला ओळखतातच असे किती लोक? अशी संस्था टिळक, लाला लजपतराय किंवा बडोद्याचे गायकवाड यांच्यासारख्या कुणी स्थापली तर आपण त्या संघटनेत सहभागी होऊन कार्य करू. त्यावर सावरकरांनी शिष्टाचारी यांना देश-विदेशातील अनेक व्यक्तींची उदाहरणे देऊन सांगितले की, चापेकर बंधूंनी स्वयंप्रेरणेने जुलमी इंग्रजाचे मुंडके उडवले ना? आपल्यासोबत कुणी येईल हा विचार न करता आपण स्वतः काही तरी केले पाहिजे. आगीने आग जशी भडकत जाते तसेच पराक्रमाचे, शौर्याचे आणि चळवळीचे आहे. सावरकरांचे विचार त्या दोघांना पटत होते. परंतु मनाची तयारी होत नव्हती. त्याच रात्री शिष्टाचारी यांनी सावरकरांसोबत चर्चा करून अनेक शंकांचे निरसन करून घेतले आणि ते ताबडतोब एखादी संस्था स्थापन करून लढा देऊया ह्यासाठी सिद्ध झाले आणि बोटीतच संस्थेचे नामकरणही झाले.... अभिनव भारत! पाठोपाठ सावरकरांनी आणि त्या दोघांनीही स्वातंत्र्यासाठी सर्वस्व देण्याची शपथ घेतली. देशसेवेची मोठी चळवळ यातून उभी राहत असल्याचे निदर्शनास येताच इंग्रज सरकारने ही संघटना क्रांतिकारी संघटना म्हणून घोषित केली. या संघटनेच्या माध्यमातून देशातील जनता आणि तरुण यांच्यामध्ये राष्ट्रीयतेचे आणि स्वातंत्र्याचे विचार रुजविण्यास त्यांनी सुरुवात केली. सोबतच इंग्रज सरकारच्या विरोधात सत्याग्रह आणि लढा देण्यासाठी या संघटनेने कार्य सुरु केले. इंग्रजांच्या पारतंत्र्यातून भारतातील लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे हे या संघटनेचे प्रमुख ध्येय होते. देशहित, स्वत्व, देशाची अस्मिता यासोबतच राष्ट्राभिमान यासोबत सावरकरांनी कधीच तडजोड केली नाही. आपण पारतंत्र्यात आहोत ही बोचणी, हे दु:ख त्यांना कायम होत असे. अभिनव भारत ही एक राष्ट्रीय शिक्षणसंस्था होती. इंग्रजी सत्ता भलेही बळकट, सशस्त्र असेल परंतु ती उलथवून टाकणे सहज शक्य आहे. सशस्त्र क्रांतीयुद्धात प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावताना कमीतकमी एका शत्रूला तरी यमसदनी पाठवावे. आपण सुरु केलेल्या कार्यात आपल्याला यश येवो अथवा न येवो. भारतमाता मुक्त करण्यासाठी, शत्रूला धडा शिकविण्यासाठी तू एकटा जरी लढलास, शत्रूने टाकलेले गुलामीचे जाळे तोडण्याचे प्रयत्न करताना तू कामी आलास, तरी हरकत नाही, कारण तू तुझे कर्तव्य पार पाडले आहे. अशा प्रकारची शिकवण अभिनव भारत या संघटनेत दिल्या जात असे. अभिनव भारत ही संघटना कालांतराने केवळ भारतापुरतीच न राहता विदेशात ठिकठिकाणी या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. अभिनव भारत संघटनेचा होणारा विस्तार, होत असलेले कार्य लक्षात घेऊन इंग्रज सरकार बिथरले. ही चळवळ नेस्तनाबूत करण्यासाठी सरकारने १९०९ यावर्षी सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव यांना पकडून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि त्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवून दिले. या घटनेनंतर अभिनव संघटनेचे कार्यकर्ते प्रचंड चिडले, संतापाने पेटून उठले. त्याचा परिणाम असा झाला की, लंडन येथे एक कार्यक्रम सुरू असताना मदनलाल धिंग्रा या क्रांतिकाराने कर्झन वायली या अधिकाऱ्यास गोळ्या घालून यमसदनी पाठवले. काही महिन्यांनंतर नाशिक येथे एक चित्तथरारक घटना घडली. नाशिकच्या विजयानंद सिनेमागृहात क्रांतिकारकांच्या
धाडसी कार्यवाहीत जिल्हाधिकारी जॅक्सन हे बळी पडले. कान्हेरे, देशपांडे आणि कर्वे या क्रांतीवीरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. इंग्रज सरकार या दोन घटनांमुळे खवळले. त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना पकडले. नाशिक येथील कार्यक्रमात जी पिस्तूलं वापरण्यात आली होती ती पिस्तूलं सावरकरांनी पाठवली होती असा आरोप करून वि. दा. सावरकर यांना अटक करण्यात आली. तेव्हा सावरकर फ्रान्समधून भारतात येण्यासाठी इंग्लंडला आले होते. तिथेच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरून खटला चालवण्यासाठी त्यांना भारतात बोटीतून आणण्यात येत होते. समोर अथांग समुद्र पसरलेला असताना सावरकरांनी एक ठाम निर्णय घेतला. त्यांनी सागरात उडी मारली. पोहत पोहत किनारा गाठला. तो किनारा फ्रान्सच्या हद्दीत होता. किनाऱ्यावर असलेल्या फ्रान्सच्या सैनिकांशी भाषेच्या माध्यमातून उचित संवाद न साधता आल्यामुळे सैनिकांनी त्यांना अटक केली. पाठोपाठ आलेल्या इंग्रज सैनिकांनी त्यांना पकडले. भारतात आणून त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. २४ डिसेंबर १९१० यादिवशी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना अंदमान येथील तुरुंगात पाठवण्यात आले. या तुरुंगवासाला काळ्या पाण्याची शिक्षा असेही संबोधण्यात येते. अंदमान येथील तुरुंगात पोहोचताच त्यांना कवितेच्या ओळी सुचल्या...
मुहिब्बाने वतन होंगे हजारो बेवतन पहिले
फलेगा हिंद पिछे और भरेगा अंदमान पहिले.
या ओळींचा अर्थ असा की, या देशावर प्रेम करणारे खूप होतील पण आधी हजारोंना निर्वासित व्हावं लागेल. आपल्या भारताच्या भरभराटाची स्वप्न पूर्ण होईल पण त्यासाठी प्रथम अंदमान भरेल.
अंदमानच्या या तुरुंगात सावरकरांचा भयंकर छळ करण्यात आला. शिक्षेचे प्रकार ऐकले की, अंगावर काटा येतो. त्यांना खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला बैलाप्रमाणे जुंपून तेल काढायला लावले. नारळाच्या काथ्या कुटण्याचे, आणि नारळाचे तेल काढण्याचे अत्यंत कष्टाचे काम दिले. त्यांना अंधाऱ्या खोलीत ठेवण्यात आले. किडे पडलेले अन्न खायला दिल्या गेले. सोबत तुरुंगाच्या परिसरात आणि बाहेर पसरलेली जंगले साफ करण्याची महाकष्टमय शिक्षा मिळत असे. या कामांमध्ये चालढकल करणारांना बेताची छडी आणि कोड्याने मारहाण होत असे. अशी कठिणातली कठीण शिक्षा भोगत असताना सावरकरांना अनेकानेक काव्य स्फुरत होते. परंतु त्यांच्याजवळ ना कलम होती ना कागद होता. ना समुद्राची शाई होती ना आकाशाचा कागद करण्याची परवानगी होती. अशा परिस्थितीत विनायक सावरकरांना काव्यस्फूर्ती शांत बसू देत नव्हती. त्यांनी मग तुरुंगाच्या भिंतीचा कागद केला आणि बाभळीच्या झाडाच्या काट्यांची लेखणी केली. कधी कधी सुचलेले काव्य कोळशाने भिंतीवर लिहायचे. नंतर मुखोद्गत करायचे. अशाप्रकारे लिहून पाठ केलेल्या दहा हजारांपेक्षा जास्त ओळी त्यांनी तुरुंगातून सुटका झाल्यावर पुन्हा लिहून काढल्या. 'सागरा प्राण तळमळला...' हे गीत या अंदमानचीच भेट. हे गीत ऐकताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही. त्याचबरोबर सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना अनेक गझला लिहिल्या होत्या परंतु दुर्दैवाने त्या हरवल्या. गझल रसिकांचे भाग्य असे की, त्या गझला २०१३ च्या जुलै महिन्यात सापडल्या आणि त्याचे गायन बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी केले. 'जयोस्तुते' हे स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र सावरकरांंनीच लिहिले आहे.
एकदा शिवजयंतीच्या निमित्ताने एका कार्यक्रमात व्याख्यान देताना सावरकर म्हणाले, 'आजपर्यंत आम्ही शिवजयंती हा महोत्सव ऐतिहासिक आहे, यामागे कोणताही राजकीय हेतू नाही असे मानत आलो आहोत. परंतु आज आम्ही जी शिवजयंती साजरी करत आहोत ती पूर्णपणे राजकीय आहे कारण शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव करण्याचा अधिकार त्यांनाच आहे, जे शिवाजी सारखे आपल्या मातृभूमीला परकियांच्या तावडीतून सोडवण्यासाठी झुंजत आहेत. हा महोत्सव साजरा करण्यामागे मुख्य उद्देश हाच आहे की, आम्हाला पारतंत्र्याच्या बेड्या फेकून स्वतंत्र व्हायचे आहे. तशी स्फूर्ती आम्हाला मिळावी.' याच व्याख्यानात सावरकरांनी अनेकांना शब्दास्त्राने झोडपून काढले. सावरकरांनी व्याख्यान चालू असताना 'स्वातंत्र्यलक्ष्मी की जय...' असा जयजयकार केला. यासोबतच सावरकरांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याबद्दल ओढ निर्माण व्हावी, पारतंत्र्याची चीड निर्माण व्हावी म्हणून देशभक्तीपर कविता, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी अशा वीरांवर पोवाडे लिहून ते गायनाला सुरुवात केली.
•• कौटुंबिक चढउतार ••
१) बाबाराव सावरकर यांच्या पत्नी सौ. येसूबाई यांचे एप्रिल १९१९ यावर्षी निधन झाले.
२) ७ जानेवारी १९२५ सावरकरांना कन्यारत्नाचा लाभ झाला. तिचे नाव..... प्रभात!
३) वि. दा. सावरकरांच्या मुलाचे नाव विश्वास! त्यांचा जन्म १७ मार्च १९२७ रोजी झाला.
४) १६ मार्च १९४५ रोजी विनायकांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांचा मृत्यू झाला.
५) ८ मे १९४५ या दिवशी प्रभात हिचा विवाह झाला.
६) वि. दा. सावरकरांचे लहाने भाऊ डॉ नारायणराव हे १९ ऑक्टोबर १९४९ रोजी हे जग सोडून
गेले.
* ठळक घडामोडी *
१) वि. दा. सावरकर यांना दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली. अशी शिक्षा भोगणारे सावरकर
हे एकमेव स्वातंत्र्यवीर !
२) सावरकर हे जगातील पहिले असे लेखक की, ज्यांनी लिहिलेल्या '१८५७ चे स्वातंत्र्य समर'
या ग्रंथाला भारतातच नव्हे तर परदेशातही बंदी होती.
३) स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे इंग्रज सरकारने त्यांची पदवी वापस घेतली.
४) भारतीय राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी जे अशोक चक्र आहे ते लावण्याची विनंती सावरकरांनी
राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना केली होती. जी मान्य करण्यात आली.
५) 'राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे लष्करीकरण' असा एक क्रांतिकारी मंत्र सावरकर
यांनी दिला होता.
६) साहित्यिकांना त्यांनी 'लेखण्या मोडा, बंदुका घ्या.' असे घणाघाती आवाहन केले होते.
७) स्वातंत्र्यवीर ही पदवी त्यांना प्र. के. अत्रे यांनी दिली. सावरकर यांना जहाल क्रांतिकारक, महाकवी, क्रियाशील समाजसुधारक, हिंदूसंघटक,हिंदूत्ववादी,राजकारणी, तत्त्वज्ञ, भाषाशुद्धी व लिपीशुद्धी अभियानाचे प्रणेते, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान, विज्ञाननिष्ठ सावरकर, इतिहासकार, इत्यादी रुपात ओळखले जाते.
८) २ मे १९०८ या दिवशी लंडनमध्ये सावरकरांच्या पुढाकारातून पहिल्यांदा शिवजयंती साजरी
करण्यात आली.
९) २४ ऑक्टोबर १९०९ या दिवशी लंडनमध्ये दसऱ्याचा उत्सव साजरा करण्यात आला.
१०) १९०९ यावर्षी ते बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले. परंतु त्यांनी पदवी स्वीकारली नाही.
असे हे थोर समाजसेवक, क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांनी त्र्याऐंशी वर्षाचे वय असताना स्वतःची इहलोकीची यात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अन्नत्याग केला. बावीसव्या दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारी १९६६ ला त्यांनी प्राणार्पण केले आणि या जगताचा निरोप घेतला. जणू बावीस दिवस ते ईश्वराची प्रार्थना करीत होते, 'ने मजसी ने ईश्वरा जीव तळमळला, ने मजसी परत वैकुंठाला.....
प्राण कासावीस झाला......'
'वंदे मातरम् ।'
नागेश सू. शेवाळकर
९४२३१३९०७१